‘आप’च्या या ‘पुजारी ग्रंथी सन्मान योजने’मुळे आता एक नवाच वाद उभा ठाकला आहे आणि तो दिल्लीतील इमामांनी उभा केला आहे. आपल्याला आपलं वेतन बराच काळ मिळालेलं नाही, असा आरोप केला आहे. भाजपची त्यामुळेही पंचाईतच झाली आहे. इमामांच्या बाजूने बोलणं भाजपच्या धोरणात बसत नाही, असंच एकुणात दिसतंय.
नुकताच दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’चे चतुर आणि धूर्त नेते अरविंद केजरीवाल यांनी केलेली ‘खेळी’ अगदीच अनपेक्षित आहे. ती आहे मंदिरांतील पुजारी आणि गुरुद्वारांतील ग्रंथी यांच्यासाठी सुरू केलेली दरमहा १८ हजार रुपये निधी दिली जाणारी ‘सन्मान योजना!’ यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली नि मतांचं घवघवीत दान पदरात पाडून घेतलं.