अफवा शोधणारे ‘एआय’ अस्त्र!

आशिष तेंडुलकर saptrang@esakal.com
Sunday, 31 January 2021

विज्ञानरंग
समाज माध्यमं आपल्या सर्वांना मोकळेपणानं व्यक्त व्हायची संधी देतात. बऱ्याच वेळा या व्यक्त होण्याला कोणतीही बंधने नसतात ना नियंत्रण. अशा माध्यमामुळं अनेक जणांना मुक्तपणे त्यांच्यातील कलागुण समाजासमोर दाखविण्याची संधी मिळाली, महत्त्वाची माहिती घरबसल्या जाणून घ्यायची संधी मिळाली आणि अनेक नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित संकटांमध्ये बचाव आणि मदत कार्यात या समाजमाध्यमांनी सिंहाचा वाटा उचलला.

समाज माध्यमं आपल्या सर्वांना मोकळेपणानं व्यक्त व्हायची संधी देतात. बऱ्याच वेळा या व्यक्त होण्याला कोणतीही बंधने नसतात ना नियंत्रण. अशा माध्यमामुळं अनेक जणांना मुक्तपणे त्यांच्यातील कलागुण समाजासमोर दाखविण्याची संधी मिळाली, महत्त्वाची माहिती घरबसल्या जाणून घ्यायची संधी मिळाली आणि अनेक नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित संकटांमध्ये बचाव आणि मदत कार्यात या समाजमाध्यमांनी सिंहाचा वाटा उचलला. प्रत्येक गोष्टीला जसे चांगले आणि वाईट पदर असतात तसेच ते समाज माध्यमांनाही आहेत - एका बाजूला या माध्यमांचा वापर सर्जनशीलतेसाठी केला जातो आहे तसाच तो दुसरीकडे अफवा आणि खोट्या बातम्या प्रसवण्यासाठीही केला जातो. अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात आणि त्या वेगवेगळ्या मित्र मैत्रिणीकडून पुन्हा पुन्हा प्राप्त होत असतात.

अशाप्रकारे एखाद्या माहितीचा भडिमार परत परत केल्यावर ती बातमी किंवा माहिती बहुदा खरीच असावी असा अनेकांचा समज होतो. काय खरे आणि काय खोटे याबद्दलच्या संवेदनाच जणू बधिर होऊन जातात आणि दुर्दैवाने हे सामाजिक पातळीवर एकत्रितरीत्या घडते. काही वेळा यातून सामाजिक सलोखा धोक्यात येऊन जीवित आणि वित्त हानी होण्यापर्यंत मजल गाठली जाते. समाजमाध्यमांमध्ये पसरणाऱ्या अफवा किंवा बातम्या याची शहानिशा करण्याची कोणतीही सोय सर्वसामान्य वाचकांना नसते. अशा अफवा अनेक वापरकर्त्यांकडून एकाच वेळेला समन्वित पद्धतीने पसरविल्या जातात. त्यामुळे त्या क्षणी बहुतेक ठिकाणी त्याच आशयाच्या बातम्या असल्यामुळे काय खरे आणि काय खोटे हे उपलब्ध वेळात शोधून काढणे जिकिरीचे होऊन बसते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समाजमाध्यमांवरील अफवा किंवा कपोलकल्पित घडामोडी खऱ्या घडामोडींपासून वेगळ्या काढता येतील का हा प्रश्न संगणक शास्त्रज्ञांना पडला - कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या कल्चर अनॅलिटीक्स संशोधक गटाने यासाठीची संगणक प्रणाली विकसित केली आहे.  या संगणक प्रणालीमध्ये आर्टिफिशीअल इंटेलिजन्स अर्थातच AI चा वापर केला आहे.  या अभ्यासाच्या वेळेस असे निदर्शनास आले की कपोलकल्पित षडयंत्र समाज माध्यमांवर अनेक वापरकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपल्या सर्वांच्या नजरेसमोर तयार होत असतात. त्यातील विविध कंगोरे/पदर, त्यातील घटना, पात्रे आणि घटनास्थळ याबाबतचा मजकूर संदेश रूपाने विश्लेषणासाठी उपलब्ध असतो.   त्यामुळे अशा सर्व संदेशांवरून वर उल्लेखिल्याप्रमाणे परस्पर संबंधांचे जाळे विणता येते.  

सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 याउलट खरी कटकारस्थाने पडद्यामागून घडत असतात आणि त्याबाबतची माहिती जसा तपास चालेल तशी उपलब्ध होत असते.  अशा कारस्थानांमध्ये अकल्पित घटक किंवा कंगोरे अथवा पदर यामध्ये क्वचितच संबंध असल्याचे दिसून येते.  आणि प्रत्येक पदरामधील घटनांमध्ये ठराविक पात्रांचा आणि स्थानांचा वारंवार उल्लेख आढळतो.  या भेदांचा फायदा घेऊन अफवा किंवा कपोलकल्पित षडयंत्र ओळखण्याचे तंत्र विकसित करण्यात आले.  आता यामध्ये सर्वांत महत्त्वाची माहिती काय असेल तर ती म्हणजे सामाजिक कथन (social narrative).  सर्वप्रथम सामाजिक कथनाशी (narrative) संबंधित बातम्या/संदेश एकत्र करण्यात आले.  प्रत्येक बातमीमधून त्यामध्ये उल्लेख केलेल्या व्यक्ती किंवा पात्रे, त्यांच्याबद्दलच्या घटना आणि घटनास्थळ यांची माहिती गोळा करण्यात आली. आता आपल्याकडे सामाजिक कथांमधील विविध कंगोरे बातम्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत आणि प्रत्येक बातमीचा स्रोत, त्यातील घटना, पात्रे आणि स्थान याची माहिती उपलब्ध आहे. 

स्रोत किंवा विविध कंगोऱ्याशी संबंधित संदेशांमधून त्यातील पात्रे, घटना आणि घटनास्थळ याचा संबंध जोडला जातो.  सोप्या शब्दात सांगायचे तर कोणत्याही दोन घटकांमधील संबंध त्या दोघांमध्ये रेष काढून दाखविला जातो.  अशा प्रकारे अनेक घटक जर आपण कागदावर मांडले तर त्यांच्यातील परस्पर संबंधातून एक रेषांचे जाळे तयार झालेले आपल्याला आढळून येईल.  आता प्रत्येक कंगोऱ्यासाठी आपण एक जाळे तयार करतो.  काही वेळेला दोन वेगवेगळ्या कंगोऱ्यातील घटक (घटना, पात्रे किंवा घटनास्थळ) एकमेकांशी संबंधित असतात.  मग आपल्याला असे दोन घटकसुद्धा रेषेने जोडावे लागतात.  अशा प्रकारे विणलेली परस्पर संबंधांची जाळी सत्य बातमीमध्ये अधिक घट्ट असते.  यामधील घटक (पात्रे, घटना आणि घटनास्थळ) यांच्यातील संबंध अनेक संदेशामधून पुन्हा पुन्हा अधोरेखित होत असतो.

पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगायचे तर असे दोन घटक अनेक रेषांनी जोडलेले असतात.  याउलट कपोलकल्पित बातम्यांमध्ये अनेक कंगोरे असतात आणि कोणत्याही दोन घटकातील संबंध नाजूक असतो - रेषेच्या भाषेत सांगायचे तर दोन घटकांमध्ये कमी रेषा असतात. आता या सामाजिक कथनकातील काही कंगोरे किंवा कथा बाजूला केल्या तर काही रेषा लुप्त होतात.  या रेषांच्या लुप्त होण्यामुळे हे जाळे विविध भागात विखुरले जाते.  सत्य घटनेमधील कंगोरे काढले तरी काही रेषा कमी होतात पण दोन घटक काही रेषांनी तरी जोडलेले राहतात. यामुळे जाळे तुटत नाही.  या वैशिष्ट्यांवरून सत्य आणि कपोलकल्पित बातम्यांचा मागोवा घेताना संशोधक गटाने या पद्धतीचा वापर करून अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या बातम्यांचे विश्लेषण केले.  यातील एक बातमी सत्य असून दुसरी अफवा आहे असे या संशोधक गटाचे म्हणणे आहे: 

२०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी पसरविण्यात आलेले pizzagate आणि (२) २०१३ शाळांमधील bridgegate. यातील pizzagate प्रकरण अमेरिकन अध्यक्षपदाच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारसमितीचे प्रमुख जॉन पोदेस्ता याच्या खाजगी ई-मेल वर बेतलेले होते तर bridgegate हे न्यू जर्सी प्रांताचे रिपब्लिकन राज्यपाल ख्रिस ख्रिस्टी याच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनी अचानक बंद केलेल्या रस्त्यासंबंधीचे प्रकरण आहे.   या दोन घटनांच्या सामाजिक कथनाचे विश्लेषण करून त्यातील महत्वाची पात्रे, घटना आणि जागा यांच्यातील परस्पर संबंध जाळ्याच्या स्वरूपात मांडण्यात आला.  या दोन जाळ्यांच्या विश्लेषण केल्यावर खालील गोष्टी नजरेस पडल्या: 

Pizzagate मधील  जाळ्यांमधील घटना तुलनेने कमी कालावधीत घडल्या तर Bridgegate मधील घडामोडी त्यामानाने अधिक कालावधीत घडलेल्या आहेत.  Pizzagate जाळे अवघ्या महिन्याभरातील घडामोडींमधून बनलेले आहे - आणि त्यानंतर त्यामध्ये फारसे बदल झाले नाहीत. तर Bridgegate मधील जाळे अनेक वर्षाच्या घडामोडींमधून तयार झाले आहे आणि अजूनही त्यामध्ये नवनवीन पात्रांची/घटनांची आणि जागांची भर पडत आहे. 

दुसरा फरक अतिशय रंजक आहे.  Pizzagate जाळ्यामधील काही ठराविक कथाकथनांद्वारे येणारी पत्रे/घटना किंवा स्थाने काढून टाकली तर हे जाळे तुटून त्यामधून अनेक घोटी छोटी जाळी तयार होतात.  Bridgegate जाळ्याच्या बाबतीत असे होताना दिसत नाही - ठराविक कथनांमधील पात्रे/स्थाने/घटना काढून टाकल्या तरी हे जाळे तुटत नाही ते एकसंघ राहते.  

अशा पद्धतीने एखाद्या घटनेच्या समाजमाध्यमांवरील कथनातून विविध घटकांच्या (पात्रे/स्थाने/घटना) परस्पर संबंधांचे जाळे विणून त्याच्या विश्लेषणामधून सत्य आणि कपोलकल्पित षडयंत्र यातील फरक सांगता येतो. 
येणाऱ्या काळात अशा प्रकारची तंत्रे वापरून आपल्याला कपोलकल्पित घटना आणि अफवा यांच्यासोबत लढावे लागणार आहे.  हे तंत्र जसे अधिकाधिक विकसित होत जाईल तशी हि लढाई अधिक सुकर होईल अशी आशा आहे.  पण हा उंदरामांजराचा खेळ आहे - या तंत्राना हुलकावणी देणारी कथाकथने कदाचित प्रसूत केली जातील आणि हा खेळ पुढच्या पातळीवर खेळावा लागेल. 

तंत्रज्ञानाला थोडी मनुष्यबळाची जोड दिली तर आपण या खेळात काही पाऊल पुढे राहू अशी अटकळ आहे.  जाता जाता  म्हणावेसे वाटते - "संपेल ना कधी ही हा खेळ सावल्यांचा!"

(तळटीप: हा लेख An automated pipeline for the discovery of conspiracy and conspiracy theory narrative frameworks: Bridgegate, Pizzagate and storytelling on the web या संशोधनपर लेखावर आधारित आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aashish tendulkar writes about Rumors search artificial intelligence