‘हायकू वृत्तीतून’ आत्मशोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

book morpis aani pimpalpan

‘मोरपीस आणि पिंपळपान’ हा दुर्गेश सोनार यांचा हायकूसंग्रह म्हणजे ‘हायकू वृत्तीने’ झपाटलेल्या कवीचा आत्मशोध आहे.

‘हायकू वृत्तीतून’ आत्मशोध

- आश्लेषा महाजन ashlesha27mahajan@gmail.com

‘मोरपीस आणि पिंपळपान’ हा दुर्गेश सोनार यांचा हायकूसंग्रह म्हणजे ‘हायकू वृत्तीने’ झपाटलेल्या कवीचा आत्मशोध आहे. आत्मशोध असला तरी माणूस ज्या समाजात राहतो, त्याचं बिंब-कवडसे त्या शोधाचा भाग असतातच. कारण माणूस काही एकटा निर्मनुष्य बेटावर रहात नाही. हायकू हा मूळचा जपानी काव्यप्रकार. त्याच्या तीन ओळींच्या मिताक्षरी रूपबंधात एक साक्षात्कारी क्षण सामावून घेण्याच्या आवाक्यामुळे एकाचवेळी सहज आणि आव्हानात्मक आहे. निसर्गातील, भोवतालातील एखाद्या क्षणमात्र घटिताने झंकारून उठणारी तरंगलहरी मनाच्या टिपकागदाने टिपणं आणि मोजक्या शब्दांत नि तीनच ओळींत नजाकतीने अशी काही मांडणं की, त्यातून थक्क करणारी अनुभूती वा अवाक् करणारी कलाटणी अनुभवास येणं, ही या हायकू कवितेची खासीयत. हा काव्यप्रकार देशविदेशांत लोकप्रिय झाला, तो बहुधा त्याच्या अशा अकृत्रिम ओघवत्या उमटण्याच्या वृत्तीमुळे.

मराठीत हायकू प्रथम अवतरला, तो कवयित्री-लेखिका शिरीष पै यांनी केलेल्या हायकूंच्या अनुवादांतून वा स्वतंत्र हायकूंतून. त्यांनी आणि शांताबाई शेळकेंसह अन्य काही कवींनी तीन ओळींच्या हायकूला अक्षरसंख्येत (५-७-५) बांधून ठेवण्यापेक्षा उत्स्फूर्त सहजतेच्या प्रवाहावर ठेवलं. नंतरच्या काळात मात्र ही अक्षरसंख्येची महिरप काही हायकूप्रेमींमध्ये लोकप्रिय झाली. एखादा परदेशी साहित्यप्रकार आपल्या मातीत रुजू पाहतो, रुजतो, तेव्हा त्याला इथल्या संस्कृतीचा सुगंध लगडतो. इथल्या काव्यपरंपरेच्या धाग्यात तो गोवला जातो. इथल्या समाजातल्या आशय-विषय-अभिव्यक्तीत तो समरसून जातो, हे अगदी स्वाभाविक आहे.

‘मोरपीस आणि पिंपळपान’चं आकर्षक मुखपृष्ठ पाहून (चित्रकार - सरदार जाधव) आणि पुस्तकाचा छोटेखानी आकार पाहून या मिताक्षरी कवितेच्या रूपबंधाचा अंदाज रसिक वाचक बांधू शकतो. ‘हायकूची बाराखडी’ आणि जपानमधील आद्य हायकूकार बाशो तसंच बुसॉन, इस्सा आणि शिक्की ह्या जपानी हायकूकारांची माहिती सांगत हायकू-तत्त्व सांगणारी कवी प्रभाकर साळेगावकर यांची विश्लेषक प्रस्तावना कवी दुर्गेश सोनार यांच्या हायकूंवरही रसग्रहणात्मक टिपण्णी करते. त्यातून वाचकाची एक मनोभूमिका तयार होते.

दुर्गेश यांनी ह्या काव्यप्रकाराला अतिशय समर्थपणे हाताळलं आहे. अल्पाक्षर रमणीयत्व हे काव्याचं प्राणतत्त्व इथं शब्दशः नव्हे, अक्षरशः जोपासलं आहे. अल्पाक्षरी असणं ही तर हायकूची पूर्व-अटच आहे. रमणीयत्व हे कवीचं कसब आहे. निसर्गातले अनेक विभ्रम ह्या हायकूत डोकावतात. निसर्ग आहे तसा किंवा जरा वेगळ्या कोनातून दिसणारा, निसर्ग रसरसलेला किंवा जीव कंठाशी आणणारा...

पानगळती

ही शिशिर चाहूल

उतरे झूल!

अशी निसर्ग घटिताला व्यापक अर्थ देणारी रचना असो की, पहिल्या प्रेमाची गुलाबी भुलावण असो, सावळबाधा झालेली राधा असो, ते विरघळणारे ‘चॉकलेटी दिवस’ असो... दुर्गेश ती सहजपणे मांडतात -

मुळीच कधी

नसे कशाचा नेम

पहिलं प्रेम!

दुर्गेश यांनी हायकूंमध्ये सामाजिक आशय आणि समकालीन वास्तवाचं भानसुद्धा लीलया उतरवलं आहे. मंदिरातले सूर, बाप्पा मोरया, चूल-मूल करण्यात गुंतलेली स्त्री, भातुकली, मामाचं पत्र, बाहुली, दंगल, अवकाळी पाऊस नि फसव्या सेल्फीलासुद्धा हायकूत स्थान मिळालं आहे. कविराज मूळचे पंढरपूरचे असल्याने ‘पांडुरंग’ तर हवाच. सामाजिक-राजकीय विसंगतीवर भाष्य करणारे हायकू तर आहेतच; पण एका हायकूत जोतिबा फुलेही आहेत आणि ‘भीमाचे हायकू’ हा स्वतंत्र विभागच आहे. आचार्य अत्र्यांवरही दोन हायकू आहेत. मोठा आशय चिमटीत पकडण्याचं हे धाडस आणि कसब दुर्गेश यांना साध्य झालेलं आहे. हे हायकू मुळातून वाचावेत आणि चिंतनात अंतर्मुख व्हावं असे आहेत. ते लिहितात -

उजेड हवा

त्यांनी मागणी केली

वस्ती पेटली!

दुर्गेश सोनार यांच्या ह्या हायकूसंग्रहाने मराठी हायकूंमध्ये उत्तम भर पडली आहे. हायकू-वृत्तीशी तादात्म्य पावलेली त्यांची लेखणी लिहिते -

येतात ऐकू

सूर मंदिरातले

जणू हायकू!

बिंदूमध्ये सिंधू शोधण्याच्या ह्या काव्यवृत्तीला शुभेच्छा.

पुस्तकाचं नाव :

मोरपीस आणि पिंपळपान (हायकूसंग्रह)

कवी : दुर्गेश सोनार

प्रकाशक : प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे

पृष्ठं : ११०, मूल्य : १२५ रुपये

Web Title: Aashlesha Mahajan Writes Book Morpis Aani Pimpalpan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Booksaptarang
go to top