

New Marathi Books
esakal
निःशब्द सावल्या - Grief unplugged हे अतिशय आगळंवेगळं असं पुस्तक आभा भागवत हिने लिहिलं आहे. तिची आई म्हणजेच शोभा भागवत यांच्या जाण्याने झालेले तीव्र दुःख, शोक, त्या निमित्ताने केलेले लिखाण आणि त्या अनुषंगाने झालेल्या अनेक जाणिवा याचं प्रभावी वर्णन म्हणजे हे पुस्तक! आई गेल्यानंतर दीड-दोन वर्षांमध्ये त्या-त्या वेळी व्यक्त होण्यासाठी केलेल्या लिखाणाचं हे संकलन आहे. हे पुस्तक वाचताना प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जे विल्यम वॉर्डन यांनी सांगितलेल्या ‘शोकांच्या ४ कार्यांची’ आठवण झाली.
‘टास्क १’ म्हणजे, मृत्यूचे वास्तव स्वीकारणे (बौद्धिक व भावनिकदृष्ट्या). सुरुवातीच्या लेखांमध्ये शोभाताईंचे शेवटचे काही दिवस. हळूहळू ढासळत चाललेली त्यांची प्रकृती, ‘आता हॉस्पिटल नको’ ही त्यांनी केलेली याचना, संथ पावलाने येणाऱ्या मृत्यूचा त्यांनी केलेला स्वीकार, लेखिकेने आईची इच्छा स्वीकारून तिला दिलेली साथ; परंतु सतत होणारी तगमग... हे सर्व वर्णन वाचून ते दिवस डोळ्यांसमोर उभे राहतात व डोळ्यांत पाणी येते. त्याचबरोबर ‘केअरटेकर’ म्हणून केलेला संघर्ष - सततचा ताण - वेळोवेळी घ्यावे लागणारे कठीण निर्णय... असं बरंच काही! त्या निमित्ताने वृद्धाश्रम, आजारी माणसाची शुश्रूषा, मृत्युपत्र, गेलेल्या माणसाची ‘प्रायव्हसी’ अशा काही महत्त्वाच्या विषयांवरही चिंतन मांडण्यात आले आहे.