शून्यातून नव्हे; अक्षरश: वजाबाकीतून जमापुंजी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी संघटित व असंघटित कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी, अधिकारांसाठी आयुष्यभर लढा दिला, तसंच योग्य वेळी कारखानदारांचीही बाजू घेतली.
narsayya adammaster
narsayya adammastersakal

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी संघटित व असंघटित कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी, अधिकारांसाठी आयुष्यभर लढा दिला, तसंच योग्य वेळी कारखानदारांचीही बाजू घेतली. येत्या ता. एक जून रोजी त्यांचा ७९ वा वाढदिवस असून, त्याच दिवशी त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशनही होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीवर प्रकाश टाकणारी मुलाखत...

‘सोलापुरातील अत्यंत दुर्लक्षित विडीकामगारांसाठी दोन वेळच्या रोजी-रोटीची जुळवणी करणं जिकिरीचं असताना, त्यांना हक्काचा निवारा मिळवून दिल्यानंतर मनाला एक प्रकारचं सात्त्विक समाधान मिळालं, ते अवर्णनीय असंच होतं, त्यातून मातृवचनाची पूर्तता केली,’’ अशा शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) ज्येष्ठ नेते, माजी आमदार कॉम्रेड नरसय्या नारायण आडम (मास्तर) यांनी आपलं हृद्गत व्यक्त केलं. आपल्या आयुष्यावर प्रकाश टाकताना भूतकाळात रमण्याबरोबरच भविष्याचाही वेध त्यांनी घेतला व तारीखवार तपशील सांगत आपला रंगतदार जीवनपट उलगडत नेला.

संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या अधिकारांसाठी व न्याय्य हक्कांसाठी नेहमीच मोर्चा, आंदोलन, हरताळ, संप, खड्या आवाजातील भाषण यांतून सोलापुरात आडममास्तर परिचित. विधानसभेतील त्यांची जोरदार भाषणं, प्रश्‍नांची मांडणी, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीची त्यांची हातोटी...मास्तरांचं असं चित्र आजवर सगळ्यांच्याच नजरेसमोर आहे.

सोलापुरातल्या दत्तनगरमधल्या पत्र्याच्या शेडमधील माकपच्या कार्यालयात आडममास्तरांशी दोन तास संवाद साधला.

भर उन्हाळ्यातही त्यांची मुद्रा अगदी प्रसन्न होती. गप्पांच्या वेळी त्यांच्या छोट्या पिनच्या चार्जरच्या मोबाईलवर (इनकमिंग- आउटगोइंग) आलेले कॉलही ते एकीकडे घेत होते, तर दुसरीकडे मुलाखतीची लिंकही सलग कशी राहील हे पाहत होते.

‘ए मेरे वतन के लोगो...’ या देशभक्तिपर गीताच्या रिंगटोनमुळे त्यांचा वेगळेपणा आणखीच अधोरेखित होत होता.

आडममास्तरांचे वडील कॉम्रेड (कै.) नारायणराव आडम हे स्वातंत्र्यसैनिक. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले व गोवा मुक्ती संग्रामातले लढवय्ये. कामगारांसाठी सतत लढा देत चळवळ उभी करताना सोलापुरात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या कार्याचा, चळवळीचा, विचारांचा वारसा घेऊन आडममास्तरांनीही सोलापुरात कामगारचळवळ सुरू केली. वडील गिरणीकामगार, आई लक्ष्मीबाई विडीकामगार, तीन भाऊ, तीन बहिणी असं मोठं कुटुंब.

कमावणारे कमी अन् खाणाऱ्यांची संख्या अधिक यामुळे आर्थिक अडचणींचा डोंगर कायमच. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे वडिलांना अनेक वेळा भूमिगत व्हावं लागे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्यानं कर्जाचा डोंगरही कायम असे. एकदा पकड -वॉरंट निघालं असता सर्व कुटुंबानं अहमदाबाद गाठलं. सन १९४१ मध्ये सगळे पुन्हा सोलापूरला आले.

आडममास्तर सांगतात : ‘‘घरातील सर्वजण अशिक्षित. माझं शिक्षण कसंबसं नववीपर्यंत. अक्षर सुंदर. गणितात मी अतिशय हुशार...त्या काळात शहरात गणितात ९९ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावलेला, त्यामुळे त्या काळात उच्च न्यायालयात कामगारांसाठी लढणाऱ्या ॲड. सुळे यांच्याप्रमाणे आपला मुलगाही मोठा बॅरिस्टर व्हावा, अशी वडिलांची इच्छा होती. मात्र, नववीपर्यंतच शिक्षण घेता आल्यानं माझ्याकडून वडिलांची अपेक्षा पूर्ण झाली नाही; पण आपल्याबरोबरीनं मुलगा कामगारचळवळीत आला याचा मात्र त्यांना फार अभिमान होता.’’

‘प्राथमिक शिक्षणासाठी रोज तीन किलोमीटरची पायपीट ठरलेली. एकाच युनिफॉर्मवर दीड वर्ष काढायचं. सणासुदीची गंधवार्ताही नसे आम्हाला. एके वर्षी तर केवळ हरभरे खाऊन जगावं लागलं. भाकरी-भाजी काय असते हेसुद्धा माहीत नव्हतं. त्या गरिबीच्या काळात शाळेत स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी मिळणारा युनिफॉर्म प्रचंड सुख देऊन जाई. शाळेत स्वातंत्र्यदिनी गायिलेल्या गाण्यामुळे एक युनिफॉर्म जादा मिळाला होता...’ ही आठवण सांगताना आडममास्तरांचे डोळे साहजिकच पाणावून गेले.

‘मिलिटरीत जाण्याचं माझं स्वप्न होतं. स्काउटच्या युनिफॉर्मसाठी वडिलांकडे तगादा लावला, तो मिळाल्यानंतर तर जग जिंकल्याचा आनंद झाला होता! तीन वर्षं तो युनिफॉर्म वापरला. अशिक्षित वडिलांना व त्यांच्या सहकाऱ्यांना मी ‘युगांतर’ हे कम्युनिस्टांचं मुखपत्र वाचून दाखवत असे. त्याबद्दल वडिलांना माझा अतिशय अभिमान वाटत असे.

विजापूरच्या सहलीसाठी पाच रुपये जमवता न आल्याची मला खंत होती. मात्र, ‘एक दिवस विमानप्रवास करीन’ असा निर्धार मी त्याच वेळी केला व १९८७ मध्ये आमदार झाल्यावर नागपूर अधिवेशनाच्या वेळी तो पूर्णही झाला,’’ गतकाळातील आठवणी उलगडताना आडममास्तर सांगतात : ‘‘पद्मशाली समाजाचे नेते गंगाधरपंत कुचन हे दरवर्षी शिक्षणासाठी वह्या व पुस्तकं देत, त्यावर माझं शिक्षण झालं. नववीत असताना संगतीतून चोऱ्या, पत्ते, जुगार अशी व्यसनं लागल्यानं हा काळ फार विपरीत परिणामांचा होता. गल्लीत येण्यासही बंदी होती. त्या वेळी रूपाभवानी मंदिराजवळील मारुतीच्या देवळात मुक्काम असायचा.

आई रोज जेवण घेऊन येई. ती रडत रडत समजावून सांगत असे. नंतर मात्र माझ्यात आमूलाग्र बदल झाला. पैसा कमावणं हाच ध्यास ठेवून पडतील ती कष्टाची कामं केली.

नंतर प्रसाद सोसायटीच्या सचिवपदावर काम केलं. मात्र, बंडखोर व चळवळ्या स्वभाव गप्प बसू देत नव्हता. शासनाकडून मिळणाऱ्या दहा टक्के रिबेटचा, म्हणजे कोट्यवधींचा, लाभ उठवण्यासंदर्भातलं प्रकरण सहकार आयुक्तांसमोर उघडकीस आणलं; त्यामुळे नोकरीस मुकावं लागलं. मात्र, स्वाभिमान गहाण न ठेवल्याबद्दल वडिलांनी शाबासकीची थाप दिली.’

‘मी १९६६ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं. राजकीय जीवनप्रवास इथूनच सुरू झाला. सन १९६७ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वडिलांबरोबर ‘हिंदू महासभे’च्या वि. रा. पाटील यांना काँग्रेसविरोधकांनी (संयुक्त समिती) पाठिंबा दिला होता. त्यांचा प्रचार केला. कार्यालयच नसल्यानं गुरुवार पेठेतील चौकात एका दगडावर बसून कामगारांसाठी काम सुरू झालं. त्या भागातील रेडिमेड उद्योगातील कामगारांशी संवाद, चर्चा, चहापान होत असे. याच काळात एका बैलगाडीतून एकच पोतं वाहण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्तीच्या विरोधात बैलगाडीमोर्चा काढला.

चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना चूक कळल्यानं हा आदेश त्यांनी मागं घेतला. पहिल्याच यशस्वी आंदोलनानं आत्मविश्र्वास दुणावला; परंतु सोलापुरात ‘इंटक’, ‘आयटक’, ‘भामसंघ’, ‘हिंद मजदूर सभ’ अशा मातब्बर संघटनांमुळे नव्या कामगार संघटनेला वावच नव्हता, तरीही यंत्रमाग, विडीकामगारांच्या संघटनेची उभारणी केली. कामगारांच्या मूळ मागण्यांसाठी सतत पाठपुरावा केला. प्रसंगी संप, हरताळ, मोर्चे, आंदोलनं केली,’ राजकीय प्रवास उलगडताना आडममास्तर पुढं सांगतात : ‘नववीपर्यंत शिक्षण झाल्यानं एका खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली, तेव्हापासून ‘मास्तर’ ही उपाधी लागली.

विद्यार्थ्यांना अंकगणितात तरबेज करण्यात यश मिळालं. घर अत्यंत लहान असल्यानं मारुतीमंदिरातच माझा मुक्काम असे. तिथंच शाळाही भरायची. सन १९६८ मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली. तिला स्थगिती मिळाल्यानंतर १९६९ मध्ये पुन्हा जाहीर झालेल्या निवडणुकीत, पूर्वी माझ्यावर चोरीचा आरोप केलेल्या व्यक्तीनंच माझा मतदानप्रतिनिधी म्हणून काम पाहिलं, हेच आयुष्यातील मोठं यश होतं. शून्यातून नव्हे तर, वजाबाकीतून जग उभारण्याची ताकद निर्माण झाली. अनेक मोठ्या संपांतून मार्ग निघाले, अनेक संपांना यश मिळालं, मागण्या मान्य झाल्यानं कामगारांचा विश्वास वाढला.

अनेक वेळा समन्वयातून मार्ग काढला. आजतागायत २२५ केसेस दाखल झाल्या, त्यातील दोनशेंचा निकाल लागला. अनेक वेळा जीवघेणे हल्लेही झाले. कामगारांच्या प्रेमामुळे त्यातून सहीसलामत बचावलो. काही कामगारांनी माझ्यावरील हल्ला स्वतःवर झेलला. तीन वेळा नगरसेवक, तीन वेळा आमदार झालो. ही सर्व सेवा समाजासाठी वाहिली. हजारोंच्या सभा घेतल्या. पहिल्या लग्नाची वाताहत झाली. वाडिया हॉस्पिटलमध्ये झालेल्या संपाच्या वेळी झालेला हल्ला अंगावर झेलणाऱ्या कामिनी डोंगरे या परिचारिकेशी ओळख झाली...त्यातून प्रेम अन् त्याचं रूपांतर संसारात झालं.’

‘कॉम्रेड गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्थे’च्या माध्यमातून शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या सहकार्यानं तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. तत्कालीन केंद्रीय गृहनिर्माणमंत्री सत्यनारायण जेठिया यांच्याकडे पाठपुरावा केला. पहिल्यांदा ‘एक हजार घरांना मंजुरी’ असं चुकीचं पत्र आलं. पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर दहा हजार घरांची स्कीम मंजूर झाली.

‘देशात आरएसएस व कम्युनिस्ट कार्यकर्तेच विधायक काम करतात,’ हे निदर्शनास आणून देत वाजपेयी यांनी यासंदर्भात जेठिया यांना सुनावलं होतं’

‘घरी पाहुणा आला तर पाहुणचार करण्याची आपली भारतीय पद्धत आहे. या पद्धतीला अनुसरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी - त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल - जाहीर सभेत कौतुक केलं होतं. त्याविषयीचा ठपका ठेवत पक्षानं मला तीन महिन्यांसाठी निलंबित केलं. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम करणारा मी साधा कार्यकर्ता असल्यानं या प्रकाराबाबत काही भाष्य करणार नाही,’’ अशीही एक आठवण आडममास्तर यांनी सांगितली.

पुन्हा जुन्या आठवणींत रमत आडममास्तर सांगतात : ‘या चळवळीचा प्रवास १९७३ पासून कधी चालत...तर कधी १९९३ मध्ये यंत्रमाग-कामगारांनी दिलेल्या सायकलवर...तर १९९३ पासून रिक्षातून...नंतर २०१६ मध्ये कामगारांनी जमा केलेल्या पुंजीतून घेतलेल्या ‘इनोव्हा’तून...असा सुरू आहे.

मातृवचनाची पूर्तता

‘वसंतदादा पाटील यांच्याविरुद्ध बंडखोरी करून शरद पवार मुख्यमंत्री झाले, त्यानंतर वसंतदादांनी नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळी दिग्गज नेत्यांसमवेत आमदारनिवासात माझीही भेट घेतली व पवारांच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी मला विनवलं. २५ लाख रुपये व विधानपरिषदेचं सदस्यत्व देण्याचं आमिषही मला दाखवण्यात आलं होतं. हा प्रस्ताव मी नाकारल्याची माहिती मिळाल्यानंतर पवार यांनी मला मंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्याही ऑफरला मी नकार दिल्यावर, ‘तुमचं कोणतंही काम सांगा, करेन,’ अशी हमी त्यांनी मला दिली. ‘आपल्याला आयुष्यभर निवारा मिळाला नाही.

विडीकामगारांना तरी घर मिळवून द्यावं,’ असं वचन आई मृत्युशय्येवर असताना तिनं माझ्याकडून घेतलं होतं. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी पवार, सुशीलकुमार शिंदे, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सोमनाथ चटर्जी, सत्यनारायण जेठिया यांच्यामार्फत प्रयत्न करून दहा हजार घरकुलांची ‘कॉ. गोदूताई परुळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था’ उभी केली. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते कामगारांच्या हाती घरांच्या किल्ल्या देताना आईच्या वचनाची पूर्तता केल्याचं सात्त्विक समाधान लाभलं,’ आडममास्तर सांगतात.

कामगारांचे हक्क-अधिकार

‘सोलापुरातील उद्योगांबाबत, कारखान्यांतील कामगारांच्या प्रश्‍नांबाबत, हक्क-अधिकारांबाबत सतत लढा सुरू आहे. ‘लक्ष्मी-विष्णू मिल’ ही पिठाच्या गिरणीप्रमाणे सुरू होती...‘नरसिंग गिरजी मिल’ सरकारच्या धोरणामुळे; ‘यशवंत’, ‘सोलापूर गिरणी’ नेत्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे, तसंच ‘वेस्ट कॉटन मिल’ कर्जामुळे दिवाळखोरीत निघाल्यानं सोलापूरच्या कामगारांची स्थिती बिकट झाली.

मालकाला मिळणाऱ्या नफ्यात कामगारांचं हक्काचं किरकोळ वेतन मिळण्याची रास्त मागणी असते, त्यासाठी मी लढा देत असतो. टेक्स्टाईल उद्योगावर युती सरकारच्या काळात अन्यायकारक असा चार टक्के विक्रीकर लादला गेला होता, यासंदर्भात पाठपुरावा करून तो आदेशही मी मागं घ्यायला लावला. हा निर्णय मालकांच्या पदरात पडला, ही जमेची बाब नाही का?

धूम्रपानविरोधी कायद्याच्या वेळी हबकून गेलेल्या विडीकारखानदारांना दिलासा देण्याचं काम केलं. तीन वर्षांपूर्वी २८ दिवस विडी-उद्योग बंद होता. यादरम्यान पाच कामगारांचा दुर्दैवी अंतही झाला. हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करून या उद्योगाला संरक्षण देण्याचं कामही केलं,’’ कामगारहिताची केलेली अशी अनेक कामं सांगताना आडममास्तर म्हणतात : ‘माणूस असलेल्या कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत, हीच भावना आहे.’

आडममास्तरांची कामगिरी

  • दहा हजार घरांची ‘कॉम्रेड गोदूताई परुळेकर विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था’.

  • ‘कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थे’त ५१०० घरकुले.

  • जागतिक कीर्तीच्या ‘रे नगर’ या महत्त्वाकांक्षी महागृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी सुरू.

  • ‘रे नगर योजने’तून असंघटित कामगारांसाठी मंजूर ३० हजारांपैकी १५ हजार घरांची पूर्तता.

  • ‘रे नगर’मधील रहिवाशांसाठी पायाभूत सुविधांसाठी ३०० कोटींची मंजुरी.

  • घरकुल योजनेसाठी २० टक्के बँक ठेवयोजना (७५० कोटी) रद्द करून घेतली.

  • कुंभारी (दक्षिण सोलापूर) इथल्या ‘विडी घरकुल’ परिसरास रहिवासी झोनची मंजुरी.

  • सन २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा विजयाचं स्वप्न.

  • १९२६ च्या ब्रिटिशांच्या कायद्यात बदल करून कामगार संघटनांसाठी अन्यायकारक नवा कायदा.

  • साडेबारा हजार चौरस फुटांत पक्षकार्यालयाच्या दहा कोटींच्या पाचमजली इमारतीचं स्वप्न

  • आमदार पेन्शन योजनेत मंजूर ५०० रुपयांमधून ४५० कपात होऊन हाती आले ५० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com