
‘बारमाही वाहणारी चंद्रभागा नदी, स्वच्छ वाळवंट आणि गावाला जोडणारे प्राचीन घाट, हे पंढरपूरकरांच्या भावविश्वातील अविभाज्य घटकच. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांच्या दृष्टीनेही ते तितकेच महत्त्वाचे.
वारसा विलोभनीय घाटांचा...
‘बारमाही वाहणारी चंद्रभागा नदी, स्वच्छ वाळवंट आणि गावाला जोडणारे प्राचीन घाट, हे पंढरपूरकरांच्या भावविश्वातील अविभाज्य घटकच. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांच्या दृष्टीनेही ते तितकेच महत्त्वाचे. चंद्रभागेत स्नान, नगरप्रदक्षिणा आणि विठुरायाचं दर्शन या त्रिसूत्रीचं हे केंद्रस्थान.
चंद्रभागेतीरी वर्ष १७७० पर्यंत एकही घाट नव्हता,’ सांगत होते पंढरपूरचे अभ्यासक अॅड. धनंजय रानडे. त्यांच्या सांगण्याला आधार होता त्यांच्याकडील व्यक्तिगत कागदपत्रांचा आणि सोलापूर गॅझेटियरचा. याच विषयावर दिवंगत माजी मुख्याध्यापक आबासाहेब भाटे यांनी लिहिलेल्या ‘बरवे बरवे पंढरपूर’ या पुस्तकातही काही संदर्भ मिळाले.
पंढरपूरला नदीवर सध्या तीन पूल अस्तित्वात आहेत. त्यापैकी एक अंबाबाई मैदानाजवळील ब्रिटिशकालीन जुना पूल. हा पूल दगडी पूल म्हणून ओळखला जातो. त्या पुलाकडून पूर्वी वाहनं वाळवंटात अगदी भक्त पुंडलिक मंदिरापर्यंत जायची. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर जुन्या दगडीपुलाकडून वाळवंटात वाहनं येऊच नयेत यासाठी लोखंडी अडथळे उभारण्यात आलेत.

या घाटांचा फेरफटका केला तर विविध गोष्टी अनुभवायला लागतात. चंद्रभागेच्या तीरावर १७७१ मध्ये पहिला घाट बांधला गेला, त्यानंतर १८५० पर्यंत तेरा घाट झाले. नदीच्या पैलतीरावर चार वर्षांपूर्वी इस्कॉनने श्री प्रभुपाद घाट बांधून पैलतीराची शोभा वाढवलीय. एका बाजूला अनेक वेळा पूर परिस्थितीचा सामना करून वर्षानुवर्षं अबाधित असलेले भक्कम घाट आणि तिथंच नवीन घाटजोडणी कामात कोसळलेल्या भिंतीचे अवशेष. नदीकाठी दशक्रिया विधीसाठी आलेल्या लोकांची गर्दी आणि तिथंच पडलेले जुन्या कपड्यांचे, केसांचे ढीग; वाळूच्या प्रचंड उपशामुळे पडलेले मोठमोठे खड्डे. इतिहास व वर्तमानाची ही अनास्था मन गुदमरून टाकणारी.
सर्वच गोष्टींसाठी आपण सरकारकडे बोट दाखवू शकतो का, मुळीच नाही. स्थानिक नागरिक आणि लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी भाविक यांचीही निश्चितच जबाबदारी आहे. कायदेशीर व तांत्रिकदृष्ट्या चंद्रभागा वाळवंटाची मालकी महसूल विभागाची; परंतु वाळवंटाच्या स्वच्छतेची जबाबदारी मात्र नगरपालिकेकडे. एकमेकांना दोष देण्याच्या प्रवृत्तीमुळे कायम असणारं घाणीचं साम्राज्य. उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निकालानंतर वाळवंटाची होणारी परवड काही प्रमाणात थांबलीय; पण त्यात सातत्य राहिलं पाहिजे.
जुन्या दगडी पुलावरून पुढे चालत असताना उजवीकडे दिसतं ते लखूबाईचं प्राचीन मंदिर. त्या भागाला पूर्वी दिंडीरवन म्हणत. त्याच्या पुढे पहिला घाट लागतो तो ‘वडार घाट’. १८५७ मध्ये नगरपालिकेने हा घाट बांधला आहे. गवळी समाजाच्या लक्ष्मीदेवीचं मंदिर या घाटाच्या लगत उभारलंय. पुढे दुसरा घाट लागतो तो ‘खिस्ते घाट’. १८२५ मध्ये कृष्णाजी महाराज खिस्ते यांनी या घाटाचं बांधकाम केलं. तिथेच दगडी बांधकाम असून, त्यावर मारुती मंदिर आहे. या घाटालगत दिसते ती दगडी बांधकामाचा उत्तम नमुना असलेली लोकमान्य विद्यालयाची इमारत, त्याच्या शेजारी पूर्वीची नगरपालिकेची इमारत आहे. त्याला लागून इ.स. १७८५ मध्ये कृष्णाजी नाईक निरगुंदीकर यांनी दगडी तट बांधून घाट बांधला. हा घाट सध्या अस्तित्वात नाही. तिथे दगडी पायऱ्या नसून केवळ उतार आहे, त्याला पंढरपूरकर डगर म्हणतात. तेथून नदीच्या पैलतीराकडे पाहिलं की दिसतो तो इस्कॉनने बांधलेला भव्य ‘श्री प्रभुपाद घाट’. इस्कॉनचे लोकनाथस्वामी महाराज यांनी पुढाकार घेऊन, अनेक अडचणींना तोंड देत हा घाट बांधलाय. या देखण्या घाटाने नदीच्या पैलतीराची शोभा वाढवलीय. पुढे उजव्या बाजूला दिसतो तो ‘उद्धव घाट’. इ.स. १७८० मध्ये गोपाळ नाईक तांबवेकर यांनी हा घाट बांधलाय. या घाटाच्या जवळ उद्धवाचं छोटं मंदिर असल्याने हा घाट उद्धव घाट म्हणूनच ओळखला जातो. त्यापुढे उद्धव घाट आणि कुंभार घाटाच्या मध्ये १७८५ मध्ये हरिजनाई अप्पा हरिदास यांनी घाट बांधला. त्यालगत श्री दत्त मंदिर असल्याने या घाटाचं नाव ‘दत्त घाट’ असंच पडलं. या घाटालगत किल्ल्याप्रमाणे दगडी बुरुज दिसतात, ते पूर्वीच्या खासगीवाले यांच्या वाड्याचे आहेत.
त्यालगत आहे सध्याची माहेश्वरी धर्मशाळा. पूर्वी तिथे सरदार खासगीवालेंचा वाडा होता. त्यापुढे श्री अमळनेरकर महाराज पाचवे (तुकाराम महाराज) यांचं दगडी समाधी मंदिर आहे. तेथून वाळवंटात उतरण्यासाठी एक अरुंद, काहीसा छोटा, परंतु सुरेख घाट आहे.
त्यालगत दिसतो तो चंद्रभागा किनारी सर्वांत प्रथम बांधलेला ‘कुंभार घाट’. इ.स. १७६१ मध्ये रामचंद्र कृष्णाजी लिमये यांनी हा घाट बांधून घेतला. पूर्वी तिथे कुंभार लोकांची घरं होती, त्यामुळे या घाटाचं नाव कुंभार घाट असंच रूढ झालं.
या घाटापासून पुढे चालताना घाट जोडण्याचं काम अपूर्ण अवस्थेत थांबलेलं दिसलं. प्राचीन घाटांच्या दरम्यान असलेल्या जागेत नवीन पायऱ्या बांधून सर्व घाट एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मार्च २०१६ मध्ये चंद्रभागा वाळवंट आणि परिसर विकासाचा निर्णय शासनाने घेतला. वाळवंट परिसर सुधारणा, भक्त पुंडलिक मंदिर व परिसर सुधारणा आणि श्री विष्णुपद मंदिर व परिसर सुधारणा असं तीन टप्यात हे काम होणार आहे. २०१७ मध्ये सुरू केलेलं हे काम वारीची गर्दी, नदीचं पाणी वाढल्याने आणि अन्य काही अडचणींमुळे थांबलं होतं. पुढे कोरोनाकाळापासून तर हे काम ठप्पच झालं. या कामांतर्गत बांधलेली भिंत कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे एकीकडे सुमारे अडीचशे वर्षांतील जुने प्राचीन घाट आजही भक्कम दिसतात आणि त्यापुढे कोसळेल्या भिंतीचे अवशेष पाहून मन अस्वस्थ झालं.
कुंभार घाटाच्या काही अंतर पुढे इ.स. १७८५ मध्ये श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराकडून (संत नामदेव पायरी) चंद्रभागेकडे जाण्यासाठी चिंतो नागेश बडवे यांनी नवीन घाट बांधला, त्याचं नाव ‘महाद्वार घाट’ असंच झाले. या घाटाच्या दोन्ही बाजूस असलेले भव्य वाडे नजरेत भरतात. राजमाता अहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेले हे वाडे मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही भक्कमपणे उभे आहेत. महाद्वार घाटाच्या समोर पाहिलं की, नदीच्या पैलतीरावर एकमेव प्राचीन घाट दिसतो. शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा घाट गुजर घाट म्हणून ओळखला जातो.
इ.स. १७९८ मध्ये रामराव जवळेकर कुलकर्णी यांनी महाद्वार घाटालगत घाट बांधला. त्याकाळी त्या भागात कासार समाजाची घरं जास्त होती, त्यामुळे हा घाट ‘कासार घाट’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला. त्याच पुढे इ.स. १८१० मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी चंद्रभागा घाट बांधण्याचं काम सुरू केलं होतं. पुढे गोविंद महाराज चोपडकरांनी उर्वरित पायऱ्या बांधून घाटाचं काम पूर्ण केलं. त्यांनीच या घाटालगत चंद्रभागा नदीचं सुंदर मंदिरही बांधून घेतलं. हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे.
चंद्रभागा घाटाकडून काही अंतर पुढे गेल्यावर दिसतो तो ‘विप्रदत्त घाट’. इ.स. १८२० मध्ये सांगलीचे पहिले अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी श्री विप्रदत्त मंदिराच्या समोरून नदीकडे जाण्यासाठी हा घाट बांधला. त्यापुढे दिसतो तो ‘पंचमुखी मारुती घाट’. इ.स. १७७० मध्ये गोपाळ नाईक जांभेकरांनी हा बांधला. पंचमुखी मारुती घाट म्हणूनच या घाटाची ओळख आहे. सुमारे शंभर वर्षांपासून हा घाट दुर्लक्षित आहे. घाटाच्या तळाकडील काही पायऱ्या मोडकळीस आल्या आहेत. त्यापुढे सर्वांत शेवटी दिसतो तो स्मशानभूमीलगतचा घाट, त्याला ‘मढे घाट’ म्हणूनच ओळखलं जातं (हा घाट कोणी बांधला, याचे संदर्भ उपलब्ध नाहीत).
राष्ट्रीय वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष राणा महाराज वासकर आणि नित्यनेमाने नगरप्रदक्षिणा करणारे विष्णू महाराज कबीर यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी घाट जोडणी कामाचं स्वागत केलं; परंतु हे सर्व काम उत्तम दर्जाचं व्हावं, घाटांचं पावित्र्य जपलं जावं, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘‘घाटजोडणी कामानंतर स्वच्छतेसाठीचं नियोजनही महत्त्वाचं आहे. नवीन घाट बांधकाम करत असताना प्राचीन घाटांचं वेगळेपण जाणीवपूर्वक जपायला हवं. प्रत्येक घाटाची माहिती त्या त्या ठिकाणी लिहिली गेल्यास भाविकांना माहिती होईल.’’
वारकरी फडकरी संघटनेचे भागवत महाराज चवरे आणि प्राचीन पंढरपूचे अभ्यासक अॅड. आशुतोष बडवे म्हणाले, ‘घाटजोडणी कल्पना चांगलीय; परंतु हे काम टिकाऊ झालं पाहिजे. निकृष्ट दर्जाचं काम झालं, तर नदीला जेव्हा पूर येतो, तेव्हा घाटाच्या पायऱ्या पडण्याची भीती आहे. चंद्रभागा नदी आणि घाट परिसर स्वच्छ रहावा यासाठी सरकारबरोबरच स्थानिक लोकांनीही प्रयत्न करायला हवेत. काही संस्था, संघटनांनी घाटाच्या स्वच्छतेची जबाबदारी घेऊन ते काम केलं पाहिजे.’ त्यादृष्टीने काही लोकांशी बोलणं झालं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पंढरपूरला सुरू असलेल्या कामांच्या अनुषंगाने नुकतेच सोलापूरचे जिल्हाधिकारी अन्य अधिकाऱ्यांच्या समवेत वाराणसीला पाहणी करून आले. तेथील घाट आणि पंढरपुरातील घाट यांची तुलना ते करतीलच. तेथील घाटावरून थेट नदीपात्रात उतरता येतं तर पंढरपूरला घाटावरून उतरून वाळवंटातून चालत नदीपात्राकडे जावं लागतं, हा महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे घाट जोडणी योग्य आहे की नाही, तसंच प्राचीन घाट व्यवस्थित संरक्षित कसे करावेत, हा कळीचा प्रश्न आहे. गंगा शुद्धीकरण प्रकल्पाच्या धर्तीवर नमामि चंद्रभागेची कागदोपत्री झालेली घोषणा प्रत्यक्षात आली, तर लक्षावधी वारकरी समाधानी होतील हे निश्चित.