पूर्वेकडील प्रतिकार

बख्तियार खिलजीनं बिहारमध्ये हाहाकार माजवून नालंदा, विक्रमशीला, ओदांतपुरी यांसारखी विद्यापीठं जाळून टाकली हे आपण गेल्या वेळच्या लेखात पाहिलं.
king narsinhdev
king narsinhdevsakal

बख्तियार खिलजीनं बिहारमध्ये हाहाकार माजवून नालंदा, विक्रमशीला, ओदांतपुरी यांसारखी विद्यापीठं जाळून टाकली हे आपण गेल्या वेळच्या लेखात पाहिलं. यात लाखो ग्रंथ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले व प्राचीन ज्ञानसंपदेचा विनाश झाला. बख्तियार खिलजीच्या पुढील मोहिमांमध्ये काय घडलं व पूर्व भारतातील राज्यांनी खिलजीच्या, तसंच त्यानंतर येणाऱ्या आक्रमणांना कसं तोंड दिलं ते या भागात पाहू या.

कामरूपचा राजा पृथू

बिहारमधील कारवायांनंतर बख्तियार खिलजीनं आपला मोहरा सन १२०३-४ मध्ये बंगालकडे वळवला. नवद्वीपचा वयोवृद्ध हिंदू राजा लक्ष्‍मणसेन याच्यावर त्याला अतिशय सहज विजय मिळवता आला. पूर्व बंगालकडे जाण्याची वाट लक्ष्मणसेनच्या दोन मुलांनी रोखल्यानंतर त्यानं १२०६ मध्ये आपला मोहरा कामरूपकडे (आसाम) वळवला. बंगालमधील देवकोट इथून त्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात केली.

आसामच्या सीमेवरील एका टोळीच्या नायकाला धर्मांतरित करून त्याचं नामकरण त्यानं अली असं केलं. हा अली त्याचा वाटाड्या झाला. दहा दिवसांच्या वाटचालीनंतर त्याचं सैन्य बागमती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलं. तिथं बख्तियार खिलजीच्या सैन्यानं नदी पार करण्यासाठी एक पूल बांधला.

बख्तियार खिलजीनं दोन सैनिकांना पुलाची राखण करण्यासाठी मागं ठेवलं. त्यानंतर डोंगर-दऱ्यांमधून व जंगलांमधून प्रवास केल्यानंतर त्याचं सैन्य कामरूपला पोहोचलं. कामरूपचा राजा पृथू हा दुर्गेचा उपासक होता. बख्तियार खिलजीचं सैन्य येत असल्याची बातमी त्याला आधीच कळली होती. त्यानं बख्तियार खिलजीच्या सैन्याची गैरसोय करण्यासाठी दग्धभू धोरण (Scorched Earth Policy) स्वीकारलं.

शेतामधली पिकं जाळून टाकली, विहिरींमध्ये विष मिसळलं, आक्रमक सैन्याला भूक आणि तहान भागवण्यासाठी काहीही मिळणार नाही अशी तजवीज केली. इथं दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत.

पहिली म्हणजे, ज्या राजांना सक्षम हेरखात्यामुळे शत्रूच्या हालचालींची बातमी आधीच मिळाली ते आक्रमणाचा सामना करण्यासाठी सज्ज होऊ शकले. दुसरी गोष्ट अशी की, ज्यांनी धर्मयुद्धाच्या मर्यादा बाजूला ठेवून ‘जशास तसं’ अशी भूमिका घेतली ते आक्रमकांचा सामना प्रभावी रीतीनं करू शकले. असो.

तहान-भुकेनं त्रस्त झालेल्या सैन्यावर पृथूचं सैन्य कळिकाळासारखं तुटून पडलं. त्याच्या सैन्यात राजबोंगशी, बोडो यांसारख्या वनवासी जमातींचं प्रमाण मोठं होतं. तुर्की सैन्याचं खूप नुकसान होऊ लागलं. त्यात पृथूच्या मदतीसाठी आणखी मोठी कुमक येत असल्याची बातमी कानावर आल्यामुळे बख्तियार खिलजीचा धीर सुटला व त्यानं माघार घेण्याचा निर्णय घेतला.

‘पळणाऱ्या शत्रूवर हल्ला करायचा नाही’ हा धर्मयुद्धाचा नियम पृथूनं नजरेआड केला आणि पळ काढणाऱ्या बख्तियार खिलजीच्या सैन्यावर हल्ला करून असंख्य तुर्की सैनिकांना यमसदनाला धाडलं.

उरले-सुरले सैनिक जेव्हा बागमती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी बांधलेला पूल स्थानिक लोकांनी पाडून टाकला होता. पृथूचं सैन्य पाठलागावर होतंच. त्यामुळे बख्तियार खिलजीच्या थकल्या-भागल्या सैनिकांनी त्याच्यासह पाण्यात उड्या टाकल्या व ते नदी कशीबशी पार करून पलीकडे पोहोचले.

या भीषण अनुभवानंतर बख्तियार खिलजी पुरता खचून गेला. खिन्न व उदासीन राहू लागला. यानंतर त्यानं एकही मोहीम सुरू केली नाही. शेवटी बंगालमधील देवकोट इथं त्याचा सरदार अली मर्दान यानं त्याचा खून केला.

कामरूपमध्ये युद्धबंदी झालेल्या मुस्लिम सैनिकांना राजा पृथूनं हिंदू धर्माच्या सहिष्णु परंपरेनुसार अभय दिलं व तिथंच स्थायिक होण्याची परवानगी दिली. हे मुस्लिम बंगालमधील गौड प्रांतातून आलेले असल्यामुळे राजानं त्यांना ‘गौडिया’ असं नाव दिलं. हे गौडिया मुस्लिम म्हणजेच आसाममधील पहिले मुस्लिम नागरिक.

आज नालंदाचं रेल्वेस्थानक बख्तियारपूर म्हणून ओळखलं जातं. म्हणजे प्राचीन, अनमोल ज्ञानसंपदेचा विध्वंस करणाऱ्या बख्तियार खिलजीची आठवण आपण जपली आहे; पण त्याचा मोठा पराभव करणाऱ्या राजा पृथूला मात्र विस्मृतीत ढकलून दिलं आहे. देशाच्या आत्मसन्मानाच्या ठिकऱ्या उडवणारं इतिहासाचं असं विकृतीकरण जगातील दुसऱ्या कुठल्या देशानं सहन केलं असतं असं वाटत नाही!

ओडिशाचा राजा नरसिंहदेव

इस्लामी साम्राज्यवादाच्या विरोधात केलेल्या संघर्षात भारतीयांनी अनेकदा त्यांच्यावर झालेल्या आक्रमणाविरुद्ध संघर्ष केला तरी, स्वतः आक्रमण केल्याची उदाहरणं मात्र फारशी आढळत नाहीत, तसंच धर्मयुद्धाच्या संकल्पनांना चिकटून राहिल्यामुळे हिंदू राजांचं अतोनात नुकसान झाल्याची उदाहरणंही इतिहासात पदोपदी आढळतात.

या दोन नियमांना अपवाद ठरलेला एक महापराक्रमी राजा म्हणजे ओडिशाचा राजा नरसिंहदेव. कलिंग (ओडिशा) इथं राज्य करणाऱ्या पूर्वगंगा किंवा प्राच्यगंगा राजवंशातील पराक्रमी राजा अनंग भीमदेव (तिसरा) याच्या पोटी राजा नरसिंहदेवाचा जन्म झाला. या अनंग भीमदेवानंच कटक शहराची निर्मिती केली.

सन १२३८ मध्ये नरसिंहदेव गादीवर बसला. त्यानं आपल्या राज्यविस्ताराच्या मोठ्या मोहिमा आखून राज्याचा विस्तार उत्तरेला भागीरथी गंगा (हुगळी) ते दक्षिणेला गौतमी गंगा (गोदावरी) यांदरम्यानच्या विस्तीर्ण प्रदेशात केला.

कुतुबुद्दीन ऐबकचा सरदार व बंगालचा सुभेदार घियासुद्दीन खिलजी याची वारंवार होणारी आक्रमणं परतवून लावताना त्यानं त्याच्या वडिलांना पाहिलं होतं. हा धोका कायमचा संपवण्यासाठी त्यानं, इस्लामी आक्रमणाची वाट न बघता आपणच त्यांच्यावर चालून जायचं ठरवलं.

सन १२४२ मध्ये त्यानं मोठ्या सैन्यानिशी बंगालची मोहीम सुरू केली. त्याचा मेहुणा व कालचुरी हैहय वंशाचा राजा परमाद्रीदेव हादेखील त्याच्याबरोबर या मोहिमेत सहभागी झाला होता. बंगालच्या दक्षिण भागात विजय मिळवत कलिंगाचं सैन्य पुढं जाऊ लागल्यावर बंगालचा सुभेदार तुघानखान यानं जिहादची हाक दिली.

सन १२४४ मध्ये नरसिंहदेवाच्या सैन्यानं लखनोरच्या किल्ल्याला वेढा दिला. तुघानखानानं मोठ्या सैन्यासह नरसिंहदेवाच्या सैन्यावर हल्ला करताच नरसिंहदेवानं तात्पुरती माघार घेऊन आजूबाजूच्या जंगलात निघून जाण्याची रणनीती आखली. तुघानखानाच्या सैन्याचा समज झाला की, कलिंगाचं सैन्य माघार घेऊन पळून गेलं.

अशा प्रकारे शत्रूचं सैन्य पूर्णपणे गाफील झाल्यानंतर नरसिंहाच्या सैन्यानं अचानक गनिमी हल्ला करून तुर्की फौजेची दाणादाण उडवली. स्वतः तुघानखान जबर जखमी होऊन कसाबसा पळून गेला. कलिंग सैन्याचा हा नरसिंहावतार पाहून तुघानखानानं दिल्लीकडे मदत मागितली.

त्यांनी अवधचा सुभेदार कमरुद्दीनखान याला सैन्यासह बंगालच्या मदतीला जाण्याचा हुकूम सोडला; पण त्या दोघांमध्ये मतभेद झाल्यामुळे ते फारसं काही करू शकले नाहीत. शेवटी, सन १२४७ मध्ये तुघानखानाच्या जागी इख्तियारुद्दीन या नव्या सुभेदाराची नेमणूक करण्यात आली.

नरसिंहदेवाचा मेहुणा परमाद्रीदेव यानं त्याचा मोठा पराभव केला. अशा रीतीनं तुर्की सैन्याचा वारंवार पराभव करून नरसिंहदेवानं बिहार व बंगाल इथं आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याच्या पराक्रमाचा धसका घेतलेल्या तुर्कांनी त्यानंतर कलिंग प्रदेशावर हल्ले करण्याचा विचारही केला नाही.

नरसिंहदेव हा कला व संस्कृती यांचाही मोठा आश्रयदाता होता. कोणार्कचं जगद्विख्यात सूर्यमंदिर त्याच्याच कारकीर्दीत बांधलं गेलं. बंगालमधील तुर्कांच्या जुलमाला कंटाळून ओडिशाला पळून येणाऱ्या हिंदूंसाठी त्यानं अनेक धर्मशाळाही बांधल्या. त्याच्या राज्यात त्यानं अनेक सुंदर मंदिरं बांधली. साहित्यिक, कवी व विद्वान यांचा तो नेहमी सन्मान करत असे. तुर्कांना धूळ चारणाऱ्या या पराक्रमी, कलासक्त राजाला आपल्या इतिहासात मात्र योग्य ते स्थान मिळालं नाही.

(लेखक ब्रँडिंग-तज्ज्ञ असून, ‘असत्यमेवजयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com