भारतावरील इस्लामी आक्रमणांची सुरुवात

इस्लामच्या स्थापनेपासून सतत कराव्या लागणाऱ्या लढायांमुळे तावून-सुलाखून निघालेलं नेतृत्व, एकामागून एक विजय मिळवल्यामुळे वाढलेला आत्मविश्वास, प्रेषितांनी सांगितलेला नवा धर्म जगभर घेऊन जाण्याची प्रेरणा...
Abhijit Jog writes Beginning of Islamic invasions of India
Abhijit Jog writes Beginning of Islamic invasions of Indiasakal
Updated on
Summary

इस्लामच्या स्थापनेपासून सतत कराव्या लागणाऱ्या लढायांमुळे तावून-सुलाखून निघालेलं नेतृत्व, एकामागून एक विजय मिळवल्यामुळे वाढलेला आत्मविश्वास, प्रेषितांनी सांगितलेला नवा धर्म जगभर घेऊन जाण्याची प्रेरणा...

या धर्मयुद्धाचं वर्णन करताना ग्रीकांचा राजदूत मेगॅस्थेनिस ‘इंडिका’ या आपल्या ग्रंथात म्हणतो : ‘त्यांनी कधीही आगी लावून व झाडांची तोड करून शत्रूच्या प्रदेशातील जमिनीचा विध्वंस केला नाही.

शेजारी लढाई सुरू असताना शेतकरी आपल्या शेताची नांगरणी सुरक्षितपणे सुरू ठेवू शकत. आपल्या राजाचा पराभव झाला तरी आपल्याला कुठलीही इजा पोहोचवली जाणार नाही, हे त्यांना माहीत होतं. सैनिक फक्त सैनिकांशीच लढत असत. शेतकऱ्याचा धर्म होता शेती करणं, तर कारागिराचा धर्म होता कलात्मक वस्तू तयार करणं.’

इस्लामच्या स्थापनेपासून सतत कराव्या लागणाऱ्या लढायांमुळे तावून-सुलाखून निघालेलं नेतृत्व, एकामागून एक विजय मिळवल्यामुळे वाढलेला आत्मविश्वास, प्रेषितांनी सांगितलेला नवा धर्म जगभर घेऊन जाण्याची प्रेरणा...

यांमुळे अरबांनी मिळवलेल्या नेत्रदीपक विजयांबद्दल आपण याआधीच्या लेखात वाचलं. इस्लामच्या प्रसारासाठी जगभर निघालेल्या मोहिमांचा रोख लवकरच भारताकडे वळणार हे निश्चित होतं; कारण, ‘अल्-हिंद’वर इस्लामचा झेंडा फडकावा अशी स्वतः प्रेषित महंमद यांची तीव्र इच्छा होती.

भारत हा मूर्तिपूजकांचा देश आणि जगातून मूर्तिपूजा नष्ट करणं हे इस्लामचं प्रमुख ध्येय, त्यामुळे भारतावर जे विजय मिळवतील त्या वीरांना जन्नतमध्ये नक्की जागा मिळेल असं स्वतः प्रेषितांनी सांगून ठेवलं होतं. या आक्रमणांची सुरुवात झाली तेव्हा भारतातील परिस्थिती काय होती हे आता जाणून घेऊ.

मध्य आशियापासून युरोपपर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशातील पर्शियन साम्राज्य आणि बायझंटाईन साम्राज्य ही दोन बलशाली साम्राज्ये इस्लामी आक्रमणाच्या वावटळीत पाल्यापाचोळ्यासारखी उडून गेली हे आपण पाहिलं. या वावटळीचा सामना करण्याच्या दृष्टीनं भारताची परिस्थिती त्या वेळी फारशी आशादायक नव्हती.

भारताचा सुवर्णकाळ मानल्या गेलेल्या गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर, सम्राट हर्षवर्धन (सन ६०६ ते ६४७) याचा काळ सोडला तर संपूर्ण भारताला एकत्र ठेवू शकेल असं मौर्य, गुप्त यांच्यासारखं मोठं साम्राज्य उरलं नव्हतं. पश्चिमेला ‘गुर्जर-प्रतिहार’, पूर्वेला ‘पाल’, दक्षिणेला ‘चालुक्य’ आणि ‘राष्ट्रकूट’ ही राजघराणी होती; पण संपूर्ण भारताला एकत्र ठेवून परकीय आक्रमणाला तोंड देऊ शकेल अशी केंद्रशक्ती अस्तित्वात नव्हती.

ग्रीकांच्या आक्रमणाच्या वेळी चाणक्य व चंद्रगुप्त यांनी ही भूमिका मोठ्या प्रभावीरीत्या पार पडली होती; पण मुस्लिम आक्रमणाच्या वेळी मात्र त्यांची उणीव भासत होती, तसंच गुप्तकाळात परमावधीला पोहोचलेल्या समृद्धीमुळे एक प्रकारच्या संतुष्टीची झापड जणू सगळ्या समाजावर चढली होती. याशिवाय अत्यंत आक्रमक, हिंसक, धर्मांध आणि विधिनिषेधशून्य शत्रूशी लढताना मोठा अडसर ठरेल अशी कल्पना तेव्हा प्रबळ होती; ती म्हणजे, हिंदूंचा धर्मयुद्ध कल्पनेवरील विश्वास.

फसवेगिरीनं युद्ध करायचं नाही, शरण आलेल्या शत्रूला अभय द्यायचं, माघार घेणाऱ्या; नि:शस्त्र, युद्धात सहभागी नसलेल्यांवर शस्त्र चालवायचं नाही, शत्रू दुसऱ्याशी लढण्यात गुंतला आहे हे पाहून त्याच्यावर शस्त्र चालवायचं नाही, विष लावलेलं शस्त्र वापरायचं नाही, युद्ध नेहमी समान पातळीवरील शत्रूशीच करायचं, स्त्रियांना युद्धातील लूट म्हणून वागणूक द्यायची नाही, सूर्योदयाच्या आधी व सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही, पाठीमागून वार करायचा नाही...

यांसारख्या धर्मयुद्धाच्या नियमांप्रमाणेच युद्ध करण्याची भारतीय परंपरा होती आणि राजपूतांसारख्या क्षत्रीय जाती हे नियम कसोशीनं पाळत असत. कत्तली, लुटालूट, स्त्रियांचं व गुलामांचं अपहरण, मंदिरांचा विध्वंस, जुलूम-जबरदस्ती यांचा हिंसक आणि प्रलयंकारी आविष्कार असलेल्या इस्लामी आक्रमणासमोर या धर्मयुद्धाचा निभाव लागणं अशक्यच होतं.

या सगळ्या परिस्थितीमुळे इस्लामची भारतावरील मोहीमही इराण, इराक, इजिप्तप्रमाणे चार-आठ वर्षात संपेल व संपूर्ण भारत मुस्लिम अमलाखाली येईल यात कुणाला शंका नव्हती. इजिप्शियन, मेसोपोटेमियन, ग्रीक, रोमन या प्राचीन संस्कृतींनंतर नामशेष होण्याची पाळी आता भारतीय संस्कृतीची होती; पण पर्शियन व बायझंटाईन साम्राज्यासारख्या शक्तिशाली केंद्रीय सत्तांनाही जे जमलं नाही ते छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेल्या भारतानं करून दाखवलं.

हजार-अकराशे वर्षांनंतरही आक्रमकांना संपूर्ण भारत इस्लामच्या छत्राखाली कधीच आणता आला नाही, तसंच अपरिमित जुलूम, जबरदस्ती, प्रलोभनांनंतरही सगळ्या हिंदू-जैन-बौद्ध यांचं धर्मांतर करणंही आक्रमकांना शक्य झालं नाही.

कारण, इस्लामच्या आक्रमणासमोर भारताचा इतिहास ठरला तो संघर्षाचा इतिहास; पराभवाचा इतिहास नव्हे. वर्षानुवर्षं आपल्याला जो इतिहास शिकवण्यात आला त्यानुसार सन ७११ मध्ये महंमद बिन कासिम यानं भारतावर आक्रमण करून सिंध प्रांत जिंकून घेतला. त्यानंतर इस्लामी आक्रमकांच्या लाटांवर लाटा भारतावर आदळत राहिल्या, भारतीय पराभूत होत राहिले आणि भारत इस्लामी राजवटींच्या गुलामगिरीत ढकलला गेला.

हा इतिहास किती अपुरा, तोकडा, संपूर्ण वास्तव लपवून ठेवणारा व दिशाभूल करणारा आहे, हे आता आपण बघू. इस्लामचं भारतावरील पहिलं आक्रमण सन ७११ मध्ये नव्हे तर सन ६३६ मध्येच झालं, जेव्हा खलिफा उमरच्या कारकीर्दीत ओमानमधील अरब नौदलानं ठाण्यावर हल्ला चढवला होता तेव्हा. हा हल्ला यशस्वीरीत्या परतवला गेला.

त्यानंतर बरखास (भडोच) इथं असाच एक प्रयत्न झाला. तो अयशस्वी ठरला. सिंधवरील अरबांचं पहिलं आक्रमण मुघीरा या सेनापतीच्या नेतृत्वाखाली देबल इथं झालं. देबल (सध्याचं कराची) हे बंदर आपल्या ताब्यात असावं अशी अरबांची फार इच्छा होती. कारण, अरबस्तानातून आग्नेय आशियाशी होणाऱ्या व्यापारासाठी हे बंदर फार सोईचं होतं, तसंच खुष्कीच्या मार्गानं सिल्क रूटमार्फत होणाऱ्या व्यापारासाठीही हे बंदर उपयुक्त ठरणार होतं; पण इथं झालेल्या लढाईत स्वतः मुघीरा ठार झाला व अरब सैन्याचा मोठा पराभव झाला.

यानंतर खलिफा उमरनं जमिनीच्या मार्गानं सिंधमधील मकरानवर स्वारी करण्याची योजना आखली; पण ‘भारताच्या वाटेला जाऊ नका’ असा सल्ला मिळाल्यामुळे त्यानं ती गुंडाळून ठेवली. यानंतर आलेला खलिफा उस्मान (सन ६४३ ते ६५६) यानंही तोच सल्ला ग्राह्य मानला व तो भारताच्या नादी लागला नाही.

चौथा खलिफा अली यानं जमिनीच्या मार्गे पुन्हा आक्रमण केलं; पण कलात या शहरात झालेल्या लढाईत मोहिमेचा प्रमुख हॅरिस-अल्-अब्दी मारला गेला. त्याचं बरंचसं सैन्यही कामी आलं आणि बाकीच्या सैन्यानं पळ काढला. अशा रीतीनं प्रेषितांबरोबर मक्केहून मदिनेला गेलेल्या, अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या पहिल्या चार खलिफांच्या कारकीर्दीत अरबांना सिंधवरील चढायांमध्ये सतत पराभवाचाच सामना करावा लागला.

याच चार खलिफांच्या कारकीर्दीत अरब सैन्यानं इतरत्र किती मोठे आणि विस्मयजनक विजय मिळवले होते हे आपण पाहिलंच आहे. यावरून अरबांच्या विजयी घोडदौडीला भारतात किती कडवा विरोध झाला व किती प्रभावी पायबंद घातला गेला हे स्पष्ट व्हावं. यानंतर आलेला खलिफा मुआविया यानं सिंधवर जमिनीच्या मार्गानं सहा वेळा आक्रमण केलं आणि प्रत्येक वेळी त्याला हिंदू राजांकडून मोठे पराभव स्वीकारावे लागले.

फक्त शेवटच्या मोहिमेत अरबांना मकरान शहरावर कब्जा मिळवता आला; पण हे लागोपाठ झालेले पराभव इतके जबरदस्त होते की पुढील २८ वर्षं अरबांनी भारताकडे वाकडी नजर केली नाही. सन ७०८ मध्ये देबल बंदर जिंकून घेण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली आणि त्यांनी लागोपाठ दोन मोहिमा आखल्या.

या दोन्ही मोहिमांचे प्रमुख उबैदुल्ला आणि दुबैल हे मारले गेले आणि अरबांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. अल् हझाज हा जेव्हा इराकमधील अरब सैन्याचा प्रमुख झाला तेव्हा त्यानं सिंधवरील आणखी एका मोहिमेसाठी खलिफाची परवानगी मागितली.

तेव्हा खलीफानं त्याला ‘सिंधवरील मोहिमा आपण सध्या थांबवाव्यात; कारण, जेव्हा जेव्हा आपलं सैन्य तिथं जातं, तेव्हा तेव्हा मुस्लिमांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. पुन्हा असल्या मोहिमांचा विचार करू नये,’ या शब्दात परवानगी नाकारली.

अशा प्रकारे सन ६३६ ते ७११ या ७५ वर्षांत अरब आक्रमकांना भारतात सतत पराभवांचाच सामना करावा लागला. याच कालखंडात त्यांनी पर्शियन व बायझंटाइन या दोन मोठ्या साम्राज्यांविरुद्ध ते आश्चर्यकारक विजय मिळवले होते त्यांच्या पार्श्वभूमीवर भारतात त्यांना झालेला कडवा विरोध विशेष लक्षात घेण्यासारखा आहे.

मात्र, आपल्या पिढ्यान् पिढ्यांपासून हे वास्तव लपवून ठेवण्यात आलं आणि त्यामुळे आपल्याच मनात आपली ‘एक पराभूत देश’ अशी प्रतिमा निर्माण होत गेली आणि त्यामुळे आपल्या देशाचं अपरिमित नुकसान झालं. अल्- हझाजनं खलिफाचा सल्ला मानला का? इस्लामी आक्रमणाच्या पुढील टप्प्यात काय घडलं, हे जाणून घेऊ पुढील लेखात.

(लेखक ब्रँडिंग-तज्ज्ञ असून, ‘असत्यमेवजयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com