संघर्षाला विराम नाही...

भारताच्या इतिहासातील अशा वीरांची आणि वीरांगनांची आपण ओळख करून घेत आहोत, ज्यांनी परकीय आक्रमकांशी सतत संघर्ष केला आणि त्यांच्यावर विजयही मिळवला.
History
Historysakal

भारताच्या इतिहासातील अशा वीरांची आणि वीरांगनांची आपण ओळख करून घेत आहोत, ज्यांनी परकीय आक्रमकांशी सतत संघर्ष केला आणि त्यांच्यावर विजयही मिळवला. आज आपण अशाच दोन व्यक्तिमत्त्वांची ओळख करून घेणार आहोत.

महाराणा कुंभ

राजस्थानमधील कुंभलगढच्या किल्ल्यासमोर उभे राहून या विशाल किल्ल्याकडे एक नजर टाकली तर मेवाडच्या राजपूत घराण्याचा भव्य-दिव्य इतिहास आठवून मन अभिमानानं भरून येतं. हा किल्ला ज्यानं बांधला तो महाराणा कुंभ किंवा कुंभकर्णसिंग, मेवाडचा राजा मोकल आणि राणी सौभाग्यदेवी यांचा सुपुत्र. इ.स.१४३३ मध्ये तो मेवाडच्या गादीवर बसला. त्याची ३५ वर्षांची कारकीर्द मेवाडचा सुवर्णकाळ म्हणून ओळखली जाते.

या पराक्रमी, न्यायी, कार्यकुशल व कलासक्त राजाचा आयुष्यात एकदाही पराभव झाला नाही. इ.स. १४३७ मध्ये त्यानं माळव्याचा सुलतान महमूद खिलजी याचा सारंगपूरच्या लढाईत मोठा पराभव केला. या विजयाची आठवण म्हणून त्याने चितोडच्या किल्ल्यात नऊ मजली विजयस्तंभ उभारला. कर्नल जेम्स टॉडने या स्तंभाचे वर्णन करताना तो कुतुबमिनारपेक्षाही आकर्षक असल्याचं म्हटलं आहे.

या पराभवानं अपमानित झालेल्या महमूद खिलजीने गुजरातचा सुलतान कुतुबुद्दीन शाह यांच्या मदतीने मेवाडवर आक्रमण केले. या संयुक्त सैन्याचाही राणा कुंभाने इ.स.१४५६ मध्ये दणदणीत पराभव केला. यानंतर त्याने पुन्हा इ.स.१४५७ मध्ये खिलजीला पाणी पाजले. अशा रीतीने माळव्याचा सुलतान तीन वेळा प्रयत्न करूनही महाराणा कुंभ याला हरवू शकला नाही. नागौरचा सुलतान शम्स खान यालाही त्याने इ.स. १४५६ मध्ये पराभूत केले.

मारवाडचा राजा राव जोधा यांच्याशी समझोता करून मेवाड-मारवाड यांची एक मजबूत फळी त्याने मुस्लिम राज्यकर्त्यांविरुद्ध उभी केली. त्याच्या चारही बाजूला पसरलेल्या मुस्लिम राजवटींनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही महाराणा कुंभाचे मेवाड राज्य नेहमी स्वतंत्रच राहिले.

महाराणा कुंभ यानं अनेक भव्य आणि आकर्षक बांधकामं केली. मेवाडच्या राज्यातील ८४ किल्ल्यांपैकी ३२ किल्ले एकट्या कुंभ यानं बांधलेले आहेत. चितोडच्या किल्ल्यात त्याने बांधलेल्या 'कुंभप्रशस्ती'वर मेवाडच्या राजघराण्याचा इतिहास कोरलेला आहे. कुंभलगढचा किल्ला ही त्याची एक भव्य निर्मिती. या किल्ल्याची भिंत ३६ किलोमीटर लांब असून ती 'ग्रेट वॉल ऑफ चायना' नंतर जगातील सगळ्यात मोठी भिंत आहे.

स्वतः महाराणा कुंभ, कुंभलगढ किल्ल्यातूनच राज्यकारभार करत असे. महाराणा कुंभाचा वंशज असलेल्या राणा प्रताप यांचा जन्मही कुंभलगढ किल्ल्यातच झाला. कुंभाने बांधलेल्या बसंतीदुर्ग किल्ल्यात त्याने भगवान विष्णूला समर्पित केलेली सात सुंदर सरोवरं बांधली आहेत.

याशिवाय त्याने कुंभलगढ व चितोडगढ येथे अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो कला आणि संस्कृतीचा मोठा आश्रयदाता होता. तो स्वतः उत्तम वीणावादन करत असे व त्यानं विपुल ग्रंथ निर्मितीही केली. संगीत क्रमदीपिका, रसिकप्रिय की टीका, हरिनर्तिका, संगीत रत्नाकर, चंडीशतक टीका, संगीत मीमांसा, संगीत-सुधा प्रबंध, वाद्य प्रबंध हे त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याच्या दरबारात अनेक प्रज्ञावंत लेखक, कवी व कलाकार होते.

यामध्ये कुंभलगढच्या किल्ल्याचा वास्तुविशारद असलेल्या मदन याचाही समावेश होता. आपला असा समज असतो, की मध्ययुगीन काळात सगळीकडे फक्त इस्लामी राजवटीच होत्या. कारण इस्लामी आक्रमकांना वारंवार धूळ चारून अत्यंत सुखी, समृद्ध आणि सुसंस्कृत राज्य चालवणाऱ्या महाराणा कुंभासारख्या महापुरुषाचे नावही आपण ऐकलेले नसते. हे आहे भारताच्या इतिहासात वारंवार केल्या गेलेल्या दिशाभुलीचे आणखी एक उदाहरण.

राणी कर्णावती

अरब आणि तुर्कांची आक्रमणं जशी वाढू लागली, तशी भारतातील अनेक राजघराण्यांनी डोंगराळ भागात स्थलांतर करून आपली राज्य वसवायला सुरुवात केली. इथली जंगलं, दऱ्याखोऱ्या, अवघड वाटा आणि वळणं यामुळे आक्रमकांची घोडदळं येथे फारशी उपयोगी ठरत नसत तसंच पायदळालाही या अपरिचित प्रदेशात हालचाली करणे कठीण जात असे.

परमार राजवंशाचा राजा भोज याच्या वंशजांनी त्यांची राजधानी इंदोरजवळील धार येथून गढवालला हलवली होती. याच परमार वंशातील राजा अजयपाल याने इ.स.१३५८ मध्ये अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर, ऋषिकेशपासून शंभर किलोमीटर अंतरावरील श्रीनगर येथे आपली राजधानी वसवली. इतिहासकार फेरिश्ता याने त्याच्या राज्याच्या श्रीमंतीचे वर्णन करून ठेवले आहे.

गढवालमध्ये सोनं, तांबं आणि शिसाच्या खाणी होत्या. तसेच अलकनंदा, भागीरथी, सोना या नद्यांच्या पाण्यातही सोन्याचे अंश सापडत असत. विल्यम फिंच हा ब्रिटिश प्रवासी म्हणतो, की गढवालचे राजे सोन्याच्या ताटामध्ये भोजन करत असत. गढवाल, कुमाउं, तिबेट इथल्या राजांच्या एकमेकांत सतत चकमकी होत असत.

गढवालच्या या राजाने जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब या तिन्ही मुघल सम्राटांना तोंड देऊन आपलं स्वातंत्र्य जपलं होतं. राणी कर्णावतीचा पती महीपत शाह हा इ.स. १६२२ मध्ये गादीवर बसला. तो अत्यंत स्वाभिमानी राजा होता. इ.स. १६२८ मध्ये जेव्हा शाहजहानचा राज्याभिषेक झाला, तेव्हा मुघलांच्या सर्व मांडलिक राजांना राज्याभिषेक समारंभाचं आमंत्रण पाठवण्यात आलं.

गढवाल दरबारात अनेक भेटींसह हे आमंत्रण आलं असता राजा महीपतला तो अपमान वाटला, कारण गढवाल हे मांडलिक नव्हे तर स्वतंत्र राज्य होतं. त्यामुळे त्याने मुघलांच्या दूताचा अपमान करून त्याला हाकलून दिलं.

१६३१ मध्ये महीपतचा रणभूमीवरच मृत्यू झाल्यावर त्याच्या अवघ्या सात वर्षांच्या मुलाला गादीवर बसवण्यात आलं व त्याच्या वतीने राणी कर्णावती राज्यकारभार बघू लागली. ती अतिशय कर्तबगार व प्रजाहितदक्ष राणी होती. तिने अनेक टाक्या व कालवे बांधून सिंचन योजना राबवल्या. डेहराडूनच्या भागातील सिंचनासाठी बांधलेला पहिला कालवा असलेला राजपुर कालवा तिच्या राजवटीत बांधला गेला.

महीपत शाहने केलेल्या अपमानामुळे शाहजहानचा आधीच गढवालवर राग होता. त्यात आता एक स्त्री हे राज्य चालवत आहे हे कळल्यावर गढवालचे राज्य गिळंकृत करण्याची ही चांगली संधी आहे, असे वाटून त्याने नजाबत खान याला तीस हजारांचे सैन्य घेऊन गढवालच्या मोहिमेवर पाठविलं. राणीने या सैन्याशी संघर्ष करून आपल्या राज्याचं रक्षण करायचं ठरवलं. राणी कर्णावतीने राज्याच्या सीमेवर आपल्या हेरांना तैनात केलं होतं.

त्यांच्याकडून मुघल सैन्याच्या हालचालीची बित्तंबातमी तिला कळत होती. तिने मुघल सैन्याला तिच्या राज्याच्या बरंच आतवर येऊ दिलं आणि एका अवघड रस्त्यावर मुगल सैन्याच्या पिछाडीला त्यांच्या नकळत आपल्या सैन्याच्या काही तुकड्या पाठवल्या. मुख्य सैन्याने समोरून त्यांच्यावर हल्ला चढवला. आता मागे वळता येत नाही आणि पुढेही सरकता येत नाही अशा कैचीत मुघल सैन्य सापडलं. गढवाली सैन्याने मुघलांची कत्तल सुरू केली.

उरलेलं सैन्य राणीला शरण आलं. तिने त्यांना ठार न मारता त्यांना असा धडा शिकवायचं ठरवलं, की पुन्हा गढवालकडे वाकड्या नजरेने बघायची इच्छा होऊ नये. भारतीय परंपरेत नाक कापलं जाणं ही सर्वाधिक अपमानाची आणि बेइज्जतीची गोष्ट मानली जाते. लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्याची गोष्ट आपण जाणतोच.

राणी कर्णावतीने हुकूम दिला, की एक-एक मुघल सैनिकाने आपले शस्त्र खाली ठेवून पुढे यायचं आणि नाक कापलं गेलं की आल्या वाटेने परत जायचं. यातून सेनापती नजाबत खानही सुटला नाही. टॅव्हर्निअर, मासिर-अल-अम्रा या ग्रंथांमध्ये राणी कर्णावतीच्या या पराक्रमाचं वर्णन करण्यात आलं आहे. मात्र इतर अनेकांप्रमाणे राणी कर्णावतीचंही नामोनिशाण भारताच्या इतिहासात उरलेलं नाही.

शत्रूचं नाक कापण्याची शिक्षा देण्याची ही पद्धत भारतात पूर्वांपारपासून चालत आलेली आहे. तसेच कापलेली नाके दुरुस्त करण्याची शस्त्रक्रियाही भारतात प्राचीन काळापासून होत आलेली आहे. सुश्रुताने इ.स.पू. पाचव्या शतकात या शस्त्रक्रियेची पद्धत सुश्रृत संहितेत लिहून ठेवली आहे. प्लास्टिक सर्जरीचं हे तंत्र भारतातून युरोपात कसं गेलं याचा इतिहास मोठा रंजक आहे.

इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्या दरम्यान इ.स.१७९० मध्ये झालेल्या युद्धात बैलगाडी चालवणारा एक गाडीवान कावसजी याला म्हैसूर सैन्याने कैद केलं आणि नाक कापून परत पाठवून दिलं. त्याच्या नाकावर पुण्यात एका कुंभाराने आपलं परंपरागत ज्ञान वापरून यशस्वी शस्त्रक्रिया केली. ईस्ट इंडिया कंपनीचे दोन सर्जन थॉमस क्रुसो व जेम्स फिंडले या शस्त्रक्रियेच्या वेळी हजर होते.

त्यांनी या पारंपरिक पद्धतीचे नीट अध्ययन केले व हा अनुभव मद्रास गॅझेट मध्ये प्रकाशित केला. नंतर इ.स. १७९४ मध्ये त्यांनी लंडनमध्ये सर्जन्सच्या परिषदेत या शस्त्रक्रियेवर एक सादरीकरण केले. त्यानंतर प्लास्टिक सर्जरीची पद्धत युरोपात सुरू झाली. आज जगभर लोकप्रिय असलेल्या प्लास्टिक सर्जरीचं मूळ पुण्यात आहे, याची अजूनही कोणाला फारशी कल्पना नाही.

(लेखक ब्रॅंडिंग तज्ज्ञ असून ‘असत्यमेव जयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com