आक्रमणांची तिसरी लाट... सुरुवात पराभवानंच

सन ११७५ मध्ये महंमद घोरीनं गोमल खिंडीतून भारतात प्रवेश केला व मुलतान जिंकून घेतलं.
muhammad ghori Attack on India
muhammad ghori Attack on Indiasakal

सन १०३४ मध्ये राजा सुहेलदेव यानं तुर्की आक्रमकांचा कसा दणदणीत पराभव केला याविषयी आपण याआधीच्या लेखात वाचलं. हा पराभव इतका निर्णायक होता की, त्यानंतर दीडशे वर्ष आक्रमकांनी भारताकडे डोळे वर करून पाहिलंदेखील नाही. आक्रमणांची तिसरी लाट सुरू झाली ती महंमद घोरीच्या आक्रमणामुळे.

महंमद घोरीचा थोरला भाऊ घियासुद्दीन सन ११६३ मध्ये अफगाणिस्तानच्या पश्चिमोत्तर भागातील घौर प्रांताचा राजा बनला. त्यानं महंमद घोरीला सन ११७३ मध्ये गझनीच्या राज्यावर बसवलं. राज्यविस्ताराची महत्त्वाकांक्षा असलेल्या या भावांनी असं ठरवलं की, घियासुद्दीननं खुरासाणकडे व इराणकडे मोहिमा आखायच्या, तर महंमद घोरीनं भारताकडे मोर्चा वळवायचा.

सन ११७५ मध्ये महंमद घोरीनं गोमल खिंडीतून भारतात प्रवेश केला व मुलतान जिंकून घेतलं. दीडशे वर्षांपूर्वी गझनीच्या महमूदनं सोमनाथवर केलेली स्वारी, तिथं केलेला विध्वंस व मिळवलेली प्रचंड लूट याच्या कहाण्या आता संपूर्ण मुस्लिमविश्वात दंतकथा बनून गेल्या होत्या.

आपणही सोमनाथला जाऊन गझनीचं 'कार्य' पुढं न्यावं या महत्त्वाकांक्षेनं घोरीनं गुजरातवर स्वारी करायचं ठरवलं. तो मोठं सैन्य घेऊन निघाला. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या दक्षिणेला असलेलं ''उच''चं राज्य त्यानं जिंकून घेतलं. वाळवंट पार करून तो चालुक्यांची राजधानी असलेल्या अनहिलवाडकडे निघाला.

तिथला राजा अल्पवयीन असल्याचं त्यानं ऐकलं होतं आणि त्यामुळे तिथं त्याला फारसा प्रतिकार होणार नाही अशी त्याची अपेक्षा होती. चालुक्यांचा अल्पवयीन राजा मूलराज (दुसरा) याची आई नायकीदेवी ही गोव्यातील कदंब राजवटीचा राजा शिवचित्त याची कन्या होती.

तिचा विवाह चालुक्य राजा अजयपाल याच्याशी झाला होता. अजयपालच्या अकाली मृत्यूनंतर त्याचा पुत्र मूलराज (दुसरा) याला गादीवर बसवण्यात आलं; पण तो अल्पवयीन असल्यामुळे नायकीदेवी राज्यकारभार बघत होती. तिची राज्याच्या प्रशासनावर उत्तम पकड होती व ती युद्धशास्त्रातही निपुण होती.

महंमद घोरी प्रचंड सैन्य घेऊन आपल्या राज्यावर चालून येत असल्याची खबर नायकीदेवीला तिच्या हेरांकडून मिळाली. तिनं शेजारी-राजवटींकडून मदत मागितली व त्यांनीही मदत द्यायचं कबूल केलं. घोरीच्या सैन्याचा तळ माऊंटअबूजवळ पडला होता.

तिथून त्यानं राणीला निरोप पाठवला की, ‘जर ती तिच्या मुलासह शरण आली तर आणि चालुक्य राजवटीचं सगळं सोनं व उत्तमोत्तम स्त्रिया नजराणा म्हणून तिनं घोरीच्या स्वाधीन केल्या तर तो तिच्या राज्यात लुटालूट, विध्वंस आणि अत्याचार करणार नाही.’ या अटी मान्य असल्याचं राणीनं भासवलं.

राणीच्या आगमनाच्या सूचना ऐकून, आपली मोहीम न लढताच फत्ते होणार, या कल्पनेनं घोरी अत्यंत खूश झाला व राणीच्या स्वागतासाठी सज्ज झाला; पण जसजसा रणदुंदुभीचा आवाज वाढत वाढत टिपेला जाऊन पोहोचला, तसतशी काहीतरी गडबड असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

चालुक्यांच्या सैन्यानं घोरीच्या तळाला चारही बाजूंनी घेरलं होतं. स्वतः नायकीदेवी घोड्यावर स्वार होऊन चालुक्यांच्या सैन्याचं नेतृत्व करत होती. घोरीच्या सैन्याची दाणादाण उडाली.

इतिहासकार फेरिश्ता लिहितो, ‘ घोरीच्या सैन्याची कत्तल उडाली व दारुण पराभव झाला. उरल्यासुरल्या सैन्यासह घोरीनं पलायन केलं. गझनीला पोहोचेपर्यंत त्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. या पराभवानं हबकलेला महंमद घोरी पुढची बारा वर्षं हिंदुस्थानच्या वाटेला गेला नाही. गुजरातकडे तर त्यानं पुन्हा चुकूनही पाहिलं नाही.’

भारताच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना नाही का? तरीही आपण घोरीचा इतका दारुण पराभव झाल्याचं कधीच का ऐकलं नाही? भारतमातेची ‘वीरपुत्री’ असलेल्या नायकीदेवीचं नावही आपल्याला का माहीत नाही? यांसारख्या प्रत्येक प्रश्नाचं पुन:पुन्हा मिळणार एकमेव उत्तर म्हणजे, काही कारस्थानी लोकांनी ठरवून केलेली दिशाभूल.

घोरी-पृथ्वीराज संघर्ष

गुजरातमध्ये मार खाल्ल्यानंतर घोरीनं आपली रणनीती बदलली. आता त्यानं भारतात खोलवर चढाई न करता सीमाप्रांतावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. आजवर अनेक आक्रमक हेच करत आले होते. त्यानं पेशावर व लाहोरपर्यंत मजल मारल्यावर दिल्लीचा व अजमेरचा राजा पृथ्वीराज चौहान याच्या राज्याशी त्याच्या सीमा येऊन भिडल्या. पृथ्वीराज व घोरी यांच्यात किती लढाया झाल्या याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहे.

‘प्रबंधचिंतामणी’, ‘पृथ्वीराज रासो’ यांसारख्या हिंदू इतिहासग्रंथांच्या मते, पृथ्वीराजनं २१ वेळा घोरीचा पराभव केला; तर मिनाझ, फेरिश्ता यांसारखे मुस्लिम इतिहासकार तराई इथं झालेल्या दोन युद्धांचाच उल्लेख करतात. खरं असं असावं की, लाहोरहून घोरीच्या सैन्यानं अनेक वेळा पृथ्वीराजच्या राज्यात घुसण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी छोट्या-मोठ्या चकमकींत पृथ्वीराज चौहानच्या सैन्यानं घोरीच्या सैन्याचा पराभव करून त्या सैन्याला पिटाळून लावलं असावं. दोन मोठी युद्धं मात्र तराई इथं झाली.

इतिहासकार मिनाझ सांगतो की, ‘ सन ११९१ मध्ये मुईझुद्दीननं (महंमद घोरी) मोठ्या सैन्यासह सरहिंदच्या किल्ल्यावर कब्जा केला. हा किल्ला चौहानराज्यात बराच आतमध्ये होता. त्यामुळे तिथून त्याला हुसकून लावण्यासाठी पृथ्वीराज दोन लाख घोडदळ, तीन हजार हत्ती असं मोठं सैन्य घेऊन निघाला.

दोन्ही सैन्यांची कुरुक्षेत्रापासून २० किलोमीटरवरील तराई इथं गाठ पडली. राजपूत सैन्याच्या प्रखर आक्रमणापुढे घोरीच्या सैन्याची डावी व उजवी बाजू कोसळली; पण हिंमतवान घोरीनं उरल्यासुरल्या सैन्याला बरोबर घेऊन लढाई सुरू ठेवली.

हत्तीवरील अंबारीत बसून लढणारा दिल्लीतील राजपूत सैन्याचा प्रमुख आणि पृथ्वीराजचा धाकटा भाऊ गोविंदराज याला घोरीचा भाला लागून त्याचे दोन दात पडले; पण डगमगून न जाता गोविंदराज लढत राहिला. थोड्याच वेळात त्याचा भाला घोरीला लागून त्याच्या हाताला मोठी जखम झाली व तो घोड्यावरून खाली पडला. एका सैनिकानं त्याला युद्धभूमीतून बाहेर नेलं.

आपला सुलतान पडलेला पाहून घोरीच्या सैन्यात पळापळ सुरू झाली. पळणाऱ्या सैन्याचा पाठलाग करून घोरीचा धोका पृथ्वीराज कायमचा संपवू शकला असता; पण त्या शूर आणि दिलदार राजपूतानं धर्मयुद्धाच्या मूल्यांना जागून घोरीला पळून जाऊ दिलं. दगाबाज शत्रूला असा मनाचा मोठेपणा दाखवणं पृथ्वीराजला आणि भारताला फारच महागात पडलं.’

गझनीला परतल्यावर पराभवाच्या अपमानानं झोप उडालेल्या घोरीनं एकच ध्यास घेतला. पराभवाचा सूड. सन ११९२ मध्ये एक लाख वीस हजार सैन्य घेऊन तो परत आला. पर्शियन इतिहासकार फेरिश्ता त्याच्या

‘तारीख-ई-फेरिश्ता’ या ग्रंथात म्हणतो, ‘दुःख आणि अपमान यात महंमद घोरी इतका बुडून गेला की, त्याला खाण्या-पिण्याचीही शुद्ध राहिली नाही.

रात्रंदिवस तो फक्त पृथ्वीराजशी कसं लढायचं याचाच विचार करत होता.’ एक वर्ष अशी तयारी केल्यानंतर त्यानं अचानक एक दिवस मोहिमेवर निघायचं ठरवलं. यादरम्यान पृथ्वीराजला घोरीच्या या मन:स्थितीची व तो करत असलेल्या तयारीची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्यानं त्याचे दोन पराक्रमी सेनापती उदयराज आणि स्कंद यांना इतरत्र मोहिमांसाठी पाठवून दिलं.

तराईच्या पहिल्या लढाईत प्रचंड पराक्रम गाजवणारे हे दोन योद्धे दुसऱ्या लढाईत सहभागीच होऊ शकले नाहीत. स्वतः पृथ्वीराज आपली नवपरिणित पत्नी संयोगिता हिच्या प्रेमात आकंठ बुडून गेला होता. असं म्हणतात की, पृथ्वीराजचा मावसभाऊ व कनोजचा राजा जयचंद्र याची मुलगी संयोगिता ही पृथ्वीराजच्या पराक्रमाच्या कथा ऐकून त्याच्या प्रेमात पडली.

जयचंद्र पृथ्वीराजपेक्षा वयानं मोठा असूनही दिल्लीचं राजेपद पृथ्वीराजला मिळाल्यामुळे जयचंद्राचा त्याच्यावर राग होता. पृथ्वीराज-संयोगिताच्या प्रेमाची कुणकुण लागल्यावर जयचंद्रनं तिचं स्वयंवर करायचं ठरवलं आणि पृथ्वीराजला स्वयंवराचं निमंत्रणच जाणूनबुजून दिलं नाही. संयोगितानं पृथ्वीराजला पत्र लिहून तिला घेऊन जायला सांगितलं.

स्वयंवराच्या दिवशी संयोगितानं एकाही राजाला वरमाला घातली नाही. त्या सगळ्यांपुढून चालत ती दरवाजापर्यंत पोहोचली. द्वारपालाच्या पुतळ्यामागं लपलेल्या पृथ्वीराजनं तिला घोड्यावर बसवून सगळ्यांसमोरून पळवून नेलं. या अपमानानं संतापलेल्या जयचंद्रनं त्यांचा पाठलाग केला; पण पृथ्वीराजनं कनौजच्या सैन्याचा पराभव केला व तो संयोगितासह दिल्लीला सुखरूप पोहोचला.,पृथ्वीराज-जयचंद्रमधील हा वैरभाव भारताच्या पुढील इतिहासाच्या दृष्टीनं फारच घातक ठरला.

त्या दोघांनी एकोप्यानं घोरीचा सामना केला असता तर त्याला टिकाव धरणं अशक्य झालं असतं. असा जो समज आहे की, जयचंद्रनं घोरीला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आणि तो घोरीच्या बाजूनं पृथ्वीराजविरुद्ध लढला तो मात्र बरोबर नाही. खरं इतकंच आहे की, घोरी-पृथ्वीराज यांचं युद्ध सुरू असताना तो पृथ्वीराजच्या मदतीला आला नाही; पण जयचंद्राचं नाव इतिहासात गद्दार म्हणून कोरलं गेलं ते मात्र कायमचंच.

या इतिहासातून लक्षात येतं ते, राज्याच्या सुरक्षेसाठी कायम दक्ष असणार्‍या कार्यक्षम हेरखात्याचं महत्त्व. नायकीदेवीच्या हेरांनी तिला घोरीच्या संभाव्य आक्रमणाबद्दल आधीच सावध केलं होतं. त्यामुळे ती तयार होती. याउलट, भारतावर पुन्हा आक्रमण करण्याच्या, एक वर्षापासून सुरू असलेल्या घोरीच्या तयारीची साधी कुणकुणही पृथ्वीराजला नव्हती. अशा गाफील अवस्थेत, तसंच सूडाच्या भावनेनं पेटलेल्या घोरीच्या अवघड आव्हानाचा सामना पृथ्वीराजनं कसा केला ते बघू या पुढील लेखात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com