

Elements of Marathi Drama and Literature
esakal
आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com
नाट्यलेखन हे शेवटी माणसाने माणसाशी साधलेला एक सखोल, सर्जनशील, नाट्यात्म संवाद असतो. मानवी संबंधांमधली गुंतागुंत, त्यातला अनपेक्षितपणा, अतर्क्यता आणि धूसरपणा - हे सारं समजून घेण्याची, त्याकडे सहानुभूतीने पाहण्याची ओढ नाट्यलेखनाला जिवंत ठेवते.
नाटक लिहिताना लेखकाची सर्जनशीलता विविध स्तरांवर काम करत असते. नाटकाचे भाषिक रूप निर्माण करताना त्याच्या डोळ्यांसमोर दृकश्राव्य मांडणीचा अवकाश असतो. त्या अवकाशात प्रकाश आणि सावल्या यांचा खेळ-साधनांची मांडणी- ध्वनी- संगीताची योजना असतील वा नसतील; पण नाटकासाठी कल्पिलेला मानवी देह असतो. मानवी मनाचं आणि विश्वाचं दर्शन नाटककाराला घडवायचं असतं - ते फक्त सांगायचं नसतं, तर दाखवायचं असतं. शब्दांबरोबर खेळता-खेळता शब्दांपलीकडचा परकाया प्रवेश नाटकातून मांडला जातो. एकटेपण जपत भवतालाचा सांगाती असण्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून नाट्यलेखन उभे राहते.