जीआयएस (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे.

"जीआयएस' म्हणजे जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिम. यातलं जिओग्राफिक म्हणजे पृथ्वीसंबंधी, इन्फर्मेशन म्हणजे माहिती आणि सिस्टिम म्हणजे त्याची प्रणाली किंवा पद्धती. "जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही, हे एका उदाहरणावरून हे स्पष्ट होईल.

समजा, गेल्या काही शतकांत जगात जिथं जिथं युद्धं झाली आहेत हे इतिहासाच्या माहितीचा आधार घेऊन ते ते प्रदेश जगाच्या नकाशावर आपण दाखवले आहेत...ते बघत असताना आपल्याला ही युद्धं किंवा हे तंटे जगातल्या ठराविक भागांतच जास्त प्रमाणात झाले आहेत असं लक्षात येतं. जगात तेल, खनिजं अशी संसाधनं कुठं जास्त आहेत हेही याच नकाशावर दाखवलं असेल तर आपल्याला युद्धं आणि संसाधनांचे साठे या दोहोंमधला संबंध लक्षात येईल. मग कच्च्या मालावर कब्जा मिळवून आपला पक्का माल विकण्यासाठी केलेली ती वसाहतवादाची युद्धं होती किंवा अगदी राष्ट्रं स्वतंत्र झाल्यांनतरची पश्‍चिम आशियातली तेलासाठी केलेली युद्धं होती हेही मग आपल्या लक्षात येईल.

जीआयएसच्या उपयोगाची यादी इथंच थांबत नाही. पोलीस खात्यातून गुन्हेगारीविषयीची माहिती मिळवून आपल्याला याच नकाशात, जगात कुठल्या भागात गुन्हेगारी जास्त आहे, हे एका स्तरावर (लेअरमध्ये) दाखवता येतं. त्याचबरोबर शाळांची संख्या, साक्षरता, बेकारी, गरिबी आणि दुष्काळ या सगळ्यांची माहिती सरकारी यंत्रणांकडून मिळवून तीही याच नकाशावर दुसऱ्या स्तरावर (लेअरमध्ये) दाखवता येते. मग या सगळ्यांचा अभ्यास करून अमुक अमुक ठिकाणी गुन्हेगारी का जास्त आहे याची कारणमीमांसा करता येते. उदाहरणार्थ ः कुठल्याशा प्रदेशात दुष्काळ पडल्यामुळे तिथे चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत का, याचं विश्‍लेषण करता येतं. शिवाय, एखाद्या ठिकाणी मुलींचं अपहरण करून त्यांची लग्नं जबरदस्तीनं लावणं किंवा बलात्कार असे गुन्हे होत असतील तर तिथं दर 1000 पुरुषांमागं स्त्रियांचं प्रमाण किती आहे हेही बघणं योग्य ठरतं. आणि तेही त्याच नकाशावर वेगळ्या लेअर्समध्ये दाखवता येतं. हे सगळं जीआयएसमुळे शक्‍य होतं.
थोडक्‍यात म्हणजे, नकाशावर वेगवेगळ्या भौगोलिक प्रांतांविषयी तंटे, युद्धं, पावसाचं प्रमाण, तापमान, नद्या, शाळा, धरणं, साक्षरता, गुन्हेगारी, बेकारी, जंगलं, रस्ते, विजेच्या तारा, जमिनीखालून सांडपाणी घेऊन जाणाऱ्या पाईपलाईन्स, गॅसचे, तसंच पाण्याचे पाईप्स, टेलिफोन एक्‍स्चेंजेस, लोकसंख्या अशा अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे.
उदाहरणार्थ ः जगाच्या नकाशावर ठिकठिकाणच्या लोकसंख्यावाढीचा दर हा एक स्तर किंवा लेअर होईल आणि तिथली साक्षरता किंवा शिक्षण हा दुसरा लेअर होईल. आता हे दोन लेअर्स एकमेकांवर सुपरइम्पोज केले तर आपल्याला त्यांच्यातले संबंध चटकन दिसतात. उदाहरणार्थ ः जिथं जिथं साक्षरता कमी आहे तिथं तिथं लोकसंख्यावाढीचा दर जास्त आहे, हा निष्कर्ष काढता येतो. आपल्याला हे कुठल्याही टेबलमध्ये किंवा स्प्रेडशीटमध्ये दाखवता आलं असतं आणि कळलंही असतं; पण ते नकाशावर सुपरइम्पोज केल्यामुळे जास्त चटकन कळतं आणि जर ते प्रदेश जवळजवळ असतील, तर त्यांच्यातली कारणमीमांसाही कळू शकते. (उदाहरणार्थ ः शेती-उत्पादन आणि दुष्काळ किंवा पावसाचा/सिंचनाचा अभाव ...)
थोडक्‍यात, भौगोलिक प्रदेशांमधल्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती वेगवेगळ्या स्रोत्रांकडून (महानगरपालिका, हवामानखातं, एनएसएसओ, पोलिस रेकॉर्डस, भौगोलिक सर्वेक्षणं (जिऑलॉजिकल सर्व्हेज्‌...) मिळवणं, ती वेगवेगळ्या तऱ्हेनं साठवणं, त्याचे वेगवेगळे लेअर्स बनवणं आणि गरजेप्रमाणे त्यातले पाहिजेत ते लेअर्स एकाच वेळी एकमेकांवर सुपरइम्पोज करून दाखवणं, त्यातल्या डेटाबेसवर क्वेरीज्‌ विचारता येणं, त्यातून निष्कर्ष काढून निर्णय घेता येणं आणि पुढं काय होण्याची शक्‍यता आहे ते वर्तवता येणं (याला "मॉडेलिंग' म्हणतात) म्हणजेच जीआयएस.
ही माहिती रास्टर किंवा व्हेक्‍टर अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं मिळवता येते आणि डेटाबेसमध्ये साठवता येते. उदाहरणार्थ ः रास्टर पद्धतीत ती माहिती म्हणजे बरेचदा उपग्रह, विमानं किंवा ड्रोन्स यांच्यामधून काढलेले फोटो असतात. हे फोटो लहान लहान चौकटीत किंवा पिक्‍सेल्सच्या रूपात साठवले जातात. उदाहरणार्थ ः जेव्हा एखाद्या भौगोलिक प्रदेशाचा नकाशा साठवायचा असतो, तेव्हा त्या फोटोंचं उभ्या-आडव्या काल्पनिक रेषांनी अनेक लहान लहान चौकटीत विभाजन केलं जातं आणि त्या चौकटीतलं किंवा पिक्‍सेलमधलं दृश्‍य साठवलं जातं. व्हेक्‍टर पद्धतीत बिंदू, रेषा (वक्र, सरळ), वर्तुळ, पॉलिगॉन अशा आकारांमधल्या गोष्टींविषयी माहिती साठवून ठेवता येते.

जर ते बिंदू असतील तर त्यांचे कोऑर्डिनेट्‌स महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ ः भूकंपाचा केंद्रबिंदू (एपिसेंटर) हा एक बिंदू मानला तर अशा पूर्वीपासूनच्या अनेक भूकंपांच्या केंद्रबिंदूंचा एक आलेख काढला तर त्यात आपल्याला एक पॅटर्न शोधता येतो आणि त्यातून निष्कर्ष काढता येतात. तसंच शहरातल्या एका बिंदूपाशी एक इमारत असेल, तर ती कशाची बांधलेली आहे, किती मजली आहे, त्यात किती लिफ्ट्‌स आहेत, किती ऑफिसेस आहेत, किती लोक काम करतात, पार्किंगच्या जागा किती आहेत...अशा अनेक गोष्टी त्या बिंदूसाठी असलेल्या डेटाबेसमध्ये साठवता येतात. तसंच त्या बिंदूपाशी एखादं हॉस्पिटल, हॉटेल किंवा एखादं नाट्यगृह असेल तर त्यांच्याविषयीची सगळी माहिती त्या बिंदूच्या डेटाबेसमध्ये ठेवता येते.
जर बिंदूऐवजी एक रेषा असेल तर तिच्या टोकांकडल्या दोन्ही बिंदूंचे कोऑर्डिनेट्‌स साठवले जातात आणि मग ती रेषा जर कुठलाही रस्ता दाखवत असेल तर तो किती पदरी आहे, तो सिमेंटचा आहे की कसा, त्याचं देखभालीचं वेळापत्रक, त्यावरचे मॅनहोल्स, सिग्नल्स, त्यावरचे टोलनाके या गोष्टी त्या रेषेसाठीच्या डेटाबेसमध्ये साठवता येतात. तसंच ती रेषा जर ड्रेनेजचा पाईप किंवा फायबर ऑप्टिकची तार दाखवत असेल तर त्याविषयीची माहिती (लांबी, बॅंडविड्‌थ, देखभालीचं वेळापत्रक...), साठवून ठेवता येते. तसंच "रेषा' प्रकारामध्ये पाण्याचे पाईप्स, टेलिफोनच्या तारा, विजेच्या तारा, गॅसचे पाईप्स यांच्याविषयी माहितीही साठवून ठेवता येते.
व्हेक्‍टर प्रकारात त्रिकोण, चौकोन किंवा पॉलिगॉन असे वेगवेगळे आकार असतील तर त्यावरचे सगळे बिंदू साठवले जातात. भूमितीचा वापर करून त्रिकोण, चौकोन किंवा कुठल्याही बंद आकृतीचा वापर आपण तळी, कुठल्याही कॉलेजचा किंवा विद्यापीठाचा कॅम्पस, तसंच शहराची सीमा अशा गोष्टींसाठी करू शकतो आणि मग त्यासाठीच्या डेटाबेसमध्ये आपण त्यातली लोकसंख्या, झाडी, पाणी, विद्यार्थी, शाळा, कॉलेजेस, दवाखाने, फायर ब्रिगेड अशांचे अनेक तपशील ठेवू शकतो.

अर्थातच हे तपशील वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा करावे लागतात. त्यानंतर त्या डेटाबेसवर क्वेरीज्‌ करून महत्त्वाचे निर्णय घेता येतात. जीआयएस वापरून अनेक प्रश्‍नांची उत्तरं शोधता येतात. उदाहरणार्थ ः अमुक अमुक ठिकाणी शाळा काढली तर तिथं मुलं येतील का? किती येऊ शकतील? आजूबाजूला कुठल्या आर्थिक स्तरातली मुलं राहतात? ती किती फी देऊ शकतील? त्यांच्यासाठी बसची गरज आहे का? शहरातल्या कुठल्या भागात अग्निशामक दलाचं स्थानक नाहीये? एखाद्या बसचा रूट बदलला तर किती प्रवाशांची सोय होईल? कितींची गैरसोय होईल ? ठराविक शहरात ठराविक रोगांचं प्रमाण कुठं जास्त आहे? त्यांच्या जवळ योग्य ती रुग्णालयं आणि आरोग्यसेवा उपलब्ध आहे का? शहरात रस्ते किंवा उड्डाणपूल पुरेसे आहेत का? की आणखीन बांधायला हवेत? हवे असतील तर कुठं? चक्रीवादळ किंवा पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीची कुठं सगळ्यात जास्त गरज आहे? ती मिळतेय का? अमुक अमुक ठिकाणी घर बांधणं योग्य ठरेल का? जमीन भुसभुशीत असणं किंवा त्या भागात सतत चक्रीवादळं होणं असं तर होत नाही ना? नवीन रेस्टॉरंट काढायला सगळ्यात योग्य जागा कुठली? फास्ट फूड रेस्टॉरंटसाठी (तिथं वर्दळ जास्त आहे का? आणि ती मोक्‍याची जागा आहे का?) आणि एक्‍सक्‍लुजिव्ह रेस्टॉरंटसाठी (आजूबाजूला श्रीमंत वर्गातली माणसं राहतात का?...) पूर्वीच्या अनुभवाप्रमाणे जमिनीखाली कुठं कुठं तेलाचे साठे असल्याची शक्‍यता आहे? कुठल्या कुठल्या विभागातून जैवविविधता कशाकशाची आणि किती प्रमाणात नष्ट होतेय? ती वाचण्यासाठी काय केलं पाहिजे? असे अनेक प्रश्‍न असू शकतात.

जीआयएस, जीपीएस आणि रिमोट सेन्सिंग यांना मिळून "जिओस्पेशियल टेक्‍नॉलॉजी' असं म्हणतात. या तिन्हींचासुद्धा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. उदाहरणार्थ ः आपण रस्त्यावरून जात असताना आपल्या मार्गावर पुढं वाहतूककोंडी आहे आणि आपल्याला इच्छित स्थळी पोचायला अमुक अमुक वेळ लागेल असं आपल्याला, आपण आहोत त्या ठिकाणी कळू शकतं. याचं कारण, व्होडाफोनसारख्या मोबाईल कंपन्यांनी आपल्या मोबाईल्सच्या स्थानाविषयीची (लोकेशन) माहिती गुगलला विकलेली असते. त्यामुळे आपल्या रस्त्यावरचे शेकडो मोबाईल फोन्स आपलं लोकेशन गुगलला दर क्षणाला आपल्या नकळतच कळवत असतात. ही लोकेशन्स खूपच कमी वेगानं पुढं सरकत असतील तर तिथं वाहतूककोंडी झालेली आहे असा निष्कर्ष गुगलचं सॉफ्टवेअर काढतं आणि ज्या वेगानं ती लोकेशन्स पुढं सरकत आहेत त्यावरून वाहतूककोंडी किती आहे याचं अनुमान काढून आपल्याला आपल्या इच्छित ठिकाणी पोचायला किती वेळ लागेल हे मग ते आपल्याला दाखवतं. यात जीआयएस, जीपीएस अशी सगळी तंत्रज्ञानं एकमेकांना साह्य करत असतात.

आता तर जीआयएस खूपच प्रगत झालं आहे. जगातल्या जवळपास सर्वच देशातली जवळपास सगळीच शहरं आणि इतर ठिकाणं यांच्याबद्दल इत्थंभूत माहिती गोळा करून व्यवस्थित डेटाबेसेसमध्ये ठेवलेली आहे. याचे अनेक फायदे झाले आहेत. वीज, पाणी, गॅस, टेलिफोन, ड्रेनेज, अग्निशमन दल, बसेस, रेल्वेज्‌, शाळा, दवाखाने अशा शहरांतल्या सगळ्या सुविधांचं नियोजन करणं हे आता जीआयएसशिवाय जवळपास अशक्‍यच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com