गुगल अर्थ (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसकसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे!

सन 2001 मध्ये "गुगल अर्थ' नावाचं एक सॉफ्टवेअर घेऊन गुगल बाजारपेठेत दाखल झाली. "गुगल स्ट्रीट व्ह्यू' हे मुख्यत्वेकरून शहरं आणि त्यांतले रस्ते यांच्यासाठी मर्यादित होतं, हे त्याच्या नावावरूनच लक्षात येतं. मात्र "गुगल अर्थ'च्या मदतीनं आता नुसते रस्तेच नव्हे तर आसपासचा परिसर म्हणजे अगदी झाडं, इमारती वगैरेही दिसणं शक्‍य व्हायला लागलं. सन 2009 पासून गुगलनं "गुगल अर्थ' 5.0 मध्ये समुद्राच्या आतले तळाचे (पाण्याखालच्या जमिनीचे) आणि मोठमोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमधले तपशीलही दाखवायला सुरवात केली! पण यात आता आपल्याला जसं त्रिमितीय दर्शन होतं तशा प्रकारचं हे त्या वेळी नव्हतं; पण 2012 मध्ये अशी त्रिमितीय मॉडेल्स बनवणारं तंत्रज्ञान घेऊन "गुगल अर्थ'ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात गुगलला यश मिळालं.

"गुगल अर्थ' आणि "गुगल मॅप्स' यात नेमका फरक काय? "गुगल मॅप्स'मध्ये आपल्याला फक्त नकाशारूपात रस्ते आणि उपग्रहावरून घेतलेली कमी रेझोल्यूशनची द्विमितीय छायाचित्रं दिसतात; पण "गुगल अर्थ'मध्ये मात्र बारीकसारीक तपशील असणारी, जास्त रेझोल्यूशन असणारी त्रिमितीय चित्रं दिसतात. यामध्ये आपल्याला रस्ते, इमारती, तळी इतकंच काय पण समुद्र आणि अवकाश यांच्यातही प्रत्यक्ष फिरून आल्याचा भास होतो. "गुगल मॅप्स' आपल्याला दिशा दाखवण्यासाठी उपयुक्त ठरतात, तर "गुगल अर्थ' आपल्याला "एक्‍स्प्लोर' करण्यासाठी मदत करतात.

"गुगल अर्थ'मध्ये सुरवातीला उपग्रहावरून घेतलेले फोटो दिसतात; पण जसजसे आपण ठराविक भाग झूम करत जाऊ तसतसे त्या भागातले रस्ते, इमारती, इमारतीच्या आसपासचा परिसर या सगळ्या गोष्टी अधिक स्पष्ट दिसायला लागतात. आणखी झूम केल्यावर हळूहळू त्या इमारतींची छतं, रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या गाड्या, झाडं, बगिचे, पोहण्याचे तलाव अथवा नदी, नदीत किंवा समुद्रात असलेली जहाजं असं सगळं आपण बघू शकतो. शिवाय, यात स्क्रीनवर चार दिशांचे बाण दाखवलेले असतात. ते वापरून हे चित्र किंवा फोटो वर, खाली, डावीकडं आणि उजवीकडं असे फिरवून आपण प्रवास करू शकतो. आपण दिल्लीवर असलो तर खालच्या बाणावर क्‍लिक करून आपण चेन्नईवर येऊ शकतो. त्यानंतर हवं तर उजवीकडं किंवा डावीकडं असलेल्या बाणांवर क्‍लिक करून आपण वेगवेगळे खंड किंवा देश हेही बघू शकतो. इंग्लंडपर्यंत पोचल्यावर झूम केलं तर लंडन दिसतं आणि आणखी झूम केलं तर त्यातला ऑक्‍सफर्ड स्ट्रीट दिसतो. आणखी झूम केलं तर त्यावरचं मार्क्‍स अँड स्पेन्सरचं दुकानही दिसतं. आपण हे सगळं समक्षच बघतो आहोत असा भास आपल्याला व्हावा इतकं हे सगळं वास्तववादी असतं.

आता प्रश्न आहे की गुगल संपूर्ण पृथ्वीच्या सगळ्या भागातले इतके असंख्य फोटो गोळा करते तरी कशी? जगभरातले इतके प्रचंड फोटो काढणं, ते साठवणं आणि ते एकत्र "शिवून' एकसंध दाखवणं हे सगळं कसं होतं? ही सगळी प्रक्रिया अतिशय थक्क करणारी आहे. आपण जेव्हा "गुगल अर्थ' हे ऍप्लिकेशन (सॉफ्टवेअर) उघडतो तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी आपली पृथ्वी दिसते. यासाठी पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह (सॅटेलाईट्‌स) पृथ्वीचा फोटो काढून तो आपल्याला दाखवतात. हा फोटो "टू डी' स्वरूपातला असतो. आपण जसजसं झूम करून जमिनीच्या दिशेनं सरकतो तसतसे आपल्याला "थ्री डी' फोटो दिसायला लागतात. हे फोटो विमानातून, हेलिकॉप्टरमधून किंवा ड्रोन्समधून घेतलेले असतात, तर जमिनीवरचे फोटो घ्यायचं काम हे मोटारगाड्या करतात. सगळ्या कोनातून एकाच वेळी फोटो घेण्यासाठी मोटारगाड्यांवर चहूबाजूंनं कॅमेरे बसवले जातात. हे फोटो घेण्याची पद्धतही विशेष असते. ज्या भागाचा फोटो घ्यायचा आहे त्या भागात ते विमान किंवा मोटारगाडी इंग्लिशमधल्या U प्रमाणे फिरते. एकदा U पूर्ण झाला की त्यालाच जोडून उलटा U होईल असं ते विमान किंवा मोटारगाडी फिरते. नांगरणी करतात अगदी तसंच. यामुळे येणारे फोटो हे तुकड्यांच्या रूपात एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. त्यानंतर हे तुकडे एका सॉफ्टवेअरकडं सोपवले जातात. फोटोज्‌ ओव्हरलॅप झालेले असल्यामुळे "हा एकाच भागाचा फोटो आहे' हे सॉफ्टवेअरच्या लक्षात येतं आणि मग फोटोचे ते तुकडे चक्क "शिवले' जातात (याला "मॅश' असं म्हणतात). सलग झालेल्या या फोटोवर मग प्रक्रिया होते. तो फोटो जिवंत वाटावा म्हणून त्यावर रंग, पोत (टेक्‍श्चर) असं सगळं चढवलं जातं आणि आपल्यासमोर सलग असा फोटो दिसतो; पण हे काम तितकं सोपं नाही. विशेषत: विमानातून असे फोटो काढताना तर अनेकदा हवामानाचा फटका बसतो. एका भागाचा फोटो काढताना वैमानिकाला किमान पाच ते सहा तास त्या भागात घिरट्या घालाव्या लागतात! आणि पृथ्वीवर असे लाखो भाग असल्यामुळे या सगळ्यासाठी किती श्रम, वेळ आणि पैसा खर्च करावा लागला असेल याची कल्पनाच केलेली बरी!

पण ही चित्रणं जेव्हा आपण बघतो त्या क्षणाची असतील असं आपल्याला वाटत असेल तर तो आपला गैरसमज आहे. जगभरातली चित्रणं गोळा करणं आणि त्यावर काम करून ती आपल्यासमोर मांडणं ही खचितच सोपी गोष्ट नाही. यात प्रचंड श्रम, वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे गुगलला दररोजची चित्रणं आपल्यासमोर मांडणं शक्‍य होत नाही; पण जगभरात होणारे भौगोलिक बदल लक्षात घेता गुगल दोन-तीन वर्षांनी हे बदल टिपते आणि आपल्यासमोर ठेवते.

"गुगल अर्थ'चं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातले स्तर किंवा "लेअर्स'. सर्वप्रथम आपल्याला फक्त पृथ्वी दिसते आणि मग उजवीकडं असलेले वर, खाली, डावीकडं, उजवीकडं असे दिशा दाखवणारे बाण दिसतात. त्यातल्या वेगवेगळ्या बाणांवर एकापाठोपाठ क्‍लिक करून आपल्याला पृथ्वीच्या पाहिजे त्या भागाकडं जाता येतं. यानंतर आपण झूम करून त्यातले तपशील पाहू शकतो. त्याच वेळी डावीकडं वेगवेगळे स्तर किंवा लेअर्स लिहिलेले असतात. शहरं, नकाशे, रस्ते असे वेगवेगळे लेअर्स असतात. आपल्याला समजा त्या भागातले नुसतेच रस्तेच बघायचे असतील आणि हे बघत असताना आपल्याला इमारती, रुग्णालयं, बगिचे असे बाकीचे तपशील बघायचे नसतील तर चक्क आपण रस्त्यांचा लेअर ऑन ठेवून उरलेले लेअर्सचे ऑप्शन्स बंद करून ठेवू शकतो. याचं कारण "गुगल अर्थ' हे सगळं वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्सवर) आपल्याला दाखवतं. म्हणजे जगभरातल्या रस्त्यांचा एक लेअर, शहरांच्या/राष्ट्रांच्या सीमांचा एक लेअर, इमारतींचा एक लेअर असे अनेक लेअर्स यात असतात. म्हणूनच आपल्याला हवा तो लेअर "ऑन' ठेवून बाकीचे "ऑफ' केले की आपल्याला हवं ते बघता येतं. आणि "टेरेन' लेअर सोडून सगळे लेअर्स "ऑफ' केले तर आपल्याला फक्त जमीन, डोंगर, दऱ्या, झाडं, नद्या असे नैसर्गिक आकार दिसतात. त्यामुळे कुणाला नुसतीच जमीन बघायची असेल तर त्यांनी "टेरेन'सकट सगळे ऑप्शन्स "ऑफ' ठेवले की झालं.

अनोळखी ठिकाणी गेल्यावर तर आपल्याला "गुगल अर्थ'ची खूपच मदत होते. अशा वेळी जर आपल्याला कडकडून भूक लागली तर? अशा वेळी "गुगल अर्थ'मध्ये डायनिंग'चा लेअर आपण "ऑन' केला तर आपल्याला त्या भागातली रेस्टॉरंट्‌स नावासहित ठळकपणे दिसू लागतात. रस्ते, इमारती या सगळ्यांचा एकत्रित फोटो असल्यानं तुम्हाला त्या रेस्टॉरंटपर्यंतचा रस्ता शोधायला अजिबातच कष्ट पडत नाहीत, तसंच बॅंका, राहण्याची व्यवस्था, शाळा, शॉपिंग मॉल्स अशा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीही आपण "गुगल अर्थ' वापरून शोधू शकतो. एखाद्याला नेमका पत्ता सांगण्यासाठी आपण "गुगल अर्थ'मधल्या इमेजेस (किंवा स्थान) इमेलनं पाठवू शकतो किंवा प्रिंटही करू शकतो.

जगातली प्रेक्षणीय स्थळं आपल्याला (घरबसल्या) पाहण्याची इच्छा असेल तर "गुगल अर्थ' खास प्रकारे मदत करू शकतं. प्रेक्षणीय स्थळाचं नाव देऊन जर "साईटसीईंग'चा पर्याय आपण निवडला तर ते प्रेक्षणीय स्थळ आपण प्रत्यक्ष भेट दिल्यासारखं पाहू शकतो. हव्या त्या कोनातून, हवं तितकं झूम करत आपण या प्रेक्षणीय स्थळाची सगळी दृश्‍यं कितीही वेळ पाहू शकतो!

"गुगल अर्थ' वापरताना आपण आकाशातून पृथ्वीकडं पाहत असतो; पण "गुगल अर्थ'मधला "स्काय मोड' वापरत आपण जमिनीकडं पाहण्याऐवजी आकाशातही पाहू शकतो आणि आकाशातले ग्रह-तारे, नक्षत्रं, आकाशगंगा यांची स्थानंही शोधू शकतो! यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्यात अवकाशातल्या या सगळ्या गोष्टींचे हाय रिझोल्यूशन असणारे "नासा'नं घेतलेले फोटोही दिसतात. "गुगल अर्थ' वापरताना आपण जसं रस्ते शोधताना पक्ष्यासारखं उडण्याचा अनुभव घेतो, तसंच "स्काय मोड'मध्ये आपण अवकाशप्रवासाचाही अनुभव घेऊ शकतो! अवकाशात दिसणाऱ्या ग्रह-ताऱ्यांची, आकाशगंगांची सगळी माहिती आणि त्यांचा इतिहास सांगणाऱ्या "नासा'च्या ज्ञानभांडाराच्या लिंक्‍सही आपल्याला त्या त्या ठिकाणी दिसतात. "गुगल अर्थ'मध्येच "हबल शोकेस'मध्ये आपल्याला हबल टेलिस्कोपनं घेतलेले अवकाशातले फोटोही पाहता येतात. "मून इन मोशन' आणि "प्लॅनेट्‌स इन मोशन' वापरत आपण पृथ्वीवरच्या कुठल्याही ठिकाणाहून चंद्र किंवा सूर्यमालेतले इतर ग्रह आकाशात कोणत्या मार्गानं प्रवास करतात हे पाहू शकतो.

"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. उदाहरणार्थ ः अंटार्क्‍टिकामधलं बर्फ किती वेगानं आणि किती प्रमाणात वितळतंय, निसर्गाची हानी कोणत्या भागात जास्त झाली आहे, कोणत्या भागात जंगलं कमी-जास्त झाली आहेत, नद्यांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी-जास्त झालं आहे का, त्यांची दिशा बदलली आहे का अशा सगळ्यावर लक्ष ठेवून आपल्याला सावध करण्याचं काम "अर्थ इंजिन' नावाचं तंत्रज्ञान (सॉफ्टवेअर) करतं.
एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com