गुगल मॅप्स (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले achyut.godbole@gmail.com
रविवार, 21 एप्रिल 2019

गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण गुगल मॅप्सचा प्रॉडक्‍ट मॅनेजर असणाऱ्या ब्रेट टेलरनं गुगल मॅप्स जलद गतीनं चालवण्यासाठी सगळं सॉफ्टवेअर नव्यानं लिहून घेतलं. सुधारलेल्या गतीमुळे आणि हाय रेझोल्यूशन इमेजेसमुळे लोकांचा जो प्रतिसाद वाढायला लागला तो नंतर कधी कमी झालाच नाही.

गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण गुगल मॅप्सचा प्रॉडक्‍ट मॅनेजर असणाऱ्या ब्रेट टेलरनं गुगल मॅप्स जलद गतीनं चालवण्यासाठी सगळं सॉफ्टवेअर नव्यानं लिहून घेतलं. सुधारलेल्या गतीमुळे आणि हाय रेझोल्यूशन इमेजेसमुळे लोकांचा जो प्रतिसाद वाढायला लागला तो नंतर कधी कमी झालाच नाही.

"तुम्हाला इथून सरळ चालत जावं लागेल. पाच मिनिटांनी एक चौक येईल, तिथं डावीकडे वळून गेल्यावर येणाऱ्या दुसऱ्या चौकामध्ये उजवीकडे वळून अंदाजे मिनिटं चालत गेल्यावर तुम्हाला तुमचं हॉस्पिटल दिसेल...' रस्त्यावर आपण कुणाला पत्ता विचारला, की बऱ्याचदा आपल्याला अशी काहीतरी उत्तरं मिळतात. असा पत्ता ऐकून आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाणं म्हणजे काही वेळा कोडं सोडवण्यासारखं असतं. एक तर "अमुक मिनिटं चालल्यावर', "एक छोटासा रस्ता दिसेल' या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात. दुसरं म्हणजे अशा प्रकारे पत्ता लक्षात ठेवणं हे सर्वांनाच जमतं असं नाही. आपण बरोबर रस्त्यानं चाललोय की नाही याची आपल्याला खात्री नसते; आणि एकदा रस्ता चुकला, की एक नवीन कोडं सुरू होतं.

अशा वेळेला आपल्याकडे तिथला नकाशा असेल तर? पण त्या ठिकाणचा नकाशा मिळणार कुठं? आणि दैनंदिन जीवनात आपल्याला अशा कित्येक ठिकाणी वाट शोधत जावं लागतं. असे किती नकाशे आपण बाळगणार? पण अशा जगभरातल्या रस्त्यांचे, तिथल्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती असणारे नकाशे आपल्या छोट्याशा स्मार्टफोनमध्ये असतील तर? काही दशकांपूर्वी कुणाला अशी कल्पनाही करता आली नसती; पण ही सगळी क्षमता असणारं "गुगल मॅप्स' हे मोबाईलवरचं ऍप आता सगळेच लोक सर्रास वापरताना दिसतात.

आज जरी कोट्यवधी लोक रस्ते शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर करत असले, तरी सोळा वर्षांपूर्वी गुगलमध्ये त्याची सुरवात अडखळतच झाली होती. खरं तर या काळात गुगलच्या स्पर्धकांनी मॅप्सशी संबंधित प्रॉडक्‍ट्‌स आधीच बाजारात आणली होती. गुगलमधल्या या नवीन प्रॉडक्‍टवर काम करणाऱ्या "गुगल लॅब्ज' विभागात "सर्च बाय लोकेशन' या प्रॉडक्‍टच्या कामाला सप्टेंबर 2003 मध्ये सुरवात झाली. गुगल मॅप्सची हीच सुरवात होती.
काय होता "सर्च बाय लोकेशन' हा प्रकार? हा प्रॉडक्‍ट वापरताना लोकांनी गुगलवर सर्च करताना एखाद्या शब्दाबरोबर पत्ता किंवा (आपल्या पिनकोडप्रमाणं तिकडे असणारा) झिप कोड दिला, तर गुगल या दोन्ही गोष्टी असणारी सगळी वेब पेजेस दाखवणार होता. या प्रॉडक्‍टचा मॅनेजर होता ब्रेट टेलर. खुद्द टेलरच्या मते मात्र हा प्रॉडक्‍ट प्रत्यक्षात "निरुपयोगी' होता!! लोकांनी कॉफीचं दुकान शोधण्यासाठी "कॉफी' आणि एखाद्या ठिकाणचं नाव टाकलं, तर लोकांना प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या कॉफीच्या दुकानांची नावं येतील अशी लोकांची अपेक्षा असायची; पण सन मायक्रोसिस्टिम्सनं निर्माण केलेल्या जावा या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचा लोगो कॉफी हाच असल्यामुळे गुगलमध्ये "कॉफी' हा शब्द टाकल्यावर गुगल लोकांना "सन मायक्रोसिस्टिम्स'ची वेब पेजेस दाखवायचा!! हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. एकूणच "सर्च बाय लोकेशन' हा एक फसलेला प्रयोग होता. त्यामुळे हा प्रॉडक्‍ट जवळपास कुणीच वापरत नव्हतं.

याच सुमारास या प्रॉडक्‍टचा चेहरामोहराच बदलणारी एक घटना घडली. एके दिवशी गुगलच्या ऑफिसमधल्या एका कॉन्फरन्स रूममध्ये एक महत्वाचं प्रेझेंटेशन चालू होतं. "पिकासा' नावाची कंपनी गुगलनं विकत घेण्यासाठी या प्रेझेंटेशनमध्ये प्लॅन दाखवला जात होता. हे प्रेझेंटेशन बघायला तिथं गुगलचा सहसंस्थापक असणारा सर्गी ब्रिन हाही हजर होता; पण प्रेझेंटेशन रटाळ होत चाललं होतं. त्याचं त्या प्रेझेंटेशनकडे मुळीच लक्ष नव्हतं. तो आपल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत होता. प्रेझेंटेशन देणाऱ्या ग्रॅहम या युवकाला ताण जाणवत होता. ब्रिननं आपल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी वेगळं पाहिलं. आता त्याच्या चेहऱ्यावर चैतन्य आणि आश्‍चर्य दिसत होतं. त्याला काहीतरी "खास' असं गवसलं होतं. त्यानं आपल्या लॅपटॉपवर नव्यानं सापडलेली गोष्ट आपल्या बाजूला बसलेल्या दोन लोकांना दाखवली आणि ते दोघंही आश्‍चर्यचकित झाले. आता ब्रिन्‌ उठला आणि सरळ प्रेझेंटेशन देणाऱ्या ग्रॅहमकडे गेला. त्यानं ग्रॅहमचं प्रेझेंटेशन कुणालाही कल्पना ना देता त्याच क्षणी थांबवलं आणि स्वतःला सापडलेली गोष्ट कॉन्फरन्स रूममध्ये बसलेल्या इतर लोकांना दाखवायला सुरवात केली.
असं काय सापडलं होतं सर्गी ब्रिनला? त्याला "कीहोल' नावाच्या कंपनीचा एक प्रॉडक्‍ट दिसला होता. कीहोल तशी छोटीशीच कंपनी होती. त्यात एकूण तीसच कर्मचारी होते; पण त्यांनी बनवलेला प्रॉडक्‍ट मात्र अफलातून होता. या प्रॉडक्‍टमध्ये उपग्रहांवरून पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागांचे अनेक फोटो घेऊन, त्यांना "शिवून' एक भलं मोठं चित्र बनवलं होतं. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दुरून दिसणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर क्‍लिक करत झूम करत पृथ्वीवर अधिक जवळ जाऊन दृश्‍य पाहता येत होतं. ब्रिन्‌ आणि कॉन्फरन्स रूममध्ये बसलेले लोक यांच्यासाठी ही एक भन्नाटच गोष्ट होती. ते बघताना रूममध्ये बसलेला प्रत्येक जण स्वतःचं घर आकाशातून दिसतं का हे पाहण्यास उत्सुक होता! कॉन्फरन्स हॉलमधलं सारं वातावरणच अचानक चैतन्यमय बनलं.

गुगलनं अर्थातच कीहोल कंपनी विकत घ्यायचं ठरवलं आणि काही काळातच कीहोल कंपनी गुगलचाच भाग बनली. कीहोलनं बनवलेल्या या प्रॉडक्‍टचा भविष्यामधल्या गुगल मॅप्समध्ये चांगलाच उपयोग होणार होता.
याच दरम्यान डेन्मार्कमधल्या रास्मुसन बंधूंनी एक नवीन प्रॉडक्‍ट बनवून एक कंपनी बनवली. कंपनीचं नाव होतं "व्हेअर 2.' कंपनीत सुरवातीला फक्त हे दोघं बंधूच होते. नंतर ते दोघं ऑस्ट्रेलियात गेले आणि मग या कंपनीत अजून दोन कर्मचारी आले. त्यांनी विंडोजवर चालणारं एक सॉफ्टवेअर बनवलं होतं. या सॉफ्टवेअरमधून रस्ते आणि दिशा अशा गोष्टी असणारा नकाशा दिसायचा. यात झूम करण्याचीही सोय होती. त्यांनी बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये काही तरी नावीन्य होतं; पण या लोकांची अडचण एकच होती ः त्यांचं सॉफ्टवेअर विकत घ्यायला कुणीच तयार होत नव्हतं!! सॉफ्टवेअर विकत घेणं तर दूरच, उलट त्यांना लोक सांगायचे, की नकाशाची गरज आपल्या आयुष्यात फार वेळा पडतच नाही. सुरवातीला या "व्हेअर 2' कंपनीला आर्थिक भांडवल पुरवायला एक कंपनी तयार होती; पण आयत्या वेळी काही कारणानं एका रात्रीतच "व्हेअर 2'ला भांडवल पुरवण्याचा निर्णय त्या कंपनीनं रद्द केला!! यानंतर त्यांना भांडवल पुरवायला कुणीच तयार होईना. एक गोष्ट मात्र चांगली घडली ः भांडवल पुरवण्याचा निर्णय रद्द करणाऱ्या त्या कंपनीनं "व्हेअर 2'च्या मंडळींची गाठ गुगलचा सहसंस्थापक असणाऱ्या लॅरी पेजशी गाठून दिली.

"व्हेअर 2'नं बनवलेलं सॉफ्टवेअर विंडोजवर चालणारं होतं; पण लॅरी पेजनं सुरवातीलाच स्पष्ट केलं, की भविष्यकाळ वेब ऍप्लिकेशन्सचा होता. लॅरीसोबत पुढची भेट अजून तीन आठवड्यांनी होणार होती. या तीन आठवड्यांत "व्हेअर 2'च्या चौघांनी अक्षरशः दिवस-रात्र काम केलं. खरं तर त्यांना दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी लॅरीला अपेक्षित असणारं वेब ऍप्लिकेशन बनवलं. यात त्यांनी गुगलचा लोगोही दाखवला!!
या साऱ्या कष्टाचं चीज झालं. गुगलनं "व्हेअर 2' कंपनी विकत घेतली. आज आपल्याला गुगल मॅपमध्ये दिसणाऱ्या रस्त्यांची, दिशांची आणि नकाशाची सुरवात या व्हेअर 2च्या मंडळींनीच केली होती.
कीहोल आणि व्हेअर 2 यांच्याशिवाय अजून एक कंपनी गुगल आपल्या मॅप्स प्रॉडक्‍टसाठी खरेदी करणार होतं. ही कंपनी अजूनच छोटी होती. यात फक्त तीनच लोक काम करायचे. काय होता हा सगळा प्रकार?
अमेरिकेतल्या मार्क क्रॅडी नावाच्या तरुणाच्या डोक्‍यात एक मोबाईल ऍप बनवण्याची कल्पना घोळत होती. हे ऍप वापरणाऱ्या लोकांना ट्रॅफिकची माहिती आणि आपल्या प्रवासाला लागणार असणारा अंदाजे वेळ समजणार होता. हे ऍप बनवण्यासाठी आवश्‍यक असणारी माहिती मिळवण्यासाठी त्यानं टॅक्‍सी कंपन्यांना स्वतःच्या खिशातून हजारो डॉलर्स दिले!! हे ऍप लोकांनी वापरायला सुरवात केल्यावर लोकांकडून त्याला ट्रॅफिकविषयीची अद्ययावत माहिती मिळायला लागली. त्याच्याबरोबर काम करणारे अजून दोन लोक होते. त्यांच्या कंपनीचं नाव होतं "झिप्डॅश.'
या ऍपमध्ये गुगलला खास रस होता. गुगलच्या मेगन स्मिथची "झिप्डॅश'च्या मार्कशी भेट झाली, तेव्हा तिनं विचारलं ः ""तुमचं ऍप किती लोक वापरतात?'' मार्क म्हणाला ः ""दोनशे ते तीनशे.'' मार्कच्या म्हणण्यात तथ्यही होतं. झिप्डॅशचं ऍप वापरणारे लोक फक्त दोनशे ते तीनशे इतकेच होते!! मार्कनं गुगलला झिप्डॅश वीस लाख डॉलर्सना विकली.

यानंतर गुगलच्या ऑफिसमध्ये खिडकीबाहेर पर्वताचं नयनरम्य दृश्‍य दिसणाऱ्या एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही सगळी मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली.

कीहोल कंपनीतून आलेल्या जॉन हॅंक यानं थोडसं कचरतच एक प्लॅन बनवला. त्याला उपग्रहावरून घेतलेल्या हाय रिझोल्यूशनच्या इमेजेस खरेदी करून गुगल मॅप्समध्ये वापरायच्या होत्या; पण यासाठी गुगलला प्रचंड पैसे मोजावे लागणार होते. सुरवातीला फक्त शहरांच्या इमेजेस विकत घेण्याचा त्याचा विचार होता. गुगलमधल्या वरिष्ठ मंडळींना त्यानं या प्लॅनचं प्रेझेंटेशन दिलं; पण आश्‍चर्य म्हणजे प्रेझेंटेशन संपल्यावर या प्लॅनला पटकन मंजुरी मिळाली. यावर तर जॉनचा विश्वासच बसेना. यानंतर या हाय रेझोल्युशन इमेजेसचा उपयोग करून गुगल मॅप्सचं ऍप्लिकेशन्स तयार झालं.
गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण गुगल मॅप्सचा प्रॉडक्‍ट मॅनेजर असणाऱ्या ब्रेट टेलरनं गुगल मॅप्स जलद गतीनं चालवण्यासाठी सगळं सॉफ्टवेअर नव्यानं लिहून घेतलं. सुधारलेल्या गतीमुळे आणि हाय रेझोल्यूशन इमेजेसमुळे लोकांचा जो प्रतिसाद वाढायला लागला तो नंतर कधी कमी झालाच नाही.

सन 2006 च्या शेवटपर्यंत मॅप्सच्या क्षेत्रात गुगलनं आपल्या स्पर्धकांना मागं टाकलं आणि ती सर्वांत जास्त पसंतीची कंपनी बनली; आणि लवकरच www.google.com या वेबसाईटनंतर गुगलची ती सर्वांत जास्त वापरली जाणारी वेबसाईट बनली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: achyut godbole write google maps article in saptarang