esakal | एनएफसी (अच्युत गोडबोले)
sakal

बोलून बातमी शोधा

achyut godbole

एनएफसी (अच्युत गोडबोले)

sakal_logo
By
अच्युत गोडबोले achyut.godbole@gmail.com

निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ नेताच त्यातून आपल्या बिलाचे पैसे वळते होतात. त्यामुळे ना नाणी आणि नोटा यांची गरज ना क्रेडिट/डेबिट कार्डांची! थोडक्‍यात आता स्मार्टफोनमध्येच क्रेडिट/डेबिट कार्ड बसवल्यासारखंच झालं. म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक क्रेडिट कार्ड! पण इथंही सुरक्षेसाठी पिन नंबर घालावा लागतो एवढंच!

निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे... पण कमी म्हणजे किती कमी अंतरावर? एनएफसी डिव्हायसेची एक जोडी फक्त काही सेंटिमीटर्स एवढ्याच अंतरापर्यंतच संवाद साधू शकते. कित्येक वेळा तर ज्या दोन एनएफसी उपकरणांना (डिव्हायसेसना) संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांना स्पर्श करावा लागतो. नाहीतर संवाद शक्‍यच होत नाही.

एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ नेताच त्यातून आपल्या बिलाचे पैसे वळते होतात. त्यामुळे ना नाणी आणि नोटा यांची गरज ना क्रेडिट/डेबिट कार्डांची! थोडक्‍यात आता स्मार्टफोनमध्येच क्रेडिट/डेबिट कार्ड बसवल्यासारखंच झालं. म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक क्रेडिट कार्ड! पण इथंही सुरक्षेसाठी पिन नंबर घालावा लागतो एवढंच!
गुगलनं सन 2011मध्ये गुगल वॉलेट आणि गुगल ऑफर्स असे दोन प्रॉडक्‍टस्‌ बाजारात आणले. ते एनएफसी तंत्रज्ञानावरच आधारित होते. गुगल वॉलेट हे आत्ताच वर्णिलेल्या ई-क्रेडिट कार्डासारखंच आहे. फक्त यात क्रेडिट कार्डाबरोबरच कस्टमर लॉयल्टी कार्डस्‌सुद्धा डिजिटल स्वरूपात साठवता येतात. आपण त्याच दुकानातून किंवा कंपनीकडून वारंवार खरेदी केली, तर त्या कार्डावर आपले पॉइंटस्‌ दरवेळी जमा होत जातात आणि आपल्याला पुढच्या खरेदीवर डिस्काऊंट मिळतो. त्याला "लॉयल्टी कार्ड' असं म्हणतात. एअरलाईन्स जी "फ्रिक्वेंट फ्लायर कार्डस्‌' देतात ती याच प्रकारची असतात.

गुगल वॉलेटप्रमाणंच ऍपलनं सन 2014मध्ये "ऍपल पे' बाजारात आणलं. याप्रमाणंच "सॅमसंग पे' आणि "अँड्रॉईड पे' हेही बाजारात आले. हे सगळे एनएफसी तंत्रज्ञानावरच आधारित होते. कुलूप बनवणाऱ्या "येल' कंपनीनं तर एनएफसीनं उघडणारी इलेक्‍ट्रॉनिक लॉक्‍स बनवली आहेत. आपण घराच्या दारापाशी गेलं, की आपण एनएफसी चिप असलेला स्मार्टफोन फक्त त्या दाराच्या कुलपापाशी न्यायचा. स्मार्टफोनमधली एनएफसी चिप लगेच त्या कुलपाला संदेश पाठवते, आणि दरवाजा उघडतो. आता म्हणजे आपल्याला क्रेडिट कार्डस्‌, लॉयल्टी कार्डस्‌ आणि घराच्या किल्ल्या यातलं काहीच बाळगायचं कारण नाही! फक्त एनएफसी चिप असलेला स्मार्टफोन पुरेसा आहे!

याशिवाय एनएफसी टॅगचा मार्केटिंगसाठी उपयोग होतो. उदाहरणार्थ, कित्येक जाहिरातींची रस्त्यावर पोस्टर्स लावलेली असतात. त्यावर फक्त एक एनएफसी टॅग लावायचा. आपण एनएफसी चिप असलेला स्मार्टफोन त्या पोस्टरच्या जवळ नेला, की त्या प्रॉडक्‍टची माहिती किंवा त्या प्रॉडक्‍टच्या जाहिरातीची युट्यूब लिंक आणि त्याचबरोबर एक डिस्काऊंट कूपनही त्या टॅगमधून आपल्या स्मार्टफोनमध्ये येऊ शकतं. मग ती माहिती वाचून किंवा व्हिडिओ बघून आपल्याला तो प्रॉडक्‍ट विकत घ्यावासा वाटला, तर आपल्याला ते डिस्काऊंट कूपन वापरून तो प्रॉडक्‍ट सवलतीच्या दरात विकत घेता येतो. अशा एनएफसी टॅग्जना "पॅसिव्ह टॅग्ज' असं म्हणतात.
याशिवाय एनएफसीचे अनेक उपयोग आहेत. आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये आपले पासपोर्ट, आधार कार्ड, व्होटर आयडी, पॅन कार्डचे तपशील, तसंच इतरही गोष्टी ठेवू शकतो. त्यामुळे एअरपोर्टवर, ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा निवडणुकीच्या वेळी मत देताना आपल्याला प्रत्यक्ष ओळख कार्ड दाखवण्याची गरज नाही. आपला स्मार्टफोन समोरच्या रीडरच्या फक्त जवळ नेला, तरी आपण कोण आहोत याची ओळख ते तपासणाऱ्याला कळतं आणि मग सगळं सुरळीतपणे पार पडू शकतं आणि तिथल्या रांगा नष्ट होऊ शकतात.

याचप्रमाणं आपल्याला आपला वैद्यकीय इतिहासही (मेडिकल हिस्ट्री) एनएफसी चिप असलेल्या स्मार्टफोनमध्ये ठेवता येतो. यात आपल्याला लहानपणापासून झालेले आजार, त्यावर झालेले उपचार, सध्या चालू असलेली औषधं अशा सगळ्या गोष्टींचा तपशील असतो. आपण कुठल्याही नव्या डॉक्‍टरकडे पहिल्यांदा गेलो, तर त्याला हा सगळा इतिहास आणि सध्याची औषधं, पूर्वीची रेकॉर्डस्‌ हे सगळं सांगावं आणि दाखवावं लागतं. आता आपण एनएफसी चिप असलेला स्मार्टफोन त्या डॉक्‍टरच्या पीसीजवळ नेला, की त्यातल्या पीसीवर आपला पूर्ण वैद्यकीय इतिहास क्षणार्धात दिसेल. आपले पूर्वीचे ईसीजी आणि एक्‍स रेज वगैरेही डिजिटल स्वरूपात त्या पीसीवर त्या डॉक्‍टरला दिसतील आणि मग त्याला निदान आणि उपचार करणं सोपं जाईल.
नोकिया, सोनी आणि फिलिप्स या तीन कंपन्या सन 2004मध्ये एनएफसीच्या कम्युनिकेशनसाठी परिमाण (स्टॅंडर्ड) निर्माण करण्यासाठी एकत्र आल्या. नोकियानं 2007मध्ये पहिल्यांदा एनएफसीचा फोन बाजारात आणला. एनएफसीमागच्या तंत्रज्ञानाची सुरवात मात्र खूप यापूर्वीच झाली होती. अगदी वीज आणि चुंबकत्व यांचं ज्ञान माणसाला झालं तेव्हापासूनच. कुठल्याही कंडक्‍टरमधून वीज वाहते, तेव्हा ती आपल्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) तयार करते; आणि या उलट जेव्हा हे मॅग्नेटिक फिल्ड बदलतं, तेव्हा ते शेजारच्या कंडक्‍टरमधून वीज वाहायला लावतं हे माणसानं खूप पूर्वीच ओळखलं होतं. वीज आणि चुंबकत्व यांच्यातल्या या संबंधालाच "इंडक्‍टिव्ह कपलिंग' असं म्हणतात. याचा इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये खूप उपयोग करून घेतला आहे. विजेचं व्होल्टेज बदलण्यासाठी (उदाहरणार्थ, 110 व्होल्ट्‌सपासून 220 व्होल्ट्‌स) आपण जो ट्रान्सफॉर्मर वापरतो, त्यातही इंडक्‍टिव्ह कपलिंगचं तत्त्व वापरलेलं असतं.

हे कसं होतं हे एका उदाहरणावरून स्पष्ट होईल. आपण मघाचं पोस्टरचंच उदाहरण घेऊ. समजा तिथं एका गायकाच्या मैफिलीचं पोस्टर लावलंय. समजा त्याचं गाणं आपण ऐकलेलं नसल्यामुळे तिकीट काढून त्या मैफिलीला जावं की नाही याबद्दल आपण संभ्रमात आहोत. तेवढ्यात त्या पोस्टरवर एनएफसीचा टॅग लावलाय असं आपल्या लक्षात येतं. आपण लगेच आपला एनएफसी चिप असलेला स्मार्टफोन काढून त्यावरचं एनएफसी रीडिंग ऍप चालू करतो. हे ऍप चालू केल्यावर आपल्या स्मार्टफोनमधल्या एनएफसी चिपला एक सिग्नल जातो; आणि त्या चिपमधून वीज वाहायला लागते. त्याबरोबर त्याभोवती एक क्षीण (वीक) चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. याचा अर्थ आपला स्मार्टफोन आता एक ऍक्‍टिव्ह (सक्रिय ) एनएफसी डिव्हाईस होतो. याचं कारण तो ऊर्जा (पॉवर) वापरून चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो.

आता आपण जेव्हा असा ऍक्‍टिव्ह एनएफसी स्मार्टफोन त्या पोस्टरवरच्या एनएफसी टॅगजवळ नेतो, तेव्हा त्या स्मार्टफोनमधलं क्षीण चुंबकीय क्षेत्र त्या पोस्टरवरच्या एनएफसी टॅगमध्येही चुंबकीय क्षेत्र निर्माण करतं. या चुंबकीय क्षेत्रामुळे त्या पोस्टरवरच्या टॅगमध्ये वीज निर्माण होते. (त्या टॅगमध्ये स्वत:ची अशी ऊर्जा नसल्यामुळे त्याला "पॅसिव्ह टॅग' असं म्हणतात). आता यामुळे एक रेडिओ फिल्ड निर्माण होतं. स्मार्टफोनमधली एनएफसी चिप या रेडिओ फिल्डचा अर्थ लावते आणि त्यातला संदेश "वाचते.' बरेचदा हा संदेश म्हणजे त्या गायकाच्या गाण्याची युट्यूबची लिंक असते. त्यामुळे आता त्या स्मार्टफोनवर त्या गायकाचं गाणं सुरू होतं. आपण ते थोडा वेळ ऐकून त्या मैफिलीला जायचं की नाही ते ठरवू शकतो.
दोन स्मार्टफोन्समधल्या कॉंटॅक्‍ट नंबर, फोटो, डिस्काऊंट कूपन किंवा गाणं किंवा काही इतरही माहितीची देवाणघेवाण करायची असली, तरी एनएफसीचा उपयोग होतो. यामध्ये जो स्मार्टफोन माहिती पाठवतो तेव्हा तो ऍक्‍टिव्ह असतो आणि ज्याच्याकडे ही माहिती जाते तो पॅसिव्ह असतो.

एनएफसी तीन तऱ्हेनं काम करू शकतं. एक म्हणजे रीडर/रायटर मोड. आपण पोस्टरवरच्या टॅगचं जे उदाहरण बघितलं ते या गटात मोडतं. दुसरी पद्धत म्हणजे "पिअर टू पिअर.' दोन स्मार्टफोन्समध्ये माहितीची जी देवाणघेवाण होते ती याच गटात मोडते. तिसरी पद्धत म्हणजे "कार्ड एम्युलेशन मोड.' आपण जेव्हा स्मार्टफोनचा वापर करून बस, ट्रेन किंवा मॉलमध्ये पैसे देतो, तेव्हा तो या गटात मोडतो.
ब्लूटूथ असताना एनएफसीची काय गरज आहे असा आपल्याला प्रश्न पडेल. एनएफसी आणि ब्लूटूथमध्ये दोन्ही बाजूंनी कम्युनिकेशन होऊ शकतं; पण या दोन तंत्रज्ञानांमध्ये महत्त्वाचे फरक आहेत आणि ठराविक गोष्टींसाठी ब्लूटूथपेक्षा एनएफसी तंत्रज्ञानच जास्त उपयोगी पडतं. उदाहरणार्थ, एनएफसीला खूप कमी ऊर्जा (पॉवर) लागत असल्यामुळे जाहिरातींना लागणाऱ्या पॅसिव्ह टॅग्जसारख्या डिव्हायसेससाठी एनएफसीच उपयोगी पडतं. अर्थात या कमी ऊर्जेमुळे काही मर्यादाही पडतात. उदाहरणार्थ ब्लूटूथ हे दहा किंवा शंभर मीटर्सपर्यंत चालू शकतं, तर एनएफसी फक्त दहा सेंटिमीटर्सपर्यंतच चालू शकतं. शिवाय एनएफसीचा वेग ब्लूटूथपेक्षा खूपच कमी असतो. एनएफसीचा सर्वाधिक वेग दर सेंकदाला 424 किलोबिट्‌स आहे, तर ब्लूटूथचा वेग दर सेंकदाला 1 ते 2.1 मेगाबिट्‌स असतो. मात्र, दोन डिव्हायसेसमधली जोडणी (पेअरिंग) एनएफसीमध्ये ब्लूटूथपेक्षा चटकन्‌ होते. यामुळेच मोबाईल पेमेंट्‌समध्ये ब्लूटूथऐवजी एनएफसीच वापरतात; पण फाईल ट्रान्स्फरसारख्या गोष्टींसाठी ब्लूटूथच वापरतात.

अजून एनएफसी तंत्रज्ञान सर्वमान्य झालेलं नाहीये. तसंच एनएफसी तंत्रज्ञानात काही प्रश्न किंवा जोखीम उरतेच. यात रेडिओ फ्रिक्वेन्सीज वापरलेल्या असल्यामुळे सुरक्षेचा (सिक्‍युरिटी) प्रश्न येतोच. शिवाय अनेक दुकानं एनएफसी रीडर्स ठेवत नाहीत; तसंच जर स्मार्टफोनची बॅटरी डाऊन झाली तर त्यातून पैसे भरता येत नाहीत. यामुळे ते तंत्रज्ञान उपलब्ध असूनही अनेक जण स्मार्टफोनबरोबर अजूनही क्रेडिट कार्ड वगैरे बाळगतातच! तसंच ऍक्‍टिव्ह एनएफसी डिव्हाईस फक्त एकाच एनएफसी डिव्हासला माहिती पाठवू शकतो. तो माहिती अनेक एनएफसी डिव्हायसेसना ब्रॉडकास्ट करू शकत नाही. एनएफसी कसं वाढतंय आणि लोकप्रिय होतंय हे काळच ठरवेल. सध्याच्या अंदाजानुसार, सन 2010पर्यंत 85 टक्के स्मार्टफोन्स एनएफसी चिप्सबरोबरच येतील....पण कोण जाणे; कदाचित त्याअगोदरच त्यालाही स्पर्धा करणारं आणखीन एक तंत्रज्ञान निघेल!

loading image