त्याला आहे वेगाची नशा

मी शिकलेल्या पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणजेच बीएमसीसीमधील ही गोष्ट मला विसरता येत नाही.
sanjay takale
sanjay takalesakal
Updated on

मी शिकलेल्या पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणजेच बीएमसीसीमधील ही गोष्ट मला विसरता येत नाही. कॉलेजच्या मुख्य इमारतीमागे ग्रंथालय होते. त्याच्या मागे खाचखळगे आणि टेकडीवजा अगदीच ओबडधोबड जागा होती आणि मग त्याच्या मागे हॉस्टेल होते. ज्या जागेवरून चालताना ठेचकळायला व्हायचे किंवा पाय मुरगळण्याची भीती वाटायची त्या जागेवरून आमचा एक मित्र प्रचंड वेगाने मोटरबाईक चालवायचा. चालवायचा कसला उडवायचा. पोटात अगदी धस्स् व्हायचे.

वेगाने मोटरबाइक चालवताना त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हे तर धुंदी असायची. वेगाची धुंदी. कोणावर छाप पाडायला किंवा आपण काहीतरी कमाल करतोय हे दाखवायला तो मोटरबाइक तशी चालवायचा नाही, तर केवळ त्याला वेगाची नशा होती म्हणून स्वत:च्या समाधानासाठी तो स्टंट करायचा. बऱ्याच वेळा चालवताना तो पडायचा. कधी कधी जोरदार आपटायचा. हात मोडला तरी हसऱ्या चेहऱ्याने तो दुसऱ्या दिवशी कॉलेजला हजर असायचा. जरा बरे वाटले की परत तसाच गाडी चालवायचा. आमच्या स्कूटरचा वेग बघून त्यापेक्षा चालत गेलात तरी लवकर पोहोचाल असे चिडवायचा.

माझ्या वेगवेड्या मित्राचे आता जगभरात चाहते आहेत. तो भारताचा म्हणून जपानमधले त्याचे चाहते तिरंगा घेऊन तो जाणाऱ्या रस्त्यावर थांबतात. त्याची सही घेतात. त्याच्यासोबत फोटो काढतात. कारण माझा कॉलेजचा मित्र संजय टकलेने जगातील अनेक दुचाकी आणि चारचाकी शर्यती जिंकल्या आहेत. नुकतीच त्याने रेसिंग दुनियेतील सर्वात कठीण डकार कार रॅली पूर्ण केली. त्याचे अभिनंदन करायला फोन केला. ‘इतक्या वेगाने कार चालवताना तुला भीती वाटत नाही का रे,’ असा घाबरट मध्यमवर्गीय प्रश्न विचारला. ‘माझा एक स्क्रू ढिल्ला आहे, माहीत आहे ना रे मित्रा तुला’, असे म्हणत तो हसू लागला. खरंच सांगतो संजय टकले म्हणजे एक वेगळेच रसायन आहे.

आमची बीएमसीसी १९८४ची बॅच जरा वेगळीच होती. क्रिकेट, टेबल टेनिस, वॉटर पोलो, बॅडमिंटन सगळ्या खेळांत आमचे संघ दर्जेदार होते. दुसरीकडे पुरुषोत्तम आणि फिरोदीया करंडक स्पर्धा गाजवणारे हाडाचे रंगकर्मी होते. काही मित्र-मैत्रिणी प्रचंड हुशार होते. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर खूप जास्त संख्येने आमचे बॅचमेट्स चार्टर्ड अकाउंटंट झाले. काही खेळातील राष्ट्रीय विजेते झाले. कोणी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले, तर कोण आंतरराष्ट्रीय पंच झाला. व्यवसायात कोणी प्रचंड मोठी औषधांची कंपनी चालवली तर कोण चक्क हायकोर्ट जज झाला. या सगळ्या गदारोळात उठून दिसतात त्यापैकी एक म्हणजे संजय टकले.

‘‘काय सांगू तुला मित्रा, मला लहानपणापासून वेगाचे आकर्षण होते. हे वेड कसे लागले मलाच कल्पना नाही. घरातील सायकल मी खूप ताकद लावून वेगाने चालवायचो आणि बऱ्याच वेळा धडपडायचो. आमचे कुटुंब म्हणजे पुण्याजवळील मांजरी गावचे शेतकरी कुटुंब. आमच्या घरची बैलगाडीही मी पळवायचो. हाती चांगली मोटारसायकल आल्यावर त्या वेगाला अजून गवसणी घालू लागलो. त्यातूनच गेली ३८ वर्षे मी विविध शर्यतींत उत्साहाने भाग घेत आलोय. पहिले १४ वर्षे मी दुचाकीच्या शर्यतीत भाग घेतला. नंतर सात वर्षे रेसिंग केले नाही,’ संजय टकले गप्पा मारू लागल्यावर म्हणाला.

‘मग केलेस काय सात वर्षे,’ असे विचारले तर तो म्हणाला,‘‘मी चक्क बॅक पॅकिंग करून जग फिरलो. एकदम कमी बजेटमध्ये फिरलो. कुठेही राहिलो, कसाही प्रवास केला; पण जग पालथे घातले. नानाविध माणसांना भेटलो. जगभरातील विविध संस्कृतींचा आस्वाद घेत अभ्यास केला. तुला माहीत आहे की कॉलेजमध्ये माझ्यात प्रगल्भता नव्हती. बॅक पॅकिंग करून फिरल्याने आलेल्या धमाल अनुभवांनी मला थोडे प्रगल्भ केले. आणि मग मी हळूहळू चारचाकी म्हणजेच मोटरकार रेसिंगध्ये प्रवेश केला,’ संजय टकलेने मला थोडक्यात कहाणी सांगितली.

संजय टकलेने मलेशिया बँकॉकच्या दुचाकी शर्यत चांगल्याच गाजवल्या. त्या विजयात मिळवलेल्या स्मृतिचिन्हांनी त्याचे घर सजले आहे. ‘‘चारचाकी शर्यतीत सहभागी होणे सोपे नव्हते,’’ असे सांगताना त्याने त्यासाठी केलेल्या तयारीचे वर्णन केले. ‘‘वेग फक्त दोन्हीकडचा समान धागा आहे; पण दुचाकी आणि चारचाकी शर्यतीत खूप फरक आहे. मला हे कळल्यावर मी त्याचे चांगले प्रशिक्षण घेतले. कधी त्यासाठी संस्था गाठली तर कधी निष्णात ड्रायव्हरला शरण गेलो. लहानपणापासून विविध खेळ खेळत आल्याने नजर चांगली होती, ज्याचा चांगला फायदा झाला. इतकेच नाही तर डकार कार रॅलीत सहभागी व्हायचे म्हणून मी दुबई आणि मोराक्कोला जाऊन प्रशिक्षण घेतले,’’ संजय अगदी सहजी म्हणाला.

‘‘भीती नाही का रे वाटत इतक्या प्रचंड वेगाने कार चालवतोस तू?’’ मी काळजीपोटी म्हणालो. ‘‘कसे असते मित्रा, माझ्यासारख्या माणसासाठी मरणाच्या जवळ गेल्याशिवाय जगत असल्याचे कळत नाही. मला नेहमीचे म्हणजे कॉपी- पेस्ट म्हणतात तसे आयुष्य जगायला आवडत नाही. काहीतरी धाडस करायचाच विचार सतत मनात येतो. त्यामुळे भीती असते ना वेगाने कार चालवताना; पण मी संपूर्ण काळजी घेतो आणि कोणतीच गोष्ट गृहीत धरत नाही.’’

मग विषय डकार कार रॅलीकडे वळाला. संजय घडाघडा बोलू लागला, फ्रान्समधील पॅरिस शहरापासून चालू होणारी रॅली सेनेगल देशातील डकार गावी संपते म्हणून याला डकार कार रॅली नावाने जाणले जाते. मोटरकारच्या शर्यतीचे अंतर ७८९१ किलोमीटरचे असते. संपूर्ण शर्यत ऑफ रोड म्हणजे नेहमीच्या रस्त्यावरून नव्हे तर आडवळणाने जाते. यात कधी कच्चा रस्ता, कधी गवताळ भाग, कधी वाळवंट तर कधी रेतीचे डोंगर पार करावे लागतात. १५ दिवसांत ही शर्यत पूर्ण करणे म्हणजे चालकांसाठी दिव्य असते. कौशल्य, संयम आणि नशिबाची परीक्षा असते.

संजय टकलेचे कौशल्य, अनुभव बघून प्रसिद्ध टोयोटा कंपनीने त्याला करारबद्ध करून आपल्या संघात दाखल करून घेतले. यंदाच्या डकार कार रॅली कार ड्रायव्हर म्हणून सहभागी होऊन शर्यत पूर्ण करणारा संजय टकले एकमेव भारतीय ड्रायव्हर ठरला. पहिल्याच प्रयत्नात शर्यत यशस्वीपणे पूर्ण करताना तो ९६ स्पर्धकांमध्ये १८वा आला. ‘‘रोज अंदाजे ७०० ते ९०० किलोमीटर अंतर मी गाठत होतो. काळ्या मातीचा टणक रस्ता मिळाला तर कधी २४०चा वेग गाठता येत होता. कधी वाळूच्या टेकड्यांवरून जाताना खूप कमी वेग राखावा लागत होता.

अनुभव भन्नाट होता. खूप मजा आली. काय सांगू तुला मित्रा, आता माझे जगभर चाहते आहेत. सांगून विश्वास नाही बसणार, पण जपानमध्ये स्थानिक लोक तिरंगा हाती घेऊन माझे स्वागत करतात. कारण तिरंगा दिसला की मी फोटो काढायला किंवा सही द्यायला नाही म्हणत नाही,’’ अभिमानाने संजय टकले म्हणाला.

चाकोरीबाहेरचे जीवन जगायचे धाडस कमी लोक करतात. तसेच आपला छंद जोपासायला कमी लोक जीवाची बाजी लावतात. माझा कॉलेजचा मित्र संजय टकले याच काही विरळा लोकांमध्ये आहे, म्हणून त्याचे जास्त कौतुक वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com