

Adolescent Mental Health
esakal
डॉ. विद्याधर बापट
संभाजीनगरजवळील खवड्या डोंगरावर गेल्या आठवड्यात एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमागील कारणांमध्ये आयफोन मिळाला नाही म्हणून आत्महत्या केल्याचे सांगत समाजमाध्यमांवर अनेक गोष्टी ऐकू येत आहेत. अशा गोष्टी वारंवार घडतायेत. अशा घटनांमागे नेमकं काय कारण असावं, कौटुंबिक नात्यातील वीण उसवत चालली आहे का, असा प्रश्न पडावा अशी आताची परिस्थिती आहे. या कोवळ्या मनांचं मूक रुदन वेळीच न ऐकल्यास परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते...
पौगंडावस्थेतील अस्वस्थतेचा आणि नैराश्याचा आजार, ही बाब आजकाल गंभीर स्वरूप धारण करत चाललेली आहे. हे आजार जितक्या लवकर लक्षात येतील तेवढ्या परिणामकारकरीत्या त्यावर उपचार होऊ शकतात. यासाठी आजाराची लक्षणे समजून घेणे व वेळेवर तज्ज्ञांची मदत घेणे ही पालक आणि शिक्षक या दोघांचीही जबाबदारी आहे. पौगंडावस्थेत व्यक्तिमत्त्व उमलत असतं. त्याला अनेक पैलू पडत असतात. उत्साह खळाळून वाहत असतो. तरीही मुलांना गोंधळात टाकणारे प्रश्न पडत असतात, मनात घोंघावत असतात. उदा. मी कोण आहे? इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे का? या सगळ्या जगरहाटीत माझं काय स्थान आहे? प्रत्येक गोष्टीत माझ्यावर पालकांचं वर्चस्व का? स्त्री-पुरुष संबंध म्हणजे काय व इतर लैंगिक प्रश्न. नातेवाईक आणि माझ्या घरातले यांच्यातील एवढे ताणतणाव का? बरं, बाहेरची परिस्थिती पहिली तर, पेपरफुटी, भ्रष्टाचार अशा खूप गोष्टी यांचा माझ्यावर ताण येणार नाही का? स्वस्थता, आनंद काही नाहीच. मला कोणीच समजून घेणार नाही का? मग जगायचं कसं आणि कशासाठी?
अशा परिस्थितीत नुसताच मूड ऑफ आहे, की अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे यातील फरक ओळखणे हे फक्त तज्ज्ञ व्यक्तीच करू शकते. बरं, पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुःखीच दिसतीलच असंही नसत. त्यामुळे त्यांच्या नैराश्याच्या आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकते. अनेक जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणा ही दिसू शकतो.