Sunday Special : चला पुनर्निमाण करु या!

envoirment.jpg
envoirment.jpg

आपत्तीची कारणे समजल्यानंतर त्यांची पुनरावृत्ती टाळणे, हवामान बदलाची दिशा समजून घेणे, त्याने होत असलेली दशा टाळणे म्हणजेच आपत्तीतून धडा घेणे होय. विकासाच्या कल्पनांतून घडलेल्या चुका आणि त्यातून वाट्याला आलेली अरिष्ट्ये टाळण्यासाठी चिकित्सक पावले उचलली पाहिजेत. त्यात लोकसहभाग वाढवल्यास उपाययोजनांची परिणामकारकता वाढू शकते, हे लक्षात घेत फेरउभारणी करावी. 

कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील महापूर ओसरल्यानंतर सुटका आणि मदत ही कामे सुरळीत होत असताना तात्पुरत्या आणि दीर्घकालीन पुनर्वसनाचे नियोजन करावे लागेल. मदत मिळवताना (देतानासुद्धा) संकुचित वृत्तींना उधाण येते. हा टोकाचा व्यक्तीवाद बाजूला सारून विशाल मनोवृत्तीने पुनर्वसनाचे दिव्य पेलावे लागेल. लोकसहभागाच्या प्रमाणानुसार पारदर्शकतादेखील वाढत जाते, ही दृष्टी घेऊन पुनर्वसनाचा अभिकल्प (डिझाइन) बनविणे काळाची गरज आहे. यानिमित्ताने चुका टाळून नव्यातील उत्तम ते स्वीकारत नवनिर्माणाची संधी पेलावी. हे लक्षात घेऊन घाईगडबड न करता, नियोजनासाठी पुरेसा वेळ घेतला पाहिजे. समाजातील सर्व घटक, शहर नियोजनकार, वास्तुशिल्पी, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ यांच्या गोलमेज बैठका घेऊन पुनर्वसनात नावीन्यपूर्ण कल्पनांना साकारणे शक्‍य आहे. 

पर्यावरण चळवळीच्या अध्वर्यू राशेल कार्सन यांनी, "आपण निसर्गाचाच अविभाज्य भाग आहोत, याचा माणसाला विसर पडलाय. निसर्गाविरोधातील लढा हा त्याचा स्वतःविरुद्धचा लढा आहे,'' असं साठच्या दशकातच सांगून ठेवलं होतं. त्याची प्रचिती वारंवार येते. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराची कारणे सर्वांनाच समजलीत. पाणथळ जागांवर विनापरवानगी बांधकामे करून त्यांना कायदेशीर ठरविण्याचा कार्यक्रम पाहता पाहता काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राबवला गेलाय. परंतु पुराच्या पाण्याला कायदा कुठे समजतो? वसाहत, जात, धर्म, वर्ग अशी सारी बंधने झुगारून ते पाणी सैरावरा घुसते. हवामान बदलाच्या काळात अतिवृष्टी आणि ढगफुटी यांचे प्रमाण व वारंवारिता वाढत असताना, अशी बांधकामे, वाईट गुणवत्तेच्या इमारती अशा आपत्तींची पेरणीच करतात. आपण असे अनेक टाइमबॉंब ठिकठिकाणी लावलेत. ही समज आपल्याला सर्वांना द्यावी लागेल. निसर्गाला ओरबाडत, बेसुमार पैसा ओतून केलेली भेसूर, ओंगळवाणी बांधकामे विकासाऐवजी विनाशाची कारणे ठरताहेत, हे ध्यानात घेऊन बौद्धिक संपदेचा उत्तम उपयोग करीत शाश्वत, पर्यावरणस्नेही विकास घडवता येतो, हे दाखवून दिले पाहिजे. 

शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून "यानंतर पुन्हा कधीही पूर येऊ देणार नाही' अशा निर्धाराने कार्य करण्याची हीच वेळ योग्य आहे. त्यासाठी सभोवतालच्या डोंगराकडेही लक्ष द्यावे लागेल. जंगलांचा विनाश झाला की माती थेट नद्यांमध्ये उतरते. वृक्षराजी पाण्याच्या प्रवाहाला अटकाव करते. हे वृक्ष नाहीसे झाल्याने पाण्याला शोषणारी वनस्पतींची मूळ व्यवस्था नष्ट होते. सामान्यतः पावसाचा थेंब साधारणपणे 3 ते 8 मिलिमीटर व्यासाचा असतो; परंतु त्याचा वेग दर सेकंदाला 25 ते 30 फूट एवढा, म्हणजेच तासाला 30 ते 36 किलोमीटर इतका तुफान असतो. अतिवृष्टी वा ढगफुटीच्या पावसाचा वेग कैकपट असतो. या जबरदस्त गतिजन्य ऊर्जेमुळे बुलडोझरने उकरल्यागत माती वाहून जाते. भारतामधील पर्यावरण चळवळीचा पाया घालणाऱ्या "चिपको' आंदोलनाच्या भूमीमध्ये 1970 मध्ये अलकनंदा नदीच्या पुरानंतर तो परिसर खडबडून जागा झाला. 1974 मध्ये "चिपको' आंदोलन सुरू झाले. वर्षापासून हवामान बदल रोखण्याकरिता युरोप, अमेरिकेतील लाखो विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. कला, तंत्रज्ञान आणि उद्यमशीलतेचे अनेक आदर्श निर्माण केलेल्या कोल्हापूर परिसरात "जंगल वाचवा, पूर घालवा' मोहीम राबवावी लागेल. आपत्तीची जोखीम कमी करण्याचा हा पथदर्शक प्रकल्प होऊ शकतो. 

हरित शहरे करूया 
युरोप आणि अमेरिकेमधील अनेक शहरे त्यांची कर्ब पदचिन्हे (कार्बन फूट प्रिंट्‌स), जल पदचिन्हे (वॉटर फूट प्रिंट्‌स) कमी करून हरित शहरांकडे वाटचाल करत आहेत. कार्बन पदचिन्ह हे एखाद्या व्यक्तीच्या गरजा भागविण्यासाठी केलेल्या कृत्यासाठी लागणाऱ्या कार्बन डायऑक्‍साइडचे मापन करते. व्यक्ती, विभाग, प्रांत वा देश यांची कार्बन पदचिन्हे मोजली जातात. असेच मापन पाण्याबाबतही करतात. कर्ब व जल पदचिन्हे शून्यावर आणता येत नसतीलच तर कमीत कमी करावीत. हाच एकविसाव्या शतकातील विवेकी सुसंस्कृतपणा आहे. जगातील सुंदर, स्वच्छ आणि हरित शहरांच्या यादीमध्ये एकही भारतीय शहर नाही. ही कोल्हापूर-सांगलीसाठी संधी आहे. तेथील वास्तुशिल्पी, अभियंते यांच्या सल्ल्याने पर्यावरणपूरक हरित बांधकामे होऊ शकतात. शहरे, कारखान्यांचे सांडपाणी नदीत सोडण्याचा प्रघात बंद करण्यासाठी ही संधी आहे. पाण्याचे शुद्धीकरण, फेरवापर कित्येक ठिकाणी करता येईल. 

या भागात अनेक साखर कारखाने आहेत. त्यांनी उसामधील पाण्याचा फेरवापर, काटकसर केल्यास सांडपाणी घटून जल पदचिन्ह कमी करता येतील. (मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील अनेक कारखाने वीज, पाणी व वाफ यांचा कार्यक्षम उपयोग करतात.) उसाला मोकाट पद्धतीने पाणी देणे टाळल्यास कोट्यवधी लिटर पाणी वाचेल. यासाठी शेतकरी व कारखाने यांना विशेष प्रोत्साहित केल्यास नद्यांकडे वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटेल. 

या भागातील पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्याची भरपाई करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शक्‍यतो स्थानिक पशुधनाला प्राधान्य देता येईल. सहकारातील आदर्श "अमूल'ने कमीत कमी पाण्यात अधिक दूध देणारे पशुधन, पौष्टिक चारा यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून या संकल्पना रुजवता येतील. मनुष्यबळ कमी झाल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना गुरांचा सांभाळ अवघड जाते. सामुदायिक गोठा करून तिथे गुरांचा तळ (पार्किंग हो!) केल्यास स्वच्छता राखून गोबर गॅस, युरियासुद्धा मिळवता येईल. युवकांसाठी नव्या सेवा (सर्व्हिसेस) निर्माण होतील. 

महापुरात उद्‌ध्वस्त हजारो घरांचे नव्याने बांधकाम करताना अतिघाई करीत कंत्राटदारांचेच पुनर्वसन होण्याची भीती असते. सहा महिने, वर्षभरात घरे केल्यास ती यांत्रिक, मठ्ठ आणि कुरुप असतील. (उदा. लातूरमधील भूकंप पुनर्वसन) घरे, गावांच्या पुनर्वसनाचा तपशील ठरविण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. कायमस्वरूपी घर उत्तम होण्याकरिता पूरग्रस्तदेखील काही काळ कळ सोसण्यास तयार होतील. ही घरे भूकंपरोधक उभारावीत. हजारो कोटी खर्चताना सुंदर, उपयोगी घरे द्यावयाची असतील तर त्यांचा अभिकल्प व रचना (ले आउट) यांत कल्पकतेसाठी राष्ट्रीय स्पर्धा घ्यावी. अनेक नवोन्मेषी कल्पना समोर येतील. दगड, स्टोनक्रिट, राखेच्या विटा अशा सामग्रींचा वापर करता येईल. सिमेंट, काच व लोखंड कमीत कमी वापरून अल्प कर्बचिन्हांच्या घराच्या अभिकल्पांचा विशेष गौरव केला जावा. यामुळे हजारो हरित घरांना चालना मिळेल. पर्यटनालादेखील नवा आयाम मिळेल.

बांधकामाची जबाबदारी सोपवताना वास्तुशिल्पी, अभियंत्यांच्या संघटना आणि असोसिएशन यांना प्राधान्य द्यावे. अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांतील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा शक्‍य तेवढा सहभाग घ्यावा. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासण्याची जबाबदारीही द्यावी. यामुळे त्यांना अनुभव मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील. बांधकामाचा दर्जा उत्तम राहील. लोकसहभाग वाढेल. अशा पद्धतीने साकारलेल्या पेरूमधील (PREVI) प्रकल्पास "जगातील सर्वोत्तम पुनर्वसन योजना' अशी ख्याती लाभली. अल्बर्ट आइनस्टाइन यांनी ""कोणत्याही आपत्तीमध्येच तिला इष्टापत्ती करण्याची सुसंधी असते,'' असा सिद्धांत सांगितला होता. तो वास्तवात उतरविण्याची ही संधी मानावी. 

"निगर्साशी असलेले नाते तुटताच मानवताही संपुष्टात येते. मग तुम्ही स्वतःच्या नफ्यासाठी वनस्पती असो वा प्राणी, सरोवर असो वा नदी सर्वांची सर्रास हत्या करीत सुटता. तुमच्यामुळे भयग्रस्त झालेला निसर्ग स्वतःचे सौंदर्य आकसून घ्यायला लागतो.'' 
"निगर्साशी असलेले नाते तुटताच मानवताही संपुष्टात येते. मग तुम्ही स्वतःच्या नफ्यासाठी वनस्पती असो वा प्राणी, सरोवर असो वा नदी सर्वांची सर्रास हत्या करीत सुटता. तुमच्यामुळे भयग्रस्त झालेला निसर्ग स्वतःचे सौंदर्य आकसून घ्यायला लागतो.'' 
- जे. कृष्णमूर्ती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com