

Agentic AI Cyber Security Risks
esakal
तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी असलंच पाहिजे, पण त्याचा लगाम मानवाच्या हातात असणं अनिवार्य आहे. मायथोसच्या या युगात आपल्याला केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून चालणार नाही, तर नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्याही तितकंच सजग राहावं लागेल. आपण निर्माण केलेलं हे ‘डिजिटल दैवत’ आपल्यावरच उलटणार नाही, याची काळजी घेणं हेच या एकविसाव्या शतकातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. सायबर सुरक्षेची ही लढाई संपलेली नाही; ती आता एका अत्यंत कठीण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.
मानवी संस्कृतीच्या इतिहासात काही असे क्षण येऊन गेले आहेत, ज्यांनी येणाऱ्या काळाची दिशाच कायमची बदलून टाकली आहे. चाकाचा शोध, वाफेचं इंजिन आणि इंटरनेटचं आगमन यांनंतर आता आपण ‘एजंटिक एआय’ (Agentic AI)च्या अशा एका वळणावर उभे आहोत, जिथे तंत्रज्ञान केवळ मानवाचं साधन राहिलेलं नाही, तर ते स्वतःच स्वतंत्र विचार करणारी शक्ती बनलं आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी अँथ्रॉपिक या कंपनीनं जेव्हा त्यांच्या ‘क्लॉड मायथोस’ (Claude Mythos) या मॉडेलची घोषणा केली, तेव्हा संपूर्ण जगाला एका नव्या आणि भीषण वास्तवाची जाणीव झाली. अनेक एआय तज्ज्ञांनी आपल्या विविध वक्तव्यांमधून ज्या तांत्रिक क्रांतीचे संकेत दिले होते, ती क्रांती ‘मायथोस’च्या रूपानं आता आपल्या दारात उभी आहे. हे केवळ एक सॉफ्टवेअर अपडेट नसून, सायबर सुरक्षेच्या जगात झालेली मोठी उलथापालथ आहे. ह्यामुळे जागतिक बँकिंग व्यवस्थेपासून ते राष्ट्र‑राज्यांच्या गुप्तचर यंत्रणांपर्यंत सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.