

Shivaji Maharaj Fort Campaign
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
औरंगजेबाने नोव्हेंबर १६६९मध्ये आगळीक केल्यामुळे राजांनी मुघलांसोबतचा तह झुगारला आणि युद्धाची रणदुदुंभी वाजविली. राजांच्या आज्ञेने ४ फेब्रुवारी १६७०च्या रात्री तानाजी व सूर्याजी मालुसरे यांनी सिंहगड स्वराज्यात आणून शुभकार्याचा जणू नारळच फोडला. हे पाहून अन्य मावळ्यांनीदेखील अतुलनीय शौर्य गाजवून अवघा मुघली प्रांत व्यापून टाकला. मुघलांना दिलेले २३ किल्ले जिंकून घेण्यासाठी शिवसैन्यामध्ये जणू चढाओढच सुरू झाली.
शिवसैन्याचे ५१ ठिकाणी छापे ः एप्रिल १६७०च्या सुमारास राजांच्या घोडदळाने परांडा, नगर व जुन्नर या मुघल प्रदेशातील तब्बल ५१ ठिकाणी एकाचवेळी आक्रमणे केली. ही धक्कादायक बातमी ९ मे १६७० रोजी औरंगजेबाला समजली.
माहुलीवर विजय (१६ जून) ः फेब्रुवारी १६७०च्या सुमारास माहुली किल्ल्यावर शिवसैन्याने हल्ला केला. यावेळी मनोहर दास हा येथील किल्लेदार होता. त्याने आपले सर्व सैन्य किल्ल्याच्या चारही बाजूस तैनात करून युद्धास सुरुवात केली. शिवसैन्याने लपूनछपून अनेकवेळा किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाणून पाडण्यात आला. पुढे मे १६७०च्या एके रात्री डोंगरकडा चढण्यात पटाईत असलेल्या मावळ्यांनी किल्ल्यावर (सिंहगडाप्रमाणे) चढाई केली. रात्रंदिवस सावध असणाऱ्या किल्लेदाराने गडावरून दगडांचा यथेच्छ मारा करून तो परतवून लावला. या हल्ल्यामध्ये अनेकजण धारातीर्थी पडले, त्यामुळे ही मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली. किल्ल्यावरील हल्याची बातमी मिळताच मुघलांची कुमक किल्ल्यावर येऊन पोहोचली. मात्र शिवसैन्याच्या हल्ल्यामुळे गांगरून गेलेल्या मनोहर दास याने पुढे किल्ला लढविण्यास नकार दिला. नव्याने आलेल्या मुघली सैन्याच्या ताब्यात किल्ला देऊन तो आपल्या प्रदेशात परत गेला. कुमक घेऊन आलेला मुघल अधिकारी दाऊद खान याने अल्लावर्दी बेग याची किल्लेदार म्हणून नेमणूक केली व त्याच्या मदतीला २०० सैनिक दिले. किल्लेदार बदलल्याचे कळताच राजांनी पुन्हा एकदा आपल्या सैन्याला रवाना केले. शिवसैन्याने १६ जून १६७० रोजी अचानक धाड टाकून अल्लावर्दी बेगला यमसदनी धाडले आणि किल्ल्यावर भगवा फडकविला.