esakal | अलकीचा 'जादूचा आरसा' (ऐश्वर्य पाटेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

Aishwary-Patekar

मी पुन्हा एकदा आरसा धुंडाळू लागलो. कारण, अशी नामी संधी परत परत काही येणार नव्हती. एका फडताळाजवळ कलाकुसर केलेली एक जुनाट पेटी दिसली. तिचं झाकण उघडलं अन् काय आश्चर्य, अलकीचा जादूचा आरसा साक्षात समोर! आजपर्यंत या आरशाविषयी खूप ऐकलं होतं. ज्याची कुणाची वस्तू हरवली असेल ती वस्तू हा आरसा मिळवून देत असे! 

अलकीचा 'जादूचा आरसा' (ऐश्वर्य पाटेकर)

sakal_logo
By
ऐश्वर्य पाटेकर oviaishpate@gmail.com

मी पुन्हा एकदा आरसा धुंडाळू लागलो. कारण, अशी नामी संधी परत परत काही येणार नव्हती. एका फडताळाजवळ कलाकुसर केलेली एक जुनाट पेटी दिसली. तिचं झाकण उघडलं अन् काय आश्चर्य, अलकीचा जादूचा आरसा साक्षात समोर! आजपर्यंत या आरशाविषयी खूप ऐकलं होतं. ज्याची कुणाची वस्तू हरवली असेल ती वस्तू हा आरसा मिळवून देत असे!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अलकी माझ्या वरच्या वर्गात शिकत होती, म्हणजे मी सहावीत, तर ती सातवीत. ‘सातवीत शिकणारी पोर’ एवढीच तिची ओळख नव्हती. तिच्याकडच्या जादूच्या आरशामुळे तिची वेगळी ओळख होती. अर्थात्‌, असा आरसा तिच्याकडे होता म्हणून तिनं मिजास वगैरे कधी केली नाही. तिला जो जादूचा आरसा मिळाला होता तो काही बाजारात जाऊन तिनं विकत आणलेला नव्हता. बाजारात कुठं असले आरसे मिळतात? तिला तो तिच्या आजीकडून मिळाला होता. तिच्या आजीला पाच मुलगे अन् चार मुली होत्या.

सगळ्यांची लग्न झाली. सगळ्यांना पोरंसोरं झाली. म्हणजे सगळ्यांच्या पोरी मिळून आजीला नाती किती असतील? तरी तो आरसा अलकीलाच मिळाला. अलकीवर तिच्या आजीचा विशेष जीव. अर्थात्‌, आजीचा विश्वास प्राप्त करण्यासाठी अलकीला स्वत:त काही बदल करावे लागले होते. ते काही इथं सांगत बसत नाही. आजीच्या अखेरच्या काळात सारं गणगोत गोळा झालं. आजीच्या सगळ्याच नाती जमा झाल्या होत्या. एका नातीची त्यादरम्यान परीक्षा होती, तरी ती आली होती. तिचं काही आजीवर प्रेम होतं असं नाही...पण जादूच्या आरशाचा मोह! दुसरं काय? आजी शेवटच्या घटका मोजत असतानाही तिनं अलकीला जवळ बोलावलं अन् तिच्याच हाती जादूचा आरसा सोपवला. बाकीच्या नातींचा विरस झाला. साहजिकच आरशाची मालकीण अलकी झाली.

तो आरसा तर मला कुचकामीच वाटत होता; पण सर्वांना त्याचं कोण कौतुक! 
एकदा सुटीच्या दिवशी अलकीच्या भल्यामोठ्या वाडावजा घरात आम्ही लपाछपीचा डाव मांडला. खरं तर अलकीचा भाऊ रोशा ‘कोयी कोयी’ खेळायचं म्हणत होता. तसा आम्हालाही तो खेळ आवडत असूनही तो बेत आम्ही हाणून पाडला. खरंतर आम्हाला, म्हणजे मला अन् मल्याला, लपाछपीच्या खेळात तर बिलकूलच रस नव्हता. मात्र, याच खेळामुळे आमचं मिशन फत्ते होणार होतं. अलकीच्या जादूच्या आरशाविषयी खूप दंतकथा आम्ही आजवर ऐकलेल्या होत्या. एकदाचा त्यांचा सोक्षमोक्ष लावायचाच असा विडा मी अन् मल्यानं उचलला होता. लपाछपीचा खेळ सुरू झाला. अलकी, रोशा, मी, सित्या, मल्या, गोऱ्या...सगळे वाड्यातल्या खोल्यांमध्ये लपायला पळालो. मी काही कुणाला शोधायचा प्रयत्न केला नाही. मल्या आधीच अलकीच्या खोलीकडे पळाला होता. दार लोटून मी मध्ये आलो तर मल्या म्हणाला :‘‘ऐ भो, मला तं लई भ्याव वाटतंय. आपल्या या कारास्थानाचं अलकीला का कळलं तं मंग आपली काही खैर न्हाई.’’

‘नगं रं घाबरू. काई बी कळायचं न्हाई तिला.’
‘न्हाई भो, म्या चाललो,’’ मल्यानं ऐनवेळी कच खाल्ली.
‘तुला करामत न्हाई बघायची का आरशाची?’ मी त्याला पुन्हा मोहात पाडलं.
‘पाह्यचीया; पर भ्याव बी वाटून ऱ्हायलंय.’
‘चल, यळ नगं दवडू. आरसा धुंडाळू.’

आम्ही अलकीच्या खोलीतल्या वस्तू इकडच्या तिकडे केल्या; पण काही केल्या आरसा सापडेना. ज्या आरशासाठी आम्ही एवढा प्रयास केला होता तो प्रयास असाच वाया जाईल की काय असंही वाटून गेलं. आमचा मूडचा गेला. 
मल्या म्हणाला :‘‘चल बाबा, निघू आता. न्हाई तं व्हईल लेंडी पाताळ!’’
‘तू तं लई पुळकी भागुबाई हायेस...दम की जरा!’’

मी पुन्हा एकदा आरसा धुंडाळू लागलो. कारण, अशी नामी संधी परत परत काही येणार नव्हती. एका फडताळाजवळ कलाकुसर केलेली एक जुनाट पेटी दिसली. तिचं झाकण उघडलं अन् काय आश्चर्य, अलकीचा जादूचा आरसा साक्षात समोर! आजपर्यंत या आरशाविषयी खूप ऐकलं होतं. ज्याची कुणाची वस्तू हरवली असेल ती वस्तू हा आरसा मिळवून देत असे! 
आमच्या घरातलं सुख हरवलंय, असं जे आई म्हणत असे; ते कुठं सापडेल का हे मला पाहायचं होतं. मधल्या बहिणीची तोरडी हरवली होती, तीही गवसणार होती...अन् माझा हरवलेला बापही! आमच्या बापासारखाच मल्याचा बापही कधीचा हरवला होता. त्याला अन् त्याच्या आईला टाकून तो कुठं तरी निघून गेला होता.

‘काय टाईम करून ऱ्हायला रं, लवकर पाह्य.’
मी अधीरतेनं आरसा समोर धरला. त्याच्यात काहीच दिसेना. मल्याचा बाप, आईचं सुख तर सोडाच; स्वत:चं थोबाडही त्यात दिसेना. कसला हा जादूचा आरसा? हा तर कुचकामी.
‘ऐ, दिसला का माहा बाप?’
‘तूच पाह्य!’
‘ऐ पऱ्या, ह्येच्यात काईच दिसत न्हाई. म्हंजी अलकीच्या आजीनं यडंच बनवलंया जगाला आन् ही अलकी बी काईच्या काई कहान्या ऐकीवती! म्हंजी, ही अलकी बी यडीच बनवून ऱ्हायलीया आपल्याला...’
‘आरं, आसं कसं व्हईन? यखांदा मंतरबिंतर आसंल, त्यो म्हनावा लागत आसंल!’
‘मग तिला इचारायचा का मंतर?’
दरवाजाजवळ पावलांची हालचाल जाणवली. आम्ही घाई करत आरसा पुन्हा जसा होता तसा ठेवून दिला. अलकी आली अन् मी साळसूदपणे मल्याला म्हणालो : ‘‘मल्या इस्टॉप...अलकी इस्टॉप!’’
‘तुमचे नाटकं कळले बरं का मला!’ अलकी रागानं म्हणाली.
‘काय झालं?’
‘नगा येड घिऊन पेडगावला जाऊ! मला का येडी समजला का? आरसा बघायला आले व्हते ना तुम्ही माह्या खोलीत?’
‘खरंच न्हाई गं, आलके’

अलकीनं मल्याच्या गालात एक ठेवून दिली. ती पाहत का मी उभा राहणार होतो? माझ्या गालावर तिची चापट पडण्यापूर्वीच मी धूम ठोकली. तिच्या हातून निसटलो. नुसताच निसटलो नाही तर हे सत्य घेऊन निसटलो की आलकीचा जादूचा आरसा काही जादूबिदू दाखवत नाही, भूत-भविष्य सांगत नाही की हरवलेल्या वस्तूचा ठावठिकाणाही सांगत नाही. अर्थात्‌, मी ज्यांना ज्यांना हे सांगितलं त्यांनी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. ज्याचा त्याचा अलकीच्या आरशावरच भरवसा. त्यांची हरवलेली वस्तू जर तो आरसा शोधून देत होता, तर त्यांनी का ठेवू नये विश्वास?

मी आईलाही विचारलं त्या आरशाबद्दल, तर आई म्हणाली : ‘खरं काय आन् खोटं काय, त्या परमेशरालाच ठावं! आरं, आरशाचं समद्या गावाला लई कौतिक. कुढं काय हरावलं का आलकीच्या आजीला गळ घालाया जायाचे लोक. आजी मधल्या खोलीत जाऊन त्यो आरसा आनायची. ज्याची वस्तू हरावली आसंन त्याला इच्यारायची : ‘काय हरावलं हाय, म्हादबा? तुह्या बायकूची आंगठीच नं?’ 

‘हा...मोठ्याई, आंगठीच. दिसली का कुढं? घावला का ठावठिकाना?’ 
अलकीची आजी म्हणायची, ‘म्या सांगते तुला...पर त्यासाठी यक गोष्ट करावी लागन...’ 
तो भाबडेपणानं विचारायचा, ‘काय ती?’ 
आजी त्याला सांगायची, ‘तुला दारू सोडावा लागन. ‘आजपासून म्या दारूच्या थेंबालासुदिक शिवनार न्हाई,’ अशी आन तुला घ्यावा लागंल.’ ही येकच गोष्ट न्हाई, तं कुनाची बैलगाडी चोरीला गेली, कुनाची गाय हरावली तरी या समद्याचा तपास ती घ्यायाची. कुनाची सासू, कुनाची सून, कुनाचा भाऊ...या समद्यांची गैरत यायाची आन् आलकीची आजी येखांदी अट घालून त्या वस्तूचा ठिकाना सांगायाची. आरं, लई पुन्यवान म्हतारी व्हती रं. गावातलं काटंकुटं येचून तिनं गाव निरळ करून टाकलं...गव्हाळीच्या रानासारखं!’
‘मंग तुह्या सुखाचा ठावठिकाना तिनं तिच्या आरशाच्या जोरावर का सांगितला न्हाई?’
‘ते बी खरंच हाये म्हना, त्यात तिला काई यश आलं न्हाई. ती म्हन्ली मला, तुहं सुख डोंगर-दऱ्यांच्या पल्याड हरावलंय, त्यामुळे अडथळा येऊन ऱ्हायला. तू जरा दम धर. ते आपसूक तुह्या दाराशी यिईल!’
‘कशाचं काय आई... तुला फशीवलं तिनं.’
‘तिनं कशाला फशीवलं? माहंच नशीब फुटकं निघालं.’

अलकीच्या आजीच्या जादूच्या आरशाच्या कहाण्या अशा कितीतरी भरतील...त्यात अलकीची भर. ती तर आम्हाला त्या आरशाच्या किती किती कहाण्या सांगायची... 
म्हणायची : ‘‘आरशात मला नं आज चंद्र-सूर्य भेटेल!’
‘ते तुह्या आरशात तुला भेटेल त्यात काय नवल? ते तं इथं आमाला बी दिसून ऱ्हायले!’’ झापडी उषी म्हणायची.
‘न्हाई तं काय! ही लई मोठी गोष्ट झाली काय?’ इंदू म्हणाली 
‘अगं, तुमाला फकस्त दिसत्यात. तुमच्याशी बोलत्यात का त्ये?’
‘म्हंजी तुह्याशी बोलले ते?’
‘तेच न्हाई, डोंगर-नद्या-झाडं...तुमाला काय सांगू? तुमी अजून जे जग पाहिलं नसंल त्या जगात मला ह्या आरशानं फिरीवलंया.’
‘कुढलं जग?’
‘म्या तं काल पऱ्यांच्या जगात गेले व्हते. इतकं खेळले त्यायच्याबरूबर, लई दमले आन् झाली नं आईची आठवन, मंग आले परत. न्हाई तं त्या म्हनीत व्हत्या की जाऊच नगं म्हनून!’
हे सगळं अलकीच्या मनाला ठाऊक. तो आरसा काहीच दाखवत नाही याचा अनुभव खरं तर मी घेतला होती. मात्र, जिथं तिथं मला गप्प करण्यात आलं. आजीच्या आरशानं जगावर एवढं गारुड करून ठेवलं होतं की त्यातून कुणी बाहेर यायला तयारच नव्हतं.

तसेही अलकीच्या आजीच्या आरशानं गावावर उपकारच करून ठेवले होते. आसपासची अनेक गावं बिघडली होती. त्यांत दुफळी माजली होती. तसं आमच्या गावाचं झालं नव्हतं. अलकीच्या आजीनं आरशाच्या जोरावर गावाला एकत्र बांधून ठेवलं होतं. मग लक्षात आलं की तिच्या आजीनं कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं नव्हतं. 
मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा आई म्हणाली, ‘आपलं सुख सापडलं.’ 
आन् मल्या मोठा कंत्राटदार झाल्यावर त्याचाही बाप त्याच्याकडे येऊन राहू लागला. आजीच्या जादूच्या आरशाशिवाय हे घडलं.

अलकीचीही हकीकत कळली यथावकाश....तिचा नवरा वारल्यामुळे ती तिच्या भावांकडेच येऊन राहू लागली होती. ज्या आरशानं इतरांचं भूत-भविष्य सांगितलं होतं तो आरसा - अलकी त्याची मालकीण असूनही - ते तिला दाखवू शकला नव्हता. जादू आरशात नव्हे, तर अलकीच्या आजीत होती. समाजाचं मानसशास्त्र आकळलेली ती जिगरबाज बाई होती.
अलकी भेटली तेव्हा मला तिला विचारायचं होतं, ‘कुठंय तुझा जादूचा आरसा?’ पण तिनं तो आरसाच फोडून टाकला होता असं मला कळलं!

Edited By - Prashant Patil