आई कवितेत मावत नाही...! (ऐश्वर्य पाटेकर)

ऐश्वर्य पाटेकर oviaishpate@gmail.com
रविवार, 12 मे 2019

इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं...
आजच्या (12 मे) जागतिक मातृदिनानिमित्त कवितेतल्या आईचा हा हृद्य शोध...

आईसारखीच आईची जी कामे
ती मी करतो..
आईसारख्याच भाकऱ्या भाजतो
आईच्या भाकरीला जो जसा, तसाच खरपूस वास
माझ्याही भाकरीला!

इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं...
आजच्या (12 मे) जागतिक मातृदिनानिमित्त कवितेतल्या आईचा हा हृद्य शोध...

आईसारखीच आईची जी कामे
ती मी करतो..
आईसारख्याच भाकऱ्या भाजतो
आईच्या भाकरीला जो जसा, तसाच खरपूस वास
माझ्याही भाकरीला!

आई शेण-शेणकूर करायची
मीही तसाच
गोठा इतका लख्खं की कुठेच काही घाण नाही

आई जात्यावर दळण दळायची
मीही भल्या पहाटे उठून दळण दळतो
आई वाळवण घालायची उन्हात
मीही तसंच वाळवण..

आई स्वयंपाक करायची सुगरण हातानं
ती तशीच चव माझ्याही हाताला

फक्त मला आईसारखी
माझी आई होता येत नाही...
दु:खात लहान लहान होत जाताना मांडीवर घेऊन
थोपटता येत नाही...

सांप्रतकाळी आपण प्रचंड श्रीमंत झालेलो आहोत, आपले खिसे पैशांनी तुडुंब भरलेले आहेत, त्याच्या जोरावर जगात काहीही विकत घेण्याची भाषा आपण करू लागलोय. तो काळही फार दूर नाही जेव्हा माणसं एक दिवस चंद्र-सूर्यही विकत घेतील! डोंगर तर विकत घेतलेच आहेत आपण...नद्याही विकत घेऊ अन्‌ समुद्रही. एवढं सगळं विकत घेण्याची दानत असलेल्या आपल्यातला माणसाला आई मात्र विकत घेताच येणार नाही. म्हणून माणूस कितीही म्हणत असला की मी श्रीमंत आहे, तरीही तो आईशिवाय मात्र दरिद्रीच राहील. कवितेतल्या आईचा शोध मला घ्यायचा आहे, त्याच्यासाठी असली प्रस्तावना तशी शोभत नाही; पण वास्तवच एवढं कठीण आलंय की असं काही व्यक्त झाल्याशिवाय मलाही राहवत नाही. लेखाच्या शीर्षभागी कवितेची योजनाही मुद्दामच केली आहे; जेणेकरून आईविषयीचा लेख आहे या भावनेनं तरी काहीजण आकृष्ट होतील. वृद्धाश्रमात धाडलेल्या आपल्या आईची आठवण होऊन थोडे तरी डोळे ओले होतील. एकूण साहित्याचा अवकाश दोन आयांनी आपल्या विचारांनी पेलून धरला आहे. एक म्हणजे, सानेगुरुजींची आई अन्‌ दुसरी मॅक्‍झिम गॉर्कीची आई. या दोन्ही आयांना वंदन
करून मी शोधतोय कवितेतली आई. आई या प्रतिमेनं मराठी कवितेलाच काय, एकूण कवितेलाही अतिशय उंचीवर नेलं आहे. मग ती कविवर्य ग्रेस यांची आई असेल, कविवर्य नारायण सुर्वे यांची आई असेल किंवा कविवर्य ना. धों. महानोर यांची गाव-खेड्यातली आई असेल...या सर्व आयांनी कवितेला मोहून घेतलं आहे. अगदी "राजकवी' या किताबानं सन्मानित झालेले कविवर्य यशवंत यांच्यापासून ते आजच्या पिढीच्या कवयित्री कल्पना दुधाळ यांच्यापर्यंत कवितेतल्या आईचा हा पट मांडता येतो. आईच्या अवकाशानं कवितेला समृद्ध केलं आहे. आईच्या गोधडीची ऊब कवितेच्या आशयाला ठसठशीत करणाऱ्या शब्दांनी पांघरून घेतली आहे. "आईवर खूप कविता लिहिल्या गेल्या; पण बापावर लिहिलं गेलं नाही' वगैरे वाद घालणारे घालतात; पण त्याला काही अर्थ नाही. "मातृदेवो भव!' असं म्हणत भारतीय संस्कृतीनं आईला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं आहे आणि आईनंही ते स्थान आजपर्यंत तरी अबाधित ठेवलं आहे. आई कवितेत सामावलीय असं नाही म्हणता येणार, आईनं कवितेला पदरात घेतलंय किंवा कवितेला स्वत:त सामावून घेतलं आहे. आईपेक्षा मोठं काय असेल जगात? चंद्र-सूर्य? ते तर लहान वयातच आईनं आपल्याला खेळायला दिले. म्हणून तर चंद्राचा चांदोमामा झालाय. आईनं मराठी कवितेची गोधडी अशी शिवून टाकलीय की पिढ्यान्‌पिढ्या तिची ऊब कमी व्हायच्या ऐवजी वाढतच गेलीय. सगळ्या विश्वावर पांघरूण घालणारी आईची ही गोधडी आहे. विश्वानं ती पांघरून घेतल्यावरही जी उरते ती आईची गोधडी. या गोधडीला धस लावण्याची क्षमता कुणाच्यातच नाही. म्हणून ही गोधडी शाबूत राहिली. गोधडीच्या आतलं "पुरण' कवटाळत असतं विश्वाच्या लेकराला. आईचा मुलगा कुठल्याही मोठ्या हुद्द्यावर असू दे...अगदी देशाचा राजा जरी असला तरी तो आईसाठी लेकरूच असतो. ही खरी ताकद आहे आईपणाची! आणि एखाद्याकडं भरपूर संपत्ती असेल; पण जर का त्याला आई नसेल तर तो भिकारी आहे, असं कविवर्य यशवंत म्हणतात. त्यांनी लिहिलेली ही कविता मराठी मातृकवितेतली बीजकविता म्हणता येईल. त्यामुळे तिचा उल्लेख इथं झालाच पाहिजे.

आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी
ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी

आईचं नसणं म्हणजे आयुष्यातलं खूप काही गमावल्यासारखं असतं. रविकिरण मंडळातले अतिशय महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जाणारे कवी माधव पटवर्धन अर्थात माधव जूलियन यांनी आईवर अतिशय हृदयस्पर्शी कविता लिहून ठेवली आहे. ती ओलांडून आपल्याला पुढं जाताच येणार नाही.

प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई
बोलावू तूज आता मी कोणत्या उपायी

माय-लेकराच्या ताटातुटीचं वर्णन यापेक्षा कुठल्या वेगळ्या शब्दांत हवं होतं! ही कविता वाचल्यावर डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या नाहीत असा माणूस निष्ठूरच म्हणावा लागेल! आई आणि अपत्याचं नातं अपार जिव्हाळ्यानं गुंफलेलं असतं. ती वीण कुठल्या विद्यापीठात किंवा शाळेत शिकून आलेली नसते. ते कसब जन्मजात असतं. मराठीतल्या अनेक महत्त्वाच्या कवींनी आपली खरीखुरी आई समोर ठेवली आहे. उपेक्षितांचा जाहीरनामा मांडणारे कविवर्य नारायण सुर्वे हेही याला अपवाद नाहीत.

त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूं घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर

गिरणी-कामगार असलेल्या आईचं आपल्या मुलांबरोबरच्या वात्सल्याचं चित्रण त्यांनी या कवितेत केलं आहे. मुलांना सोडून कामावर जाताना होणारी तिची अवस्था, दसऱ्याच्या आदल्या दिवशी मुलांना मिल दाखवून खाऊ घेऊन देणारी आई आणि अचानक हे मायेचं छत्र हरवल्यानं मुलांची होणारी सैरभैर अवस्था हृदय पिळवटून टाकणाऱ्या शब्दांत सुर्वे यांनी रेखाटली आहे.

आई अपरात्री उठायची
आणि जात्यावर बसायची
फाटक्‍या लुगड्याला गाठी बांधून
अंग झाकून घ्यायची
इतक्‍या अपरात्रीही गाणं म्हणायची
मंद फिक्‍या आवाजात
काळोखात वितळून जायची

निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी आपली गाव-खेड्यातली आई मांडली, जी कृषिजन संस्कृतीतल्या त्या प्रत्येक आईचं प्रातिनिधिक रूप आहे. तिच्या दु:खाचा, संघर्षाचा, कष्टाचा, वेदनेचा वेद ती मांडते. मरते तरी तिच्या गाण्याची लकेर कवीच्या शब्दांसाठी मागं सोडून जाते. कविता दु:खाची असूनही नितांतसुंदर रूपात बदलून जाते.

अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई
डोई तिच्या भारा असे चालताना तोल जाई
काळी काळी कृश देह, ती असे माझी माय
वणवण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय

कवी वामन निंबाळकर यांच्या "माय' या कवितेतल्या या ओळी आहेत. कवीची आई मोळी विकून आपल्या पोरांचं पोट भरत असते. मात्र, सर्पदंशानं ती मरते; पण कविता इथं संपत नाही. शेवटी कवी म्हणतो की
दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो.
आता कवीच्या घरात चूल नाहीये, तरीही त्यानं मोळी विकत घेणं म्हणजे प्रत्येक मोळीवालीत आई शोधणं आहे. ही भावना फार महत्त्वाची आहे. नाहीतर अलीकडं प्रत्यक्ष आईसाठीच घराचे दरवाजे बंद होत आहेत! प्रत्येक कवी जेव्हा आपली आई आपल्या कवितेतून समोर ठेवतो, तेव्हा त्या कवीच्या जातीपातीचा, त्याच्या दु:खाचा खूप मोठा इतिहास-भूगोल समोर येतो. विद्रोहाचा विस्तव आपल्या शब्दांतून मांडणारे कवी नामदेव ढसाळ यांनी आपल्या आईला धारेवर धरत कवितेतून व्यवस्थेची झाडाझडतीच घेतली आहे...

आई गेली याचं दु:ख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते
दु:ख याचं आहे: अज्ञानाच्या घोषाआत
तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या
आईअगोदर बाप मेला असता तरी
मला त्याचं काही वाटलं नसतं
दु:ख याचं आहे: तोही तिच्या करारात सामील होता
दोघांनीही दारिद्याचे पाय झाकले
लक्ष्मीपूजनाला दारिद्रय पूजले

मराठी कवितेतल्या आईचा शोध कविवर्य फ. मुं. शिंदे यांच्या "आई' या कवितेशिवाय पूर्ण होणार नाही. जगातल्या त्या प्रत्येक मुलाची भावना जणू काही त्यांनी आपल्या या कवितेत रेखाटली आहे. या कवितेचं यश कशात आहे तर ती नुसती फ. मुं. शिंदे यांची आई नाही वाटत, ती प्रत्येकाची आई वाटते.

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गल्बललेलं गाव असतं

तशीही आई इतकी मोठी आहे की जी कवितेत मावू शकत नाही. आई जे काही घरासाठी करते त्यात कधीही दिखाऊपण नसतं. घरा-दारासाठी जिवाची माती करून घेऊनही त्याची तिला कधी खंत वाटत नाही. प्रख्यात हिंदी कवी मंगलेश डबराल आपल्या "आईचा फोटो' या कवितेत तिच्या याच समर्पणवृत्तीचं चित्र रेखाटतात. गाव-खेड्यातल्या आईचं हे सार्वत्रिक चित्र ठरावं...!

घरात आईचा एकही फोटो नाही
जेव्हा जेव्हा फोटो काढायची वेळ येते
आई घरात कुठल्यातरी हरवलेल्या वस्तूच्या शोधात असते
किंवा सरपण गवत आणि पाणी आणायला गेलेली असते

फोटो ही फार साधी गोष्ट असूनही घरात तिचा फोटो मिळत नाही. तिला फोटो काढायची आवड नाहीये की तिला फोटोत कुणी घेत नाही? तर असंही काही नाही. ती सतत काम करत असते. जर फोटो काढलेच तर तिच्या कामाचेच अगणित फोटो निघतील.

जोडलेली सगळी नाती एकवेळ बदलतील; मात्र आईचं नातं कदापिही बदलत नाही. इतर नात्यांमधले माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात; पण आईच्या नात्याचं तसं नाही, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं अन्‌ ते खूप पैसे देऊनही जगाच्या बाजारातून कुणी विकत घेऊ शकत नाही. कवितेतल्या आईचा शोध घेताना अनेक कविता हाताशी आल्या. त्या सगळ्यांचा उल्लेख करणं केवळ अशक्‍य आहे. तरी का माहीत, काही कवितांना डावलून पुढं जाताच येत नाही. आता ही कविवर्य दासू वैद्य यांचीच कविता घ्या नं,
"न सांगताच आई निघून गेली म्हणून...' या नावाच्या आपल्या कवितेत ते म्हणतात ः

प्रत्येक आईचा मुलगा
कवी असूच शकत नाही
पण प्रत्येक मुलाची आई
त्याच्यासाठी एक कविता असते
न विसरणारी

आई-मुलाच्या नात्यात नेहमी प्रेम-जिव्हाळाच असतो. आईच्या मायेच्या पदराखाली जीवन सुरक्षित वाटत असतं. बालपणी एकाला दोघं, दोघाला चौघं येऊन मिळाले की कुठलेही खेळ (तुम्हाला आठवत असेल तर!) सुरू व्हायचे. मात्र, कुणी नं कुणी, कुठं नं कुठं सारखं धडपडायचं, तेव्हा कुठलीही आई फाडायची खसकन्‌ तिच्या पदराची चिंधी अन्‌ बांधायची भळभळत्या जखमेवर. तेवढ्या एका चिंधीनं जखम लिंपली जायची...आताशा असं काही झालंच तर कुठली आई फाडेल पदराची चिंधी, चिंधी फाडण्यासाठी जर पदरच नाही! एवढं दरिद्री होत गेलंय जग. पदराच्या चिंधीनं व्यवस्थित बांधली होती विश्वाच्या पेंढीची गाठ. म्हणूनच पोरक्‍या विश्वाला आई शोधली पाहिजे. तिच्याच पदराला असते चिंधी. शिवाय, विश्वाला असंख्य ठिकाणी खरचटलंय. त्या जखमाही बांधाव्या लागतील. मात्र, या पसाऱ्यात आई सापडणं अवघड. विश्व बिनचिंधीचं
भळभळतंच राहील..!

तुम्ही म्हणाल, लेखाच्या समारोपात हे काय समोर ठेवलं आहे? जर का आईशिवाय ज्या जगात पोरं जन्माला येणार असतील तर त्या जगाचा अंत निकट आहे. म्हणून काही तुम्ही तुषार कपूरला आणि करण जोहरला जाब विचारावा, असं मी म्हणणार नाही. पुढं त्यांचीच पोरं त्यांना विचारणार आहेत, आई कुठेय म्हणून?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aishwarya patekar write mother article in saptarang