कृत्रिम बुद्धिमत्ता : आव्हानं मोठी, संधीही अमर्याद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

artificial intelligence
कृत्रिम बुद्धिमत्ता : आव्हानं मोठी, संधीही अमर्याद!

कृत्रिम बुद्धिमत्ता : आव्हानं मोठी, संधीही अमर्याद!

- अजित जावकर saptrang@esakal.com

कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात कशा संधी आहेत, हे क्षेत्र कसं आहे, यातल्या करिअरसंधी आणि इथले धोके यासंदर्भात मार्गदर्शन करणारं हे सदर...

या लेखमालिकेतील पहिल्याच लेखामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय) क्षेत्रातील करिअरची निवड नेमकी कशी करायची, याबाबत चर्चा करणार आहोत. मागील अनेक दिवसांपासून मी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये हाच विषय शिकवतो आहे. याच क्षेत्रामध्ये संशोधन करणारी कंपनीदेखील मी स्थापन केली आहे. बर्लिनमध्ये काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये मुख्य ‘एआय’ अधिकारी म्हणूनदेखील मी काम करतो आहे. प्रत्यक्ष उद्योगजगत आणि या क्षेत्रात शैक्षणिक पातळीवर सुरू असलेल्या संशोधन आणि अध्यापनाशी मी थेट संबंधित आहे, त्यामुळं या क्षेत्राशी संबंधित अंतर्गत आणि जटील विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचा माझा प्रयत्न असेल. अभियांत्रिकी, विज्ञान आणि गणित या ज्ञानशाखांशी थेट संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून मी हा लेखनप्रपंच करतो आहे. याशिवाय ‘एआय’चा आधार घेऊन स्वतःच्या करिअरमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्यांसाठी किंवा या नव्या क्षेत्राकडं वळू पाहणाऱ्यांसाठीदेखील ही लेखमाला उपयुक्त ठरेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.

यातच करिअर कशासाठी?

याच विस्तृत अशा लेखमालिकेतील पहिला लेख हा एका महत्त्वाच्या प्रश्नाशी संबंधित आहे, तो म्हणजे, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील करिअरची निवड आपण का करावी ? करिअरसाठी ‘एआय’ची निवड करणं ही खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यातील आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे, या क्षेत्रामध्ये तुमची खरोखरच मेहनत घेण्याची इच्छा असेल, तर त्यातील संधीदेखील अक्षरशः अमर्याद आहेत, याच संधींचा धांडोळा घेण्यापूर्वी आपल्याला ‘एआय’चा थोडा खोलवर जाऊन विचार करावा लागेल. प्रत्यक्षात या क्षेत्राबाबत सध्या जी चर्चा होते आहे ती आणि वास्तव यांच्यात बराच फरक आहे. या क्षेत्रातील नवसंकल्पनांचा तुम्ही सद्यःस्थितीमध्ये कशापद्धतीने वापर करू शकता आणि त्याआधारे आपल्या जीवनामध्ये कसं स्थित्यंतर घडवून आणू शकता, हे पाहणं अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. ‘एआय’बाबत तुम्ही स्वतःची स्वतंत्रपणे विचार करण्याची पद्धत विकसित केली, तर तुम्हाला अनेक आर्थिक आघाड्यांवर त्यांचा वापर करता येईल. यासाठी बऱ्याच आर्थिक व्यवहारांमध्ये अगदी खोलवर जाण्याचीदेखील गरज तुम्हाला भासणार नाही. हे सगळं तुमचं काम ‘एआय’ करेल.

रोजगारातील मोठे चढ-उतार

मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ‘एआय’ कशापद्धतीनं स्थित्यंतर घडवून आणेल, या महत्त्वपूर्ण प्रश्नानं आपण या विषयाची सुरुवात करूयात. तुम्ही तुमचं पुस्तकांचं नवं दुकान वेबवर सुरू करू शकता? सैद्धांतिक अंगानं याचं उत्तर सकारात्मक असलं तरी अॅमेझॉनच्या ‘एआय’नं शिफारस केलेले अल्गोरिदम हे आता इतके पुढारले आहेत, की नव्या कंपनीला त्यांच्याशी स्पर्धा करताना अक्षरशः दमछाक होईल. कारण इथं ‘एआय’नं लोकांच्या मनावर कब्जा केला आहे. अगदी हेच गणित नोकऱ्यांच्या बाबतीतदेखील लागू होतं. रोजगारावर ‘एआय’चा मोठा परिणाम होणार आहे. सध्या निर्माण होणाऱ्या रोजगारांचा विचार केला, तर ही बाब सहजपणे तुमच्या लक्षात येऊ शकते. ‘एआय’नं उच्चकौशल्य असलेल्या रोजगाराच्या संधी वाढविल्या आहेत (उदा: डेटा सायंटिस्ट), तसंच अगदी तळाच्या रोजगारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येतं (उदा : फूड डिलिव्हरी); मात्र बरोबर मधल्या पातळीवरील रोजगारावर मात्र त्यानं आघात केल्याचं दिसून येतं. इथं मात्र कर्मचाऱ्यांची आणि वेतनाची कपात असे प्रकार दिसून येतात. हे सगळं कशामुळं झालं असेल, तर अनेक क्षेत्रांमध्ये ऑटोमेशन आल्यानं हे घडलं. काही प्रक्रिया या स्वयंचलित झाल्या आहेत, तर काही पूर्णपणे कालबाह्य झाल्यानं त्यांच्याशी संबंधित कामच संपुष्टात आलेलं दिसतं. त्यामुळंच पश्चिमेकडं रोजगाराच्या पॅटर्नमध्येही आमूलाग्र बदल झालेला दिसतो. अनेक सेवांमध्ये पूर्वी कर्मचारी ज्या कौशल्यांच्या आधारे काम करत होते, आज त्यांची आवश्यकताच राहिलेली नाही. तर, काही ठिकाणी महाराजीनामा सत्र सुरू असल्याचं दिसतं.

तांत्रिक स्थित्यंतर मोठं

इतिहासाचे अभ्यासक आणि विचारवंत युवाल हरारी यांनी उपस्थित केलेला, ‘इतिहासातील सर्वांत विषम समाजाला आपण सामोरं जात आहोत का?’ हा प्रश्न अधिक रास्त वाटतो. हे सध्या सुरू असलेलं स्थित्यंतर कदाचित भविष्यातदेखील कायम राहणार, असा विचार आपण केला, तर एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे, आपण अभूतपूर्व आणि क्रांतिकारक अशा बदलांना सामोरं जाणार आहोत. सामाजिक अर्थकारणाचा विचार केला, तर आपल्याला समाजवाद आणि भांडवलशाही अशा दोन्ही घटकांची गरज भासेल; पण सगळ्याच बाबतीत ‘एआय’ वरचढ ठरणार असेल, तर माणसांचीदेखील फारशी गरज भासणार नाही. माणसापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता ही अधिक ताकदवान ठरली, तर माणसाचं आणि मानवतेचं असणं पूर्णपणे कालबाह्य ठरण्याचा धोका बळावतो. जगप्रसिद्ध ग्रंथ असणाऱ्या ‘सुपर इंटेलिजन्स’मध्ये निक बोस्टरोम म्हणतो की, ‘हे नवं सुपरइंटेलिजन्स पृथ्वीवर माणसापेक्षाही अधिक प्रभावी ठरेल.’ याच आघाडीवर एलॉन मस्क आणि बिल गेट्स यांची मतंदेखील एकसारखीच असल्याचं आपल्याला दिसून येईल.

पृथ्वीवर माणसाव्यतिरिक्त दुसरी तितकीच बुद्धिमान प्रजात अस्तित्वात आल्यानं त्याच्या होणाऱ्या परिणामांवर आताच विचार करणं, किंवा त्याबाबत अंदाज वर्तविणंदेखील अवघड आहे. या पूर्णपणे विषम अशा जगात माणूस खूप मागं पडलेला असेल, कारण त्याचं या ग्रहावरील प्रभुत्व पूर्णपणे संपुष्टात आलेलं असेल. कदाचित म्हणूनच असेल, अनेक देशांनी ‘एआय’बाबत राष्ट्रीय धोरण आखलेलं दिसून येतं. यात प्रामुख्यानं पुढील ५० ते १०० वर्षांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या सगळ्या बदलांना आपली मुलं सामोरं जाणार आहेत. अशा स्थितीत वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो? हे सगळे बदल खूप भीतिदायक वाटत असले तरीसुद्धा तुम्ही तुमच्या करिअरला नुकतीच सुरुवात करत असाल, तर तुमच्यासमोर अनेक संधी आहेत. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आमूलाग्र असं स्थित्यंतर घडवून आणायचं, किंवा ‘एआय’मध्ये करिअर करायचं असेल, तर खरोखरच ही खूप चांगली वेळ आहे.

यामुळे अनेक प्रेरक गोष्टींची निर्मिती होऊ शकेल, त्यात प्रामुख्यानं बायोइन्फॉर्मेटिक्स, जिनोमिक्स आणि मेटाव्हर्स आदींचा समावेश होतो. या सगळ्यांचा खूप वेगानं प्रचार आणि प्रसार होतो आहे. एकीकडं माणसासमोर जागतिक हवामान बदलानं मोठी आव्हानं निर्माण केली असताना, त्यांचा आधीच वेध घेणारी यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. शैक्षणिक आघाड्यांवर काहीसे अशाच प्रकारचे बदल झाल्याचं दिसून येतं. उदाहरणच द्यायचं झालं तर वाचन, लेखन आणि अंकगणित यांच्याऐवजी आपण ‘एआय’बाबत अधिक जागरूक असणंदेखील गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवरदेखील ‘एआय’चा वापर करू शकता. फक्त तुम्हाला त्याचा थोडा खोलवर जाऊन विचार करावा लागेल. पुढील दोन, पाच, दहा, वीस आणि पन्नास वर्षांमध्ये ‘एआय’चा कशापद्धतीनं वापर होईल, हे एकदा तुम्हाला समजलं, की त्याबाबतचं नियोजन करणंदेखील अधिक सोपं होईल. या लेखमालेच्या माध्यमातून आपण याच घटकांचा अधिक सखोलपणे विचार करणार आहोत. या लेखामध्ये मी मांडलेली मतं ही वैयक्तिक असून, त्यांचा कोणतीही कंपनी, विद्यापीठ अथवा माझ्या संस्थेशीदेखील संबंध नाही.

(लेखक हे ऑक्सफर्ड विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शिकवतात. भारतामध्ये ‘एआय’बाबतचं संशोधन व्हावं म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आहे.)

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top