नवं शैक्षणिक धोरण, कौशल्य आणि मेटाव्‍हर्स! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Metaverse

या लेखात कौशल्य आणि संकल्पनांवर आधारित शिक्षण कशा प्रकारे देता येईल याची कल्पना माझ्या युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधील शिकविण्याच्या अनुभवाच्या आधारे मांडणार आहे.

नवं शैक्षणिक धोरण, कौशल्य आणि मेटाव्‍हर्स!

- अजित जावकर ajit.jaokar@conted.ox.ac.uk

या लेखात कौशल्य आणि संकल्पनांवर आधारित शिक्षण कशा प्रकारे देता येईल याची कल्पना माझ्या युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधील शिकविण्याच्या अनुभवाच्या आधारे मांडणार आहे. मी यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा मेटाव्हर्ससारखे गुंतागुंतीचे विषय शिकवताना कौशल्य आणि संकल्पनांवर आधारित विचारांचा वापर कसा करायचा, याची मांडणी करणार आहे. आम्ही मेटाव्हर्स हा विषय शिकताना या कल्पना कशा उपयोगात आणायच्या हे उदाहरणांसह स्पष्ट करणार आहे आणि त्याच्या परिणामांचा भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणावर (एईपी २०२०) कसे परिणाम होतील, याचीही चर्चा करणार आहोत. येथे चर्चा करण्यात आलेल्या संकल्पना मी प्रत्यक्ष शिकवताना अमलात आणलेल्या आहेत आणि त्यात व्यक्त केलेली मतं माझी स्वतःची आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो, की आम्ही ही संकल्पना विकसित करण्यासाठी नगरमधील न्यू आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमधील प्राध्यापिका योगिता खेडकर यांचाही या कामात सहयोग घेतला आहे व त्यांना या कल्पनांचं सादरीकरण करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डमध्येही आमंत्रित करण्यात आलं होतं.

भारताच्या शैक्षणिक धोरणामध्ये सुमारे तीस वर्षांनंतर सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण (२०२०) भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील मैलाचा दगड ठरणार आहे. या धोरणात कौशल्यवाढीवर भर देण्यात आला असून, ते आंतरशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन देणारं आहे. या धोरणात विशेषतः निर्णयक्षमता, विश्‍लेषणात्मक विचार, प्रश्‍नांची सोडवणूक आणि त्याचबरोबर कामातील लवचिकता, एकत्र काम करणं (टीमवर्क) आणि संज्ञापन (कम्युनिकेशन) या सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व ओळखून त्यावर भर देण्यात आला आहे.

अमेरिकेतही याच धर्तीवर शैक्षणिक धोरणात सुधारणा होत असून, पारंपरिक पदवीपेक्षा कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला जातो आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात हे सर्व बदल होत असताना आपण शिकवण्याच्या व शिकण्याच्या पद्धतीबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.

शिक्षणपद्धतीमध्ये ब्लूमच्या प्रख्यात त्रिकोणाच्या आधारे संज्ञानात्मक (कॉग्निटिव्ह) विचार करण्याच्या कौशल्यांचं विविध प्रकारांनी वर्गीकरण केलं जातं. बेंजामिन ब्लूम यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणतज्ज्ञांच्या एका गटाने १९५६ मध्ये ही संकल्पना मांडली होती. त्याद्वारे अत्यंत गुंतागुतींच्या कौशल्यांचं वर्गीकरण केलं जातं. या त्रिकोणाच्या मूळ व सुधारित आवृत्तीमध्ये हे वर्गीकरण एका पिरॅमिडच्या मदतीने करण्यात आलं असून, कोणीही पिरॅमिडच्या खालील बाजूला असलेल्या गोष्टीमध्ये नैपुण्य मिळवल्याशिवाय वरच्या बाजूला असलेल्या गोष्टींचा विचार करू शकणार नाही, ही या वर्गीकरणामागची मूळ संकल्पना आहे.

हा पिरॅमिड शिकणाऱ्यांना सावकाश आणि प्रयत्नपूर्वक पावलं टाकण्यास भाग पाडतो. या पिरॅमिड पद्धतीमुळे चाचणीचं प्रमाणीकरण झालं असून, कंटाळवाण्या अभ्यासक्रमामुळे विषयातील रस कमी होण्यापासून विद्यार्थ्यांची सुटकाही झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात शिकण्यात सोपेपणा आणि एकवाक्यता आवश्‍यक असताना ही कळण्यास सोपी व चित्रमय पद्धत अत्यंत उपयुक्त ठरली. मात्र, आजच्या विद्यार्थ्यांना माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध असल्याने ते ब्लूमच्या वर्गीकरणापासून दूर जाऊ शकतात. आजचे विद्यार्थी सर्जनशील आहेत, त्यामुळे शिक्षणासाठी नव्या दृष्टिकोनाची गरज होती.

ब्लूमच्या उलट्या त्रिकोणाद्वारे वर्गीकरण

आम्ही नैपुण्य आणि संकल्पना शिकण्यासाठी ब्लूमच्या उलट्या त्रिकोणाची संकल्पना मांडत आहोत. अशाप्रकारे आम्ही उलट्या ब्लमूचा उपयोग करून घोकंपट्टीऐवजी सर्जनशीलता, पृथक्करण, मूल्यमापन या शिकण्याच्या विविध मार्गांचा उपयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना देऊ करीत आहोत. अशा प्रकारे उलट्या त्रिकोणाद्वारे वर्गीकरणातून अध्यापनाची ही पर्यायी पद्धत अत्यंत मनोरंजक ठरते, कारण ती सर्जनशीलतेला शिकण्याचं दुर्मीळ साधन म्हणून पाहात नाही. खरंतर, आम्ही सर्जनशीलतेला शिक्षणाच्या केंद्रस्थानी आणलं आहे.

(वरील चित्राचा स्रोत : शेली राईल, फ्लिपिंग ब्लूम्स टेक्सोनॉमी)

ब्लूमच्या उलट्या त्रिकोणाद्वारे वर्गीकरण ही संकल्पना नवी नाही, आम्ही केवळ हे तंत्र आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मेटाव्हर्ससारख्या गुंतागुंतीच्या विषयांच्या अध्ययनासाठी वापरण्याची सूचना करीत आहोत.

मेटाव्हर्समध्ये आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत, मात्र मेटाव्हर्स ही एक परिसंस्था आहे आणि ती मेटा कंपनीच्या मागे टाकणारी आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात आपल्याला यासंबंधी मोठ्या प्रमाणात अनिश्‍चितता दिसणार असली, तरी मेटाव्हर्सचा वापर सुरू होईल आणि तो उपयुक्तही ठरेल. विशेष म्हणजे, तो मेटा कंपनीने केलेल्या कल्पनेच्याही पुढचा असेल. या लेखात आपण शिक्षणावर भर दिला असल्याने आपण उलट्या ब्लूम वर्गीकरणाच्या आधारे मेटाव्हर्समध्ये शिक्षणाचा आराखडा कसा तयार करू शकतो, यावर चर्चा करूयात.

काय फरक पडेल?

इलिन मॅकगिव्हने या हार्वर्ड विद्यापीठातील मानव संसाधन, शिक्षण आणि अध्यापन विभागातील संशोधकाने मेटाव्हर्समधील शिक्षणासंदर्भातील आकर्षक मांडणी सादर केली आहे. मेटाव्हर्समधील भन्नाट शिक्षण तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देतं. उदा. तुमच्या खोलीत बसून प्रवाळांच्या खडकांमधून पोहणं किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या बाकावर बसून चंद्रावर चालण्याचा अनुभव देणं. अशाप्रकारे एक्सआर (व्हर्च्युअल रिॲलिटी, ॲग्युमेंटेड रिॲलिटी आणि मिक्स्ड रिॲलिटी) विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकणं, त्यातील रस वाढणं आणि अधिक गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळण्यासाठीचं प्रवेशद्वार ठरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. ‘‘शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवू पाहात आहेत याची अर्धी लढाई व्हर्च्युअल रिॲलिटीमुळे जिंकली जाते, कारण ते विद्यार्थ्यांना त्या वातावरणात नेऊन सोडतं आणि त्यामुळे गोष्टी सांगण्याला मोठी चालना मिळते. त्यातून विद्यार्थ्यांना थेट भावनिक अनुभव मिळतो. तो विद्यार्थ्यांना खरोखरच त्या प्रयोगाचा अनुभव देतो आणि त्यात गुंतवून ठेवतो.’’ मेटाव्हर्समधील शिक्षणासंदर्भात मॅकगिव्हने यांचं हे विधान खरंच उद्‍बोधक ठरावं.

तर मग या स्थितीमध्ये शिक्षणाचं ध्येय ‘विद्यार्थ्या’ला ‘शिकवण्या’कडून त्याला ‘संशोधनात्मक शिक्षणाचा अनुभव’ देणं हा झाल्यास; विद्यार्थी संबंधित विषयात पुढील शिक्षण घेणं त्यांना शक्य आहे अथवा नाही, याचा अंदाज बांधू शकतील. त्यामुळे आपण शिकवण्याच्या या पद्धतीकडे कौशल्याधारित शिक्षणाला पर्याय म्हणून पाहू शकतो. ही पार्श्‍वभूमी समजल्यावर मेटाव्हर्सचा अर्थ काय निघेल? म्हणजे, आपल्या उलट्या ब्लूम वर्गीकरणाचा उपयोग मेटाव्हर्स शिकवण्यासाठी कसा होऊ शकतो?

त्याचे संभाव्य पर्याय असे -

१) एखाद्या क्षेत्रातील प्रश्‍न मांडल्यास विद्यार्थी प्रथम मेटाव्हर्समध्ये त्याची प्रतिकृती तयार करतील.

२) त्यानंतर ते त्यांच्या कामाची तुलना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आणि व्यावसायिकांनी तयार केलेल्या उदाहरणांशी करतील.

३) पुढं जाऊन विद्यार्थी आपले स्वतःचे मूल्यांकन निकष बनवतील आणि त्याची तुलना आपल्या अध्यापकांच्या निकषांशी करतील.

४) ही प्रक्रिया वारंवार घडत राहील.

अशाप्रकारे उलट्या ब्लूम पद्धतीतून आपण विद्यार्थ्यांना वास्तविक ज्ञानाकडून सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी), विश्‍लेषण, क्रिटिकल थिकिंग, विविध प्रवासांचं मूल्यमापन किंवा त्यातून शिकण्याचे मार्ग सांगू शकतो व विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात.