साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ताराबाई भवाळकर यांच्या शब्दांत दोन कमी शंभरावं मराठी साहित्य संमेलन दिल्ली मुक्कामी दणक्यात पार पडलं. हे साहित्य संमेलन आधीपासून गाजत होतं आणि पुढंही बराच काळ गाजत राहील. ते गाजवणारा नेहमीचा ऐवज होताच जसा, की साहित्याच्या मांडवात राजकारणी कशाला या सनातन प्रश्नापासून तो सुरू होतो.
मग नेत्यांनी आल्यानंतर काय बोलावं, संमेलनाच्या ठिकाणची व्यवस्था, सोयींवरून मानापमान, संमेलनात चर्चा अमक्या विषयांवर व्हायच्या ऐवजी तमक्या विषयांवर व्हायला हवी, असे नेहमीचे उसासे अशा सगळ्या रूढी यथासांग पार पडल्या, मात्र खरंतर ही संमेलनातील उपकथानकं.
खरा मुद्दा दिल्लीत मराठी माणसाचा म्हणून काही आवाज उमटवावा, त्या निमित्तानं दिल्लीत मराठीजन काही एकत्र येत नाहीत, या समजाला झटकावं हे किती साधलं हा असला पाहिजे. यात कोणाची काही मतं असू शकतात पण तारा भवाळकर यांची मांडणी मराठी बाण्याचा खणखणीत आविष्कार होती.
खुद्द पंतप्रधानांच्या उपस्थितीत आणि नंतरही या साहित्य सौदामिनीचा लखलखाट संमेलनाला तेजाळून टाकणारा होता. स्वर न चढवता आणि मर्यादाभंग न करता जे खुपतं त्यावर नेमकं बोट कसं ठेवावं याचा वस्तुपाठ ताराबाईंनी घालून दिला. बाकी वादांचं आणि राजकारणाचं गाडं चालत राहील पण हे भाषण मराठी सारस्वतांचा हुंकार म्हणून कायमचा संदर्भ बिंदू बनून राहील.
साहित्य संमेलनांकडून समाजातील विविध घटकांच्या निरनिराळ्या अपेक्षा असतात. अनेकदा त्या परस्परविरोधीही असतात. यातून त्या मांडवात काहीही घडलं किंवा नाही घडलं तरी टीकेला वाव असतो. हल्ली ज्या १९५४ च्या दिल्लीतील साहित्य संमेलनाविषयीचे उमाळे दाटून येतात, त्या संमेलनावर आणि त्याचे संमेलनाध्यक्ष असलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या भाषणावर टीकाटिपणी झालीच होती.
संमेलन हा मंच आहे तिथं सगळ्या विचारांचा जागर होण्यात गैर काहीच नाही. तो विचारांचे झेंडे घेतलेल्या एखाद्याच गटाचा फड कसा असू शकतो. तसा तो असावा अशी अपेक्षा ठेवली की मग अपेक्षाभंग आणि कोणाला व्यासपीठ मिळालं आणि कोणाला नाही हे अनाठायी मुद्दे पुढं येतात.
राजकीय नेत्यांना संमेलनात येऊ द्यावं का आणि शासकीय पैसा संमेलनासाठी घेतल्यानं मिंधेपणा येतो का, त्याचा संमेलनाच्या आयोजनावर आणि तिथल्या मांडणीवर परिणाम होतो का, हा एक चर्चेचा मुद्दा असतो. खरंतर आता राजकारणी नको म्हणायचं काही कारण उरलेलं नाही.
ज्या दुर्गाबाई भागवतांच्या अध्यक्षतेखाली आणीबाणीच्या काळात झालेल्या संमेलनातील राजकारणी नकोत यासाठीचा दाखला दिला जातो त्याचं काही औचित्य उरलेलं नाही. मराठीजनांनी असल्या स्मरणरंजनातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडावं. सरकारी पैसा आल्यानं काही दबाव येतो का, याचं उत्तर ताराबाईंचे भाषण चोख देतं.
तसंच साहित्य संमेलनात झालेल्या अनेक परिसंवादांतील अनेक वक्त्यांनी केलेली मांडणीही देते. आयोजक संस्था असलेल्या ‘सरहद’नं सुरुवातीपासूनच मंच सर्वांसाठी ही भूमिका ठेवली आणि संमेलनपूर्व कार्यक्रमांच्या धडाक्यातही हा सगळ्यांना सामावून घ्यायचा धागा जोपासला, तेव्हा शरद पवार स्वगताध्यक्ष झाले म्हणून किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्घाटनाला बोलावलं म्हणून संमेलन कोण्या एका बाजूला झुकलं असली तर्कटं फोल आहेत. मंच सर्वांसाठी ठेवताना आपल्या भूमिकेवर ठाम राहता येतं, हेही संमेलनात आयोजकांनी दाखवलं.
संमेलनातील झळाळता अध्याय आहे तो संमेलनाध्यक्ष या नात्यानं लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी केलेलं भाषण. त्यांना केवळ लोकसाहित्यापुरतं मर्यादित करणंही अन्यायकारकच. त्यांच्या भाषणातील सारा ऐवज अगदी नवा नाही.
त्यांनीच किंवा अन्य कोणी याआधीही तो मांडला आहे पण ज्या सूत्रबद्ध रीतीनं त्या व्यक्त झाल्या, ते अभिव्यक्तीचा संकोच होत असल्याची चर्चा दाटताना, वाट दाखवणारा मास्टरक्लास होता. त्यांनी सांगितलं, की जे लोकसाहित्यात आहे, ते अभिजन स्वीकारतात आणि आपलंच म्हणूनही ठसवतात पण त्याआधी दुर्लक्ष, विरोध या टप्प्यातून जावं लागतं.
उदाहरण दिलं बुद्धाचं. बुद्धाचा नववा अवतार म्हणून स्वीकार करण्यापूर्वी दुर्लक्ष, उपेक्षा, विरोध यातून जावं लागलंच होतं. नाकारलेल्या गोष्टींना त्यांचं समाजमानसातलं स्थान संपत नाही हे लक्षात आल्यानंतर अभिजन वर्ग कसा आपलंसं करतो याचं ताराबाईकृत वर्णन हलवून सोडणारं आहे. सामन्यांच्या देवता अतिशय लोकप्रिय असतात.
त्याच्या यात्रा-जत्रा भरल्या की त्या स्थानांना मोठं उत्पन्न मिळू लागतं मग उच्चवर्णीय समाज आधी त्या देवतांना हिणकस मानायचा प्रयत्न करतो, तरीही लोकप्रियता कमी होत नाही म्हटल्यावर त्यात शिरायचं, त्याच देवतेला उचलून धरायचं, ही आपलंसं करण्याची रीत त्या दाखवतात.
अभिजन मंडळी लोकसंस्कृतीमधील देवता, भाषा, चालीरिती, पोशाख, दागिनेही उचलतात, त्याला प्रतिष्ठेचं स्थान देतात हे ताराबाई अशा काळात सांगताहेत जेव्हा बहुजन नायकांना आपलंसं करण्याची लाटही जोरात आहे. सीता-राम, पार्वती-महादेव, विठ्ठल-रखुमाई यांचा जयजयकार एकत्र होतो एकेरी देवतांचा गजर अलिकडेच सुरू झाल्याचे भेदक निरीक्षण त्या नोंदवतात, तसंच बहुजन शिक्षणात आल्याने दर्जा खालावल्याच्या तक्रारीची साधार खिल्ली उडवतात.
ताराबाईंच्या भाषणातून अत्यंत संयतपणे पण नेमका निशाणा साधला. या भाषणानंतर त्यांना संमेलनाचं अध्यक्षपद मिळालंच कसं असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांच्या साहित्य साक्षरतेची यत्ता कंची असाच मुद्दा तयार होतो. ताराबाईंचं सगळं भाषण ज्याला महाराष्ट्रात सर्वसाधरणपणे पुरोगामी विचार म्हटलं जातं, अशा संकल्पनांची मांडणी, उजळणी, विस्तार करणारं आहे.
न्या. महादेव गोविंद रानडे, राजारामशास्त्री भागवत, विठ्ठल रामजी शिंदे अशांची मराठी संस्कृतीची संवादी, समावेशक मांडणी त्या पुढं नेतात. हाच महाराष्ट्राचा मुख्य प्रवाहही आहे. तो मान्य नसलेले कायमच होते आणि आहेत. हा आवाज वाढत असताना विठ्ठल, संत आणि मराठी भाषा, लोकसाहित्याचा दाखला देत ताराबाई संवादी सूर लावतात, हे महत्त्वाचं आहे.
हेही रास्त, तेही चुकीचं नाही असला मंच पाहून ताल धरणारा बनचुकेपणा त्यात नाही. भाषण गाजण्याचं हे एक कारण. म्हणून पुन्हा ज्यांचा ताराबाई, पुरोगामींना फुरोगामी म्हणणारे असा उल्लेख करतात त्यांच्याकडून प्रतिवाद झाला तर आश्चर्याचं काही नाही. भवाळकरांचे भाषण भारतीयत्वाच्या चिरंतन धाग्याचे स्मरण करणारे आहे.
भारतीय संस्कृतीमधील सर्वसमावेशकता, सहिष्णूता या गुणासंह किंवा त्यामुळेच ती टिकावू शाश्वत आणि भविष्यसन्मुख असल्याचा निर्वाळा देणारी ही मांडणी आहे. ताराबाई संस्कृतीविषयी बोलतात तेव्हा त्यांना सिद्धेश्वरशास्त्री चित्राव आणि तर्कतीर्थांसारख्या संस्कृती आणि धर्माच्या अभ्यासकांकडून मिळालेल्या शिक्षण, मार्गदर्शनाची पार्श्वभूमी असते. साहजिकच फुरोगामी शिक्का मारलेल्या कार्यकर्त्याचं प्रचारी मनोगत म्हणून त्याकडं दुर्लक्ष करता येत नाही.
संस्कृतीची वाटचाल देवाणघेवाणीतून होते, असं त्यांचं निरीक्षण. संस्कृती कुणीतरी धर्मगुरुनं किंवा एखाद्या विद्वानानं सांगितली आणि प्रसारित झाली असं होत नाही. ही जैविक प्रक्रिया आहे भाषेसारखीच, असं सांगताना माणसाच्या श्रद्धा, देवदेवता, भावभावना, संवेदना या सगळ्या देवाणघेवाणीतून माणूस घडतो, त्याला संस्कृती म्हणतो, असं त्या मांडतात तेव्हा संस्कृती शुद्धीच्या कल्पनांनी पछाडलेल्यांची आणि एकारलेल्या संस्कृती कल्पना, त्यावर आधारित सांस्कृतिक राजकारण करणारे अशा सगळ्यांची पंचाईत करणारी ही मांडणी असते.
ती एकदा मान्य केली, की माणूस मध्यावर येतो. जो लोकसाहित्याचा गाभा आहे. उत्तरेतील आर्यबहुल आणि दक्षिणेकडील द्रविडबहुल संस्कृतीच्या सीमेवरचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र हे ताराबाईंच निदान तर्कतीर्थांनी ७१ वर्षांपूर्वी महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारतातील संस्कृतीची सांधेजोड करणारा प्रदेश असल्याचं सागितलं होतं, त्याच्याशी नात सांगणारं आहे.
या दोन्हीचा अर्थ महाराष्ट्र एककल्ली नाही. धर्म, भाषा कोणत्याच बाबींत एकारलेपणा टिकत नाही. हा यातील निर्वाळा साप्रंत काळात व्यापक महाराष्ट्र धर्माचं भान नव्यानं करून देणारा आहे. त्यांच्या लोकधर्म कल्पनेतून केवळ धर्माधारित सांस्कृतिक कल्पनांची मांडणी करण्याचा प्रतिवाद ठोसपणे उभा राहतो.
निसर्गानं जगायला शिकवलं तो प्रवास आजही सुरू आहे, त्याला त्या लोकधर्म अशी संज्ञा देतात. अन्य संघटित धर्माचा कोणताही शिक्का मारला, तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चालत राहतो तो लोकधर्मच, असं त्या धर्मापलीकडं चालत आलेल्या चालीरितींचा हवाला देत सांगतात. याच क्रमात त्या धर्मांतर म्हणजे संस्कृत्यांतर नव्हे, असं आपल्या अनुभवांच्या आधारे सांगतात.
हे निरीक्षण नव्यानं वाद चर्चांना निमंत्रण देणारं आहे. १९७५ मध्ये स्त्री मुक्ती वर्ष नावाची भानगड येण्याआधी अनेक शतकं आपल्याकडं जात्यावरच्या ओव्यातूनही बायका आपल्यावरचा अन्याय, वेदना मांडत आल्याचं त्या दाखवून देतात. हे खरं असलं तरी त्या वेदनांवर उपाय आणि सुटका हे बव्हंशी आधुनिक चळवळींचं फलित आहे याकडं दुर्लक्ष कसं करता येईल.
आपण सारे निरनिराळ्या बोली बोलतो. या बोलींचं संमेलन म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन, असं सांगताना भवाळकर एरवी प्रमाणभाषेच्या प्रभावात वळचणीला असलेल्या बोलींचं महत्त्व अधोरेखित करतात. त्याचं संपूर्ण भाषण लोकभाषा, लोकसंस्कृती, त्यातलं संचित, त्यातील शहाणीव, औपचारिक शिक्षण नसलेल्यांच्या साहित्यातून दिसणारं आधुनिक म्हणावं असं शुद्ध भान यावर सविस्तर भाष्य करणारं आहे.
उदार संस्कृतीचं प्रतीक म्हणून त्या विठ्ठलाकडं बोट दाखवतात. भाषा बोलली तर जिवंत राहते, केवळ पुस्तके - ग्रंथांतून ती टिकत नाही आणि मराठी टिकवण्याचं काम संतांनी केल्याचं तसं करताना शिवाजी महाराजांचं स्वराज्य साकारण्यासाठीची भूमी तयार करण्यात संत साहित्याचा वाटा असल्याचा न्या. रानडेंचा निष्कर्ष त्या अधोरेखित करतात.
संस्कृत देवापासून आली, मग मराठी काय चोरापासून झाली, असा एकनाथांचा सवाल त्या मांडतात. याच व्यासपीठावर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मराठी संस्कृतमधून आल्याचं सांगत होते. तर संमेलनाच्या मांडवातच नंतरच्या काही परिसंवादात त्याचाही जोरदार प्रतिवाद झाला.
कोणाच्या धारणा काहीही असू शकतात मात्र त्या मुक्तपणे मांडता आल्या पाहिजेत, हेच तर संमेलनाचं काम असेल, तर ते इथं चोखपणे बजावलं गेलं.साहित्य संमेलनं हवीतच कशाला किवा त्यांचं फलित काय असं विचारणाऱ्यांना ताराबाईंनी भाषा संस्कृतीविषयी केलेली मूलभूत मांडणी, उपस्थित केलेले प्रश्न, त्यांच्या भाषणातून निर्माण होणारे प्रश्न हे खणखणीत उत्तर आहे. त्यावर मतमतांतरं असू शकतात. तेही विचारकलहास का घाबरता, असं विचारणाऱ्या आगरकरांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात बरंच घडतं म्हणायचं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.