लोभसवाणा अंधार...

अक्षय इंडीकर akshayindikar1@gmail.com
Sunday, 24 January 2021

मोन्ताज
नट, दिग्दर्शक, संगीतकार अशा अनेक मोलाच्या जबाबदाऱ्या पार पाडत चार्ली चॅप्लिन यांनी उभ्या केलेल्या चित्रकृती सिनेमामाध्यमाच्या वैश्विकतेची साक्ष देतात. एखादा माणूस किती परिणामकारकरीत्या आपलं म्हणणं मांडून ते समाजमनापर्यंत पोहोचवतो आणि काळाच्या ओघात पुरून उरू शकतो याची मनोमन साक्ष या चित्रकृती देत राहतात.

नट, दिग्दर्शक, संगीतकार अशा अनेक मोलाच्या जबाबदाऱ्या पार पाडत चार्ली चॅप्लिन यांनी उभ्या केलेल्या चित्रकृती सिनेमामाध्यमाच्या वैश्विकतेची साक्ष देतात. एखादा माणूस किती परिणामकारकरीत्या आपलं म्हणणं मांडून ते समाजमनापर्यंत पोहोचवतो आणि काळाच्या ओघात पुरून उरू शकतो याची मनोमन साक्ष या चित्रकृती देत राहतात. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या चार्ली चॅप्लिन यांचं बालपण खूप कष्टात, हालअपेष्टा सहन करण्यात गेलं आणि त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्धही अत्यंत वादळी आणि अनेक वाद-विवादांनी भरलेला होता. दिग्दर्शक म्हणजे जर एक समग्र अनुभव उभा करून तो प्रेक्षकांना खरा वाटायला लावणारा माणूस असेल, तर मी म्हणेन की सिनेमाच्या इतिहासात चार्ली चॅप्लिन यांच्याएवढा मोठा दिग्दर्शक झाला नाही. अतिशय साध्या, रोजच्या आयुष्यातल्या घटनांनी भरलेल्या कथा...‘सिटी लाईट्स’, ‘द कीड’, ‘मॉडर्न टाइम्स’, ‘द सर्कस’, ‘द ग्रेट डिक्टेटर’ अशा एकाहून एक अद्भुत सिनेमांची निर्मिती करणारा हा अवलिया कलावंत ‘सिनेमातली स्पेस’ या गोष्टीला वैश्विक जाणिवेनं भिडत असे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कलावंताची अमरता’ याच परिभाषेत बोलायचं झाल्यास आणि आपण अमर व्हावं हा उद्देश मनात बाळगून कलावंत काम करत असतील तर चार्ली चॅप्लिन अमर होऊन गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कॅमेऱ्यासमोर सुरू असलेलं आयुष्य काही दिग्दर्शक जसं आहे तसं घडू देतात. चार्ली चॅप्लिन ते आयुष्य उलगडून दाखवतात. स्थिर दृष्टिकोनातून एका अर्थानं प्रोसिनियमच्या रचनेशी साम्यर्ध साधत जाणारी कॅमेऱ्याची मांडणी, एकाच कोनातून कॅमेरा जरी समोरच्या अवकाशाला भिडत असला तरी त्यात अनेक पातळ्या तयार करण्याची हातोटी चॅप्लिन यांनी व्यवस्थित ओळखली होती. समोर चाललेलं दृश्य अनेक पातळ्यांवर उलगडत (अनफोल्ड या अर्थानं) जाऊन प्रेक्षकाला अर्थबोध करून देणं आणि तो अनुभव अधिकाधिक समृद्ध कसा होत जाईल याचं भान त्यांच्यातला दिग्दर्शक कायम ठेवत असे.

सप्तरंगमधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

‘द किड’ या चित्रपटाच्या सुरुवातीला येणारा एक अतिशय छोटासा प्रसंग वानगीदाखल. हा प्रसंग त्यांच्यातल्या दिग्दर्शकाची उंची दाखवतो. एक सीन आहे...एक बाई आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सोडून निघून जाणार आहे...तिच्या समोर असलेल्या अडचणी, अनेक विवंचना आणि त्यातून वाट्याला आलेलं एकटेपण...त्यातून तिला ते बाळ सोडून द्यायचं आहे. त्याचा एकच शॉट आहे. शॉट म्हणजे कॅमेरा सुरू होऊन बंद होईपर्यंत जो काळ बद्ध-बंदिस्त केला जातो तो. त्या बाईचा तिथं एक लाँग शॉट आहे. त्यात ती एका बागेत बाळाला घेऊन बसली आहे. मागं कारंजं उडतं आहे, पाण्याचे तुषार त्या बाईच्या पार्श्वभूमीवर उडत ठेवणं आणि त्या बाईच्या मागं एक न संपणारा रस्ता दाखवणं हे तिच्या मानत चाललेली घालमेल, तिचं एकटेपण, निर्णय घेताना तिची होणारी कुचंबणा हे सगळं, त्या अवघ्या काही सेकंद पडद्यावर येऊन जाणाऱ्या शॉटमधून चॅप्लिन अशा काही कुशलतेनं मांडतात, जे अनेक निबंध लिहूनसुद्धा मांडलं जाऊ शकत नाही. अशी एकटेपणाची भावना सहज उभी राहते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी एक महान दिग्दर्शक म्हणजे ॲलेक्झेंडर डोव्हजनको. रशियन चित्रपटांविषयी बोलताना आयझेन्स्टिन यांच्याबद्दल नेहमी लिहिलं-बोललं जातं; पण डोव्हजनको हा प्रतिभावान दिग्दर्शक नेहमीच दुर्लक्षित राहतो. त्यांनी त्यांच्या सिनेमातून काळ आणि अवकाश तेवढ्याच ताकदीनं पडद्यावर आणला आणि त्यातून रशियन माणसाच्या सुख-दुःखाची कथा-व्यथा अतिशय सशक्तपणे उभी केली. 

माणसांचे चेहरे, हलणारं गवत, ग्रामीण भागात सर्वदूर पसरलेला निसर्ग यांचं चित्रण करताना त्यांनी त्यांचा कॅमेरा स्थिर ठेवून समोरचं दृश्य प्रेक्षकाच्या नजरेसमोर उलगडत नेलं आहे. ‘अर्थ’ (Earth) हा त्यांचा फार ताकदीचा सिनेमा त्यांच्यातल्या महान दिग्दर्शकाची साक्ष देण्यास पुरेसा आहे. सूर्यफुलांच्या शेतांच्या पार्श्वभूमीवर राबणारं शेतकरी-कष्टकरी आयुष्य या सिनेमात दिसून येतं. आताच्या युक्रेनमध्ये, म्हणजे तेव्हाच्या रशियात, जन्मलेल्या या दिग्दर्शकाचा हा सिनेमा आजवरच्या सर्वोत्कृष्ट सायलेंट सिनेमांपैकी एक मानला जातो. जगभरातले सिनेअभ्यासक त्याचा उल्लेख अग्रक्रमानं करतात.

सिनेमातला अवकाश (स्पेस इन सिनेमा ) प्रत्येक जण आपापल्या मगदुरानं भरत जात असतो. हिचकॉक म्हणतात त्यानुसार, सिनेमा म्हणजे एक पांढरा चौकोन असतो, तो तुम्हाला तुमच्या कल्पेननं भरायचा असतो. ती कल्पना केवढी, तिचा विस्तार केवढा? तर जेवढा तुमचा अनुभव, जीवनानुभव, आयुष्याकडे, माणसांकडे, राजकीय-सामाजिक प्रवाहांकडे बघण्याचा अनुभव असेल तेवढाच त्याचा विस्तार.  रंग-रूप-रेषा-टेक्श्चर हे जसे चित्रकाराचे प्रांत, तसेच सिनेमात अवकाशनिर्मितीत मोलाची भूमिका बजावणारे घटक म्हणजे लेन्स, फ्रेमिंग, मॅग्निफिकेशन, डिस्टन्स इत्यादी इत्यादी. 

‘सिनेमा म्हणजे पांढरा  चौकोन असतो’ असं म्हणणारे हिचकॉक हे आपल्या मातीतल्या, आपल्या भाषेतल्या एका महान कलावंतांशी नातं सांगतात असं मला वाटतं. त्यांचं नाव प्रभाकर बरवे. ‘कोरा कॅनव्हास’ हे बरवे यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. कोऱ्या कॅनव्हासवर चित्रकार चित्र रेखाटतो, तर सिनेमा तयार करणारा दिग्दर्शक आपल्या समोरच्या पडदारूपी कॅनव्हासवर शॉट निर्माण करतो.  

‘मला सूर दिसतात. माझ्या समोर असलेल्या अमूर्त अवकाशात मी सूर बघत असतो,’ असं कुमार गंधर्व म्हणायचे. सिनेमात अगदी याउलट प्रक्रिया करायची असते. आपल्यासमोर असलेलं मूर्त अवकाश एका लयीत, नकळतपणे, अमूर्त, शब्दातीत अनुभवात रूपांतरित करायचं असतं. आंद्रेई तार्कोव्स्की, क्रिस्तोफ किस्लॉव्हस्की, मणी कौल, सर्गेई परायानोव्ह यांच्यासारखे दिग्दर्शक या मूर्त-अमूर्ताच्या खेळात लीलया संचार करतात. त्यांनी निर्माण केलेलं कल्पित जग ते सहजपणे खरं वाटायला लावतात. त्या जगात ते आपल्याला बोट धरून नेतात आणि कधी जोराचा धक्का देऊन त्या लोभसवाण्या अंधारात ते आपल्याला सोडून देतात कळतही नाही.

(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Indikar Writes about charlie chaplin