सिनेमातला ‘चेकॉव्ह’ 

तुर्कस्तानी सिनेदिग्दर्शक नूरी बिलगे जेला
तुर्कस्तानी सिनेदिग्दर्शक नूरी बिलगे जेला

विराट रूपडं. त्रिकाल व्यापून उरणारं. दोन शतकांच्या संधिकालावर अस्तित्वात आलेली सिनेमा नावाची जादू जगात विद्युत्‌वेगानं पसरली. तुर्कस्तानही त्याला अपवाद नव्हता. तुर्कस्तान हा प्रजासत्ताक देश. दोन खंडांमध्ये पसरलेला. युरोपचा काही भाग, तर आशियाचा काही भाग. केवळ भौगोलिक अर्थानंच नव्हे तर, सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय, तसंच पेहराव, खानपान यातसुद्धा दोन संस्कृतींच्या संकराची झलक दिसते. 

दोन संस्कृतींचा संकर होतो तेव्हा किंवा दोन संस्कृती एकमेकींच्या समोर ठाकतात तेव्हा संघर्षाच्या ठिणग्या पडणं स्वाभाविक असतं आणि त्याच वेळी या संघर्षाच्या घुसळणीतून काही देदीप्यमान कलाकृती निर्माण होणंही स्वाभाविकच. त्याचीच फलश्रुती नूरी बिलगे जेला या जगद्विख्यात दिग्दर्शकाच्या रूपात जगासमोर आहे. नूरी यांच्या सिनेमाविषयी बोलण्यापूर्वी तुर्की सिनेमाच्या जडणघडणीविषयी थोडंसं...

ल्युमिए बंधूंच्या ‘द अरायव्हल ऑफ द ट्रेन’चा पहिला प्रवास तुर्की भूमीतच सन १८९६ मध्ये झाला. ओटमान राजवटीत. त्याच वेळी मानकीन ब्रदर्स यांच्याही चित्रपटाचा पहिला खेळ तुर्की लोकांसमोरच सादर झाला. जगाला स्तिमित करणारी ही जादू तुर्की जगण्यात स्थिरावायला वेळ लागला नाही. सेडात सिमवी यांचा ‘द स्पाय’ हा सिनेमा सन १९१७ मध्ये प्रदर्शित झालेला पहिला कथनचित्रपट होता. तिथपासून सुरू झालेला हा प्रवास अनेक अर्थांनी विकसित होत राहिला आणि यिलमाझ गुनै, येशीम उत्साग्लू , झेकी डेमिर्क्यूब्झ, सिमियाँग क्रिपलांगल्यू यांच्यापर्यंत जाऊन स्थिरावला. जागतिक सिनेमाचं भांडार समृद्ध करण्याचं भाग्य लाभलेले हे कलावंत आपापल्या शैलीनुसार, आपापल्या जीवनधारणांनुसार जगलेलं वास्तव चित्रचौकटीत बद्ध-बंदिस्त करण्याचा प्रयत्न कलात्मकतेनं करत राहिले व अखिल मानव जातीच्या सिनेमासंस्कृतीला जगण्याचं नवं भान देत राहिले. त्याच साखळीतलं एक ताकदीचं आणि माझ्या आवडीचं नाव म्हणजे नूरी बिलगे जेला. तुर्की सिनेमात ‘न्यू वेव्ह’ घेऊन आलेला हा कलावंत. 

नूरी यांच्या कलात्मक धारणेमुळे त्यांच्या देशात त्यांचा फारसा सन्मान न होता विदेशात झाला व नंतर ते जगभरातल्या सिनेरसिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झाले. तुर्कस्तानातल्या सर्वाधिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मात्र त्यांच्या पहिल्या सिनेमाला - ‘कस्बा’ला -  स्थान दिलं गेलं नव्हतं. कारण काय तर, या सिनेमाला ‘डॉक्युमेंट्री’ म्हणावं की ‘फिक्शन फिल्म’ म्हणावं हे कळत नव्हतं. आणि म्हणून तो वगळण्यात आला होता.

शेवटी, तो सरकारी फिल्म फेस्टिव्हल होता. त्यानं नूरी यांचा सिनेमा नाकारला. मात्र, बघता बघता नूरी यांचे सिनेमे जगभर गाजू लागले आणि शेवटी तुर्की सरकारलाही त्यांच्या सिनेमाची दखल घेणं अपरिहार्य होऊन बसलं.

मुद्दा हा की, डॉक्युमेंट्री आहे की फिक्शन फिल्म आहे या विभागणीत नूरी यांचा सिनेमा बसवता येत नाही. त्याला फक्त ‘सिनेमा’ एवढंच नाव आहे. सिनेमा हा सिनेमाच्या भाषेतून व्यक्त करणारा हा दिग्दर्शक. समीक्षकांच्या सोईसाठी कोणत्या कप्प्यात कोणतं साहित्य टाकावं हे न कळल्यामुळे काही कादंबऱ्या जशा आपल्याकडच्या साहित्यात कायमच उपेक्षित राहतात, तशीच उपेक्षा नूरी यांच्या वाट्याला सुरुवातीला आली. नूरी यांच्या सिनेमावर जगभरातील अनेक महत्त्वाच्या सिनेमाकर्त्यांचा प्रभाव दिसून येतो. सत्यजित राय यांच्या ‘अपू-त्रयी’चाही प्रभाव त्यांच्या सुरुवातीच्या सिनेमांवर ठळकपणे दिसून येतो. आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या साध्या माणसांच्या गोष्टी, रोजच्या जगण्यातले साधे साधे प्रसंग, वास्तवाची  कलात्मक फेररचना, कॅमेऱ्याला कधीच सामोरी न गेलेली, म्हणजेच एका अर्थानं, दुसरं कोणतं पात्र वठवायचं ओझं मनावर - पर्यायानं चेहऱ्यावर - नसलेली माणसं, स्वतःच्याच घरात-गावात-वस्तीत-आजोळच्या घरात केलेलं चित्रीकरण...या सगळ्यामुळे येणारा व्यक्तिगतपणाचा बाज-साज त्यांचे सिनेमे अजरामर करत गेला. युरोप-आशियातल्या सिनेमाचा इतिहास स्वतःत पुरेपूर मुरवून-भिनवून घेऊन निर्माण केलेल्या स्वतःच्या स्वायत्त सिनेभाषेमुळे नूरी यांचे सिनेमे अत्युच्च पातळी गाठतात. 

गाव, स्थलांतर, मानवी नाती, स्त्री-पुरुष संबंध, अपराधगंड, कलात्मक झगडा, बालपणाच्या दबून राहिलेल्या भावना ही सगळी आशयसूत्रं कवेत घेत नूरी हे जगण्याचे अनेक पदर ठाय लयीत, एखाद्या कवितेसारखे प्रेक्षकांपुढं सादर करत नेतात. वानगीदाखल सांगायचं तर, त्यांच्या ‘क्लायमेट’ या सिनेमाची सुरुवात पाहता येईल. नवरा-बायकोच्या विलग होण्याची गोष्ट. सिनेमाचं नाव ‘क्लायमेट’ आहे.

नावातूनच सुरू होतं ते वेगवेगळ्या ऋतूंचं दर्शन. सुरुवात रखरखीत उन्हानं. शेवट थंड बर्फानं. निसर्गाला माणसाच्या नात्यात हस्तक्षेप करण्याची मुभा असण्याचं एक कल्पित जग हा कलावंत उभं करतो आणि त्याच जगात वास्तवाचं कधी लोभसवाणं, तर कधी भीतिदायक रूप प्रेक्षकापुढं मांडत नेतो. स्त्री-पुरुषसंबंधांचा वेध नूरी अतिशय सखोलतेनं घेत जातात. जणू काही ते समोरच्या पात्रांविषयीचं भाष्य करत नसून विवाहसंस्था या अव्याहत चालत आलेल्या गोष्टीचेच अनेक पदर उलगडून सादर करत आहेत असं सिनेमा बघताना वाटत राहतं. इतका हा वेध सखोल-सर्वांगीण असतो.

नूरी यांचा हा सिनेमा पाहताना जगप्रसिद्ध स्वीडिश दिग्दर्शक इंगमर बर्गमन यांच्या ‘सीन्स फ्रॉम मॅरेज’चीही आठवण येते. ठाय लयीतल्या एडिटिंगनं त्यांच्या सिनेमाला एखाद्या सिम्फनीचा कलात्मक दर्जा प्राप्त होतो. ‘कस्बा’, ‘थ्री मंकीज्’, ‘ऊझाक’  इत्यादी अजरामर कलाकृती तयार करणाऱ्या या कलावंताला भेटण्याची संधी मला एकदा मिळाली होती. ‘त्रिज्या’ या माझ्या सिनेमाच्या वर्ल्ड प्रीमिअरच्या निमित्तानं शांघायमध्ये आमची भेट झाली. जवळपास दोन तास चाललेल्या त्यांच्या मास्टरक्लासच्या सुरुवातीलाच मी त्यांना एक प्रश्न विचारला व तो म्हणजे : ‘तुमच्या सगळ्या सिनेमांपैकी तुमचा सर्वात आवडता सिनेमा कोणता?’ त्यावर त्यांचं उत्तर होतं : ‘एकदा तयार झाल्यानंतर माझा कोणताच सिनेमा मी पुन्हा बघत नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही.’ 

मी अर्थातच पुढचा प्रश्न विचारला नाही. मला माझं उत्तर मिळालं होतं व ते म्हणजे, एखादी कलाकृती निर्माण केल्यावर कलाकार ओझ्यातून जसा मुक्त होत असतो, तसाच तो त्याच वेळी स्वतःच्या अनेक काळ्या, अज्ञात, अपरिचित बाजूही त्या कलाकृतीत ओतत असतो. मग कलाकार त्या अंधाऱ्या, भुयारी तळघरात परत गेल्यास बाहेर येण्याची शक्यता विरळच. 

मी सिनेमादिग्दर्शक असल्यानं अभ्यास म्हणून कधी कधी रात्री-अपरात्री सहज नूरी यांच्या सिनेमांतला एखादा सीन पाहत बसत असतो... आणि बघता बघता त्या तुर्कस्तानी बर्फात कधी स्वतःला झोकून देणं होतं कळतही नाही.  चेकॉव्हच्या एखाद्या अद्भुत उंची गाठणाऱ्या कथेनं जसा आंतर्बाह्य तळ ढवळून गेल्याची भावना होते, तसंच काहीसं नूरी बिलगे जेला यांच्या सिनेमानं माझं होतं.

(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com