शांततेचं थाई गाणं  

दिग्दर्शक आपिचतपोंग वीरसेथकूल
दिग्दर्शक आपिचतपोंग वीरसेथकूल

‘आपिचतपोंग वीरसेथकूल’ अशा भल्या मोठ्या नावाचा एक शिडशिडीत, तरुण थाई फिल्ममेकर जगातल्या नव्या जाणिवेच्या दिग्दर्शकांना कायमच आदर्श वाटत आला आहे. एवढं मोठं नाव लोकांना उच्चारायला अवघड जातं म्हणून त्यांनी ‘जो’ हे टोपणनाव धारण केलं आहे. थाई कुटुंबात जन्मलेल्या जो यांचं बालपण एका गावात गेलं. आई-वडील डॉक्टर, लहानपणापासून त्यानं आई-वडिलांकडे येणारी माणसं पहिली. कोणत्याही कलेचा केंद्रबिंदू माणूस असतो आणि माणूस ही आशयवस्तू त्यांच्या नजरेस बालपणापासूनच पडत होती. वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक स्तरातली माणसं लहानपणापासून त्यांच्या आजूबाजूला होती. त्यांच्या निरीक्षणातून जे हाताला येईल त्यातून सिनेमासारखं काही करता येईल का असं जो यांच्या मनात कायमच येत असे. नंतर ते आर्किटेक्चर शिकले. आजूबाजूची माणसं, त्यांची सुख-दुःखं बघण्याची जो यांची पद्धत थाई सिनेमाच्या परंपरेच्या चौकटीत न बसणारी आहे. एका मुलाखतीत जो यांनी त्यांची सिनेमाविषयक भूमिका विशद केली आहे. त्यात ते म्हणतात : ‘सिनेमा एक समृद्ध दृश्यानुभव उभा करतो, सिनेमा हा माझ्यासाठी कायमच स्मृतीच्या (आठवणींच्या) जवळ नेणारं माध्यम आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आठवता तेव्हा त्या गोष्टीला सिनेमाचं रूप येतं.’ त्यांनी अशीच आपल्या लहानपणी आई-वडिलांसोबत बघितलेली माणसं आपल्या सिनेमांमधून मांडायचा यशस्वी प्रयत्न केला. ‘मी माझ्या अतिशय जवळच्या नातेवाइकांसाठी सिनेमा करतो, त्यांना तो आवडला तर जगातील प्रत्येक माणसाला आवडू शकतो. फक्त त्यासाठीची पूर्वअट हीच की, तुम्ही त्या सिनेमाच्या काळाला अतिशय शांततेनं सामोरं गेलं पाहिजे,’ अशी जो यांची सिनेमाविषयक धारणा अशी आहे.

सिनेमात जेव्हा एखादा सिनेकर्ता एखादी कलाकृती करत असतो, त्या वेळी त्याच्या सर्व नैतिक मूल्यांच्या एकत्रीकरणातून तो एक जग तयार करत असतो, त्याच वेळी त्याची समोरच्या प्रेक्षकाडून एक साधी अपेक्षा असते की, त्यानं त्या कलाकृतीला थोडंसं संयमानं, कोणताही पूर्वग्रहदूषित भाव न ठेवता सामोरं जावं. बाजारीकरणाच्या दुनियेत सिनेमाला अतिशय जलद, जंक फूडचं इन्स्टंट स्वरूप येत असताना जो यांच्यासारखे दिग्दर्शक बुद्धाच्या ठायी असणाऱ्या शांत लयीनं एखाद्या डोहासारखं काम करता. त्या कामाला तेवढ्याच शांतपणे सामोरं गेलं पाहिजे, ही प्रेक्षक म्हणून आपलीही जबाबदारी असते.

जो यांच्या सिनेमाचा प्रामुख्यानं विषय राहिलेला आहे तो म्हणजे थाई सांस्कृतिक स्मृती. ‘सांस्कृतिक स्मृती’ असं म्हणताना तिची व्याख्याव्याप्ती अतिशय सविस्तरपणे वर्णावी लागते. त्या अवकाशात त्या देशाचं साहित्य, त्या देशाच्या सिनेमाविषयक विविध प्रभावांचा अंतर्भाव, वेगवगेळ्या धारणांचं लोकसंगीत, इतर संस्कृतींमधून पाझरत आलेलं नव्या जाणिवेचं संगीत, बदलती दृश्यभाषा अशा सगळ्याचा अंतर्भाव होतो.

आठवणी एकरेषीय कधीच नसतात. गतकाळातील एकच गोष्ट आठवली असं कधी होत नाही. एकाच गोष्टीला जोडून सलग असंख्य गोष्टी त्या प्रवाहात आपल्या समोर येऊन उभ्या राहतात. तो प्रवाह एका विशिष्ट, सूत्रबद्ध लयीत मांडल्यावर त्याची कलाकृती तयार होते. जो यांचा अतिशय गाजलेला सिनेमा ‘अंकल बूंमी हू कॅन रिकॉल पास्ट.’  यात एक माणूस त्याचं पूर्वायुष्य आठवतोय. या सिनेमाचं एक स्वतंत्र जग आहे, त्या जगात मेलेल्या बायकोचं भूत आणि अजस्र, केसाळ माकडाच्या रूपात त्या माणसाचा मुलगा सहज येऊन टेबलावर जेवण करत बसतात. गप्पा मारतात. वेगळं काही घडत नाही. भूत आलं वगैरे असाही आविर्भाव नाही. दचकून चित्र-विचित्र अंगविक्षेप करून माणसं विनोद करत नाहीत, तर भूतकाळात जमा झालेली माणसं त्यांच्यासोबत जेवण करताना सुख-दुःखाविषयी चर्चा करतात. प्रथमदर्शनी आपल्याला, आपण अशी भुताखेतांची काहीतरी कथा बघतोय यानं दचकायला होतं; पण तो तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. थायलंडच्या सांस्कृतिक पर्यावरणात ‘हॉरर स्टोरी’ अशा प्रकारच्या अनेक समृद्ध दंतकथा, मिथ्यकथा आहेत. ती सगळी मिथकं रोजच्या जगण्याचा भाग मानता येतील एवढी खरी आहेत. कारण, ती मिथकं जरी काल्पनिक असली ती त्यांतून प्रस्थापित होणारा अर्थ हा अनेक अर्थांनी रोजच्या जगण्यात आपल्याला सहजपणे लागू होताना दिसतो. जसं आपल्या भवतालात ‘कथासरित्सागर’ किंवा ‘इसापनीती’मधल्या गोष्टी या फक्त त्या प्राण्यांच्या किंवा काल्पनिक न राहता त्या मूलभूत मानवी वृती रेखांकित करतात, त्याचप्रमाणे जो यांच्या सिनेमाच्या अंतर्गत रचनेत सहजपणे अनेक माध्यमंसुद्धा येतात. कधी फोटोग्राफी, तर कधी पडद्यावर थेट काढलेली चित्रं. अनेक माध्यमांचा वापर करून सिनेमाची एकरेषीय कथा सांगणं हा त्यांच्या सिनेमाचा प्रमुख स्थायीभाव! मूळचा आर्किटेक्ट असलेला हा दिग्दर्शक त्याच्या सिनेमाची रचना करताना, एखादी इमारत जशी शून्य अवकाशातून उभी केली जाते, तशा पद्धतीनं काळाची रचना करत नेतो, ज्या जगात त्याचे स्वतःचे नियम सुरू होतात, ज्यांना कोणत्याही गोष्टींचं बंधन नाही.

जो यांच्या अनेक छोट्या छोट्या कलाकृती वेगवेगळ्या चित्रपटमहोत्सवांत सादर होत असतात आणि जगभरचे, चांगला आशयघन सिनेमा आवडणारे रसिक त्यांच्या सिनेमाची आवर्जून वाट बघत असतात. जगप्रसिद्ध होऊनसुद्धा आजही एका छोट्या गावात राहून अतिशय छोट्या छोट्या लांबीच्या प्रायोगिक फिल्म ते आवर्जून करत राहतात. रोजचं दैनंदिन आयुष्य डिजिटल कॅमेऱ्याच्या साह्यानं बद्ध-बंदिस्त करून ठेवतात आणि त्यातून नवा आकार बांधू पाहतात. जणू सिनेमाच्या रूपातून लिहिलेली डायरीच!

त्यांच्या एका सिनेमात काही लोक मिळून एका अंधाऱ्या गुहेतून प्रवास करत आहेत. खूप दूरवर त्या अंधाऱ्या गुहेतून अतिशय शांतपणे ती माणसं चालत काहीतरी शोधत जात आहेत. शेवटी काही काळानं प्रकाशाची एक तिरीप त्यांच्या नजरेस पडते आणि क्षणभर, काहीतरी शब्दांत न सांगता येण्यासारखं, बघितल्याची भावना तयार होते. त्यासाठी त्या अंधाऱ्या गुहेतून चालत जाऊन तो प्रवास करावा लागेल ही पूर्वअट पार पाडावी लागते. 
आजकाल फक्त विचित्र अंगविक्षेप करून, पापणी मिटण्याआत सिनेमाचा शॉट कट व्हावा अशा गदारोळात जो यांचे सिनेमे रुद्रवीणेवर मध्यरात्री वाजवलेल्या धृपदासारखे आहेत.

(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com