दृश्यकविता लिहिणारा दिग्दर्शक

तैवानी दिग्दर्शक हौ हासिओ हसीएन
तैवानी दिग्दर्शक हौ हासिओ हसीएन

‘कलात्मक उंची’ या गोष्टीची कोणत्याही निकषांच्या आधारावर मोजमाप करण्याची पद्धत अस्तित्वात नाही; किंबहुना या संकल्पनेची एकच एक अशी सार्वत्रिक व्याख्या असूच शकत नाही. थिएटरमध्ये किंवा आताच्या जमान्यात सिनेमा अतिशय व्यक्तिगत पातळीवर ग्रहण केला जात असताना सिनेमाची सापेक्षता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक दिग्दर्शक आयुष्यभर काही आशयसूत्रांनी, काही कथांनी, काही नटांच्या अभिव्यक्तीनं, त्यांच्या भूसांस्कृतिक पर्यावरणानं इतके झपाटले गेलेले असतात की त्यांच्या देशांचा, त्यांच्या संस्कृतीच्या आधुनिक जडणघडणीचा इतिहास पाहायचा झाला तर त्याचं रूप सहजपणे दिसतं. चांगल्या फिल्ममेकरच्या सिनेमातूनसुद्धा त्या देशाची ‘देश’ म्हणून झालेली जडणघडण, लोकांच्या जीवनधारणा, पेहराव, खानपान यांचा प्रत्यय येतो. सिनेमा करणारा त्याच्या त्याच्या क्षमतेनं त्या कलाकृतीत अर्थ ओतत जातो, बघणारा त्याच्या त्याच्या क्षमतेनं, ती समोर आलेली कलाकृती पाहत असतो, तिचा अन्वय उलगडत असतो. 

तैवान हा असाच एक देश. चीनच्या जवळचा. एकीकडे जपान, तर एकीकडे फिलिपिन्स. अस्सल आशियाई जाणीव जपणारा. अमेरिकेच्या अक्राळविक्राळ जागतिक धोरणांसमोर स्वतःचं वेगळं अस्तित्व जपण्याची पराकोटीची धडपड करणारा. इथल्या भवतालात सिनेमा करणारी अनेक दिग्दर्शकमंडळी आहेत. एडवर्ड यंग आणि हौ हासिओ हसीएन ही त्यांपैकी आघाडीची नावं. 

आजच्या या लेखात हौ हासिओ हसीएन यांच्याबद्दल... 
‘फिल्म कमेंट’ या जागतिक दर्जाच्या मासिकानं एक सर्वेक्षण केलं होतं, त्यात ‘१९९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ असा गौरव हौ हासिओ हसीएन यांचा करण्यात आला होता. ‘एका दशकाचं प्रतिनिधित्व करणारा दिग्दर्शक’ अशी जागतिक स्तरावर ओळख असणारा दिग्दर्शक आपल्या कामानं जगभर पोहोचला. मातृभाषेत सिनेमा करणारा, भांडवली व्यवस्थेत वाहवत जाऊन ‘चार घटका विरंगुळा’ या सूत्राच्या मायाजालात न अडकता जे दिसलं, जे पाहिलं, जे अनुभवलं ते जग पडद्यावर मांडायची बांधिलकी जपणारा ते कलावंत असण्याचं खरं रूप मिरवणारा...असा एवढा मोठा पैस असणाऱ्या या महान कलावंताचा जन्म १९४७ चा. 

हौ हासिओ हसीएन यांची ओळख त्यांच्या सिनेमांच्या सौंदर्यशास्त्रीय रचनेत तर आहेच. याशिवाय, आपल्या देशाचा इतिहास सिनेमातल्या एखाद्या पात्राच्या आधारानं किंवा त्या व्यक्तिरेखांच्या ओघात येणाऱ्या आजूबाजूच्या रचनेतून गतकाळाच्या वैभवासह दृश्यांकित करणारा दिग्दर्शक अशीही आहे. ‘द पपेटमास्टर’ या सिनेमातून एका स्थानिक कलावंताच्या सबंध पिढीची गोष्ट उलगडताना कलावंत आणि राजकीय व्यवस्था यांच्यातील आंतरिक संघर्ष त्यांनी मांडला आहे. 

हौ हासिओ हसीएन यांच्या सर्व सिनेमांवर नजर फिरवल्यावर सिनेमाच्या भाषेत आढळणारे अनेक मुद्दे समोर येतात. उदाहरणार्थ : एका विशिष्ट अंतरावरून समोर घडत असणारी घटना पाहणं...ढोबळ अर्थानं एक गोष्ट सांगण्यापेक्षा शब्दातीत वातावरण तयार करणं...दोन पात्रांच्या संवादांच्या प्रसंगात अतिशय कमी वेळा कॅमेऱ्याचा हस्तक्षेप करणं. एकाच अक्षावरून ठाय लयीत चित्रचौकटीत अनेक पातळ्यांवर दृश्य घडवत आणि उलगडत नेत एका वेगळ्या विश्वाचा प्रवास हा दिग्दर्शक प्रेक्षकाला घडवून आणतो. त्यांच्या सिनेमाची जातकुळी थोर जपानी दिग्दर्शक ओझू यांच्याशी मिळती-जुळती. ओझू यांचा त्यांच्यावरील प्रभाव त्यांनी वेळोवेळी मान्यही केलेला आहे. 

एखाद्या गायकाच्या घराण्यात जसा बुजुर्ग गायकाच्या सुरांच्या आठवणींचा साज असतो तशीच काहीशी रचना हौ हासिओ हसीएन यांच्या सिनेमात असते, त्यानं ओझू यांच्या सिनेमाची आठवण प्रकर्षानं येते. ओझू यांचे सिनेमे जिथं चित्रित झाले, त्या टोकियो शहरातच हौ हासिओ हसीएन यांचा ‘कॅफे ल्युमिए’ हा सिनेमा चित्रित करण्यात आला आहे. तो करत असताना माणसांबरोबरच त्यांनी त्या शहराचीसुद्धा कथा प्रेक्षकांपुढं उलगडली आहे. एखाद्या खूप मोठ्या शहरात अव्याहतपणे वाहत जाणाऱ्या, एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत प्रवास करत जाणाऱ्या रेल्वेचं रूपक त्यांच्या सिनेमात सातत्यानं येत राहतं. त्यांच्या सिनेमातलं अजून एक सूत्र म्हणजे, सशक्त स्त्री-व्यक्तिरेखा. आधुनिक जगण्याला स्वतंत्रपणे सामोऱ्या जाणाऱ्या स्त्री-व्यक्तिरेखा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

आत्मज्ञान झालेल्या एखाद्या साक्षात्कारी सिद्धपुरुषात विश्वात्मक ज्ञान, करुणा यांच्याबरोबरच एक सापेक्षभाव जसा आढळतो, तसा हौ हासिओ हसीएन यांच्या सिनेमात एक तटस्थ आध्यात्मिक भाव आढळतो. आध्यात्मिक म्हणजे  आत्मिक उंची या अर्थानं, आपल्याकडे रूढार्थानं वापरल्या जाणाऱ्या धार्मिक या अर्थान नव्हे. सर्व जगाकडे समदृष्टीनं बघण्याची हातोटी त्या सिनेमांमध्ये आढळते,  झेन तत्त्वज्ञानाच्या जवळ जाणारी. घटित वास्तवाचा, काळाचा आणि विशाल पटावर घडणाऱ्या घटनांचा साक्षीदार होणं, त्यातले अनेक क्षण जगणं हा एक पदर आणि ते जगलेले अनुभव अभिव्यक्त करणं हा दुसरा पदर. 

तैवानमधलं दैनंदिन आयुष्य, त्यातील अनेक पिढ्यांची गोष्ट, बदलत गेलेले नातेसंबंध, बदलती कुटुंबव्यवस्था, बदलत्या आर्थिक धोरणांतून हळूहळू आकारत गेलेली नवी जीवनव्यवस्था या सगळ्यांचा वेध हौ हासिओ हसीएन घेताना दिसतात. जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा एखादा पॅनोरॅमिक कॅमेरा लावण्यापेक्षा मायक्रो लेन्स लावून सूक्ष्मपणे होत जाणारा बदल टिपणं असा असतो. हे ब्रीद बाळगून त्यांनी असे जवळपास १८ सिनेमे केले. त्यांचा आत्मचरित्रात्मक सिनेमा पाहायचा तर ‘टाइम टू लिव्ह अँड टाइम टू डाय’पासून सुरुवात करायला हरकत नाही. हरवून गेलेला भूतकाळ आणि समोर उभा ठाकलेला भविष्यकाळ यांना सामोरं जाताना ते एका कुमारवयीन पात्राची गोष्ट किंवा अनुभवमालिका सांगत जातात आणि पाहणाऱ्याला आपल्यासमोरचं रोजचं जगणं बघत असल्याचा भास होता होता काही क्षणांतच, जे बघत आहोत त्याला खूप वेगवगेळ्या पातळ्यांवर तत्त्वचिंतनात्मक बैठक आहे, याची जाणीव होत जाते. आम्ही ‘सिनेमा लॅब’ नावाचा एक उपक्रम राबवत असतो, त्यात मी विद्यार्थ्यांना एक प्रश्न नेहमी विचारतो व तो म्हणजे, ‘गणित आणि कविता यांच्या नेमका काय फरक आहे?’ या प्रश्नाला भिडताना मला प्रत्येक वेळी हौ हासिओ हसीएन यांच्या सिनेमांची आठवण येते. त्यांचे सिनेमे म्हणजे दृश्यकविता आहेत. 

स्थलांतर हे कधी ऐच्छिक असतं, तर कधी लादलेलं. मानवी जगण्यात नव्या शक्यता, नव्या आकांक्षा शोधण्याची धडपड करताना स्थलांतर अपरिहार्य होऊन बसतं. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फक्त माणसंच जातात असं नाही. माणसांबरोबरच त्यांची स्वप्नं, त्यांचा इतिहास, त्यांची मुळं, त्यांच्या जगण्याची रीत असं सगळंच स्थलांतरित होत जातं. समाज-अभ्यासक हे स्थलांतर या कृतीकडे आकड्यांच्या स्वरूपात, आर्थिक परिणती म्हणून बघतात, तर हौ हासिओ हसीएन हे स्थलांतरानंतरच्या जगण्याची शोकात्म कविता करतात. मात्र, ही सिनेकविता फक्त वरवरची भावुक, सुलभीकरण करणारी, बटबटीत यमकांची न होता वैश्विक होत जाऊन तुम्हा-आम्हाला सहज आपलीशी वाटते आणि ती आपल्यासोबत कायम निनादत राहते. 
(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com