जपानी जगणं

जपानी दिग्दर्शिका नाओमी कावासे
जपानी दिग्दर्शिका नाओमी कावासे

शहरीकरणाच्या उग्रगंधी धुळीत मातीपासून दूर जात चाललेलं जपान... जपानचा सिनेमा अगदी साठच्या दशकापासूनच वेगवेगळी वळणं घेत आपली स्वायत्त ओळख जपत आला आहे. हॉलिवूडच्या भयंकर मोठ्या मार्केटिंग क्लृप्तींच्या त्या ओझ्यापुढं न झुकता स्वतःच्या भाषेत सिनेमे करणारे अनेक जपानी दिग्दर्शक आजही जगभरातल्या सिनेचाहत्यांना सहजपणे आठवतात. जपानी माणूस, त्याचा भवताल, त्याचं जगणं मांडण्याचा प्रयास तर अनेक दिग्दर्शक करतात; पण त्याच्या पलीकडे जात तेशीगारा यांच्यासारखे दिग्दर्शक त्यांचा सिनेमा स्थळ-काळापुरता, जपानपुरता मर्यादित ठेवत नाहीत. सार्वकालिक सत्य, चिरंतन मानवी मूल्ये, स्त्री-पुरुषांमधला आदिम झगडा, पृथ्वीवर माणूस स्वतःला कायमच उपरा का समजतो वगैरे प्रश्नांची उकल ते सिनेमांतून करत राहिले. त्याच सर्व पुरुष-दिग्दर्शकांच्या मांदियाळीत एक नाव जगभरातील प्रेक्षकांना सातत्यानं पाहायला मिळत आहे व ते म्हणजे नाओमी कावासे. जपानच्या बाहेर जपानी सिनेमाची ओळख नाओमी यांच्यासारखी कलावंत आपल्या खास अशा दिग्दर्शकीय शैलीतून करून देतेय. 

मातृभाषेत सिनेमा करताना सर्वात पहिला मुद्दा म्हणजे, जगाकडे जाणारी वाट केवळ आणि केवळ स्वतःच्याच मार्गानं जाते हा विश्वास असायला हवा. जग समजून घेणं म्हणजे स्वतःला समजून घेणं. स्वतःचा भवताल, स्वतःतले वयानुरूप होत जाणारे बदल समजून घेणं व त्यानुरूप जगण्याचा दृष्टिकोन विकसित करत नेणं. नाओमी यांची चित्रसंवेदना तरुणपणातच विकसित झालेली आढळते. ‘सुजूकू’ हा त्यांचा पहिलाच सिनेमा त्यांची दिग्दर्शकीय उंची किती आहे त्याची चुणूक दाखवून देतो. 

नाओमी यांचा प्रत्येक सिनेमा हा कुणाचा तरी किंवा कशाचा तरी शोध- अव्याहतपणे चाललेला शोध - आहे. हा शोध जपानी खेड्यात घडत राहतो. निसर्गानं समृद्ध असलेली, जंगलांनी, वाहत्या नद्यांनी वेढलेली खेडी हा नाओमी यांच्या सिनेमाचा भवताल. जवळच्या; पण काही कारणानं दूर गेलेल्या नातेवाइकांचा शोध ही प्रमुख थीम त्यांच्या सर्व सिनेमांतून वाहताना दिसते. माणसांचं एकमेकांपासून दूर जाणं... कधी मृत्यूमुळे, तर कधी स्थलांतरामुळे.  

नाओमी यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचं एकमेकांपासून वेगळं होणंं या घटनेचा नाओमी यांच्या उर्वरित आयुष्यातील मानसिक जडणघडणीवर खूप परिणाम झाला. त्यांच्या आई-वडिलांचं दूरत्व या ना त्या प्रकारे नाओमी यांच्या सिनेमातून पुनःपुन्हा डोकावत राहताना दिसतं. नारा नावाच्या जपानी खेड्यात नाओमी यांचं बालपण गेलं.  

एका स्त्रीनातलगानं (आत्या किंवा मावशी) त्यांचा बालपणी सांभाळ केला. साहजिकच, लहानपणापासून आजूबाजूला स्त्रियांचं एक विश्व बघायला मिळालं असणार आणि स्वतः स्त्री असल्यानं स्त्रीच्या दुःखांची अस्सल जाणीव त्यांना असणार. नाओमी यांच्या चित्रपटांतील स्त्रीव्यक्तिरेखा अतिशय कंगोरे असलेल्या असतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडघडण पाहत असताना त्या पडद्यावर अतिशय ठामपणे आणि कणखरपणे उभ्या राहताना दिसतात. रोजच्या आयुष्यातील दुःखांची बहुरंगी किनार या व्यक्तिरेखांच्या जगण्याला वेढून टाकत असली तरी मानवी नात्यांतील ओलावा नाओमी यांच्या सिनेमांत कायम राहताना दिसतो. त्यांच्या सिनेमांतील माणसं रोजच्या दुःखांनी पिचलेली आहेत. कधी कधी हे दुःख बाह्य परिस्थितीनं ओढवलेलं आहे, तर काही वेळा त्या दुःखाच्या तऱ्हेची व्याख्या करता येणंसुद्धा कठीण व्हावं इतकं ते दुःख आंतरिक आहे. समाजाविषयी, माणसांविषयी सहानुभूती वाटणं हा एक भाग आणि ते दुःख पडद्यावर  मांडणं हा दुसरा भाग. नाओमी यांचा कॅमेरा कधीच भावुक होण्याच्या वाटेनं जात नाही. 

स्वतःकडे कॅमेरा फिरवून दैनंदिन जगण्याचा सेल्फी काढून, स्वतःची ‘आजी’ काही दिवस चित्रित करून ‘आजी’ ही व्यक्तिरेरखा समर्थपणे उभी करत, तो सिनेमा बघणाऱ्या प्रत्येकाला त्या व्यक्तीच्या जवळ नेण्याची किमया नाओमी अतिशय सहजपणे साधतात.  

नाओमी यांनी करिअरच्या सुरुवातीला काही काळ फोटोग्राफी केली. लहानपणापासून त्यांच्या आजूबाजूला जो निसर्ग होता तो निसर्ग कॅमेराबद्ध करण्याची किमया साधता येतेय का याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, काही काळातच त्यांना  फोटोग्राफीपेक्षा सिनेमा अधिक जवळचा वाटू लागला. 

जपानी खेड्यांत निसर्ग हा अनेक पातळ्यांवर समोरचं दृश्य अर्थपूर्णरीत्या देखणं करत राहतो. आपल्याकडे चांगल्या सिनेमॅटोग्राफीची व्याख्या म्हणजे, निसर्गाचं पोस्टरसारखं दिसणारं रूप किंवा अतिशय निरर्थक, अस्थानी असलेल्या ड्रोन कॅमेऱ्यानं घेतलेल्या शॉट्सचा भडिमार! पण नाओमी यांच्या सिनेमात निसर्ग येतो; पण तोही परिस्थितीनुरूप. केवळ दोन सीनच्या जोडणीचा सांधा म्हणून किंवा लोकेशनबदल करायचा आहे म्हणून निसर्गाचा एक, सूर्यास्ताचा एक शॉट असे बाळबोध सिनेमात लावले जातात तसे निसर्गाचे शॉट नाओमी यांच्या सिनेमात कधीच येत नाहीत. त्यांच्या सिनेमांमधल्या पात्रांच्या आंतरिक जडणघडणीवर निसर्ग विविध तऱ्हांनी प्रभाव पाडत असतो. सुरुवातीला त्यांच्या सिनेमात त्यांनी आजीचं चित्रण तीन सिनेमांमधून केलं आहे. त्यांना सिनेमा म्हणण्यापेक्षा त्या ‘जगण्याच्या नोंदी करणाऱ्या फिल्म’ होत्या. अर्ध्या तासाच्या वगैरे. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्यांना ‘कान चित्रपट महोत्सवा’तला अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा ‘कॅमेरा द ओर’ हा पुरस्कार मिळाला. अनेक टीकाकार त्यांच्या सिनेमाला ‘खूप व्यक्तिनिष्ठ जाणिवेचा सिनेमा’ असंही म्हणतात; पण त्यावर त्यांचं म्हणणं असं की, ‘जग समजून घेण्याचा सगळ्यात चांगला मार्ग स्वतःला समजून घेणं हाच आहे.’ 

आपल्याकडे सिनेमामधून काहीतरी संदेश देणं अपेक्षित असतं. अशा सामाजिक ओझ्याखाली कलेचं कलापण हरवून बसलेले सिनेमे एका प्राथमिक अर्थानं संदेश देऊ करतात; पण संदेश एकदा आकलनात आला की त्या कलाकृतीच्या क्लासिक असण्याच्या दर्जाविषयी काहीतरी उणीव निर्माण व्हायला सुरुवात होते. 

नाओमी यांच्या सिनेमाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे सिनेमे कधीच कोणतीच शिकवणूक द्यायला जात नाहीत. ते फक्त तटस्थपणे माणसांच्या जगण्याची स्थिर चित्रं मांडतात. समाज व्यक्तीव्यक्तींनी तयार झालेला असतो, एक कुटुंब हा समाजरचनेचं प्रतिनिधित्व करणारा घटक असतो. नाओमी यांच्या सिनेमात कुटुंबाचं चित्रण असतं, म्हणजेच पर्यायानं समाजाचं चित्रीकरण असतं. ‘हानेझू’, ‘स्टील द वॉटर’, ‘स्वीट बिन’ यांसारख्या त्यांच्या अजरामर कलाकृती एकदा तरी मोठ्या पडद्यावर अनुभवाव्यात अशाच आहेत.

(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com