व्रतस्थ दिग्दर्शक

1) फिलोपिनो दिग्दर्शक लॅव दियाज. 2) लॅव दियाज यांच्या ‘द एंड ऑफ हिस्ट्री’ या सिनेमाचं पोस्टर.
1) फिलोपिनो दिग्दर्शक लॅव दियाज. 2) लॅव दियाज यांच्या ‘द एंड ऑफ हिस्ट्री’ या सिनेमाचं पोस्टर.

ल्युमिएबंधूंच्या सिनेमॅटोग्राफ या तंत्राच्या साह्यानं जगात एक क्रांतिसदृश वातावरण तयार झालं. वास्तव चित्रित करण्याची हातोटी माणसानं आत्मसात केली. त्याचा विकास आणि प्रसार जगभरात खूप वेगानं आणि झपाट्यानं झाला. जगभरातल्या अनेक देशांत कलावंत मंडळी आपल्या कथांची, आपल्या विचारांची देवाणघेवाण करणारं सिनेमारूपी दस्तावेजीकरण करू लागले. सन १८९० च्या जवळपास ऑगस्ट आणि लुई या ल्युमिएबंधूंनी तयार केलेलं सिनेमॅटोग्राफ हे यंत्र फिल्म प्रोजेक्ट्रर आणि फिल्म प्रिंट अशा दोन्ही स्वरूपांत काम करत होतं. सिनेमॅटोग्राफ हा शब्द एका ग्रीक शब्दावरून आला, त्याचा शब्दश: अर्थ ‘गतीचं लिखाण.’  

मानवी जीवनातली काळ ही संकल्पना बद्ध-बंदिस्त करण्याच्या वेगवेगळ्या हालचाली पडद्यावर लिहिण्याची किमया म्हणजेच गतीचं लिखाण. पॅरिसच्या अंधारात अगदी ५० सेकंदांच्या छोट्या छोट्या फिल्म म्हणजे कारखान्यातून कामगार बाहेर येतात वगैरे अशा...त्या फिल्ममधून सिनेमाच्या जादूची सुरुवात झाली. ती जादू झपाट्यानं पसरली. मनीला या  फिलिपिन्समधल्या शहरातसुद्धा. दाटीवाटीच्या लोकसंख्येत मनीलामध्ये ल्युमिएबंधूंची ही जादू एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला पोहोचली आणि त्यानंतर त्या देशात सिनेमा करणारे अतिशय दर्जेदार चित्रपट दिग्दर्शक तयार झाले. पॅसिफिक समुद्राच्या पूर्वेला वसलेला फिलिपिन्स हा तसा चिमुकला देश. या देशाला राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक इतिहासही परंपरेला साजेसा.

फिलिपिन्समधला सिनेमा तसा सुरुवातीला आदर्शवादी विचारांनी, राष्ट्रप्रेम-देशभक्ती अशा भावनांनी भरलेला होता. त्यांतल्या पात्रांची आणि कथानकाची रचना त्या पद्धतीनं केली गेली होती; जेणेकरून राष्ट्रीय अजेंडा देशभर खूप वेगानं पसरायला मदत व्हावी. सन १९४० च्या दरम्यान फिलिपिन्समध्ये सिनेमात युद्ध आणि तत्कालीन वास्तव ही आशयसूत्रं  डोकावायला सुरुवात झाली. कोणत्याही देशाचा सिनेमा हे त्या त्या काळाचं अपत्य असतं. त्या त्या काळातल्या लोकांच्या जाणिवांचं-नेणिवांचं, आदर्शाचं रूप सिनेमातून जसजसं मांडलं गेलं, जसजशी देशाची सामाजिक-राजकीय परिस्थिती बदलत गेली त्यानुसार सिनेमातल्या आशयानंसुद्धा वेगळं वळण घ्यायला सुरुवात केली. माणसाच्या संस्कृतीत कायदे, परंपरा, विचारसरणी, श्रद्धा, रीती-रिवाज, समाजधारणा या सगळ्यांचा समावेश असतो. या सगळ्या गोष्टी सिनेमा सहजतेनं आपल्याशा करत समृद्ध होत जातो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिलिपिन्सचा सिनेमासुद्धा याच परंपरेचं आणि आधुनिकतेचं भान राखत सिनेमाचा आशय आणि सिनेमाची भाषा अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय सघन, अतिशय समृद्ध असं काम करत राहिला आणि इराणी सिनेमाप्रमाणेच जगाला आपल्या लोकसंस्कृतीतून जन्मलेल्या सिनेमारूपी कलेची त्यानं दखल घ्यायला लावली. फिलिपिन्सच्या सिनेमाच्या इतिहासात अतिशय लख्खपणे समोर येणारं एक नाव म्हणजे लॅव दियाझ. ता. ३० डिसेंबर १९५८ रोजी जन्मलेला हा प्रतिभावान कलावंत जागतिक सिनेमच्या इतिहासात आपला ठसा ठळकपणे उमटवत आहे.   सिनेमामाध्यम युरोपकेंद्री झालं, वसाहतवादी दृष्टिकोनातून सिनेमाकडे पाहायची सवय प्रेक्षकांना लागली. 

सिनेमाचा काळ, त्याची लांबी किती असावी याची गणितं मल्टिप्लेक्स-संस्कृतीनंतर तर अजूनच बदलायला लागली. एकाच दिवशी एकाच थिएटरमध्ये चित्रपटाचे अनेक शो व्हावेत म्हणून सिनेमाची लांबी अतिशय कमी कमी होत गेली. 

आयुष्याचा विस्तीर्ण पट मांडण्याची परंपरा काहीशी मागं पडत जाऊन काहीतरी चमकदार, क्लृप्तियुक्त असं झटपट सादर करण्याची किंवा सामाजिक आशय सांगण्याच्या नादात काहीतरी बटबटीत सादरीकरण करून ढोबळ सामाजिक दरी दाखवणाऱ्या शॉर्ट फिल्मचा जमाना आला. याच सगळ्या इन्स्टंट बाजारात, झगमगाटात अतिशय शांत, ठाय लयीत अतिशय संयतपणे एखाद्या, सलग दोन तास चालणाऱ्या धृपद रागदारीसारखं काहीतरी सिनेमात करणारा माणूस म्हणजे लॅव दियाज. 

तिघांपैकी कुणी तरी एक माणूस कुठला तरी गुन्हा करतो अन् तिघांचं आयुष्य बदलतं...एवढ्या एकाच ओळीची गोष्ट. साडेचार तासांचा सिनेमा. द एंड ऑफ हिस्ट्री.  जागतिक वाङ्मयात अजरामर स्थान असलेल्या दोस्तोव्हस्कीच्या ‘क्राईम अँड पनिशमेंट’ या कादंबरीवर आधारित संरचना. सिनेमामाध्यमाची खरी ताकद हा सिनेमा आपल्याला दाखवून देतो. सिनेमा किंवा जगातली कुठलीही कला असेल, ही त्या त्या माध्यमातूनच अतिशय निखळ स्वरूपात व्यक्त करता येते, म्हणजे एखादं चित्र ते पाहिल्यावरच पूर्ण होतं; मग भलेही त्या चित्राचं कितीही पानांत वर्णन करा किंवा त्याची  महती सांगा, तसंच रागदारी संगीतातल्या एखाद्या रागाचंही. अगदी असंच लॅव दियाज यांच्या सिनेमाचंही! त्यांचे सिनेमे तुम्हाला अनुभवावे लागतात. दियाज हे त्यांच्या सिनेमातून एक जग आपल्यासमोर उभं करतात. त्या विश्वात अंधार असतो. आशा असते. निराशा असते. स्वप्नांनी भरलेलं मानवी जग असतं...त्याबरोबर त्या देशाचा इतिहास आणि वर्तमान आपल्यासमोर उलगडत जातो. 

गरिबीत जीवन व्यतीत करणाऱ्या, साध्या माणसांचे नैतिक-अनैतिक पेच दियाज हे ठाय लयीत एखाद्या दृश्य काव्याप्रमाणे उभे करतात. एकेक सिनेमा करायला जवळपास अकरा-अकरा वर्षं घेऊन फिलिफिन्सचा सबंध इतिहास उलगडून सादर करण्याचा ध्यास घेतलेला दियाज यांचा सिनेमा प्रथमदर्शनी अतिशय संथ आणि काहीच न घडणारा वाटू शकतो; पण तीच त्याची ताकद आहे. कुणीतरी म्हटल्यानुसार,‘आयुष्यातले देदीप्यमान बदल अतिशय हळुवारपणे घडतात...’ त्याप्रमाणेच दियाज यांच्यासारखा महान कलावंत त्याच्या सिनेमातून पात्रांच्या जीवनाचा वेध घेता घेता वैश्विक मानवी संघर्ष आपल्यासमोर उभा करतो.

एका मुलाखतीत दियाज म्हणतात : ‘सिनेमा म्हणजे मानवी संघर्षाचा आरसा आहे. माणसाच्या आंतरिक विश्वात तुम्ही एकदा प्रवेश केलात की तुम्हाला त्या साम्राज्यातून बाहेर येणं अतिशय कठीण होऊन जातं.’ 

आपला देश, देशाची सुख-दुःखं, देशातला आंतरिक संघर्ष चित्रित करण्याचा वसा घेतलेले दियाज हे अतिशय सहजपणे अमेरिकेत-युरोपात जाऊन सिनेमे करू शकतात; पण त्यांनी निवडलेला मार्ग आहे तो म्हणजे, आपल्या मातृभाषेत सिनेमा करणं आणि आपल्या भोवतालचं जग सिनेमामाध्यमातून मांडत राहणं. ते  म्हणतात : ‘‘माझ्यासाठी फिलिपिन्स, फिलिफिनो माणसाचं दुःख, त्याची स्वप्नं हे सगळ्यात मोठं जग आहे. ते जग मी सोडून जाऊ शकत नाही. सिनेमा करणं म्हणजे एक नैतिक जबाबदारी स्वतःवर घेतल्यासारखं आहे. त्या जबाबदारीचं भान राखत मी माझ्या मातृभाषेत सिनेमा करणं पसंत करतो आणि हेच सिनेमे माझ्या मातृभाषेतूनच जगभर पोहोचण्याची आकांक्षा बाळगतात.’’ एवढं आत्मविश्वासपूर्ण मत सिनेमाच्या भाषेवरच्या हुकमतीची साक्ष देतं. 

दियाज यांच्या एका सिनेमातलं पात्र फोनवर बोलत असताना एक वाक्य म्हणतं : ‘मी सिनेमासाठी सिनेमा करतोय; कुणासमोर काही सिद्ध करण्यासाठी नव्हे.’ याच सूत्रानुसार ‘द एंड ऑफ हिस्ट्री’, ‘द वर्ल्ड बिफोर हर’, ‘फ्रॉम व्हॉट इज बिफोर,’ असे सात-आठ तास लांबीचे सिनेमे ते - प्रसिद्धीपासून दूर राहून - फिलिपिन्ससारख्या चिमुकल्या बेटावर व्रतस्थपणे करत आहेत...आणि जागतिक सिनेमा समृद्ध करत आहेत. आशिया खंडातल्या सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवा’ला उपस्थित राहण्याचा योग मला माझ्या एका सिनेमानिमित्त आला होता. त्या वेळी दियाज यांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल अशी आशा बाळगून मी त्यांची वाट पाहत होतो; पण नंतर समजलं की, दियाज हे फिल्म फेस्टिव्हलमध्येसुद्धा फारच कमी वेळा येतात. सिनेमातून संवाद साधल्यावर, अजून काय बाकी उरतं, ही भावना त्यामागं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कलावंत कलेतून संवाद साधतो. बाकीचे सोपस्कार तसे कमी महत्त्वाचे...

(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com