कालातीत सिनेमा

अक्षय इंडीकर akshayindikar1@gmail.com
Sunday, 3 January 2021

मोन्ताज
मोन्ताज या फ्रेंच शब्दाचा अर्थ एडिटिंग!  सिनेमा या कलेसंदर्भात तो अनेक अर्थांनी चपखल ठरतो.  संकलित करणं, काळाचे-स्थळाचे अनेक तुकडे एकत्रित करणं अशाही त्याच्या अर्थच्छटा सांगता येतील. सिनेमाविषयीचं हे सदर म्हणजेही एक प्रकारचा ‘मोन्ताज’च...

सिनेमा हे माध्यम उण्यापुऱ्या काही वर्षांचं! इतर कलांच्या तुलनेत त्याचा उगम, विकास, व्याप्ती, त्याचं अतिभव्य स्वरूप नजरेसमोर स्पष्टपणे उभं राहतं. कुणी याला कला म्हणतं, तर कुणी म्हणतं धंदा! मानवी जगण्याचा सर्वांगानं वेध घेणारं हे माध्यम अतिशय ताकदीनं त्याच्या उगमापासूनच जगभर पसरायला सुरुवात झाली. आरंभी काही दृश्यांच्या हालचालींपासून सुरू झालेला ‘फिल्म’ या शब्दाचा प्रवास एका सर्वांगसुंदर कलेत बघता बघता रूपांतरित झाला. अगदी नेमकं सांगायचं तर, एकोणिसाव्या शतकापासून माणसाला चित्रं हलती करत नेण्याची ओढ लागली होती.

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फोटोकेमिकल प्रक्रियेनं फिल्म स्टॉक (थोडक्यात, रिळं), सेल्युलॉईड यांवर समोरचं दृश्य बंदिस्त/बद्ध करून, फिल्म-प्रोजेक्टरच्या साह्यानं ते पडद्यावर प्रक्षेपित करणं हे सगळं आज जरी आपण सहजपणे पाहत असलो तरी सिनेमाच्या आरंभी ही नवलाई स्तिमित करणारी होती. आज जसं पारंपरिक चित्र विविध कौशल्यांचा वापर करून हलतं करण्याची किमया माणसानं साधली, तशीच काही तंत्रांचा वापर करून पडद्यावर हलती चित्रं माणूस रेखाटू लागला. सावल्यांचा खेळ,  तसंच मध्य आशियात सर्रास सादर केल्या जाणाऱ्या पडद्यामागच्या सावल्यांच्या हलत्या बाहुल्या, कॅमेरा ऑब्स्क्युरा ही होती सिनेमाची आदिम रूपं. जादू तीच; फक्त खेळ नवा. गतिमानतेचं दैवी वरदान लाभलेला. 

एखादी गोष्ट तिच्या सर्व सामर्थ्यानिशी बंदिस्त करण्याची, बद्ध करण्याची देणगी माणूस कसा आत्मसात करत होता याची जी गोष्ट, तीच सिनेमा या कलेच्या निर्मितीच्या प्रेरणेची गोष्ट होत जाते. सुरुवातीला फक्त दृश्यांची असणारी ही गंमत हळूहळू भाषेत रूपांतरित होत गेली आणि भाषा नावाची मानवी जगण्यात सगळ्यात सेंद्रिय संबंध असलेली गोष्ट सिनेमा नावाच्या जादूनं बघता बघता आत्मसात केली. त्यातून ‘सिनेमाची भाषा’ नावाची एक जादूई गोष्ट आकाराला आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिनेमाची भाषा कशासाठी? तर गोष्ट सांगण्यासाठी, अनुभव सांगण्यासाठी, काहीतरी काळाच्याही पलीकडे जाऊनसुद्धा टिकून राहावं यासाठी. एखादा रस्ता, एखादं शहर, एखादं गाव, एखाद्या गावाचा कारखाना असं काहीही कायमस्वरूपी बद्ध करून ठेवण्याच्या प्रेरणेतून सिनेमा नावाच्या गोष्टीचा जन्म झाला.

सिनेमॅटोग्राफ नावाच्या तंत्रानं बद्ध केली जाणारी गोष्ट हळूहळू ‘सिनेमा’ म्हणून ओळखली जाऊ लागली. बघता बघता सिनेमा अवघ्या मानवजातीला व्यापून उरला. त्याचा व्यवसाय झाला, त्याची कला झाली, सिनेमाची मांडणी, त्यातला काळ, त्याचा आशय, त्याच्यात चित्रित झालेली स्थळं यांतून एक नवं जग साकारता येतं याची जाणीव चित्रकर्त्यांना झाली आणि त्यातून काही अपूर्व अशा चित्रलेण्या जन्माला आल्या. 

‘सिनेमा’ किंवा ‘मूव्ही’ किंवा ‘फिल्म’ या कलेनं माणसाचं जगणं समृद्ध केलं आणि शेकडो देशांतलं बहुसांस्कृतिक जगणं, तिथली राजकीय-सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक परिस्थिती भाषेची, काळाची, प्रादेशिकतेची बंधनं ओलांडून कायमची जतन करून ठेवली गेली. 

सिनेमाचं काम हे,  कोणत्याही साहित्यप्रकाराचे जे काम असतं, तसंच असतं. उदाहरणार्थ : मानवी जगणं दस्तऐवजाच्या रूपात मांडणं, माणसाच्या धारणा, त्याची संस्कृती, त्याच्या चाली-रीती, त्याच्या श्रद्धा, त्या श्रद्धांना होत असलेला विरोध हे सर्व जगभरचे जुने-नवे फिल्ममेकर आपापल्या कामातून करत गेले. विसावं शतक हे मानवी जगणं बेचिराख करून, अस्तित्व हादरवून टाकण्याऱ्या दोन महायुद्धांनी व्यापलेलं होतं. भवतालच्या कोणत्याही घटनेचा जसा जीवसृष्टीवर परिणाम होतो तसाच मानवी जगण्यावरही होतो. माणसाच्या मूलभूत प्रेरणेतली एक प्रेरणा म्हणजे काहीतरी शेअर करणं...अनुभव, गोष्ट, संगीत, चित्र, नृत्य, शिल्प असं काहीही...

तर माणसाच्या ही जी ‘अनुभव इतरांबरोबर वाटून घेऊन त्याला सार्वत्रिक स्वरूप देण्याची प्रेरणा’ आहे ती सिनेमानं आपलीशी केली आणि जगभरात वेगवगेळ्या देशांत त्यांच्या त्यांच्या भाषेत सिनेमे तयार होऊ लागले. सिनेमाचा उगम आणि त्याचा प्राथमिक टप्प्यातला विकास हा युरोपकेंद्री आहे; पण तो जगातल्या प्रत्येक देशानं आपलासा केला, आपल्या संस्कृतीत स्थान दिलं आणि तो प्रवाही ठेवण्याचं काम जगातल्या प्रत्येक खंडातल्या देशानं केलं. आता तर सिनेमा आपल्या जगण्याचा एवढा अविभाज्य भाग बनून गेला आहे की अगदी गावात-खेड्यात जाणाऱ्या एसटी बसपासून ते दूरदेशी झेपावणारी विमानं प्रवाशांना सिनेमा दाखवत इकडून तिकडे घेऊन जात असतात.

आपण एक सिनेमा बघतो म्हणजे काय करतो, तर थिएटरमधल्या अंधारात (आता घरातल्या अंधारात) तो ठरावीक काळ विकत घेतो, म्हणजे सिनेमा आपल्याला काळात अनुभवावा लागतो. ही काळात बांधलेली कला आहे, त्याच्याच अगदी उलट चित्रकला ही स्थळात बांधलेली कला आहे.  सिनेमासंदर्भात काळाच्या परिमाणाच्या सोबतीनंच स्थळ हाही एक पैलू जोडला गेलेला आहे. 

आजपासून सुरू होत असलेल्या या सदराची भूमिका म्हणून सिनेमाची व्याप्ती विशद करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. जगात सिनेमाचा उगम कसा झाला, सिनेमाच्या जन्माच्या आधी सिनेमासारख्या दिसणाऱ्या कोणत्या गोष्टी अस्तित्वात होत्या, सिनेमाला ‘तंत्रावर आधारलेली कला’ असं का म्हणतात, जागतिक सिनेमाच्या इतिहासात नेमकं असं काय घडत गेलं की त्या त्या देशात त्या त्या स्वरूपाचा, नव्या सौंदर्यशास्त्रीय जाणिवेचा सिनेमा आकाराला आला, आज भारतीय सिनेमा कसा आकार घेत आला, त्याच्या उगमाला, भाषेला, भाषिक समृद्धीला कोणते घटक जबाबदार ठरत गेले असे मुद्दे समोर ठेवून यथाशक्ती आराखडा मांडण्याचा प्रयत्न करत जाणार आहे. 

मी सिनेमा करणारा माणूस आहे. सिनेमाचा तशा अर्थानं ॲकॅडमिक अभ्यास केलेला माणूस नसून मी एक असा सिनेदिग्दर्शक आहे, ज्यानं काही सिनेमे तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘त्रिज्या’, ‘स्थलपुराण’ असे सिनेमे आकाराला येत गेले. माझ्यासारख्या अनेक सिनेदिग्दर्शकांना वारसा म्हणून भारतीय अवकाशात अशा काही गोष्टी प्राप्त होतात आणि आता जागतिकीकरण आपल्या जगण्यात एवढ्या खोलवर पाझरत गेल्यावर भारतीय असण्याची जाणीव कशी  पुसट होत जाऊन जागतिक सिनेमासुद्धा किती सहज आपला वाटायला लागतो आणि त्यातून जगभरातल्या अनेक सिनेदिग्दर्शकांची मांदियाळी, आपले भाऊबंद, आपले पूर्वसुरी आहेत याची जाणीव होत राहते... त्या समग्र जाणीव, त्यांची गोष्ट  सांगण्याची, अनुभव मांडण्याची हातोटी माझ्या लेखनातून मला बघता येतेय का याचाही प्रयत्न मी या सदरातून करणार आहे.
(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay indikar writes about movie