व्यक्तिरेखा घडण्याचा प्रवास (अक्षय शेलार)

अक्षय शेलार shelar.a.b.mrp4765@gmail.com
रविवार, 19 ऑगस्ट 2018

"बेटर कॉल सॉल' ही मालिका म्हणजे "ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेचा "प्रीक्वेल' म्हणजे त्याच्या आधीची कहाणी आहे. सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या पूर्वायुष्याची कहाणी त्यात मांडली जाते. सॉल इथं जिमी मॅकगिल म्हणून दिसतो. या जिमीचं आयुष्य कशा प्रकारे वळणं घेत जातं ते दाखवणाऱ्या आणि तो नायक किंवा खलनायक कसा बनत जातो ते मांडणाऱ्या या मालिकेविषयी...

"बेटर कॉल सॉल' ही मालिका म्हणजे "ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेचा "प्रीक्वेल' म्हणजे त्याच्या आधीची कहाणी आहे. सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या पूर्वायुष्याची कहाणी त्यात मांडली जाते. सॉल इथं जिमी मॅकगिल म्हणून दिसतो. या जिमीचं आयुष्य कशा प्रकारे वळणं घेत जातं ते दाखवणाऱ्या आणि तो नायक किंवा खलनायक कसा बनत जातो ते मांडणाऱ्या या मालिकेविषयी...

जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली जी काही सॅटेलाईट टीव्ही चॅनेल्स आणि नेटवर्क्‍स आहेत त्यापैकी एक म्हणजे "एएमसी' नेटवर्क्‍स. याच नेटवर्कअंतर्गत जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेल्या ज्या काही मोजक्‍या आणि उत्तम टीव्ही मालिका आहेत त्यापैकी एक म्हणजे याआधीच योग्य वळणावर येऊन थांबलेली "ब्रेकिंग बॅड.' 2015 मध्ये याच "ब्रेकिंग बॅड'चा शोरनर, लेखक-दिग्दर्शक व्हिन्स गिलिगन यांचीच "बेटर कॉल सॉल' ही टीव्ही मालिकादेखील "एएमसी'वरूनच प्रसारित झाली. ही मालिका "ब्रेकिंग बॅड'चाच "स्पिन ऑफ प्रीक्वेल' आहे- ज्यात "ब्रेकिंग बॅड'मधल्या सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या पूर्वायुष्याची कथा आपल्यासमोर मांडली जाते.

सॉल गुडमन हा "ब्रेकिंग बॅड'मधला "वॉल्टर व्हाइट' ऊर्फ "हायझेनबर्ग'चा वकील यात जिमी मॅकगिल (बॉब ऑडिनकर्क) म्हणून दिसतो. तो "ब्रेकिंग बॅड'मध्ये गुन्हेगारांच्या वर्तुळात खुनाच्या गोष्टींवर चर्चा करताना, ते लपवताना, अवैध गुन्हे करणाऱ्या व्यक्तींचा वकील म्हणून दिसतो तसा इथं नाही. मुळात तो अजून "सॉल गुडमन'च नाही. उलट तो पायलटमध्ये म्हणजे पहिल्या भागात तर अगदी रक्त पाहून दचकतोय. त्याला अजूनही त्याचा मार्ग सापडला नाहीये. तो एक क्‍लाएंट मिळवण्यासाठी धडपडतोय. त्याला नाईलाजानं, कुणीच वकील नसलेल्या गुन्हेगारांच्या वतीनं लढत, फक्त सातशे डॉलर्स प्रती क्‍लाएंट या हिशेबानं सरकारी यंत्रणेच्या जीवावर जगावं लागत आहे.

मात्र, पहिल्या भागात बराच सभ्य, सरळमार्गी असलेला जिम हळूहळू त्याच्या काही चुकांमुळं सामजिक आणि अगदी गुन्हेगारी वर्तुळात ओळखला जाऊ लागलाय. तो करत असलेली धडपड, यंत्रणेकडून होणारी त्याची आणि इतरांची फसवणूक या गोष्टी आपण पाहतो. शिवाय तो किती महत्त्वाकांक्षी वृत्तीचा आहे, याचीही आपल्याला कल्पना आहेच. तो यशस्वी होणार हे तर निश्‍चित आहेच; पण तो तिथपर्यंत कसा पोहचतो, हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.

ही (आणि अगदी "ब्रेकिंग बॅड'ची) गोष्ट आपल्याकडे दाखवतात तशी, आधीपासून नायक किंवा खलनायक असलेल्या व्यक्तीची नाही. तर एक व्यक्ती नायक अथवा खलनायक बनण्याची आहे. (जेच होणं खरं तर अपेक्षित असतं.) थोडक्‍यात "ब्रेकिंग बॅड' ज्या गोष्टींवर समर्थपणे उभी राहिली होती, त्याच गोष्टी अजून प्रभावीपणे आपल्यासमोर मांडल्या जातात. ब्लॅक कॉमेडी असलेल्या निओ-न्वार, थ्रिलिंग ड्रामाच्या रूपानं ही मालिका आपल्यासमोर ऍल्बक्वर्कीमधलं गुन्हेगारी विश्व, कायद्याचं राज्य, सरकारी यंत्रणा आणि मुख्य म्हणजे जिम मॅकगिलचं विश्व उभं करते.

या सर्व गोष्टी प्रभावी लिखाणासोबतच व्हिन्स गिलियनच्या एव्हाना परिचयाच्या झालेल्या चित्रण आणि दिग्दर्शकीय हाताळणीतून समोर दिसतात. (अर्थात सगळे एपिसोड्‌स त्यानं दिग्दर्शित केले नसले, तरीही त्याच्या केवळ ऑन-बोर्ड असण्याचा प्रभावही दिसून येतो.) ज्यात भावनिक गुंतागुंत, खिळवून ठेवणारं चित्रण, लक्षात राहतील असे संवाद आणि निव्वळ सुंदर असं वर्णन करता येण्याजोगं पार्श्वसंगीत अशा कित्येक आवर्जून उल्लेख करण्याजोग्या गोष्टी आहेत. ज्यात "ब्रेकिंग बॅड'ची खासियत मानले जातात असे अप्रतिम मॉंताज आणि भूतकाळातल्या घटना अलगद आणि अगदी हळूहळू, गरज भासेल तितक्‍याच प्रमाणात उलगडणारे, बऱ्याचदा ओपनिंग सीक्वेन्स, पूर्वी दाखवले जाणारे फ्लॅशबॅकही आहेत.

याहून जास्त काही भावतं ते यातली गुन्ह्यांची उकल आणि फिलॉसॉफी. व्हिन्सला तणाव कसा वाढवायचा आणि त्यातून समोरच्या पात्रांमध्ये होणाऱ्या भावनिक हिंदोळ्यामधून आपल्याला हवं ते आणि हवं तितकं कसं काढून घ्यायचं हे बरोबर ठाऊक आहे. यातही अशी बरीच दृश्‍यं आहेत. खास लक्षात राहिल असाच एक दृश्‍य म्हणजे माइकची स्टेसीसमोरची (केरी कॉंडन) कबुली.

जवळपास प्रत्येक पात्राकडे लपवण्याजोगी काहीतरी गोष्ट आहे जी नेमकी त्याचा मार्ग शोधत त्याच्याकडे येते, त्याच्यासमोर उभी ठाकते आणि बऱ्याचदा त्याच्या चुकीच्या निर्णयाची वाट बघत बसते. जेव्हा ते पात्र तो निर्णय घेतं तेव्हा नियती त्यावर हसत राहते. त्या पात्राचा ऱ्हास हा तिचा विजय असतो. तिला तो विजय असुरी आनंद मिळवून देतो. मात्र, दुसरीकडे आपण त्या पात्रात, त्याच्या भूतकाळात (किमान आपल्याला ज्ञात असलेल्या), त्याच्या आयुष्यात इतके खोलवर शिरलेलो असतो, ते पात्र आपल्यासमोर इतकं धडपडलेलं असतं, की त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला झालेली इजा, तो ऱ्हास आपल्यालाच पाहवत नाही....इथंच लेखक म्हणून व्हिन्स गिलिगन आणि पीटर गॉल्ड ही या मालिकेची लेखकद्वयी यशस्वी होते.

"बिंगो' या सातव्या एपिसोडमधल्या शेवटच्या दृश्‍यात एकापाठोपाठ एक भावनांचा जो काही कल्लोळ उभा केला आहे तो आधी जिमी ज्या परिस्थितीत अडकलाय ते पाहून सुरवातीला जराशा निराशेनं आणि त्यानंतरच्या त्याच्या नेहमीप्रमाणेच्या हसत परिस्थितीला सामोरं जाण्याच्या काहीशा महत्त्वाकांक्षी वृत्तीमुळं डोळ्यात पाणी आणतो. तो त्या दरवाजावर लाथा मारत असताना त्या लाथा कुठंतरी आपल्यावरही कळतनकळत परिणाम करत असतातच.

किंवा नवव्या एपिसोडमधला माइक आणि त्याच्या क्‍लाएंटमधला संवाद पाहावा. माइक जेव्हा त्याला, ""चांगला किंवा वाईट गुन्हेगार किंवा माणूस असा काही प्रकार नसतो. कारण मी वाईट पोलिस आणि चांगले गुन्हेगारही पाहिले आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बाजूनं असा, तुम्ही तुमचा शब्द पाळणं गरजेचं आहे. आणि तसंही, तुम्ही एखादं बेकायदा कृत्य केलं असेल तर तुम्ही गुन्हेगार आहात. चांगला किंवा वाईट याचा प्रश्न फक्त तुमच्या स्वतःपुरता मर्यादित असतो,'' असं सांगतो तेव्हाही अशाच फिलॉसॉफीचा अनुभव येतो.

चक आणि जिममधल्या बऱ्याचशा संवादांचाही असाच उल्लेख करता येईल. ज्यात ते आपल्याला केवळ एक पात्र म्हणून दिसत नाहीत. ते त्यांच्या आयुष्यातल्या समस्या सोडवत असताना, किंवा चर्चा करत असताना योग्य-अयोग्य, चांगलं-वाईट यापलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करतात. पहिल्या सीझनच्या अंताकडे येताना जेव्हा चकचा मानसिक स्फोट होऊन तो इतक्‍या वर्षांत मनात दाबून ठेवलेली गोष्ट बोलतो, तेव्हाही त्या नात्यातला तणाव आपल्यासमोर उभा केला जातो. यावेळी तर आपण कुणाची बाजू घ्यावी हा प्रश्न असतो, कारण आपण एक प्रकारे जिमच्या नजरेतून विचार करत असतो. एकूणच यातला पात्रांचा हा प्रवास खास पाहावा असा आहे, हे मात्र नक्की.

Web Title: akshay shelar write article in saptarang