एप्रिल फळ

April-Fruit
April-Fruit

आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे.

एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच म्हणायचे आहे. एप्रिल महिना म्हणजे वसंत आगमन. सर्वत्र फुलांचे सडे असतात. नुकत्याच आलेल्या कोवळ्या पालवीमुळे झाडे रंगीबेरंगी झालेली असतात. प्रत्येक झाड जणू यजमान होऊन वसंताचे स्वागत करतोय अशा मूडमध्ये असते. कोठे कोठे कोकिळा मजेत गात असते. आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे.

किंचित लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी. मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवून देते. ती शान काही औरच.

झाडावरची थोडीशी उबदार गरम कैरी ज्याने घरातून चोरुन आणलेल्या तिखटमिठाच्या पुडीबरोबर खाल्ली नाही तो माणूस कधी जगलाच नाही.
आंब्याचे जेवढे लाड होत नसतील तेवढे कैरीचे होतात. शिवरात्रीलाच त्या कैरी बाळांची चाहूल लागते. मोहोराच्या मध्ये दडलेली ती छोटीछोटी बाळे टपोरी मोत्यापेक्षाही गोड दिसतात.. आंब्याच्या झाडाचेही पहिलटकरिणीसारखी डोहाळे पुरवले जातात. खते दिली जातात. फवारणी केली जाते. गारा लागू नयेत म्हणून पानांचा आडोसा केला जातो, दृष्ट लागू नये म्हणून लिंबू उतरवले जाते, कोणी धटिंगणाने दगड मारू नये म्हणून जागता पहारा बसतो. दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात, षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढू लागते. एका दैवी मुहुर्तावर कैरीला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते, प्रौढत्वाच्या पक्वपणाची गोडी अजून आलेली नसते, आणि बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो. अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैऱ्याना हलकेच झेल्याचा पाळणा करून झाडावरून उतरवले जाते, त्यांच्यासाठी मस्त गवताची उबदार दुलई अंथरली जाते, त्यावर त्यांना जाग न येईल इतक्‍या हलकेच धक्का न लावता नाजूकपणे झोपवले जाते, पुन्हा त्यावर उबदार गवताचे पांघरुण घातले जाते.

गवताच्या मऊ दुलईवर पहुडलेल्या कैऱ्या आता दिसामासाने रंगरूप पालटू लागलेल्या असतात. सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करून युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरून उतरून लाल रंग त्याची जागा घेऊ लागतो. हळूहळू अंगावर हळदी, केसरी रंगाचा साज चढतो. कैऱ्या आता मोठ्या झालेल्या असतात.’ अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे गं ’ हे गाणे त्या गाऊ लागतात..

त्यातल्याच एका धमक पिवळ्या सुवर्णवर्खी कैरीला अलगद उचलले जाते. आळीतल्या रामाच्या पायाशी नैवेद्य ठेवला जातो. घरातले सगळे या क्षणाची केंव्हाची वाट बघत असतात. पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर, रत्ना, रायवळ प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापूस तसा इतरांशी थोडा फटकून वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्‍यापाशी बसेल. मंडईमधेसुद्धा हापूस विकणारे चेहेऱ्यावर वेगळेच राजेशाही भाव आणून बसलेले असतात. हापूस आंबा दाखवताना एखाद्या हिऱ्याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिऱ्हाईक ही तेवढ्यात टेचात हापूसची करंडी मिरवत घेऊन जाते.

पायरी हा तसा राजकारणी लहानथोरात सारख्याच सलगीने वागणारा. याला हापूसचा दर्जा मिळत नाही. आपण रायवळच्या पंक्तीला बसावे की नाही, हा प्रश्‍न याच्या डोक्‍यात सतत असतो. त्यामुळेच की काय ‘आपल्या पायरीने वागावे’ असे कोणी म्हणताना पाहिला की मला जिन्याच्या पायरीपेक्षा पायरी आंब्याचीच पटकन आठवण होते. म्हटले तर फोडी करा म्हंटले तर घोळून खा, असा दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा तो पायरी. हापूस हा फक्त तबकातून छान फोडी करून नजराणा केल्यासारखा पेश करायचा असतो. तो त्याचा मान आहे. हापूस घोळून द्या, असे कोणी म्हटले, की त्याचा अपमान होतो आणि म्हणणाऱ्याची जागा दिसून येते. घोळून आलेला हापूस हा मला नेहमीच नळदमयन्ती आख्यानातल्या घोड्याच्या तबेल्यात काम करणाऱ्या, मनातल्या मनात चरफडणाऱ्या नळ राजासारखा वाटतो. बाजारात आंब्यांचा दरवळ असतो. कोठे ही नजर फिरवली तरी आंबेच आंबे नजरेस पडतात. 

पिवळे धमक, पिवळसर केशरी, जर्द केशरी, लालसर हिरवे, हिरवट केसरी, संध्याकाळच्या लालसर प्रभेचे सगळे रंग ही आंब्यांची रास रंगवायला वापरले जातात. एखाद्या नामचीन चित्रकाराने आव्हान स्वीकारून केवळ एकाच रंगात चित्र काढायचे ठरवून त्या रंगाच्या सगळ्या छटा मनलाऊन चित्र काढावे तसे या आंब्यांकडे बघून राहून राहून वाटते, तोतापुरीला देवाच्या प्रसादात मान मिळायचे आणखी एक कारण म्हणजे त्याचा रंग. गोऱ्यापान बाळाला मस्त आंघोळ घालून झोपवले असावे आणि झोपेतच त्याच्या गालाला खळी पडावी आणि गाल आणखीच खुलून दिसावे तदवत या तोतापुरीचा रंग दिसतो. त्याची पांढरट साल त्यावर गुलाबीसर केसरी नव्हाळी. बाजीरावाच्या मस्तानीशी स्पर्धा करावी तर यानेच. आंब्यांचे स्पर्शसुद्धा किती सांगावेत. तलम पातळ सालीचा केसर. जाड सालीचा दशेरी, करकरीत रेशमी स्पर्शाचा हापूस, गोऱ्याघाऱ्या वर्णाचा कडक तोतापुरी.

हातातच घोळवत ठेवावा असा गोटी आंबा, खडबडीत कावजी पाटील. चवीमध्येसुद्धा इतकी विविधता दुसऱ्या कोणत्या फळात क्वचित दिसते. पाणचट, फिक्का तोतापुरी, साखरीगोड दशेरा, किंचित तुरट शेपू, केवळ कच्चाच खाता यावा यासाठीच निर्माण केलेला मोठ्ठा खोबरी आंबा, दातच काय पण डोकेसुद्धा आंबेल इतका आंबट शेन्द्री आंबा. मला वाटायचे की आंबणे हा शब्द या आंब्यावरूनच आला आहे. चवीनुसार आंब्यात जाती जमाती आहेत. पण एका जातीच्या एकाच झाडाच्या एका फांदीवरून काढलेल्या दोन आंब्याच्या चवीत फरक आढळेल. अर्थात अशी तुलना करून शब्दच्छल करण्यापेक्षा समोर दिसणाऱ्या गोष्टीचा आनंद घेणे हेच चांगले. हे सांगण्यासाठी आंब्याइतके दुसरे समर्पक उदाहरण दुर्मिळच. काही आंबे जरा फारच तयारीचे असतात. ते रंग बदलायचे नावच घेत नाहीत. कितीही परिपक्वपणा आला तरी बाहेरून हिरवेच असतात. गोडी अवीट असते, रसाळ असतात, पण रंगाने हिरवेच असतात. त्याना पाहिले की अनंत काणेकरांच्या ‘पांढरे केस हिरवी मने’ मधली ‘आऊ’ आठवते. वय झाले तरी उत्साह कमी होत नाही. काहीसे आशा भोसलेंच्या चिरतरूण आवाजासारखे. आंबे हे घोळूनच खायचे असतात. चिरून फोडी करून, ताटलीत मांडून असला नाजूक रेशमी प्रकार यांना आवडत नाही. 

करंडीतून आंबा घ्यायचा, गोड निघावा अशी प्रार्थना करायची, घोळायचा, वरचे टोक दातानीच काढून टाकायचे आणि ओठानी थेट भेट घ्यायची. मामला कसा एकदम सरळ, स्ट्रेट असतो. आंबा घोळून खाण्यात आणखी एक मजा असते. तोंड वाकडे करत आवडती गोष्ट खुशीत चाखत माखत करणे हा अजब प्रकार फक्त आंबे चोखून खातानाच घडू शकतो. या दिवसांत सगळे घरच ‘आंबा’मय झालेले असते. स्वयंपाक्‌ घरात तर आंब्याला मध्यभागी ठेऊनच सगळे पदार्थ केलेले असतात.. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही तसे मोसम संपला तरी आम्रपुराण काही संपत नाही. आंब्याचे होणारे हे कौतुक बघून साक्षात भगवंताला ही ‘मासानाम मार्गशीर्षोहम्‌’च्या पुढे जाऊन ‘फलानाम आम्रोस्मीन’ असेच म्हणावेसे वाटेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com