Kalpana-Shirode
Kalpana-Shirode

खानदेशनी आखाजी

आखाजी दिवायी सौ महिना
ऊना तिना भाऊ तिले लयी पयना

आखाजी म्हणजे अक्षय तृतीया. आखाजी आणि दिवाळीत सहा महिन्यांचं अंतर. आणि या सणांना माहेरी जाणं हा मुलीचा जणू हक्कच असतो. मग सासरची मंडळी तिला चिडवतात की, आखाजीला आणि दिवाळीला तुझा भाऊ येतो आणि तुला आमच्यापासून पळवून घेऊन जातो. खानदेशात आखाजी हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या दिवसापासून आंबे खायला सुरवात होते. उन्हाळा खूप तीव्र असतो, म्हणून गरीब लोकांना चपला आणि छत्री दान करतात. ठिकठिकाणी पाणपोया सुरू करतात. कारण म्हणतात ना,

माझ्या दुकानात हंड्या लावल्या चार चार,
अन्नाच्यापरीस पान्याचा धर्म फार

शोभेच्या वस्तू लावण्यापेक्षा आणि कुणाला अन्नाचा दानधर्म करण्यापेक्षा उन्हाळ्यात तहानलेल्या माणसाला पाणी पाजण्याचं पुण्य जास्त असतं, असा याचा अर्थ. आखाजीच्या दिवशी घागरीवर घागर ठेवून त्यावर डांगर म्हणजे खरबूज ठेवून पूजतात. उन्हाळ्यामुळे सगळ्या गोष्टी कशा गारेगार पाहिजेत म्हणून हे सगळं. या सगळ्यामुळे आपल्या वाडवडिलांना पाणी मिळतं, असा समज आहे. वाडवडिलांची आठवण म्हणून आखाजीला त्यांचं श्राद्ध करतात. पितरं जेवू घालतात. या दिवशी आंब्याचा रस, पुरणपोळी, काळ्या मसाल्याची आमटी, कुरडया, पापड, भजी, सांजोऱ्या असा बेत करतात. मातीच्या खापरावर पुरणपोळ्या भाजल्या जातात. त्यावर घरचं तूप मनसोक्त घेतल्यावर त्याची मजाच काही और होते. जेवणात आंब्याचा रस असला तरी देवाला नैवेद्याला मात्र दोन आंबेच ठेवले जातात. खूप जणांनी आजपर्यंत मला एक प्रश्न विचारला आहे की, आमरसही गोड आणि पुरणाची पोळीही गोड. मग गोडाबरोबर गोड कसं खाऊ शकता तुम्ही खानदेशी मंडळी? त्याचं उत्तर म्हणजे, हापूस, जो मिट्ट गोड असतो, तो काही तिकडे पूर्वी मिळायचा नाही. तिकडे आंबा मिळत असे गावरान. तो असतो आंबटगोड. त्यामुळे त्याच्याबरोबर पुरणपोळी मस्तच लागते. मी तर म्हणते एकदा खाऊनच बघा तुम्ही. आता हापूसही मिळायला लागला, पण आमची कुठल्याही आमरसाबरोबर पुरणपोळी खायची सवय अजूनही तशीच आहे. 
प्रत्येक सासुरवाशिणीला आखाजीला माहेरी जायची ओढ असते. तिला माहेराहून घ्यायला आलं म्हणजे मूळ आलं, असं म्हणतात. आणि जो घ्यायला येतो त्याला मुऱ्हाळी म्हणतात. मग ती सासरच्या लोकांना अजीजीने म्हणते, 

आखाजीनं मूळ नका परतावू सासरा,
माहेरी जावाले सन (सण) नई ना दुसरा.

मग तिची लगबग सुरू होते. तिच्या मुलांना पण मामाच्या घरी जायची घाई झालेली असते. परीक्षाही संपलेल्या असतात. एकदाची ती माहेरी पोचते. खानदेशात मुलगी माहेरी आली की तिच्यासाठी काय करू अन्‌ काय नको असं सगळ्यांना होतं. शेतीचीही कामं झालेली असतात. वसंतऋतूचं साम्राज्य असतं, मुहूर्ताचा दिवस असल्याने चांगल्या गोष्टीची सुरवात या दिवशी करतात. मुलीचा हा माहेरवास आठ दिवसांसाठी पक्का असतो. मग रोज दुपारी आमरस पुरणपोळी खाऊन झाल्यावर जुन्या सख्या गोळा होतात. घराजवळचं एखादं मोठं आंब्याचं, पिंपळाचं किंवा कडूलिंबाचं झाड बघून त्याला झोके बांधायचे. जोरजोरात झोके घेत त्याहून जोरजोरात गाणी म्हणायची. 

आथानी कैरी, तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी, खडक फुटना, 
झुयझुय पानी व्हाय वं

बहिणाबाईंचंही एक गाणं 
मला या वेळी आठवतं.
आखाजीचा आखाजीचा 
मोलाचा सन देखाजी,
निंबावरी निंबावरी बांधिला छान झोका जी,
गेला झोका गेला झोका, 
चालला माहेराले जी,
आला झोका आला झोका पलट सासराले जी

मग सगळ्यांनी मिळून फुगड्या खेळायच्या. नवऱ्याचं नाव मधे गुंफून उखाणे घ्यायचे. मैत्रिणींची थट्टा-मस्करी करायची. चिडवून चिडवून तिला भंडावून सोडायचं. आठ दिवसांसाठी सासर पूर्ण विसरायचं. लहानपणच्या आठवणी काढायच्या, त्यात खूप खूप रमायचं, खूप खूप हसायचं. कुल्फीची गाडी आली की कुल्फी खायची. गावातल्या बायकांचे दोन गट करून टिपऱ्या खेळायच्या. आखाजीच्या दिवशी जावई पण बरेचदा जेवायला असतो. त्यावरून एक गाणं असं आहे,

आखाजीना सन मोठा, 
एक घागरले दोन लोटा,
जवाईबुवा पित्तर बठा, 
सांजोरीसाठी बोंबली उठा

मग जावयाला दादाबाबा करून समजवलं जातं. आता मुलीची सासरी परत निघायची वेळ होते. सगळ्यांचे डोळे पाणावतात. आता दिवाळीलाच पुन्हा भेट होईल या अपेक्षेत तिला सासरी पाठवायचं. तेवढ्यात कोणीतरी त्या मुलीला उखाणा घे म्हणून आग्रह करतं, मग आढेवेढे घेत, लाजत लाजत ती शहरात राहाणारी मुलगी नाव घेते.

गुलाबी माझी पैठणी, पदराचा रंग मोतिया.
रावांचं नाव घेते, आज अक्षय तृतीया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com