सोने म्हणजेच संपत्ती...!

Gold-Rate
Gold-Rate

भारतीयांना आजही सोन्याचे आकर्षण कायम आहे. हौस म्हणून किंवा प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे आजवर अनेक आहेत. त्यात सर्व वयोगटांतील विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्व आले आहे. चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. आता सोने म्हणजेच ‘संपत्ती’ असेही समजले जाते...

बचत अन्‌ गुंतवणूक दोन चक्रांवर आर्थिक रथ
गुंतवणूक आपण सर्वच जण करीत असतो. बचत आणि गुंतवणूक दोन चक्रांवर आपला आर्थिक रथ चालत असतो. पण, आता काळ बदलला आहे. गुंतवणुकीचे अनेक नवीन पर्याय समोर येत आहेत. एकाच गुंतवणूक पर्यायात इतके प्रकार आहेत, की सामान्य माणूस भांबावून जातो. गुंतवणूक कोणतीही असो; त्याची कसोटी तीन गोष्टींवर होते, ती म्हणजे- परतावा, जोखमी अन्‌ कालावधी. शेअर, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक धोका पत्करला लावणारी आहे. या पार्श्‍वभूमीवर सोने गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. जागतिक पातळीवर सोन्याला गुंतवणुकीत प्राधान्य दिले जाते. शेअर बाजारातील गुंतवणुकीने दीर्घ कालावधीत खूप अधिक परतावा दिला आहे. पण, सोने गुंतवणुकीच्या तुलनेत तेथे जोखमीचा घटक मोठा आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

भावनिक नको; अभ्यासपूर्ण दृष्टिकोन हवा
आजही आपण गुंतवणुकीसाठी सोने, जमीन आणि व्यवसाय या पारंपरिक पर्यायांचा प्राधान्य देताना दिसतो. इतकेच नव्हे, तर हे गुंतवणुकीचे पर्याय आपल्यासाठी इतके भावनिक आहेत, की आपण मुहूर्ताशिवाय या पर्यायांत गुंतवणूक करताना दिसत नाही. जर गुंतवणूक सोने, जमीन किंवा व्यवसायात होणार असेल, तर आपण भावनिक होतो, ते काही चुकीचे नाही. पण, पैसा निरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून फिरवून अधिकाधिक धनसंचय करून देतो, हे लक्षात घेऊन आता सर्वसामान्यांदेखील या गुंतवणुकीच्या पर्यायांना प्राधान्य देताना फक्त भावनिक नव्हे; तर अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवायला हवा.

सोन्यामधील गुंतवणूक अन्‌ परतावा...
सोन्याचे भविष्यात नक्की काय होईल, हे खरेतर कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, सध्याच्या दरावर सोने आकर्षक वाटत असेल, तर काही प्रमाणात खरेदी करावी आणि काही दिवस वाट पाहून उरलेली खरेदी करावी. जागतिक अस्थितरतेमध्ये सोने हीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे सोन्याचे भाव घसरत असले, तरी लोकांनी एकरकमी गुंतवणूक न करता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. शिवाय, अडचणीच्या वेळीही लगेच पैसा होतो.

भावनिश्‍चिती जागतिक पातळीवर
डॉलर युरो नाते, आंतरराष्ट्रीय चलनांवर परिणाम करणाऱ्या अमेरिका, युरो झोन, जपान, चीन आणि भारतात घडणाऱ्या आर्थिक घडामोडी, क्षेत्रीय आणि राजकीय स्थैर्य, औद्योगिक वाढ-घट, रोजगार वाढ-घट आदी घटकांचा अभ्यास करणे हे सोन्यातील गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हिताचे आहे. किटको डॉट कॉम, ब्लूमबर्ग, एफएक्‍स स्ट्रीट डॉट कॉम, नेट डॅनिया डॉट कॉम आदी वेबसाइटवर सोन्याशी निगडित घटकांची माहिती उपलब्ध असते. भारत हा सोन्याचा वापर करणारा जगातील सर्वांत मोठा देश असला, तरी सोन्याचे दर ठरविणे भारतीयांच्या हातात नाही.

सोन्याला सर्वाधिक मागणी
सोन्यातील गुंतवणुकीची वेळ प्रत्येकालाच साधता येईलच, असे नाही. सोन्यात गेल्या दहा वर्षांपासून तेजी सुरू आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरता, चलनवाढ यापासून वाचण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत कच्चे तेल, डॉलर, बॅंक यांच्यापेक्षा सोन्याकडे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे सोन्यास अधिक मागणी आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय कसा वापराल?
सोने गुंतवणुकीची ही सुयोग्य वेळ म्हणावी काय, हा आजच्या संदर्भात लाखमोलाचा प्रश्‍न जरूर आहे. कोणत्याही गुंतवणुकीसाठी योग्य व अयोग्य काळ नसतो. सोने गुंतवणुकीसाठी तर नाहीच. पण, गुंतवणूक ही नेहमी दीर्घ कालावधीसाठी किमान पाच वर्षांसाठी मात्र असावी, हेही नागरिकांनी लक्षात असू द्यावे.

सोन्या-चांदीच्या अलंकारांसह वस्तूंमध्ये नवीन प्रकार
जळगावमध्ये विविध प्रकारचे आकर्षक दागिने बनविणाऱ्या कारागिरांच्या हस्तकलेला येथे वाव मिळालाच; त्याचबरोबर बारमाही रोजगारही मिळाला. वास्तविक, जळगावमधील मोठ्या सराफांकडे अलंकार बनविण्याची आधुनिक यंत्रे आली आहेत. तरीही हाताने दागिने घडविणाऱ्या कारागिरांचे महत्त्व थोडेही कमी झालेले नाही, हे या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. अगदी एक ग्रॅमचेही दागिने हे कारागीर घडवू शकतात. गेल्या पन्नास वर्षांत सोने व चांदीच्या अलंकारात, वस्तूंमध्ये कितीतरी नवीन प्रकार आले, तरीही हे कारागीर टिकून आहेत. त्यांनी घडविलेली आभूषणे नेहमीच ग्राहकांच्या पसंतीला उतरतात. सोन्यातील गुंतवणूक म्हणजे संपत्ती असून, अडचणीच्या वेळी केव्हाही त्यातून पैसा उभारता येऊ शकतो. सोने म्हणजे पूर्णवेळ उपयोगात येणारी वस्तू आहे. सोन्यातून तातडीने व्यवहारही करता येऊ शकतात. सोन्यातील गुंतवणूक नुकसानकारक नाहीच. सोन्याची हौस व गरजही भागते. त्यामुळे प्रत्येक घरात सोने खरेदी करून गुंतवणूक केली जाते. शक्‍यतो ग्राहक गुंतवणूक करताना सोन्याचे बिस्कीट अथवा तुकडा खरेदी करतात. सोन्याचे आकर्षण भारतीयांसह परदेशातही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com