अजून खूप काही करायचं आहे... (अलका देव-मारुलकर) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alka deo marulkar

अजून खूप काही करायचं आहे... (अलका देव-मारुलकर)

वयाच्या सोळाव्या वर्षापासून मैफली करताना थोर व गुरुतुल्य कलाकारांचे व संगीतसाधकांचे भरपूर आशीर्वाद व प्रेम मला लाभत आलं. मात्र, आजही मैफल सुरू करताना एखाद्या नवकलाकाराप्रमाणेच माझ्या मनात एक हुरहूर, एक अनामिक भीती असते. आपल्या महान गुरूंचं नाव आपण राखू शकू ना अशी एक मानसिक अवस्था असते. गाणं मनासारखं झालं तर सर्वार्थानं कृतार्थ झाल्यासारखं वाटतं; पण जर मनासारखं नाही झालं तर अंतर्मुख होऊन स्वतःला कोषात बंद करायची प्रामाणिकताही मी बाळगून आहे.

मी "गायिका' म्हणून जन्म घ्यावा आणि तोही थोर गायक-संगीतविचारक व श्रेष्ठ गुरू पंडित धुंडिराज ऊर्फ राजाभाऊ देव, म्हणजेच माझे दादा व उत्तम आवाजाची देणगी लाभलेल्या रंजना देव या कर्तबगार मातेच्या पोटी, हे जणू विधिलिखितच होतं. किंबहुना मी गायिका झाले नसते तर विधात्याच्या देणगीचा व माझ्या वडिलांच्या स्वप्नांचा तो अव्हेरच झाला असता! पिता व गुरू या दोन्ही नात्यांमध्ये माझ्या वडिलांनी गुरू या नात्यालाच अधिक महत्त्व दिलं आणि अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं माझी सांगीतिक जोपासना केली. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच सुंदर, आकर्षक बंदिशी व काही महत्त्वाचे पलटे घोटून घेणं आणि आवाजाचा आवाका तीन-साडेतीन सप्तकांच्या परिघामध्ये वाढवणं असं हसत-खेळत त्यांनी मला शिकवलं व माझ्या सांगीतिक संस्कारांची बैठक पक्की केली. सुमारे दहाव्या वर्षापासून माझी खरी तालीम सुरू झाली. पहिली पाच-सहा वर्षं ग्वाल्हेर घराण्याची सौंदर्यतत्त्वं केंद्रस्थानी ठेवून दादांनी रागविस्ताराच्या प्रक्रियांचे धडे मला दिले. ग्वाल्हेर घराण्याची थोडी चढ्या लयीतली विलंबित बढत संपूर्ण रागाचं विहंगम दर्शन (Aerial view) घडवण्यास सहाय्यक होते. तालाचा भक्कम आधार घेऊन फुलणारी चुस्त गायकी हे या घराण्याचं वैशिष्ट्य आहे; त्यातही तिचा एक विशेष पैलू लयकारी (किंवा बोलबॉंट) हा होय. ही लयकारी मात्र दादांनी मला उशिरा, बरीच वर्षं गेल्यावर, शिकवली. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे लयतत्त्व हे चैतन्यदायी असलं तरी त्यात बंदिशीच्या शब्दांच्या आघातांचा जर अतिरेक झाला तर गाण्यात रुक्षता येण्याचं भय असतं, असा त्यांचा खोलवर विचार होता.

ग्वाल्हेर गायकीची पाया भक्कम करणारी शैली माझ्या बुद्धीवर व गळ्यावर चढवल्यानंतर दादांनी पुढील पाच-सहा वर्षं किराणा घराण्याची स्वरप्रधान विस्तृत आलापचारी, तसंच विलंबित लयीतला ठहराव यावर प्रकर्षानं भर देणारी गायकी शिकवली. सुरवातीच्या माझ्या ग्वाल्हेर घराण्याच्या प्रशिक्षणातून "छायानट', "हमीर', "कामोद', "केदार', "भैरव', "अल्हैय्या बिलावल', "भूपाली', "गौडसारंग' आदी रागांची ओळख दादांनी जशी करून दिली होती, तितक्‍याच उत्कटतेनं किराणा घराण्याचं नाजूक स्वरकाम, विस्तृत आलापी व विलंबित लयीमध्ये सहज विचरण करण्यास योग्य असे "तोडी', "मुलतानी', "शुद्ध कल्याण', "मालकंस', "मारू-बिहाग', "दरबारी-कानडा' हे राग मला शिकवले. या दोन्ही घराण्यांच्या - वरपांगी एकमेकींपासून विभिन्न असलेल्या - शैलींचे स्वतंत्र तसंच समन्वित विचार मला त्यांनी इतक्‍या अप्रतिम पद्धतीनं समजावले आणि त्यातून मला जी समग्र दृष्टी मिळाली ती माझ्या सुरवातीच्या मैफिलींमध्ये स्पष्ट प्रतिबिंबित झाली. दादा स्वतः 25 वर्षं कलाकाराच्या भूमिकेतून संपूर्ण भारतात रसिकांना प्रिय होतेच; त्यामुळं गुरू म्हणूनही मला प्रशिक्षण देताना मैफलीचं तंत्र व तीमधला संयम, आवेश तसंच स्पष्ट रागविचार या तिन्ही तत्त्वांचा मिलाफ करण्यास त्यांनी मला प्रवृत्त केलं.

माझ्या प्रशिक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे विकट, प्रगल्भ व बुद्धीला सुखावणारी जयपूर गायकी! दादांच्या योजनाबद्ध प्रशिक्षणात ही गायकी तिसऱ्या क्रमांकावर असण्याचं कारण म्हणजे, या गायकीला वयाची, तसंच बुद्धिमत्तापूर्ण आकलनाची परिपक्वता अत्यंत आवश्‍यक असते हा दृढ विचार! माझ्या वयाच्या 20-21 व्या वर्षापासून जयपूर गायकीचं जे विविधांगी शिक्षण सुरू झालं ते पुढं 20 वर्षं अव्याहतपणे सुरू राहिलं. या कालावधीत दादांनी मला "बिहागडा', "पटबिहाग', "ललितागौरी', "नटकेदार', "जौनपुरी', "देवगंधार' आदी रागांचं विस्तृत शिक्षण दिलं.
दादांच्या संगीतप्रशिक्षणाविषयी थोडंसं सांगणं आवश्‍यक आहे. अतिशय कष्टानं त्यांनी गायनविद्या प्राप्त केली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी ग्वाल्हेरला जाऊन सुमारे नऊ वर्षं पंडित राजाभैया पूँछवाले या श्रेष्ठ गुरूंकडून ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली. पुढं मध्य प्रदेशातल्या देवासचे उस्ताद रजब अली खॉं यांची नितांतसुंदर "बलपेंचदार' गायकी - जिच्यावर किराणा घराण्याची सुंदर कलाकुसर होती - दादांना भरभरून मिळाली. सन 1963 मध्ये जयपूरजवळच्या "वनस्थली विद्यापीठा'त वरिष्ठ व्याख्याते म्हणून रुजू झाल्यावर सुमारे पाच वर्षं तिथल्या संगीत विभागाचे प्रमुख प्रोफेसर बी. आर. देवधर यांच्याकडून जयपूर घराण्याच्या दुर्मिळ रागांसह, अप्रतिम बंदिशींचं विस्तृत व प्रदीर्घ प्रशिक्षण दादांना मिळालं. त्यामुळं त्यांच्या गायनशैलीत या घराण्याच्या उत्तमोत्तम सौंदर्यतत्त्वांचा मिलाफ झाला व त्यांच्या समग्र दृष्टीला नवीन पैलू प्राप्त झाले. रागाधिष्ठित, वस्तुनिष्ठ व रागविस्ताराच्या समस्त प्रक्रिया प्रमाणबद्धतेनं व्यक्त करण्याची अपूर्व शैली दादांनी विकसित केली व ती माझ्यापर्यंतही पोचवली.

दादांची तालीम मला किमान 40 वर्षं अव्याहत मिळाली. इतकं सर्व असूनही एक तळमळ, एक ओढ दादांच्या मनात सतत होती व ती म्हणजे मला जयपूर घराण्याचं विशेष प्रशिक्षण कुठल्या तरी अतिशय प्रगल्भ व सर्वार्थानं योग्य अशा जयपूर गायकीच्या गुरूंकडून मिळावं! अर्थात, 1973 ते 1976 पर्यंत मला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे "प्रज्ञा' छात्रवृत्ती मिळत असल्यामुळं गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर किंवा थोर गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर या महान गुरूंकडून शिकण्याची संधी मिळू शकली असती; परंतु त्या वेळी दादांकडून अविरत तालीम सुरू असल्यामुळं मी स्वतःच या संधीचा फायदा करून घेण्यासाठी नकार दिला. पुढं सांगलीला स्थायिक झालेले दादांचे जिवलग मित्र पंडित मधुसूदन कानेटकर (भुर्जी खॉं यांचे शिष्य) यांच्याकडं सन 1979 पासून जयपूर घराण्याचं शिस्तबद्ध व तितकंच रसाळ गाणं शिकण्याचा अपूर्व योग ईश्‍वरकृपेनं माझ्या आयुष्यात आला. खरं तर दादांच्याच आग्रहामुळं हे घडू शकलं. कानेटकरकाकांच्या मनात दादांविषयी मित्र म्हणून अपार स्नेह तर होताच; शिवाय दादांच्या उत्तुंग गायकीचेही ते मनापासून चाहते होते. काकांच्या प्रशिक्षणातला फार महत्त्वाचा भाग म्हणजे, त्यांनी मी आत्समात केलेल्या गायकीला कुठंही धक्का न लावता मला जयपूर घराण्याचं तंत्र - सर्पगती स्वरसंगती, सहजसुंदर लयविचार व जोडरांगाचा प्रमाणबद्ध समन्वित आविष्कार - शिकवलं. या कालावधीत कानेटकरकाकांकडून मला "कौशीकानडा', "रायसा कानडा', "बहादुरी तोडी', "संपूर्ण पूर्वा', "संपूर्ण मालकंस', "खट तोडी', "भैरव अंगाचा खट', "कोमल रिषभाचा खट' व "डागुरी' आदी रागांचं विस्तृत प्रशिक्षण मिळालं. काकांच्या स्वरलगावातलं मार्दव, आर्जव व रसात्मकता आजही माझ्या रोमरोमात आनंदानुभूती देत असते. कानेटकरकाकांनी मला 10 वर्षं तालीम दिली; बरोबरीनं दादांचीही तालीम सुरू राहिली.
एवढ्या प्रचंड रागगायनाचा आवाका स्वतःमध्ये व्यवस्थित सामावून घेणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतकंच अशक्‍यप्राय होतं; पण हे दोन्ही गुरू माझे दोन अंतःचक्षू बनून आजही मला या विराट व अनंत प्रवासाची दिशा दाखवत आहेत. आज ते सशरीर नसले तरीही त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक रागाच्या प्रस्तुतीतून मला त्यांचं सान्निध्य, मार्गदर्शन व "अजून खूप काही करायचं आहे' ही जाणीव मिळतच राहत आहे व कायम मिळत राहाणार आहे, हा माझा दृढविश्वास आहे.

दादांनी मला घडवलं, संगीताव्यतिरिक्त उच्च शिक्षणाचा ध्यासही त्यांच्याचकडून मला मिळाला. इंग्लिश साहित्यात एमए, योगी अरविंदांच्या "सावित्री' या महाकाव्याचं गहन संशोधन, संगीत-अलंकार (भारतात प्रथम क्रमांक) व संगीतप्रवीण (आजचं "संगीताचार्य') या ऍकॅडमिक शिक्षणाचा, तसंच सुमारे 10 वर्षं चित्रकलेच्या अभ्यासाचा मला संगीतसाधनेत खूप उपयोग झाला. माझ्या आयुष्याच्या सुरवातीचा 25 वर्षांचा काळ उत्तर भारतात व्यतीत झाल्यामुळं माझा हिंदी भाषेवर विशेष लोभ होता; त्यामुळं हिंदीच्या उपभाषांचा - भोजपुरी, मैथिली व ब्रज - माझ्या बंदिशींत सहज समावेश झाला. पुढं पुण्यात 20 वर्षांच्या वास्तव्यात मराठी काव्याचा अभ्यास करत असताना कविवर्य भा. रा. तांबे यांच्या अजरामर प्रेमकवितांना मी स्वरसाज चढवला व भारतातल्याच नव्हे, तर अमेरिका, कॅनडा व इंग्लंड इथल्या मराठीभाषक रसिकांना "मधुघट' या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक वेगळाच "भावानुभव' मला देता आला हे विशेष! मीरा, कबीर व सूरदास या श्रेष्ठ संतकवींच्या भक्तिरसानं ओतप्रोत गीतांचं सादरीकरण हाही माझ्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा आहे व यामुळं "स्वररचनाकार' म्हणून माझी सृजनशक्ती मला सतत जागती ठेवता आली. स्वरभाव व शब्द यांतून व्यक्त होणाऱ्या अलौकिक प्रेमाचं प्रतीक असलेल्या ललित संगीताचाही माझ्या आयुष्यात फार मोठा सहभाग आहे. अनेक वर्षं बनारस इथं राहिल्यामुळं आणि दादांच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मला मिळालेल्या असंख्य ठुमरी-दादरा यांचा खजिना मला नव्या दृष्टीनं जोपासता आला. "पूरब बाजा'च्या या अप्रतिम गायकीनं माझं संगीतविश्व अधिकच समृद्ध झालं यात शंका नाही. दादा नेहमी म्हणायचे ः "ख्याल, ठुमरी, गझल, गीत व भजन हे जरी क्रमानं एकामागून एक आपण म्हणत असू, तरीही ते एकमेकांपेक्षा अतिशय कठीण आहेत व ते गाताना त्यांच्या विशुद्ध स्वरूपाचं भान ठेवणं अत्यावश्‍यक आहे.' परंपरा सांभाळून संगीतात नवनवीन संकल्पना कशा रीतीनं सामावून घ्यायच्या हाही विचार दादांनीच मला दिला म्हणून "रसरंग' या त्यांच्याच उपनावानं मी अनेक बंदिशी रचल्या, नवीन रागांची निर्मिती केली. त्यांत "आनंदकल्याण,' "जोगेश्री', "वरदश्री', "मध्यमादी-गुर्जरी' हे राग विशेष उल्लेखनीय आहेत.

आजवरच्या 67 वर्षांच्या आयुष्यात अनेक भावनिक चढ-उतार मी पाहिले; पण माझं संगीत मात्र माझ्या आयुष्यातून कधीच "उतरलं नाही!' कलाकार म्हणून मला मिळालेल्या "गानसरस्वती', "संगीतकौमुदी', "डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार', "संगीतशिरोमणी' आदी उपाधी मला अतिशय आश्‍वासक वाटतात. कारण, मी योग्य मार्गानं साधना करत आहे, याची प्रचीती मला येत राहते. एक गानसाधिका म्हणून तर मी प्रयत्नशील आहेच; पण एक गुरू म्हणूनही मी अतिशय आग्रही आहे! एक विचार मी माझ्या शिष्यांमध्ये रुजवायचा प्रयत्न करते. गानविद्या प्राप्त करण्यासाठी नशिबाची गरज नसते, गरज असते ती प्रचंड चिकाटीची, ध्यासाची, न ढळणाऱ्या निष्ठेची आणि गुरुकृपेची...यशापयश तेव्हाच ठरतं. नशिबाचा सहभाग एकशतांशपेक्षाही कमी असतो. माझे सर्व शिष्य माझ्याचसारखे मनस्वी व ध्येयवादी आहेत. विशेष उल्लेख करायचाच झाला तर, माझी कन्या व शिष्या शिवानी चैतन्य दसककर हिची प्रगती समाधानकारक असून, संगीतक्षेत्रात विशेष स्थान प्रस्थापित करण्याचं तिचं स्वप्न आहे. याशिवाय स्वराली पणशीकर, कल्याणी दसककर, ईश्‍वरी दसककर या विशेष प्रतिभावान शिष्या अतिशय उत्कटतेनं संगीतसाधना करत आहेत, याचा मला गुरू म्हणून अभिमान वाटतो.

जेव्हा एक गायिका एकाच वेळी शिष्या व गुरू या दोन्ही भूमिकांत असते, तेव्हा आपण प्रशिक्षण घेत असलेल्या रागविचारांचं स्पष्टीकरण हे प्रशिक्षण देताना अधिक योग्य पद्धतीनं होतं हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मैफली करताना थोर व गुरुतुल्य कलाकारांचे व संगीतसाधकांचे भरपूर आशीर्वाद व प्रेम मला लाभत आलं. जाणकार व संगीतप्रेमी रसिकांच्या मनात आपुलकीचं स्थान निर्माण झालं. हे सगळं खरं असलं तरी आजही मैफल सुरू करताना एखाद्या नवकलाकाराप्रमाणेच माझ्या मनात एक हुरहूर, एक अनामिक भीती असते. आपल्या महान गुरूंचं नाव आपण राखू शकू ना अशी एक मानसिक अवस्था असते. आजही सर्वस्व झोकून गाण्याची उमेद माझ्यात आहे. यालाच मी निरपेक्ष व्यावसायिकता (सेल्फलेस कमिटमेंट) असं म्हणते. गाणं मनासारखं झालं तर सर्वार्थानं कृतार्थ झाल्यासारखं वाटतं; पण जर मनासारखं नाही झालं तर अंतर्मुख होऊन स्वतःला कोषात बंद करायची प्रामाणिकताही मी बाळगून आहे. त्याचा अर्थ एवढाच ः माइल्स टू गो बिफोर आय स्लीप...