माणुसकी जपणाऱ्या माणसाचं गोंदण: ऑल इज वेल | Writer Sandip Kale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

All is well book

माणुसकी जपणाऱ्या माणसाचं गोंदण: ऑल इज वेल

sakal_logo
By
संदीप काळे

माणसं जोडून माणुसकी जपणाऱ्या माणसाचं आत्मचरित्र..

ऑल इज वेल हे संदीप काळे यांचे आत्मचरित्र आहे. नांदेड जिल्ह्यातील पाटनूर या छोट्याशा गावातून त्यांचा सुरू झालेला प्रवास ते एक यशस्वी पत्रकार असा जीवनप्रवास यात वाचायला मिळतो. खूप वेगळी भाषा या पुस्तकाची आहे. अलीकडे अशी कलाकृती फार कमी वाचायला मिळते. साधेपणाचा साज या पुस्तकाला लागला आहे. खरंतर आत्मचरित्र वाचल्याने वाचकाच्या जीवनाला दिशा मिळत असते. हे आत्मचरित्र वाचल्याने प्रत्येक वाचकाला जीवन जगण्याची दिशा मिळते. प्रत्येक पान वाचतांना वाटते आता पुढे काय होणार. पुस्तक हातात घेतल्यावर आपण खाली ठेवत नाही.

एखाद्या व्यक्तीची जडणघडण होत असताना अनेक घटकांचा संबंध येत असतो.लहानपणी त्यांच्या जिवनात आलेली माणसं आई, वडील , आजोबा यांचे योग्य संस्कार त्यांना मिळाले आहेत. शाळा या घटकाचे विशेष आकर्षण अगदी लहानपणापासूनच होती. आपल्या जडणघडणीत शाळेतील शिक्षक यांचे मोठे योगदान आहे हे वाचताना जाणवते. आपलं गाव, माणसं याबद्दल विषेश प्रेम पाहायला मिळते. गावातली माणसे किती प्रेमळ असतात हे प्रत्येक शब्दातून दिसते. त्यांच्या लहानपणी घडलेल्या अनेक प्रसंगातून आपल्याला नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी प्रेरणा मिळते.

त्यांना भेटलेल्या सामान्य माणूस सुद्धा जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान सांगून जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सांडस गावचे बापू. एका प्रसंगात बापू सांगतात, एखादा माणूस तुम्हाला आवडला तर त्याच्या हाताची किंवा पायाची ऊर्जा आपल्याला लागली पाहिजे. साधी सरळ असणारी माणसं सहजपणे जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात. या आत्मचरित्रात अशी अनेक माणसं वाचायला मिळतात. अगदी लहानपणी लागलेली वाचनाची आवड त्यांच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी करणारी आहे.

गावाकडचं वातावरण , ग्रामीण संस्कृती यावर नेमकेपणाने भाष्य केले आहे. दारू, निवडणुका , जातीव्यवस्था यावर अगदी तटस्थपणे आणि परखडपणे केली आहे. दारूची समाजाला लागलेली कीड कशी घातक आहे यावर खूप चांगलं चिंतन केले आहे. परीक्षांमधील कॉपी सारखा प्रकार अगदी सहजपणे आणि बिनधास्तपणे रेखाटला आहे. ग्रामीण संस्कृती मधील लग्न व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेली किस्से वाचतांना हास्याची लकेर आपल्या चेहऱ्यावर उमटल्याशिवाय राहात नाही.

कॉलेज जीवनामध्ये तुम्हाला मिळालेल्या संधीच सोन करण्याची एक वेगळा मूलमंत्र यात वाचायला मिळतो. प्रत्येक तरुण वाचकाला व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी हे आत्मचरित्र एक वरदान आहे. कॉलेज जीवन म्हणजे केवळ मौज मजा हा एक वेगळा समज तरुणांमध्ये आहे. पण याच्या जोडीला संदिप सरांनी कॉलेजमधील इतर व्यक्तिमत्त्व विकासाच्या गोष्टीत सहभाग घेउन त्यांच्या जीवनाला एक टर्निंग पॉइंट दिला आहे. संदीप सरांचं कॉलेज जीवनाची जडणघडण ही प्रत्येक तरुण वाचकांसाठी एक कार्यशाळा आहे. कॉलेजमधील शिक्षक, मिळालेले मित्र, योग्य संघटनेशी आलेला संबंध , त्यातुन भेटलेली माणसं या गोष्टी एक सामजिक व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी कशी उपयुक्त आहेत हे नक्कीच वेगळं वाचायला मिळते. एक छोटीशी फुललेली प्रेमकहाणी पण यात वाचायला मिळते.

करीयरच्या योग्य वळणावर योग्य माणसं भेटणं खुप गरजेचं आहे. संदीप सरांना त्यांच्या जीवनात खूप माणसं भेटली. चळवळीच्या माध्यमातून अनेक लोकांना जवळून अनुभवता आले. जी चांगली माणसं भेटली त्यांच्यासमवेत अजुन त्यांचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. माणसाला यश मिळालं की तू मागे वळून पाहत नाही पण संदीप सरांच्या बाबतीमध्ये ते नेहमी आपल्या भूतकाळात रमताना दिसतात. अगदी प्रांजळपणे त्यांच आपल्या जीवनातील योगदान व्यक्त करतात.

ऑल इज वेल आत्मचरित्रात संदीप सरांनी सहजपणे त्यांचे जीवन मांडले आहे .जे साधं-सरळ जीवन वाट्याला आलेला आहे ते त्यांनी यात व्यक्त केलं आहे. जीवनाच्या वाटेवर वाटेला आलेले खडतर प्रसंग त्यांनी यात मांडलेले आहेत. कुठेही आलेल्या खडतर प्रसंगाचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही. आत्मचरित्र वाचत असताना ते अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत लिहलेले असल्याने ते मनाला अगदी सहज भावते. ग्रामीण भागातून शिक्षणं घेणाऱ्या प्रत्येक तरुणांना त्यांचे हे आत्मचरित्र मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. संदीप सरांना माणसं जोडण्याचा जणू काही छंदच आहे. ज्यांना जीवनाच्या प्रवासात माणसं सोडून माणूसपण जपायचे असेल त्यांनी सरांच आत्मचरित्र नक्कीच वाचले पाहिजे. सहित्यामधला अनमोल ठेवा ‘ऑल इज वेल‘ हिंदी, इंग्रजी, मराठी या तिन्ही भाषेत आहे.

पुस्तक परीक्षण: प्रा.कुंडलिक शांताराम कदम

शिक्षक भवन. तळेगाव ढमढेरे

तालुका. शिरूर ,जिल्हा .पुणे

पुस्तकाचे नाव: ऑल इज वेल(मनातला सक्सेस पासवर्ड)

लेखक: संदीप रामराव काळे

प्रकाशन: सकाळ प्रकाशन पुणे

पाने: दोनशे सत्तर

किंमत: दोनशे चाळीस रुपये

loading image
go to top