AlphaGo vs Lee Sedol
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
संगणक प्रोग्राम अल्फागो आणि जगातील सर्वोत्तम गो खेळाडू ली सेडॉल यांच्यातील तो सामना...पहिल्या सामन्यात अनेक तासांच्या संघर्षानंतर ली सेडॉलला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात तर आणखी नाट्यमय घटना घडली. खेळाच्या मधल्या टप्प्यात अल्फागोनं एक चाल खेळली. गोच्या भाषेत ती चाल नंतर ‘मूव्ह ३७’ म्हणून प्रसिद्ध झाली. ती चाल इतकी अनपेक्षित होती की समालोचक काही क्षण गप्प झाले. एका व्यावसायिक खेळाडूनं तर हसून प्रतिक्रिया दिली. कारण त्याला वाटलं की मशिननं चूक केली आहे, पण काही मिनिटांनी सर्वांना समजलं की ती चाल विलक्षण हुशार होती...
दक्षिण कोरियाच्या सोल शहरात २०१६मधील मार्च महिन्यात एक अशी लढत झाली होती, जिच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. ही लढत दोन माणसांमध्ये नव्हती. एका बाजूला जगातल्या सर्वोत्तम गो खेळाडूंपैकी एक असलेला ली सेडॉल होता, तर दुसऱ्या बाजूला एक संगणक प्रोग्राम ‘अल्फागो’ होता. ही फक्त एका खेळाची मॅच नव्हती. अनेकांना वाटत होतं की ही माणूस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातली एक ऐतिहासिक चाचणी होती.