

Amateur Theatre and Marathi Rangbhoomi
esakal
आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com
नवे कलाकार आणि प्रेक्षक घडवण्याचं काम महाराष्ट्रात अनेक दशकं सुरू आहे. इथे हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीने एकमेकांना घडवलं. महाविद्यालयीन स्पर्धा, स्वतंत्र नाट्यसंस्था आणि छोट्या नाट्यजागा यांतून अनेक कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञ पुढे आले आहेत.
‘‘वा, तुमचा नाटकाचा छंद चांगला आहे’’ नाटक करणाऱ्यांना किंवा नाटकाचा अभ्यास करणाऱ्यांना हे वाक्य अनेकदा कानी पडतं. वरकरणी कौतुक वाटतं. पण कधी कधी त्यानंतर विचारला जाणारा प्रश्न बोचतो : ‘‘पण नोकरी काय करता?’’ म्हणजे नाटकाची आवड चांगली, पण ते खरं काम नव्हे. तालमी करणं, प्रयोग उभे करणं, नाटकासाठी वेळ देणं, या सगळ्याला किती गांभीर्याने घ्यायचं, असा प्रश्न त्यातून विचारला जातो. ज्याला पैसे मिळतात तो व्यावसायिक आणि ज्याला मिळत नाहीत तो हौशी, अशी सोपी विभागणी आपण करून टाकतो. पण नाटकाचं जग समजून घेण्यासाठी अशी विभागणी खरंच पुरेशी आहे का?
या प्रश्नाचं एक उत्तर ‘हौशी’ या शब्दात दडलेलं आहे. ‘हौशी’ हा शब्द साधारणपणे इंग्रजीतील ‘अमॅच्युअर’ या अर्थाने वापरला जातो. ‘अमॅच्युअर’ हा शब्द लॅटिन ‘अमातोर’पासून आला आहे. याचा अर्थ प्रेम करणारा. आजकाल मात्र हाच शब्द कमी कौशल्य, अपुरी तयारी किंवा गांभीर्याचा अभाव दाखवण्यासाठी वापरला जातो. ‘अमॅच्युअर’ या शब्दाला असा कमीपणाचा अर्थ चिकटणं ही आधुनिक पाश्चात्त्य रंगभूमीच्या इतिहासातली एक गंमत आहे. गंमत अशी की आधुनिक पाश्चात्त्य रंगभूमी अशाच ‘हौशी’ मंडळींनी घडवली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पॅरिसमधलं आंद्रे आंत्वानचं ‘थिएटर लिब्र’ आणि बर्लिनमधलं ओटो ब्राह्मचं ‘फ्राय ब्यून’ ही वर्गणीच्या आधारावर चालणारी नाट्यसंस्था होती.