esakal | अंबर की पाक सुराही
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

अंबर की पाक सुराही

sakal_logo
By
स्वाती हुद्दार

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक अमृता प्रीतम यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे, त्यानिमित्त त्यांच्या साहित्याचा कानोसा घेणारा लेख...

...और जहॉं भी आझाद रुह की झलक पडे
समझना वह मेरा घर है

मानवतावादाचे पुरेपूर प्रतिबिंब उमटलेली अमृता प्रीतम यांची "मेरा पता' ही कविता, त्यांच्या साहित्याचा स्वभावधर्म सांगणारी आहे. अमृता प्रीतम असेच लिहीत गेली, समकालीन प्रवाहापेक्षा वेगळे, काळाच्या कैक योजनेपुढचे. आणि म्हणूनच त्यांचे साहित्य काळाच्या कसोटीवरही अक्षर ठरले आहे. असाच वैचारिक, व्यक्‍तिगत स्वातंत्र्याचा पुरेपूर उच्चार अमृताजींच्या प्रत्येक साहित्यात दिसतो. त्यांच्या साहित्यातून उमटते निर्भीडता, बंडखोरी, स्त्रीत्वाचा अभिमान आणि फाळणीचे दु:खही. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री स्वातंत्र्याचा इतका स्पष्ट उच्चार करणारे, समाजव्यवस्थेवर ओरखडे ओढणारे साहित्य अमृताजींच्या लेखणीतून प्रसवले आणि त्यांनी भारतीय साहित्य विश्‍वाला सर्वसमावेशक उंचीवर नेले.

अमृताजींचा जन्म 1919 सालचा. बालपण लाहोरमध्ये गेले. स्वातंत्र्य, फाळणी आणि त्याच्या जखमा त्यांनी जवळून अनुभवल्या आणि त्याचे पडसादही त्यांच्या साहित्यात उमटले. फाळणीनंतर अमृताजींनी लाहोर सोडले; पण त्याची स्मृती त्यांच्या मनात कायमची राहिली. फाळणीच्या जखमांनी छिन्नविछिन्न झालेल्या पंजाबचे दु:ख पाहून त्यांचे संवेदनशील मन हळवे झाले आणि त्यांच्या लेखणीतून "आज आंखा वारिस शाह नु' ही कविता उमटली. ही कविता अमृताजींच्या साहित्यप्रवासातील मैलाचा दगड ठरली. पिंजर या कादंबरीतूनही त्यांनी फाळणीचे दु:ख व्यक्‍त केले आहे.
वयाच्या 16 व्या वर्षी प्रीतम यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या अमृताजींचा संसार सुखाचा झाला नाही. योगायोग असा की वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांचे लिखाणही प्रसिद्ध झाले. आयुष्याच्या एका वळणावर त्यांना साहिर भेटले आणि अमृताजींच्या लेखणीला तलम फुलपाखरी पंख लाभले. प्रेमाची भावना त्यांच्या कवितेचा प्राण बनली आणि प्रेमाच्या अनेक अनुभूतींचे वर्णन त्यांच्या कवितेतून उमटू लागले.

उमर की सिगरेट जल गयी
मेरे इश्‍क की महक
कुछ तेरी सांसों में
कुछ हवा में मिल गयी

अमृताजींच्या अशरीरी प्रेमाच्या कविता मधुराभक्‍तीची आठवण करून देतात.
मेरी सेज हाजिर है
पर जूते और कमीज की तरह
तू अपना बदन भी उतार दे
उधर मूढे पर रख दे
कोई खास बात नहीं
बस अपने देश का रिवाज है...

ही कविता लिहिणाऱ्या अमृताजी एक साहित्यिक म्हणून खूप उंचावरच्या अढळ तेजस्वी ध्रुवताऱ्यासारख्या भासतात. "सच्चे दुध की तरह मेरी मुहब्बत' असे आपल्या प्रेमाचे वर्णन करणाऱ्या अमृताजींच्या प्रेमकवितांमधून राधा भेटते.
पंजाबच्या मातीचा गंध, पंजाबचा ढंग, पंजाबी संस्कृती त्यांच्या लिखाणातून सातत्याने भेटते.

गर्म घूंट इक तुम भी पीना
गर्म घूंट इक मै भी पीलूँ
उम्र का ग्रीष्म हमने बीता दिया
उम्र का शिशिर नहीं बितता
आ सजन आज बात कर ले

अमृताजींचे साहिरवरचे प्रेम सफल झाले नाही, आणि त्यांच्या आयुष्यात इमरोज नावाचा फरिश्‍ता आला. त्यानंतर अमृता आणि इमरोज हे दोन वेगळे प्रवाह उरलेच नाहीत. आकाशाची गहनता, समुद्राची गंभीरता या नात्यात उतरली. आकाश आणि समुद्राची निळी आभा त्यानंतर या दोघांच्याही जीवनाला व्यापून उरली.
अमृताजींच्या लेखणीची ताकद इतकी जबरदस्त होती की भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा ओलांडून त्यांचे साहित्य विश्‍वाकार झाले आहे. ज्याकाळी महिलांसाठी सुशिक्षित असणेच दुष्प्राप्य होते अशा काळात एका स्त्री साहित्यिकाने आपल्या काळापेक्षा कितीतरी पुढचे विचार साहित्यातून मांडण्याची हिंमत करणे, ही खरेच एक क्रांतीच होती. अमृताजी साहित्यातून जशा दिसल्या तसेच त्या प्रत्यक्ष जीवनातही जगल्या. बेधडक. सच्चा. त्यांचे प्रेम त्यांनी डंके की चोट पे मान्य केले. म्हणूनच त्यांच्या साहित्यातूनही सच्चेपणाची शुभ्र धारा सतत प्रवाहित होताना दिसत राहते. इमरोजवरचे त्यांचे प्रेम एक जन्म पुरण्याइतके नाहीच मुळी, म्हणून त्या म्हणतात,

मै तुझे फिर मिलूँगी
कहॉं कैसे पता नहीं
शायद तेरे कल्पनाओं
की प्रेरणा बन
तेरे केनवास पर उतरुँगी
मै तुझे फिर मिलूँगी

अमृताजींची ही कविता जीवनाचे शाश्‍वत तत्त्वज्ञान सांगते.
एकीकडे प्रेमकवितांची रेशमी लड हातात घेतलेल्या अमृताजींनी सामाजिक, राजकीय विषयावर भाष्य करणारे साहित्यही लिहिले. फाळणीवरची "मजबुर', "मेरा शहर', "राजनीती' या आणि अशा अनेक व्यवस्थेवर कोरडे ओढणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
काव्य हा मूळ गाभा असलेल्या अमृताजींनी कादंबरी, कथा, ललित, गद्य, आत्मचरित्र, डायरी, पत्रे, वैचारिक निबंध असे इतर साहित्यप्रकारही तितक्‍याच समर्थपणे हाताळले आहेत. त्यांचे 16 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. एकाच जन्मात शेकडो जन्मांचे संचित गवसलेल्या अमृताजींनी आपले अनुभवसंपन्न जीवन "रसिदी टिकट' नावाच्या आत्मचरित्रातून मांडले आहे. पद्मभूषण, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी असे सन्मान प्राप्त केलेल्या अमृताजी अंबर की पाक सुराहीच आहेत.
 

loading image
go to top