
धमक्या देऊन ईप्सित साध्य करणं, हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य बनतं आहे. यातूनच कणखर भूमिका घेणारा नेता अशी प्रतिमा बनवत आहेत, मात्र वास्तवात ट्रम्प यांचं बोलणं, त्याचा परिणाम आणि प्रत्येक वेळी त्यांच्या समर्थकांना ट्रम्प यांचीच सरशी झाल्याचा डांगोरा पिटणं यातील फटी दिसायला लागल्या आहेत. ट्रम्प यांच्या या शैलीचा खरा कस चीनसोबतच्या व्यवहारात लागणार आहे. दक्षिण अमेरिकेतील शेजारी देश ट्रम्प यांच्या इच्छेपुढं मान तुकवत असल्याचं निदान दाखवत असले, तरी चीन जशास तसं उत्तर देतो आहे.