बी पॉझिटिव्ह, आम्ही येणार...

कोरियाच्या जगप्रसिद्ध ‘बीटीएस’ बॅण्डचे सदस्य सध्या लष्करी सेवेत दाखल झाले आहेत. दक्षिण कोरियातील तरुणांना दोन वर्षांसाठी लष्करी सेवा करावीच लागते.
Korea Popstar
Korea Popstarsakal

- अमोल परचुरे

कोरियाच्या जगप्रसिद्ध ‘बीटीएस’ बॅण्डचे सदस्य सध्या लष्करी सेवेत दाखल झाले आहेत. दक्षिण कोरियातील तरुणांना दोन वर्षांसाठी लष्करी सेवा करावीच लागते. नियमच आहे त्यांचा तसा; पण त्यामुळे ‘बीटीएस’चे कोट्यवधी फॅन्स हळहळ व्यक्त करताहेत. आपल्या लाडक्या पॉपस्टार्सना लष्करी सेवेतून सूट मिळावी, अशी त्यांची मागणी मंजूर झालेली नाही.

एक मात्र खरं, पुढील दोन वर्षं तरी ‘बीटीएस’ लाईव्ह परफॉर्म करणार नाहीत. ‘दीड-दोन वर्षांचा काळ हा हा म्हणता निघून जाईल’ असं सांगत पुन्हा जोमाने परतण्याचा विश्वास त्यांनी आपल्या चाहत्यांना दिला आहे.

अखेर तो दिवस आलाच... कोरियाच्या ‘बीटीएस’ (बँग्टन सोनियोंदन) बॅण्डमधले उरलेले दोन सदस्यही सक्तीच्या लष्करी सेवेत दाखल झाले. दिवस होता, १२ डिसेंबर २०२३. जगभरात ‘बीटीएस’चे कोट्यवधी फॅन्स आहेत जे ‘बीटीएस आर्मी’ म्हणून ओळखले जातात, ते अक्षरशः हळहळत होते. आपल्या लाडक्या पॉपस्टार्सना लष्करी सेवेतून सूट मिळावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

पण, नियम म्हणजे नियम आणि त्यातून ‘बीटीएस’ अपवाद नाहीत, यावर कोरिया सरकार ठाम राहिलं.  आता सरकारच्या या निर्णयावर बरेच वाद-विवाद सुरू आहेत; पण पुढची दोन वर्षं तरी ‘बीटीएस’ लाईव्ह परफॉर्म करणार नाहीत, हे तर नक्की आहे आणि हाच दोन वर्षांचा विरह त्यांच्या चाहत्यांना असह्य होतोय.         

दक्षिण कोरियातील तरुणांना वयाच्या तिशीपर्यंत दोन वर्षांसाठी लष्करी सेवा करावीच लागते. हा नियम १९५७ पासून अमलात आणला जातोय. महिला यात स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात. उत्तर कोरियासोबत अजूनही युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे हा लष्करी सेवेचा नियम दक्षिण कोरियामध्ये आहे आणि तो सर्वांना पाळावाच लागतो. ऑलिम्पिकमध्ये जर सुवर्णपदक मिळाले असेल, तरच या लष्करी सेवेतून सूट मिळू शकते.

अशाच प्रकारे ‘बीटीएस’ बॅण्डमधील गायकांनाही सूट मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून मागणी होत होती. दोन वर्षांपूर्वी सरकारनेच केलेल्या सर्वेक्षणानुसार, कोरियाला भेट देणाऱ्या दर १३ परदेशी पर्यटकांपैकी एकाने सांगितलं, की ‘बीटीएस’च्या आकर्षणामुळे मी हा देश फिरायला आलोय. एकूणच, ‘बीटीएस’मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधी रुपयांचा फायदा होतोय.

त्यामुळे त्यांना लष्करी सेवेतून सूट मिळावी, अशी मागणी अगदी तिथल्या संसदेतही करण्यात आली. ही मागणी जोर धरू लागताच सरकारने एक नवीन नियम बनवला. हा नियम आता ‘बीटीएस लॉ’ नावाने ओळखला जातो. या नियमानुसार, ज्यांनी ज्यांनी कोरियन संस्कृती जगभरात पोचवण्याचं काम केलं अशा व्यक्ती वयाची तीस वर्षं पूर्ण केल्यानंतरही लष्करी सेवेत दाखल होऊ शकतात. थोडक्यात, लष्करात जाणं ते काही काळ पुढे ढकलू शकतात. 

मोठ्या अपेक्षेने सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांचा या नव्या नियमामुळे हिरमोडच झाला. कारण त्यांची मागणी पूर्णपणे सूट मिळावी, अशी होती. खरं तर यापूर्वी जेव्हा सेलिब्रिटींना सूट द्यावी, अशी मागणी व्हायला लागली तेव्हा लष्करात कमी जोखमीची कामं असणारी एक वेगळी ब्रँच बनवण्यात आली; पण सर्वांना समान न्याय असायला हवा, अशी ओरड सर्वसामान्यांमधून सुरू झाल्यावर ती बंद करण्यात आली.  

लष्करी सेवेतून सूट कुणाला देण्यात यावी, यावरून कोरियाच्या संसदेत यापूर्वीही बरीच चर्चा झालेली आहे. केवळ पदकविजेत्या खेळाडूंनाच अशी सवलत का? यावरूनही बरीच खडाजंगी झालेली आहे. पण, तरीही आणखी कुणाकुणाला सूट मिळावी याची यादी काही अजून बनलेली नाही. तशी यादी बनवायची झाली तर त्यावरून पुन्हा एक वेगळेच राजकारण देशात सुरू होईल, अशी भीती तिथल्या राज्यकर्त्यांना वाटत असते.

कोरियामध्ये जर कुणी लष्करात जायला नकार दिला किंवा या नियमावर आक्षेप घेतला, तर कमीत कमी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो.  इतकेच नाही, तर पुढे आयुष्यभरासाठी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ त्या व्यक्तीला मिळू शकत नाही.   

आपल्याला आता सूट मिळणार नाही, हे लक्षात येताच ‘बीटीएस’मधील एकेक सदस्य लष्करी सेवेत दाखल झाला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बॅण्डमधला ‘किम सॉकजीन’ हा उत्तर कोरियाच्या सीमेवरील लष्करी प्रशिक्षण केंद्रात सहभागी झाला. पुढे मग काही महिन्यांनी जे-होप, शुगा आणि किम नाम-जून हे सदस्य लष्करात दाखल झाले.

याच वर्षी १२ आणि १३ डिसेंबर रोजी किम थियॉन्ग, जिमीन आणि जॉन्गकूक  यांनीही लष्करी सेवेला प्रारंभ केला. ‘बीटीएस’ बॅण्ड व्यवस्थापकांनी यापूर्वीच जाहीर केलंय, की आता ‘बीटीएस रियुनियन कॉन्सर्ट’ २०२५ मध्येच होईल. त्यापूर्वी लष्करातील सैनिकांसाठी एखादा म्युझिकल कार्यक्रम ते करू शकतात.

लष्करात दाखल होण्यापूर्वी किम थियॉन्ग, जिमीन आणि जॉन्गकूक या तिघांनी समाजमाध्यमांवरील लाईव्ह सेशनमध्ये चाहत्यांना आवाहन केलं, ‘आम्हाला निरोप द्यायला मिलिटरी कॅम्पबाहेर येऊ नका. तिकडे गर्दी करू नका. तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे याची आम्हाला कल्पना आहे; पण आम्हाला निरोप द्यायला गर्दी केलीत, तर त्याचा त्रास यंत्रणांना होईल.’

खरं तर, गेल्याच वर्षी ‘प्रूफ’ हा अल्बम आल्यावर चाहत्यांना उगाच असं वाटत होतं की आता आपले हे लाडके गायक लष्करात जाणार नाहीत; पण तसं झालं नाही आणि आता जगभरात पसरलेल्या चाहत्यांमध्ये नैराश्याची भावना तयार झाली आहे. समाजमाध्यमांवर कोट्यवधी मेसेज, मिम्स, व्हिडीओंमधून हे स्पष्टपणे जाणवतं, की ‘बीटीएस’ची लोकप्रियता किती जबरदस्त आहे.

‘बीटीएस आर्मी’ म्हणजेच जगभर पसरलेले जे फॅन्स आहेत त्यांना खरं तर नुसतं फॅन्स म्हणणं योग्य ठरणार नाही. ‘बीटीएस’ची गाणी, पोस्ट्स, व्हिडीओज लाईक करणं, बीटीएस कॉन्सर्टना हजेरी लावणं एवढ्यापुरती त्यांची भक्ती मर्यादित नाही. त्यांची ‘बीटीएस’वर निष्ठा आहे.

‘बीटीएस’चा जास्तीत जास्त प्रसार करणं हे त्यांचं मिशन आहे, म्हणूनच त्यांना ‘आर्मी’ म्हणतात. ‘बीटीएस’चं नवीन गाणं आलं रे आलं, की ते अल्पावधीत कसं हिट होईल, ग्लोबल म्युझिक चार्टमध्ये ते सतत पहिल्या क्रमांकावर कसं राहील यासाठी ही ‘आर्मी’ सतत काम करत असते. ‘बीटीएस हॅशटॅग’ सगळ्या समाजमाध्यम प्लॅटफॉर्म्सवर सतत ट्रेंडिंग ठेवणं, ‘बीटीएस’बद्दल अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडीओला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवून देणं, बीटीएस फॉलोअर्सची संख्या सतत वाढवत ठेवणं असा चहूबाजूंनी ‘बीटीएस’चा प्रसार ते करत असतात.

‘बीटीएस बॅण्ड’चे सदस्यही नेहमी समाजमाध्यमांच्या माध्यमातून आपल्या या आर्मीशी जोडलेले असतात. त्यांच्या व्हिडीओ मीट्स होतात तेव्हा जगातले कोट्यवधी फॅन्स लाईव्ह असतात. ‘बीटीएस बॉईज’सुद्धा प्रत्येक देशातल्या फॅन्सबरोबर आपुलकीने बोलतात. भारतातील चाहते असतील तर ‘नमस्ते’ म्हणून संवाद साधतात. या त्यांच्या विनम्र स्वभावामुळेही ते तरुणाईला खूप आपलेसे वाटतात. 

भारतासारख्या देशात ‘बीटीएस’ची लोकप्रियता किती आहे हे समजून घ्यायला एक उदाहरण पुरेसे आहे. याच वर्षी १२ मार्च रोजी सेऊलमध्ये ‘बीटीएस’ची ‘परमिशन टू डान्स’ ही कॉन्सर्ट झाली होती. त्याचे लाईव्ह प्रसारण आपल्याकडे ‘पीव्हीआर’ने मुंबई-पुण्यासह देशभरातल्या मोठ्या शहरांमध्ये तिकीट लावून केले होते.

महागडी तिकिटे असूनही हे लाईव्ह शो हाऊसफुल होते. त्यात अर्थातच तरुणाईची संख्या जास्त होती आणि त्यातही टीनएजर मोठ्या संख्येने होते.  शाळकरी मुलांच्या बोलण्यातही आता बीटीएस गाण्यांचे  बोल आणि कोरियन शब्द मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळतात.

‘बीटीएस’ची थोडक्यात पार्श्‍वभूमी 

१९९३ मध्ये आलेल्या ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटात ह्युंदाई या कोरियन ब्रॅण्डच्या कार दिसल्या आणि त्यामुळे परदेशात या कंपनीची मागणी प्रचंड वाढली. या एका घटनेने कोरियाने आर्थिक महासत्ता बनण्यासाठी सांस्कृतिक चलन बळकट करण्याचा मार्ग निवडला. चित्रपट, संगीत, टीव्ही शो, फॅशन अशा सर्व कलाक्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष पुरवलं जाऊ लागलं.

पुढे के-कल्चर पूर्ण भारतात आणि त्याचवेळी संपूर्ण जगात पसरायला लागलं. ‘ओल्ड बॉय’ चित्रपट कान महोत्सवात पोहचला आणि कोरियन स्टार्स हॉलीवूडपटात झळकायला लागले.  २०१२ मध्ये ‘गंगम स्टाईल’ गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला. यू-ट्युबवर सर्वाधिक लाईक्स मिळवण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड या गाण्याने मिळवला. पुढच्याच वर्षी म्हणजे २०१३ मध्ये ‘बीटीएस बॅण्ड’चा जन्म झाला.

अल्पावधीतच विशीतल्या गायकांचा हा बॅण्ड जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. ‘बीटीएस’ची गाणी सामाजिक, राजकारण या विषयांवर आधारित होती, त्यामुळे तरुणाईचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत गेला, असं म्हटलं जातं.  अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ या अमेरिकेतील वर्णद्वेषविरोधी आंदोलनातही ‘बीटीएस’ने उडी घेतली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते भारताचे राष्ट्रपती, सर्वांच्या भाषणात ‘बीटीएस’चा उल्लेख व्हायला लागला.  इतकी देदीप्यमान लोकप्रियता मिळवून यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना त्यांच्या कारकिर्दीत असा दोन वर्षांचा खंड पडणं, हे ‘बीटीएस’च्या भवितव्यासाठी अतिशय धोकादायक आहे, असं पाश्‍चात्त्य देशातील काही तज्ज्ञांना वाटतं. बीटल्स ग्रुप जेव्हा फुटला तेव्हा जी प्रतिक्रिया होती साधारण तसेच काहीसे ‘बीटीएस’बाबतीत होत आहे, असंही काहींना वाटतं. 

सर्वात शेवटी म्हणजे दहा दिवसांपूर्वी लष्करात गेलेला ‘जॉन्गकूक’ चार आठवड्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये होता. तिकडे तो जिमी फॅलनच्या ‘द टूनाईट शो’मध्ये अवतरला. टाइम्स स्क्वेअर रूफटॉपवरून एका कॉन्सर्टमध्ये गायलाही. अर्थातच, तो व्हिडीओ टिकटॉकवरून प्रचंड व्हायरल झाला. त्यापूर्वी त्याने गायलेलं जस्टिन टिंबरलेकच्या गाण्याचं थ्री-डी रीमिक्स अजूनही गाजतेय. नोव्हेंबर महिन्यात त्याचा ‘गोल्डन’ हा सोलो अल्बम आला आणि त्याने आजपर्यंतचे कोरियन सोलो गायकाचे सगळेच्या सगळे विक्रम मोडले. त्याचा डान्स व्हिडीओ टिकटॉकवर ट्रेंडिंगला आहे. 

याच कारणामुळे अशीही शक्यता वर्तवली जात होती, की बीटीएस सदस्य जेव्हा पुन्हा सार्वजनिक आयुष्यात परततील तेव्हा ‘जॉन्गकूक’सारखे सोलो अल्बम काढतील. ते पुन्हा एकत्र कॉन्सर्ट करणार नाहीत; पण ‘बीटीएस’ची एजन्सी ‘बिगहिट म्युझिक’ यांनी ही शक्यता नाकारली आहे. २०२५ मध्ये बीटीएस रियुनियन कॉन्सर्ट होणार आणि त्यात सर्वच्या सर्व सहा सदस्य सहभागी होणार हे त्यांनी जाहीर केले आहे.  कोरियाच्या संरक्षण मंत्रालयानेही बीटीएस सदस्यांना लष्करी सेवेत असताना एकत्र येऊन सराव करण्याची मुभा दिलेली आहे. 

लष्करात दाखल होण्यापूर्वी बीटीएस सदस्यांनी त्यांच्या ‘आर्मी’ला सांगितले, ‘गेली दहा वर्षे आम्ही गातोय, तुमचे प्रेम या काळात जसे टिकून आहे, तसेच ते यापुढेही राहू दे... दीड-दोन वर्षांचा काळ हा हा म्हणता निघून जाईल.’ आपल्या गाण्यांतून ‘बीटीएस’ बॅण्डने तरुणांना स्वतःवर प्रेम करायला आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायला शिकवलं. आताही त्यांचं तेच म्हणणं आहे.

‘बीटीएस’ बॅण्डचे आता पुढे नक्की काय होणार, याकडे केवळ चाहतेच नाही; तर जागतिक संगीताच्या बाजारपेठेतील दिग्गजही लक्ष ठेवून आहेत.

(लेखक चित्रपट, नाटक आणि विविध कलामाध्यमांचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com