चैतूचा खऱ्या आईचा शोध

नोव्हेंबर महिना हा ‘आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना’ म्हणून साजरा केला जातो, तर ९ नोव्हेंबर हा दिवस जगभरात ‘दत्तक विधान दिवस’ म्हणून साजरा होतो.
Mother
MotherSakal

- अमोल परचुरे

९ नोव्हेंबर ‘दत्तक विधान दिवस’ आणि १० तारखेला ‘नाळ २’ प्रदर्शित होतोय. त्यातील चैतूला खऱ्या आईचं प्रेम मिळेल का, ते कळेलच; पण लाखो अनाथांशी नाळ जुळेल असे नवीन पालक त्यांना मिळोत, हीच या दिनानिमित्त अपेक्षा...

नोव्हेंबर महिना हा ‘आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना’ म्हणून साजरा केला जातो, तर ९ नोव्हेंबर हा दिवस जगभरात ‘दत्तक विधान दिवस’ म्हणून साजरा होतो. यावर्षी त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० नोव्हेंबरला ‘नाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय, हा एक चांगला योग म्हणावा लागेल. २०१८ मध्ये आलेला ‘नाळ’ आणि त्यातल्या दत्तक चैतूचं विश्व गलबलून टाकणारं होतं.

आजही कधी तो चित्रपट टीव्हीवर बघताना चैतूची भूमिका साकारणाऱ्या लहानग्याचं खूपच कौतुक वाटतं. आता तोच चैतू खऱ्या आईला भेटायला विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात आलाय असं टीझरमधून बघायला मिळालं. पुढे नेमकं काय होणार याची उत्सुकता आहेच; पण त्याच निमित्ताने विविध चित्रपटांमधून ‘दत्तक’ हा विषय कसा मांडला गेला याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

हॉलिवूडपटात ‘दत्तक’ या विषयावरचे असे अनेक चित्रपट आहेत. अत्यंत तरल आणि संवेदनशील मांडणी असलेले ‘द ब्लाइंड साईड’सारखे चित्रपट आहेत, तसेच ‘इन्स्टंट फॅमिली’सारखे विनोदी चित्रपटही आहेत. ‘डेसपिकेबल मी’ या ॲनिमेशनपटातही ‘ग्रू’ हे मुख्य पात्र मार्गो, ॲग्नेस आणि एडिथ या लहान मुलींना दत्तक घेतो, पण त्याचा उद्देश त्या मुलींचा वापर चोरी करण्यासाठी असतो.

२०१६ मध्ये आलेल्या ‘लायन’ या चित्रपटात देव पटेलने प्रमुख भूमिका साकारली होती. भारतातल्या एका गरीब कुटुंबापासून विभक्त झालेला लहानगा ‘सरू’ याला ऑस्ट्रेलियामधील जोडपं दत्तक घेते. ‘सरू’चं आयुष्य बदलून जातं, पण तरीही वयाच्या २५ व्या वर्षी त्याला खऱ्या आईला भेटायची ओढ निर्माण होते आणि भारतात येऊन तो आईचा शोध घेतो.

बॉलीवूडमध्ये मात्र ‘गोद’ घेतलेले नायक आणि मग क्लायमॅक्सला कधीतरी त्यांना खरं काय ते समजल्यावर ओक्साबोक्षी मेलोड्रामा असंख्य चित्रपटांमधून दिसलेला आहे. अगदी ‘सीमा’पासून ते ‘राजाबाबू’ आणि ‘मिशन काश्मीर’पर्यंत असंख्य असे चित्रपट आहेत, ज्यात दत्तक हा विषय मुख्यतः मेलोड्रामा पद्धतीनेच मांडलेला आहे.

मणिरत्नम यांनी २००२ मध्ये ‘कन्नाथिल मुथामित्तल’ या चित्रपटात ‘दत्तक’ मुलीची व्यथा मांडली होती, पण तो पूर्णपणे ‘दत्तक विधान’ विषयावरचा चित्रपट म्हणता येणार नाही. शेखर कपूर यांनी ‘मासूम’मध्ये हा विषय थोड्या संवेदनशील पद्धतीने दाखवला होता, पण त्यात पती-पत्नी यांच्यातील संबंधांवर मुख्य फोकस होता.

‘गुलमोहर’ चित्रपटात वयाच्या पन्नाशीतही दत्तकपुत्र असल्यामुळे स्वतंत्र ओळख मिळवण्यासाठी अस्वस्थ असणारी मनोज वाजपेयीची व्यक्तिरेखा जमून आली होती; पण तिथेही केंद्रस्थानी ‘दत्तक’ विषय नव्हता. यामुळेच ‘नाळ’सारख्या चित्रपटातला ‘दत्तक’ चैतूचा विषय आणि त्याचं वेगळेपण ठळकपणे जाणवतं.

वयाची चाळिशी ओलांडल्यावर सगळं सुस्थितीत असतानाही ‘दत्तक’ व्यक्तींना आपली मुळं शोधण्याचा ध्यास लागतो, हे काही जणांना फिल्मी वाटू शकतं, पण खऱ्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात. अगदी अलीकडेच आनंद केपर हा ४३ वर्षांचा डच नागरिक भारतात आला होता, त्याबद्दलची बातमी वाचली. गेल्या बारा वर्षांत तो तीन वेळा भारतात येऊन गेला, कारण त्याला आत्याच्या खऱ्या आईचा शोध घ्यायचा आहे. माटुंगा येथील अनाथाश्रमातून त्याला १९८० मध्ये डच कुटुंबाकडे दत्तक देण्यात आलं होतं.

आता तो अमस्टरडॅम जवळच्या छोट्या शहरात शिक्षक आहे, सुखाने जगतोय... पण तरीही त्याला आपली खरी आई शोधायचा ध्यास स्वस्थ बसू देत नाही. अशी अनेक उदाहरणं जगभर सापडतील. वय जसं वाढत जातं तसं ‘दत्तक’ व्यक्ती नव्या कुटुंबात सामावून जातात, पण तरीही आत कुठेतरी त्यांना भूतकाळात डोकावण्याची ऊर्मी असतेच. हे काय गूढ आहे ते सगळ्यांना समजणं कठीण आहे, म्हणून चित्रपटातलं त्यांचं चित्रण काहींना अतिरंजित वाटत असतं.

दुसरीकडे, मूल दत्तक घेण्याची इच्छा आपल्याकडे अनेक जोडप्यांना असते, पण आपल्या समाजात मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज आहेत. तेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न नोव्हेंबर महिन्यात जगभरात होत असतो. ही प्रक्रिया समजून घेण्याबरोबरच पालक म्हणून मानसिक तयारी होणं, जबाबदारीची जाणीव होणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. चित्रपटाच्या माध्यमातून हे काम किती सहजपणे साधता येतं, त्याचा ‘नाळ’ हा आदर्श नमुना आहे.

चैतूच्या दृष्टिकोनातून जरी चित्रपट दिसत असला तरी त्यातून इतर पात्रांचा समंजसपणाही अधोरेखित होतो. दत्तक मूल म्हणजे सावत्र वागणूक असं चित्रण बऱ्याच चित्रपटात झालेलं आहे, त्यामुळे ‘दत्तक’ मुलांवर त्यांचे पालक कितीही प्रेम करत असले तरी समाजमान्यता मिळताना बऱ्याच अडचणी येतात. यामुळेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून नेहमी हे सांगितलं जातं की, ज्याप्रमाणे अवयवदानासाठी चळवळ उभी राहिली तसंच भरीव काम ‘दत्तक विधान’ कार्यात सर्व स्तरांतून होण्याची गरज आहे.

‘नाळ’ बघताना जाणवतं की चैतूला ज्यांनी दत्तक घेतलंय ते पालक अगदी पोटच्या पोराप्रमाणे त्याला सांभाळतात, त्याला माया लावतात. पण अगदी लहान वयात जेव्हा चैतूलाच समजतं की हे आपले खरे आई-बाबा नाहीत तेव्हा तो सैरभैर होतो. चैतूवर इतकं प्रेम करणारे आई-बाबा असूनही चैतूच्या मनात इतका कोलाहल बघून आपणही हळवे होतो. त्याच्या सुमी आईबद्दलही कळवळा वाटतो आणि चैतूला बघूनही जीव तुटत असतो.

या चित्रपटात कुणी खलनायक नाही, कुणी कजाग नाही, कुणी कुणाचे कान भरत नाही... उलट विदर्भातल्या रखरखीत वातावरणात मायेचा ओलावा काय असतो ते चित्रपटात दिसतं. चित्रपट संपताना लहान कोवळ्या वयात चैतूला आलेली समज बघून मन भरून येतं. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आहेच; पण मुख्य मुद्दा म्हणजे सकारात्मक चित्रणामुळे ‘दत्तक’ या विषयाभोवती असलेलं थोडंफार मळभ दूर करण्यात हा चित्रपट महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

भारतात मूल दत्तक घेण्याच्या आकडेवारीत दिवसेंदिवस घट होत आहे. २०१९-२० मध्ये ३३५१ बालकांना दत्तक घेण्यात आलं. २०२०-२०२१ मध्ये हाच आकडा ३१४२ एवढा होता. ज्या दत्तक संस्था आज या क्षेत्रात काम करत आहेत, त्यांना जनजागृतीची गरज प्रामुख्याने वाटतेय.

‘नाळ’मधल्या चैतूला खऱ्या आईचं प्रेम मिळेल का ते दुसऱ्या भागात कळेलच, पण लाखो अनाथ मुलांशी नाळ जुळेल असे नवीन पालक त्यांना मिळोत हीच ‘आंतरराष्ट्रीय दत्तक दिना’निमित्ताने अपेक्षा आपण करू शकतो.

(लेखक चित्रपट, नाटक आणि विविध कलामाध्यमांचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com