क्रिकेटचे हे नियम माहीत आहेत का?

आपण भारतीय क्रिकेटरसिक अभिमानाने सांगतो की, क्रिकेट हा आमचा धर्म आहे. इथं क्रिकेटर्सना देवाचा दर्जा दिला जातो.
Cricket
CricketSakal
Summary

आपण भारतीय क्रिकेटरसिक अभिमानाने सांगतो की, क्रिकेट हा आमचा धर्म आहे. इथं क्रिकेटर्सना देवाचा दर्जा दिला जातो.

आपण भारतीय क्रिकेटरसिक अभिमानाने सांगतो की, क्रिकेट हा आमचा धर्म आहे. इथं क्रिकेटर्सना देवाचा दर्जा दिला जातो. भारतात क्वचितच एखादं घर असं असेल, ज्या घरात कोणीच क्रिकेट खेळलं नसेल किंवा ज्या घरात क्रिकेट हा खेळ कधीच पाहिला गेला नसेल. आजही भारताच्या गल्ली-बोळी, चाळी, सोसायटीज, मैदानं, आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा खेळ खेळला जातो. आपलं गल्ली क्रिकेट म्हटलं की खेळाच्या नियमांवरून चालू सामन्यात होणारे वाद हे अटळ असतात. आपण ज्या खेळाला श्वास किंवा धर्म मानतो, त्या खेळाचे असेही काही नियम आहेत, ज्यांच्याविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल. आपण आज क्रिकेटमधील असेच काही नियम पाहणार आहोत. ‘आपण आजवर ज्या नियमांचं पालन करून क्रिकेट खेळत होतो, ते तर चुकीचे आहेत’, असा साक्षात्कारही यानिमित्ताने काहींना होऊ शकतो.

‘बॉलिंग टाकताना अम्पायरला साइड सांगितली नाही’ म्हणून आपल्याकडे अम्पायर सर्रास नो बॉल देतो, त्यामुळे एखादा गोलंदाज बॉलिंग टाकायला गेल्यावर त्याला सर्व टीममेट्स ओरडून सांगतात, ‘‘अम्पायरला साइड सांग.’’ पण क्रिकेटच्या नियमांनुसार कोणताही गोलंदाज बॉलिंग टाकायला आल्यावर त्याला ‘तो कोणत्या हाताने, कोणत्या बाजूने, स्पीन की पेस गोलंदाजी करतोय’ हे स्वतःहून विचारून फलंदाजाला कळविणे, हे अम्पायर्सचं कर्तव्य असतं. पुढं गोलंदाजानं अम्पायरला न कळवता दुसऱ्या साइडने किंवा दुसऱ्या हाताने गोलंदाजी केल्यास अम्पायर नो बॉल देऊ शकतात.

आपण गल्ली क्रिकेट खेळताना खेळाडू एकमेकांच्या, अम्पायर्सच्या अंगावर धावून जाणं नित्याचंच असतं; पण क्रिकेटच्या नियमांनुसार खेळाडूंना आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टचं पालन करणे अनिवार्य आहे. मात्र तरीही खेळाडूने नियमांचा भंग करून, लेव्हल ४ चा गुन्हा/गैरवर्तन केल्यास, क्रिकेटच्या ४२.५.२.३ नियमांतर्गत अंपायर्सना खेळाडूंना निलंबित करण्याचा अधिकार आहे.

चुकीचं वर्तन केल्यास खेळाडूला फुटबॉल या खेळाप्रमाणेच संपूर्ण सामन्यासाठी निलंबित करण्यात येतं. म्हणजेच रेड कार्ड आणि खेळाडूंचं निलंबन हे फक्त फुटबॉलपुरतंच मर्यादित आहे, असं नाही. गोलंदाजाने बॉल टाकल्यावर पॉपिंग क्रिजपर्यंत पोहचण्याआधी बॉलचे दोन किंवा अधिक टप्पे पडल्यावर त्याला नो बॉल समजण्यात येऊन पुढच्या चेंडूवर फलंदाजाला फ्री हिट देण्यात येतो. आपल्या गल्ली क्रिकेटमध्ये त्याला सहसा ‘डेड बॉल’ समजलं जातं. नो बॉल किंवा फ्री हिटवर कोणताच फलंदाज स्टम्पिंग आउट होऊ शकत नाही. नो बॉल किंवा फ्री हिटवर फलंदाज चार पद्धतीने बाद होऊ शकतो.

‘रन आउट, ‘क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्यावर’, ‘हँडलिंग द बॉल’ आणि ‘हेतुपुरस्सर दोन वेळा फटका मारल्यावर’ (हिट द बॉल ट्वाइस). सध्याच्या नियमांनुसार ‘हँडलिंग द बॉल’ हा नियम ‘क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण करणे’ या प्रकारात मोडतो.

फ्री हिटला जर मागच्या नो बॉलच्या वेळी स्ट्राइकवर असलेला फलंदाजच पुन्हा स्ट्राइकवर राहिला, तर त्या बॉलवर फिल्डर्सची पोझिशन चेंज करता येत नाही. फक्त सुरक्षेच्या कारणासाठी स्टम्प्सजवळ थांबलेला विकेटकीपर स्टम्प्सपासून अजून मागे थांबू शकतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अपील केल्याशिवाय अम्पायर्स कोणत्याच फलंदाजाला बाद घोषित करू शकत नाहीत. जर एखाद्या फलंदाजाच्या बॅटला चेंडूचा हलकासा स्पर्श होऊन विकेटकीपरने झेल पकडला हे अम्पायर्सच्या लक्षात आलं असेल; पण कोणत्याच खेळाडूने खात्री नसल्यामुळे अपील केलं नाही; तर अम्पायर स्वतःहून त्या फलंदाजाला आउट देऊ शकत नाही.

एलबीडब्ल्यू या प्रकारात फक्त पॅडलाच नव्हे; तर ‘फलंदाजाची बॅट व त्या बॅटला पकडलेल्या हाताच्या मनगटापर्यंतच्या भागाव्यतिरिक्त’ शरीराच्या कोणत्याही भागाला किंवा फलंदाजाने घातलेल्या कोणत्याही संरक्षण उपकरणाला बॉलचा थेट स्पर्श झाल्यास फलंदाजाला बाद दिलं जाऊ शकतं. म्हणून खरंतर एलबीडब्ल्यू म्हणजे ‘लेग बिफोर विकेट’ नव्हे, तर ‘बॉडी बिफोर विकेट’.

फटका खेळल्यावर जर चेंडू स्टम्प्सवर जात असेल, तर फलंदाज पाय, पॅड, बॅट, हेल्मेट यांचा वापर करून तो चेंडू स्टम्प्सवर जाण्यापासून वाचवू शकतो; पण या वेळी हाताचा वापर केल्यास त्याला बाद घोषित करण्यात येतं. पण या परिस्थितीत जर त्याने ज्या हातात बॅट पकडली आहे, त्याच हाताने चेंडू अडवल्यास त्याला बाद घोषित करता येत नाही.

फलंदाज बॅटिंग करताना ग्लोव्हजमध्ये बॅटचा हँडल पकडतात, त्यामुळे त्या ग्लोव्हजला बॅटचाच एक भाग समजलं जातं. म्हणून बॉलचा ग्लोव्हजला स्पर्श होऊन जर क्षेत्ररक्षकाने झेल पकडला, तर फलंदाजाला बाद दिलं जातं; पण बॉलचा ग्लोव्हजला स्पर्श होताना जर त्या ग्लोव्हज आणि बॅटचा संपर्क नसेल, तर फलंदाजाला बाद देता येत नाही. ही दुर्मीळ अशी घटना आहे. श्रीलंकन खेळाडू रंगना हेराथला कसोटीमध्ये या नियमामुळे नाबाद घोषित करण्यात आलं होतं.

एखाद्या गोलंदाजाने सलग तीन चेंडूंवर विकेट घेतल्यास (रन आउट व काही अपवाद वगळता) त्याला ‘हॅटट्रिक’ म्हटलं जातं. ही ‘हॅटट्रिक’ दोन ओव्हर्समध्ये, दोन इनिंग्समध्ये किंवा दोन मॅचेसमध्ये मिळूनही होऊ शकते. पण गोलंदाजाने या तीन चेंडूंच्या मध्ये एखादा वाइड किंवा नो बॉल टाकला, तर त्याला ‘हॅटट्रिक’ म्हणता येत नाही.

समजा की, गोलंदाजाने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्यावर तिसरा चेंडू वाइड (ज्यावर बॅट्समन स्टम्पिंग झाला नाही) किंवा नो बॉल टाकला व त्यानंतर पुढील वैध चेंडूवर त्याने विकेट घेतल्यावरही त्याला ‘हॅटट्रिक’ म्हणता येत नाही. ‘हॅटट्रिक’ होण्यासाठी गोलंदाजाने टाकलेल्या सलग तीन चेंडूंवर विकेट्स घेणं आवश्यक असतं. प्रवीण तांबे यांनी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना केकेआर संघाविरुद्ध २ वैध चेंडूंवर ‘हॅटट्रिक’ घेतली होती. ऑस्ट्रेलियाच्या मर्व्ह ह्युज यांनी तीन वेगवेगळ्या ओव्हर्समध्ये मिळून ‘हॅटट्रिक’ घेतली होती.

क्रिकेट खेळात क्लीन बोल्ड, स्टम्पिंग, रन आउट किंवा हिट विकेट या प्रकारांत स्टम्प्सवरील बेल्स जमिनीवर पडल्याशिवाय फलंदाजाला बाद घोषित करता येत नाही; पण क्रिकेटच्या ८.५ या नियमाद्वारे काही अपरिहार्य कारणामुळे ऑन फिल्ड अम्पायर्स चक्क बेल्सशिवाय सामना खेळवू शकतात. २०१९ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा ॲशेस सामना जोरदार वादळामुळे काही वेळ बेल्सशिवाय खेळवला गेला होता. म्हणजे आपण आजवर गल्ली क्रिकेटमध्ये कधीच बेल्सचा वापर केला नाही, हेदेखील क्रिकेटच्या नियमात तंतोतंत बसतं.

क्रिकेटमध्ये पर्यायी म्हणून क्षेत्ररक्षणासाठी आलेला खेळाडू कर्णधाराप्रमाणे वागू शकत नाही, तो खेळाडूंना गाइड करू शकत नाही किंवा फिल्डिंग सेट करू शकत नाही.

एखाद्या संघाला विजयासाठी एका धावेची गरज असताना फलंदाजाने विजयी चौकार मारला; पण चेंडू सीमारेषेबाहेर जाण्याआधी जर फलंदाजांनी पळून धाव पूर्ण केली असेल, तर फलंदाजाच्या व संघाच्या खात्यात एकच धाव जोडली जाते. फुटबॉल या खेळाला वेळेचं बंधन असल्यामुळे गोलकीपरकडून बऱ्याचदा वेळ वाया घालवण्यासाठी नानाविध हरकती केल्या जातात. क्रिकेटमध्येही फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामधील कोणी खेळाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला, तर अम्पायर्स त्या संघाला किंवा खेळाडूला पहिली आणि शेवटची ताकीद देतात. पुन्हा त्यांनी त्याची पुनरावृत्ती केल्यास त्या संघाला पाच धावांची पेनल्टी देण्यात येते.

मैदानात क्षेत्ररक्षण करताना विकेटकीपर व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने हातात ग्लोव्हज परिधान केल्यास (मस्करीतसुद्धा) त्या संघास तातडीने ५ धावांची पेनल्टी लावण्यात येते. फेक फिल्डिंगचा बनाव करून जर क्षेत्ररक्षक फलंदाजाला धाव घेण्यापासून रोखत असेल, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला शिक्षा म्हणून पाच धावांची पेनल्टी दिली जाते. क्षेत्ररक्षण करताना काही काळासाठी मैदानाबाहेर गेलेला खेळाडू ओव्हर संपल्यावर नजरचुकीने अम्पायर्सना विचारल्याशिवाय मैदानात आला व क्षेत्ररक्षण करताना त्याने चुकून बॉलला स्पर्श केल्यास डेड बॉल घोषित केला जातो व शिक्षा म्हणून पाच धावांची पेनल्टी देण्यात येते.

एखाद्या बॅट्समनने मारलेला फटका क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूच्या हेल्मेटला लागल्यावर कॅच पकडला किंवा रन आउट झाला, तरीही फलंदाजाला बाद घोषित करण्यात येतं. १९७९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली हा खेळाडू ॲल्युमिनिअम बॅट घेऊन मैदानावर फलंदाजीसाठी आला होता. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगने शॉटमध्ये जास्त पॉवर येण्यासाठी बॅटच्या मागच्या बाजूला कार्बन ग्राफाईटची स्ट्रीप लावली होती, त्यावर आयसीसीने चिंता दर्शवली होती. सध्याचं क्रिकेट म्हणजे बॉलर्सचा कर्दनकाळ आहे.

बॅट आणि बॉल यांच्यातला मुकाबला समान व्हावा, यासाठी बॅटच्या आकारावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. बॅटची लांबी १०८ मिलिमीटर, बॅटची कडा ४० मिलिमीटर आणि जाडी ६७ मिलिमीटरपेक्षा अधिक असू शकत नाही. गल्ली क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाल्यावर फलंदाजाचा ‘पहिला बॉल, ट्रायल बॉल’ असा अलिखित नियम असतो; पण आपण गल्ली क्रिकेटमध्ये एमसीसीच्या अधिकृत नियमांप्रमाणे खेळायला सुरुवात केली तर?

(लेखक क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक तसेच एका माध्यमसंस्थेचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com