भारतीय महिला क्रिकेटचा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Woman Cricketer

क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वकरंडक स्पर्धा १९७५ मध्ये पुरुषांनी नव्हे, तर १९७३ मध्ये महिलांनी खेळली होती, ज्यात इंग्लंडच्या संघाने विश्वविजेतेपद मिळवलं होतं.

भारतीय महिला क्रिकेटचा इतिहास

‘आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू कोण?’ या प्रश्नाचं आपल्या तोंडून आपसूकपणे उत्तर येतं, ‘सचिन तेंडुलकर’. पण, सचिनपूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने १९९७ च्या विश्वचषकात मुंबई इथं डेन्मार्क विरुद्ध केला होता.

१९८० मध्ये भारताविरुद्ध मुंबई येथील कसोटीत ‘एकाच सामन्यात शतक झळकावून दहा विकेट्स घेणारा’ इयान बॉथम हा पहिला खेळाडू आहे, असा समज आहे; पण सर्वप्रथम ही कामगिरी १९५८ मध्ये ‘लेडी ब्रॅडमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेट्टी विल्सनने इंग्लंडविरुद्ध केली होती.

क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वकरंडक स्पर्धा १९७५ मध्ये पुरुषांनी नव्हे, तर १९७३ मध्ये महिलांनी खेळली होती, ज्यात इंग्लंडच्या संघाने विश्वविजेतेपद मिळवलं होतं. क्रिकेट इतिहासातील पहिला आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामनादेखील ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या पुरुष संघांमध्ये नव्हे, तर २००४ मध्ये ५ ऑगस्टला इंग्लंड व न्यूझीलंडच्या महिला संघांमध्ये झाला होता.

पण आपल्याकडे प्रेक्षकांचा संपूर्ण ओढा, ग्लॅमर, स्टारडम व परिणामी टीआरपी हा पुरुष क्रिकेटकडं असल्यामुळं महिला क्रिकेट व त्याचा इतिहास आजवर झाकोळला गेला होता. पण, आज परिस्थिती झपाट्यानं बदलत आहे. आपण आता लैंगिक समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत आहोत, असं वाटतं. महिला व पुरुष खेळाडू हा भेदभाव दूर करण्यासाठी ‘बीसीसीआय’ने पहिलं पाऊल उचलत भारतीय क्रिकेटमध्ये वेतन समानता धोरण लागू केलं आहे. महिला आणि पुरुषांमध्ये वेतनाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्वांना समान मॅच फीज म्हणजेच वेतन मिळतं.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचा उंचावलेला आलेख, त्यामुळे प्रेक्षकांची मिळणारी पसंती, बीसीसीआयचं महिला क्रिकेटर्सना मिळणारं प्रोत्साहन यामुळे टीव्ही ब्रॉडकास्टर्सही आता महिला क्रिकेटला गांभीर्याने घेऊ लागले आहेत. आज स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स व शेफाली वर्मा या महिला क्रिकेटपटू शाहरुख खानसोबत टीव्ही कमर्शियल्समध्ये दिसतात. त्यात आता बीसीसीआयने महिला आयपीएल (डब्ल्यूपीएल) ही स्पर्धा सुरू केली आहे. महिला क्रिकेटचं हे नवीन पर्वच म्हणावं लागेल.

व्हायाकॉम १८ कंपनीने महिला आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क पाच वर्षांसाठी तब्बल ९५१ कोटी रुपये देऊन मिळवले आहेत. प्रत्येक सामन्यासाठी साधारण ७.०९ कोटी रुपये ही कंपनी बीसीसीआयला देईल. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या लिलावात स्मृती मंधानाला तब्बल ३.४० कोटी रुपये इतकी बोली लागली, जी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळणाऱ्या सॅलरीपेक्षा अडीच पट आहे. त्यामुळे आज भारतीय महिला क्रिकेट सुवर्णकाळातून जात आहे, हे लक्षात येईल.

पण भारतीय महिला क्रिकेटला कायमच सुगीचे दिवस नव्हते. भारतीय महिला क्रिकेटने अतिशय खडतर काळातून प्रवास केला आहे. आपल्या वाटेत आलेल्या सर्व अडथळ्यांना क्लीन बोल्ड करत आज त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहिलं, तर २६ जुलै १७४५ रोजी इंग्लंडमध्ये ब्रामली व हॅम्बल्डनच्या महिला क्रिकेट संघांमध्ये पहिला क्रिकेट सामना खेळल्याची नोंद आहे. १८८७ मध्ये इंग्लंडच्या यॉर्कशरमध्ये ‘व्हाइट हेदर क्लब’ या पहिल्या महिला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. पुढे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या देशांतही महिला क्रिकेट खेळलं जाऊ लागलं. १९२६ मध्ये पहिल्या ‘महिला क्रिकेट असोसिएशनची’ स्थापना झाली; पण असोसिएशनला १९२९ मध्ये लॉर्ड्‍स क्रिकेट मैदानावर ‘महिलांचे सामने’ खेळवण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. पुढे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनीही आपल्या महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली.

इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये १९३४ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला कसोटी क्रिकेट सामना खेळला गेला. ही मालिका इंग्लंडच्या संघाने २-१ ने जिंकली होती. महिला क्रिकेटच्या जगभरात झालेल्या प्रसारानंतर १९५८ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेची’ स्थापना झाली.

एकीकडे जगभरात महिला क्रिकेट जोर धरत असताना भारतात मात्र परिस्थिती वेगळी होती. भारतात १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला अगदी काही मोजक्या उत्साही महिला क्रिकेट खेळत असत. महिला क्रिकेटसाठी देशात अधिकृत अशी कोणतीच संघटना नव्हती व त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकही नव्हते. त्या काळात क्रिकेट हा फक्त पुरुषी खेळ समजला जात असे.

आजच्या काळातही भारतात मुलींनी क्रिकेट खेळणं ही सामान्य गोष्ट नाही. त्या काळात क्रिकेट खेळण्यासाठी मुलींना घरातून परवानगी मिळणं किती कठीण असेल, याची आपण कल्पना करू शकतो. त्याकाळी महिला संघ बनवून त्यांचा सामना भरेल असा विचारही दुरापास्त होता. पण, त्या कठीण काळातही एका व्यक्तीने महिलांच्या क्रिकेटसाठी स्वतःहून पुढाकार घेतला. त्या व्यक्तीचं नाव होतं ‘महेंद्र कुमार शर्मा’. त्यांनी लखनौमध्ये मुलींचे संघ बनवले, त्यांना प्रशिक्षण मिळेल याची तजवीज केली आणि त्यांचे सामनेही भरवले.

आजपासून ५० वर्षांपूर्वी ते रिक्षातून हातात माईक घेऊन गावभर ‘कन्याओं की क्रिकेट होगी, जरूर आइए’ अशी दवंडी देत फिरायचे. त्यांनी लखनौच्या क्वीन्स अँग्लो संस्कृत कॉलेजच्या छोट्याशा मैदानावर एका शनिवारी महिलांचा क्रिकेट सामना भरवला होता. या सामन्यासाठी अवघे २०० प्रेक्षक जमा झाले होते. त्या सामन्यासाठी ज्या स्कोअररला बोलावलं होतं, तो वेळेत आलाच नाही. मग त्या सामन्यासाठी प्रेक्षक म्हणून आलेल्या शुभंकर मुखर्जी या मुलाला स्कोअररचं काम करावं लागलं.

शर्मा यांनी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी खूप कष्ट घेतले. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच महिलांच्या क्रिकेटलाही सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळावी याच उद्देशाने ते सामन्यांचं आयोजन करायचे. १९७३ मध्ये त्यांच्या पुढाकाराने ‘भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन’ (डब्ल्यूसीएआय)ची स्थापना झाली. १९७३ नंतर भारतीय महिला संघांच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भरवण्यात येऊ लागल्या.

पहिल्यांदा पुण्यात बॉम्बे, महाराष्ट्र व यूपीच्या संघांमधे आंतरराज्य स्पर्धा भरवण्यात आली. त्यात बॉम्बे संघात ‘डायना एडुलजी’ यांचा समावेश होता. त्यानंतर दुसरी स्पर्धा वाराणसीमध्ये भरवण्यात आली, ज्यात आठ संघांचा समावेश होता. तर, कलकत्ता इथे झालेल्या तिसऱ्या स्पर्धेत बारा संघ सहभागी झाले होते. ही संख्या पुढे वाढतच गेली. त्यानंतर रेल्वेज व एअर इंडिया यांचेही संघ यात सहभागी होऊ लागले.

दरम्यान, भारतात अंडर १५, अंडर १९, ‘राणी झाशी’ ही आंतरविभागीय स्पर्धा, राजकोटची आंतरविद्यापीठ स्पर्धा, प्रियदर्शिनी ट्रॉफी अशा अनेक स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षा प्रमिला चव्हाण (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री) यांनी महेंद्र कुमार शर्मांसोबत महिला क्रिकेटचा भारतात प्रसार करण्यात योगदान दिलं. या स्पर्धांचं आयोजन करताना पैशांची कमतरता भासत असे; पण महिला क्रिकेट सुरू राहावं म्हणून या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महेंद्र कुमार शर्मा यांनी आपली लखनौमधील वडिलोपार्जित संपत्तीदेखील विकली.

१९७५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अंडर २५ संघाने भारताचा दौरा केला. त्यांच्यात पुणे, दिल्ली व कलकत्ता येथे तीन कसोटी सामने खेळले गेले. या वेळी भारतीय महिला संघाला माजी भारतीय कप्तान लाला अमरनाथ यांनी प्रशिक्षण दिलं. या मालिकेत तिन्ही कसोटी सामने अनिर्णीत राहिले. पुढील वर्षी ३१ ऑक्टोबर १९७६ ला भारतीय महिला संघाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडीज संघाविरुद्ध बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला.

शांता रंगास्वामी या भारतीय संघाच्या पहिल्या कसोटी कर्णधार होत्या. त्यांनी या सामन्यात ७६ धावांची खेळी केली. हा पहिला सामना अनिर्णीत राहिला व ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पुढे १९७८ मध्ये भारताने महिला क्रिकेट विश्वचषकाचं यशस्वी आयोजन केलं. याच विश्वचषकात १ जानेवारी १९७८ ला ईडन गार्डन्स, कोलकता इथं भारताने इंग्लंडविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना डायना एडुलजी यांच्या नेतृत्वात खेळला. दुर्दैवाने भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना जिंकू शकला नाही; पण याच वर्षी ‘आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेने’ भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनला अधिकृत मान्यता दिली.

७० व ८०च्या दशकात भारतीय महिला संघाला आपली किट सोबत घेऊन ट्रेनच्या सेकंड क्लासने देशभर प्रवास करावा लागत असे. त्यात काही खेळाडूंकरिता सीट्स तर आरक्षितही नसायचे. बऱ्याच वेळा त्यांना एखाद्या शाळेतील हॉलमध्ये मुक्काम करावा लागत असे. सुविधांचा अभाव, मुला-मुलींमधील भेदभाव, महिला क्रिकेटपटूंना तेव्हा मिळालेला दुजाभाव, मैदानांची कमतरता, आजच्या तुलनेत मिळणारा अत्यल्प आर्थिक मोबदला... या सर्वांवर मात करत महिला क्रिकेटपटूंनी स्वतःची ओळख मिळवण्यासाठीची केलेली धडपड ही खरंच प्रेरणादायी आहे.

शांता रंगास्वामी, डायना एडुलजी, संध्या अग्रवाल व सुधा शाह यांसारख्या दिग्गज खेळाडूंचं भारतीय महिला क्रिकेटसाठी फार मोठं योगदान आहे. तब्बल २३ वर्षं दमदार कामगिरी करत महिला क्रिकेटमध्ये अशक्य वाटणारे अनेक विक्रम आपल्या नावे करणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची क्वीन मिथाली राज, दोन दशकं धावणारी ‘चकदा एक्स्प्रेस’ झुलन गोस्वामी, नीतू डेविड, टॉर्च बेयरर अंजुम चोप्रा यांचं भारतीय महिला क्रिकेटच्या उन्नतीसाठी मोठं योगदान आहे. आधीच्या या महिला क्रिकेटपटूंनी जी तपस्या केली, त्याची फळं आताची पिढी चाखत आहे. अर्थात, आजच्या खेळाडूही प्रचंड प्रतिभावान आहेत, यात शंका नाही.

२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषद आयसीसीमध्ये विलीन झाली, त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनसुद्धा बीसीसीआयमध्ये विलीन झाली. तिथून पुढे महिला क्रिकेटची प्रगती वेगाने होऊ लागली. डायना एडुलजी यांनी पुढाकार घेतल्याने, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेटमध्ये खूप सकारात्मक बदल घडलेत. महिला क्रिकेट बीसीसीआयमध्ये सामील झाल्यावर त्यांनी महिला क्रिकेटसाठी खूप काम केलं. भारतीय महिला क्रिकेट संघाने आजपर्यंत २००५ व २०१७ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेटमध्ये काही तांत्रिक फरक आहेत. महिला क्रिकेट सामन्यात सीमारेषा ही पुरुष क्रिकेट सामन्यात असलेल्या सीमारेषेपेक्षा छोटी असते. महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा बॉल (१४० - १५१ ग्रॅम) हा वजनाने पुरुषांच्या क्रिकेट सामन्यातील बॉलपेक्षा (१५५.९ - १६३ ग्रॅम) हलका असतो. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये मैदानातील आतील वर्तुळ हे ३० यार्ड, तर महिलांच्या क्रिकेटमध्ये ते २५ यार्ड असतं. महिलांचा कसोटी सामना हा चार दिवसांचा असतो व प्रत्येक दिवशी १०० ओव्हर्स टाकल्या जातात. हे काही तांत्रिक फरक वगळता पुरुष व महिला क्रिकेटचे इतर सर्व नियम सारखे आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघांचे सामने आता मैदानात, टीव्ही व ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पाहिले जात आहेत, त्याबद्दल समाजमाध्यमांवर चर्चाही होत आहे. फॅन फॉलोइंगच्या बाबतीत भारतातील अनेक महिला क्रिकेटपटू मोठ्या स्टार्सना मागे टाकत आहेत. नुकतंच भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या संघाला धूळ चारत अंडर १९ विश्वचषक विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. त्यात आता महिला आयपीएल (डब्ल्यूपीएल) महिला क्रिकेटमध्ये एक नवीन अध्याय जोडत आहे.

एकेकाळी ‘महिला स्कर्टवर क्रिकेट खेळताना कशा दिसतील’ हे पाहायला येणारे प्रेक्षक आज हजारोंच्या संख्येने तिकीट काढून भारतीय महिला क्रिकेटपटूंचा खेळ पाहायला येतात, भारताचा अंडर १९ महिला संघ विश्वविजेता होतो; स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा यांसारख्या भारतीय खेळाडूंवर करोडोंची बोली लागते व जगभरातील महिला क्रिकेटपटू ‘महिला प्रीमियर लीग’ या भारतीय स्पर्धेत खेळण्यासाठी येतात.

हे सर्व पाहायला ‘स्त्री-पुरुष समानतेचे गोडवे फक्त दिवाळी अंकांतल्या कवितांमध्ये किंवा राजकीय भाषणांपुरतेच मर्यादित न ठेवणारे’, स्वतःची प्रॉपर्टी विकून भारतीय महिला क्रिकेटचा पाया रचणारे, रिक्षातून हातात माइक घेऊन गावभर ‘कन्याओं की क्रिकेट होगी, जरूर आइए’ अशी दवंडी पिटणारे महेंद्र कुमार शर्मा आज आपल्यात हवे होते, त्यांच्या इच्छाशक्तीला, जिद्दीला सलाम !

(लेखक क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक तसेच एका माध्यमसंस्थेचे संचालक आहेत.)