बायो'पीक' (अमोल उदगीरकर)

अमोल उदगीरकर amoludgirkar@gmail.com
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये बायोपिक्‍सचं हे प्रस्थ अचानक कशामुळं वाढलं आहे, ते का लोकप्रिय होताना दिसतात, त्यांचं सर्जनशीलतेशी नातं नेमकं कसं आहे, हे चित्रपट उदात्तीकरण करतात की त्या व्यक्तिमत्त्वाचा साकल्यानं विचार करतात अशा विविध गोष्टींचा परामर्श.

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये बायोपिक्‍सचं हे प्रस्थ अचानक कशामुळं वाढलं आहे, ते का लोकप्रिय होताना दिसतात, त्यांचं सर्जनशीलतेशी नातं नेमकं कसं आहे, हे चित्रपट उदात्तीकरण करतात की त्या व्यक्तिमत्त्वाचा साकल्यानं विचार करतात अशा विविध गोष्टींचा परामर्श.

कामानिमित्तानं मला अनेक फिल्म प्रॉडक्‍शन हाऊसेसना भेटी द्याव्या लागतात. अशाच एक भेटीमध्ये फार रोचक प्रसंग घडला. मी एका प्रॉडक्‍शन हाऊसच्या एका महत्त्वाच्या एक्‍झिक्‍युटिव्हच्या केबिनमध्ये त्याच्याशी चर्चा करत होतो. तितक्‍यात त्या एक्‍झिक्‍युटिव्हला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. केबिनमध्ये मी एकटाच असताना माझी नजर तिथल्या कार्डबोर्डवर गेली. तिथं एक चार्ट लावला होता. मी जिथं बसलो होतो तिथून एकदमच दिसण्यासारखा. मी नजरेला ताण देऊन तो चार्ट वाचला. काय होतं त्या चार्टवर?... अनेक ऐतिहासिक/ प्रसिद्ध/ काही कुख्यात लोकांची नावं! त्या व्यक्तींच्या माहिती, गुण-अवगुण यांचा लेखाजोखाही त्या चार्टवर होता. ते एक्‍झिक्‍युटिव्ह परत आले, तेव्हा त्यांना मी त्या चार्टबद्दल विचारणा केली. त्यांनी दिलेलं उत्तर थोडं धक्कादायक होतं. ते म्हणाले ः ""आमचा पुढचा प्रोजेक्‍ट बायोपिक असणार आहे. बायोपिकसाठी आम्ही पर्याय एक्‍स्प्लोअर करत आहोत.'' बायोपिकचं लोण सर्वत्र कसं पसरलं आहे, हे सांगणारा हा प्रातिनिधिक प्रसंग.
भारतीय चित्रपट उद्योगाचं (हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे एखाद्या चित्रपटातला प्रयोग यशस्वी होतो आहे असं दिसलं, की लगेच इतर लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते त्या यशस्वी प्रयोगाचं रूपांतर एका "ट्रेंड'मध्ये होईल याची पुरेपूर काळजी घेतात. म्हणजे भगतसिंग हे चलनी नाणं आहे हे कळलं, की एकाच वर्षी भगतसिंगांवर चार-चार चित्रपट येतात. "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हिट झाला, की पावसाळी छत्र्यांप्रमाणं रोमॅंटिक चित्रपट "उगवतात.' सध्या मात्र "सीझन ऑफ द फ्लेवर' आहे तो म्हणजे बायोपिक. आपल्याकडं सध्या बायोपिक्‍स किंवा चरित्रपट बनवण्याची जोरदार लाट आली आहे. "भाग मिल्खा भाग', "मेरी कोम', "नीरजा', "संजू', "लोकमान्य', "बालगंधर्व' आणि "...आणि डॉक्‍टर काशिनाथ घाणेकर'सारखे चित्रपट जोरदार चालले आणि "बायोपिक जॉनर'ला सुगीचे दिवस आले. प्रेक्षकांनी या चरित्रपटाच्या ट्रेंडला संमिश्र प्रतिसाद दिला असला, तरी या बायोपिक हंगामाच्या निमित्तानं काही प्रश्न पडतात. तिकीटखिडकीवर चित्रपटानं किती कोटी "छापले' यापलीकडं जाऊन पडणारे प्रश्न. आपल्याकडं जे चरित्रपट बनतात ते मध्यवर्ती व्यक्तिरेखेला संतुलित न्याय देतात का? हे चित्रपट बनवताना निर्माता-दिग्दर्शक जी "सिनेमॅटिक लिबर्टी' घेतात ती कितपत योग्य आहे? हॉलिवूडच्या किंवा जगातल्या इतर चित्रपट उद्योगांमधल्या बायोपिक्‍सशी तुलना केली, तर दर्जाच्या दृष्टीनं आपले बायोपिक कुठं उभे आहेत?

भारतीय बायोपिक्‍सचा इतिहास
वरील प्रश्नांची उत्तर देण्याअगोदर भारतीय बायोपिकचा धावता आढावा घ्यायला पाहिजे. भारतीय बायोपिक्‍सचा इतिहास खूप जुना आहे. अगदी आपल्या चित्रपटांइतकाच. दादासाहेब फाळके यांनी बनवलेला "राजा हरिश्‍चंद्र' हा बायोपिकच आहे, असं म्हणता येईल. राजा हरिश्‍चंद्र हा खरंच अस्तित्वात होता की नाही किंवा अशा नावाची व्यक्ती खरंच होऊन गेली आहे का, वगैरे फाटे फोडायचे नसतील, तर "राजा हरिश्‍चंद्र' हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला पहिला चित्रपट हाच खरा "आद्य बायोपिक' म्हणता येईल. युद्धग्रस्त चीनमध्ये जखमींची सेवा करणारे डॉ. कोटणीस यांच्यावर बनलेला "डॉक्‍टर कोटणीस की अमर कहानी' हा वेगळ्या विषयावरचा चित्रपटही भारतीय बायोपिक्‍सच्या इतिहासातला मैलातला दगड समजला जातो. आपल्याकडं पूर्वी काही चांगले बायोपिक्‍स पण बनले आहेतच. फूलनदेवीच्या आयुष्यावर आधारित "बॅंडिट क्वीन', हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला, एका वकिलाच्या आयुष्यावर आधारित "शाहिद' किंवा "पानसिंग तोमर' ही काही चांगल्या बायोपिक्‍सची उदाहरणं. "भाग मिल्खा भाग' हा भारतीय बायोपिक्‍सच्या प्रवासातला मैलाचा दगड मानला जातो. धावपटू मिल्खासिंग यांच्या आयुष्यातले चढउतार दाखवणाऱ्या या चित्रपटानं बॉक्‍स ऑफिसवर खणखणीत गल्ला जमवला आणि इंडस्ट्रीमधल्या धुरिणींना बायोपिक ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरू शकते याची जाणीव झाली. पूर्वी चार-पाच वर्षांत एखादा बायोपिक यायचा; पण "भाग मिल्खा भाग'च्या यशानंतर एकाच वर्षी सात-आठ बायोपिक बनायला आणि प्रदर्शित व्हायला सुरवात झाली आणि हा आकडा प्रत्येक वर्षी वाढतच चालला आहे. बायोपिकचा दिग्दर्शक विषयाशी किंवा इतिहासाशी प्रामाणिक राहिला, तर तो चांगला चरित्रपट बनवू शकतो हा नियम वरचे चित्रपट अधोरेखित करतात. शेवटी दिग्दर्शक हाच चित्रपटाचा कर्ताधर्ता असतो. शेखर कपूर, हंसल मेहता किंवा तिग्मांषू धुलिया ही मंडळी त्यांच्या कुठल्याही चित्रपटाच्या विषयावर सखोल रिसर्च करतात, जो कुठल्याही चरित्रपटासाठी अत्यावश्‍यक असतो. हे लोक मध्यवर्ती व्यक्तिरेखेचे भले बुरे "ट्रेट्‌स' दाखवताना कुणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. त्यामुळं यांच्या चित्रपटामधल्या व्यक्तिरेखा "लार्जर दॅन लाइफ' न बनता अधिक मानवी बनतात आणि त्यामुळंच त्यांनी बनवलेले बायोपिक्‍स बाकीच्या भारतीय बायोपिक्‍सपेक्षा वेगळे ठरतात. या दिवाळीत प्रदर्शित झालेला अभिजीत देशपांडे या दिग्दर्शकाचा "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा या उदात्तीकरणाच्या सापळ्यात अडकण्याचं टाळतो आणि काशिनाथ घाणेकर या कलाकाराची शोकांतिका समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवतो, ही मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतीय बायोपिक्‍सचं एक सकारात्मक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय बायोपिक फक्त प्रसिद्ध नेत्यांवर/ खेळाडूंवर फोकस करत नाहीच. विमान अपहरणाच्या आणीबाणीच्या प्रसंगी आपला प्राण देऊन प्रेक्षकांना वाचवणारी एअरहोस्टेस "नीरजा', आपल्या मृत पत्नीला आदरांजली देण्यासाठी एकट्यानं पहाड खोदून रस्ता बनवणारा दशरथ मांझी, सगळ्यांना परवडतील असे सॅनिटरी नॅपकिन बनवणारा अरुणाचलम मुरुगनाथम अशा दुर्लक्षित नायकांवरही प्रकाशझोत टाकण्याचं काम आपले बायोपिक्‍स करतात.

अस्सल भारतीय "जुगाड'
अर्थात चांगली उदाहरणं असली, तरी दुर्दैवानं लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं सकारात्मक नाहीत. व्यक्तिपूजा हा आपल्या भारतीय समाजाचा स्थायीभाव आहे, हे एक उघड गुपित आहे. राजकारण असो वा समाजकारण असो वा कार्पोरेट क्षेत्र असो, आपल्याला समूह म्हणून नेहमीच एक मसीहा लागत असतो. मुद्द्यांपेक्षा किंवा इश्‍यूजपेक्षा आपल्याला व्यक्ती मोठ्या वाटतात. भारतीय प्रेक्षकांना बायोपिक आवडण्याचं कारण आपल्या या व्यक्तिपूजक मानसिकतेमध्ये दडलेलं आहे. व्यक्तिपूजा आणि त्यापाठोपाठ येणारं अतिरेकी उदात्तीकरण याचा फटका आपल्या बायोपिक्‍सनाही बसत आहे. "संजू'सारख्या चित्रपटात राजू हिरानीसारखा दिग्दर्शक संजय दत्तच्या आयुष्यातला सोयीस्कर भाग तेवढा उचलून "रंगसफेदी' करण्यात धन्यता मानतो, हे याचंच लक्षण आहे. "मॅचफिक्‍सिंग'च्या आरोपामुळं कारकीर्द संपुष्टात आलेल्या मोहंमद अजहरुद्दीन या क्रिकेटपटूवरचा "अजहर' हा चित्रपट अजहरच्या बिघडलेल्या इमेजची डागडुजी करण्याच्या नादात इतकी अतार्किक वळणं घेतो, की हा चित्रपट अजहरुद्दीनची "पीआर ऍक्‍टिव्हिटी' आहे की काय असा संशय यायला लागतो. "सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली एखाद्याची नकारात्मक प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करणं हा चरित्रपटाचा उद्देश कसा असू शकतो? बायोपिक बनवताना ज्या व्यक्तिविशेषावर तुम्ही चित्रपट बनवत आहात त्याचा सम्यक आढावा घेणं अपेक्षित असतं. मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही बाजू दाखवणं अपेक्षित असतं; पण आपल्याकडचे बायोपिक हा मूलभूत नियम पाळताना दिसत नाहीत. ज्या व्यक्तीवर चित्रपट बनत आहेत त्याचा उदोउदो करण्यावर आपल्याकडं जास्त भर दिसतो. व्यक्तीनं आयुष्यात काहीतरी जगावेगळी आणि भरीव कामगिरी केली आहे, म्हणून त्याच्यावर चित्रपट बनतो हे ठीक आहे; पण आपल्या चित्रपटात तो माणूस कसा परफेक्‍ट आहे, हे दाखवण्यात दिग्दर्शकाची ऊर्जा खर्च होते. त्या माणसाचा "हिरो' करण्यात आपल्याला जास्त रस असतो किंवा "लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा तयार करण्याला प्राधान्य देण्यात येतं. याबाबतीत हॉलिवूडचे चित्रपट आपल्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा ठसा उमटवतात. "वूल्फ ऑफ द वॉलस्ट्रीट' किंवा "द एव्हिएटर'सारखे चित्रपट मध्यवर्ती व्यक्तिरेखांचे त्यांच्या अंगी असणाऱ्या गुण-दोषासकट प्रभावी चित्रीकरण करतात; पण "भाग मिल्खा भाग' किंवा "मेरी कोम' यांच्यामध्ये (ते चित्रपट म्हणून कुणाला चांगले वाटत असले तरी) असं होताना दिसतं का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. मिल्खासिंग यांनी पुरस्कारवाटप समितीवर असताना पुरस्कारांच्या बाबतीत आपल्यावर वारंवार अन्याय केला, असा आरोप मेरी कोमनं जाहीररीत्या प्रसारमाध्यमातून केला होता; पण या कटू प्रसंगाचा उल्लेख दोन्ही चरित्रपटांत दिसत नाही.

आणखी एक "चोरवाट'
भारतीय दिग्दर्शकांनी चोखाळलेली अजून एक चोरवाट म्हणजे एखाद्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवायचा; पण "ऑन पेपर' किंवा अधिकृतरित्या कधीही तसं कबूल करायचं नाही. "द डर्टी पिक्‍चर' किंवा "गुरू' ही काही उदाहरणं. "द डर्टी पिक्‍चर' हा वादग्रस्त अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित होता, तर "गुरू' हा चित्रपट धीरूभाई अंबानीच्या आयुष्यावर बेतलेला होता, असं म्हणतात. निर्माता-दिग्दर्शकांनी तसं अधिकृतरीत्या कबूल न करण्यामागं कायदेशीर कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, ज्याच्या आयुष्यावर चित्रपट बनत आहे त्याच्या कुटुंबीयांकडून परवानगी न मिळणं वगैरे वगैरे. नुकताच अनुराग बसूला किशोरकुमारच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा विचार यामुळंच सोडून द्यावा लागला. मीनाकुमारीच्या आयुष्यावर बनणारा बायोपिकही त्यामुळंच बारगळला. धीरूभाई अंबानी यांनी आपलं उद्योगसाम्राज्य उभारताना व्यवस्थेला अनेकदा हवं तसं वाकवलं, हा इतिहास आहे; पण पडद्यावर असं दाखवणं अंबानी यांच्या वारसदारांना रुचलं नसतं, हे उघडच आहे आणि पाण्यात राहून माशाशी वैर कसं करायचं हा प्रश्न दिग्दर्शक मणिरत्नम यांना पडला नसेलच, असं नाही. शिवाय याला आपल्या भंपक सांस्कृतिक दुट्टपीपणाचीही एक बाजू आहे. धीरूभाई "तेरे बिन बेसुवादी दुनिया' या गाण्यावर नाचत आहेत, प्रणय करत आहेत हे पडद्यावर कसं दाखवायचं? शिवाय नृत्य आणि गाण्यांशिवाय तर आपला चित्रपट पूर्ण होत नाही. मग काय करायचं, तर धीरूभाईंना संहितेमध्ये "गुरूभाई' करून टाकायचं. सगळे प्रश्न एका झटक्‍यात सुटणार. आपले निर्माते आणि दिग्दर्शकांचा हा "जुगाडू' स्वभावही चांगला बायोपिक बनण्याच्या आड येतो.

प्रेक्षक, नैतिकता आणि बायोपिक
आपल्याकडं बनणाऱ्या बायोपिक्‍सवर अनेकदा "ते गॅंगस्टर, गुंड आणि समाजविघातक लोकांचं उदात्तीकरण करतात,' असा आरोप केला जातो. आरोपात काही प्रमाणात तथ्य आहेच. त्यातून आम्हाला न आवडणाऱ्या माणसाच्या बायोपिकवर आम्ही बहिष्कार टाकतो, अशी भूमिका सेन्सिबल समजली जाणारी माणसंही घ्यायला लागतात, तेव्हा काळजी वाटायला लागते. भारतासारख्या गुंतागुंतीच्या समाजात नायक कोण आणि खलनायक कोण हे तुम्ही एकमतानं ठरवूच शकत नाही. आपल्याकडं अनेक जातीय, धार्मिक, वांशिक समूह एकत्र राहतात. त्यांच्या तितक्‍या अस्मिता आणि आदरस्थानं आहेत. यामुळं होतंय काय, की एका समूहाचा नायक हा दुसऱ्या समूहाचा खलनायक असू शकतो आणि उलटंही असू शकतं. राम हा अनेक लोकांचं दैवत असला, तरी या देशात रावणालाही मानणारा एक वर्ग आहे (संदर्भ ः रजनीकांतचा "काला' चित्रपट). गांधीजींना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे, तसंच नथुरामबाबत सॉफ्ट कॉर्नर असणाराही अल्प का होईना; एक वर्ग आहे. त्यामुळे अमुक एक माणूस "खलनायक' आणि तमुक एक "महानायक' असं सरसकट विधान आपल्या देशात करताच येत नाही. आपल्याकडं जो ओपिनियन मेकर मध्यमवर्गीय समाज आहे, त्याच्या चष्म्यातूनच माध्यमं या उदात्तीकरणाच्या मुद्द्याकडं बघतात, त्यामुळं विचित्र प्रश्न उद्भवतात. हा वर्ग संजय दत्तला "दहशतवादी' म्हणून टीका करत असताना त्याहून गंभीर आरोप असलेल्या राजकीय नेत्यांना मात्र डोक्‍यावर उचलून धरतो, हीदेखील वस्तुस्थिती आहेच.

"अँटी हिरो'चं उदात्तीकरण होणं हे बहुतेकदा आपल्या व्यवस्थेचं अपयश असतं. ज्या व्यवस्थेत तळागाळातल्यांना न्याय मिळत नाही अशा ठिकाणी "अँटी हिरो' तयार होण्याची प्रक्रिया जोमात असते. हसिना पारकर (जिच्यावर एक अतिशय सुमार बायोपिक बनला होता) हिच्या घरी कायम आपल्या समस्यांची दाद मागण्यासाठी गरीब श्रमिक मुस्लिम लोकांची कायम गर्दी असायची. कारण निर्ढावलेली व्यवस्था त्यांना न्याय देण्यात कमी पडायची. फूलनदेवी (जिच्यावर "बॅंडिट क्वीन' बनला) ही खासदार म्हणून निवडून येते ती अशाच व्यवस्थेनं गांजलेल्या लोकांमुळं. पांढरपेशा वर्गाला जे खलनायक वाटतात, ते अनेकदा रंजल्यागांजल्यांचे "रॉबिनहूड' असतात हे समजून घ्यायला हवं. यात कुठंही कायद्यानं दोषी ठरवलेल्या लोकांचं समर्थन करण्याचा उद्देश नाही; पण भारतासारख्या गुंतागुंतीचं सामाजिक फॅब्रिक असणाऱ्या देशाचं हेच वास्तव आहे.

"संजू' चित्रपटाच्या निमित्तानं झालेल्या चॅनेलीय चर्चेत अनेकदा प्रेक्षक मूर्ख असतात, त्यांना अक्कल नसते अशा अर्थाची विधानं करण्यात आली. हा प्रेक्षकांना कमी लेखण्याचा प्रकार बंद होण्याची नितांत गरज आहे. आजचा प्रेक्षक हा कधी नव्हे तेवढा प्रगल्भ आहे. इंटरनेट युगातल्या या प्रेक्षकाला चित्रपटाला कितपत गांभीर्यानं घ्यायचं याची चांगली जाण आहे. चित्रपटांत जे होतं ते प्रत्यक्षात करण्याची हुक्की असणारे अल्प लोक आहेत; पण ते तेवढंच. बहुसंख्य भारतीय हा सुजाण मतदार आणि सुजाण प्रेक्षक आहे, असं मला वाटतं. त्यानं "संजू'ला किंवा अशा अन्य काही चित्रपटांना "हिट' केलंय म्हणून त्यांना बालबुद्धीचं समजणाऱ्या वर्गानं आपल्या हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर पडण्याची नितांत गरज आहे.

अर्थकारण आणि मर्यादा
भारतीय प्रेक्षक बायोपिक्‍सच्या प्रेमात पडले आहेत, हे उघडच आहे; पण मागणी तसा पुरवठा करणारी प्रॉडक्‍शन हाऊसेस किंवा स्टुडिओज बायोपिक्‍सच्या प्रेमात का पडले आहेत, हे समजून घेणंही आवश्‍यक आहे. जगातल्या सर्व चित्रपटांच्या प्रेक्षकांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे "अंडरडॉग' नायक. सर्व अडथळ्यांवर मात करून नायक किंवा नायिका आपलं इप्सित साध्य करतात, हे त्यांना पडद्यावर बघायला आवडतं आणि हा नायक खऱ्या आयुष्यातला असला, तर त्याला ते हातोहात उचलून धरतात. अनेकदा प्रेक्षक या "अंडरडॉग' नायकाच्या पडद्यावरच्या प्रवासात स्वतःला बघत असतात. अनेक भारतीय प्रेक्षक बायोपिक्‍सकडं "प्रेरणादायी उत्प्रेरक' म्हणून बघतात. त्यामुळं बायोपिकला एक प्रेक्षकवर्ग नक्की मिळतो. त्याशिवाय तुम्ही ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर बायोपिक बनवत आहात तो प्रसिद्ध असला, तर त्याचा चाहतावर्ग हा निर्मात्यांचा "पोटेन्शिअल प्रेक्षक' असतो. उदाहरणार्थ, पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर असणाऱ्या "भाई' चित्रपटाला किमान पहिल्या आठवड्यात तरी (जो परतावा मिळवून देण्याच्या दृष्टीनं सगळ्यांत महत्त्वाचा असतो) पुलंचा चाहतावर्ग गर्दी करणार हे उघड आहे. हीच गोष्ट "ठाकरे' या बायोपिकलाही लागू पडते. रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट (आरओआय) किंवा परतावा मिळण्याच्या दृष्टीनं हा पोटेन्शियल प्रेक्षकवर्ग निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

रेडिमेड मिळणारी कथा
आणखी एक गोष्ट म्हणजे चित्रपट बनवायचा म्हणजे तुम्हाला कथा शोधण्यापासून सुरवात करावी लागते. ओरिजनल आणि चांगल्या कथानकांचा स्क्रिप्टचा दुष्काळ ही बहुसंख्य निर्मात्यांसमोरची मोठी चिंता आहे. बायोपिकमध्ये कथानकाचा हा प्रश्न नसतो. त्या व्यक्तीच्या जीवनप्रवासाच्या रूपानं तुमच्यासमोर कथानक रेडिमेड तयार असतं. अर्थातच बायोपिकमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आणि फापटपसारा नसणारी पटकथा तयार करणं ही अतिशय आव्हानात्मक गोष्ट आहे; पण अनेक गोष्टींची सुरवातीपासूनच क्‍लॅरिटी असते हेही खरंच. बायोपिक्‍सच्या लाटेत नवीन कथानकं तयार होण्याची प्रक्रिया मंदावत जातं आहे की काय, अशी भीती अनेकदा व्यक्त केली जात असते. ही भीती एकदमच निराधार नाहीये. बायोपिक्‍सच्या भडिमारामुळं "अतिपरिचयात अवज्ञा' या तत्त्वानं बायोपिक्‍सना एका मर्यादेनंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं बंद नाही झालं, तर ओरिजनल, नवीन कथानक देणारे चित्रपट कमी होण्याची सध्या अशक्‍य वाटणारी भीती प्रत्यक्षात येऊ शकते.

मराठी चित्रपटांचं काय?
बायोपिक्‍सच्या लाटेत मराठी चित्रपट उद्योगही अलिप्त राहिलेला नाही. यंदाच्या दिवाळीत दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट यशराजसारख्या बड्या निर्मितीगृहाच्या "ठग्ज ऑफ हिंदुस्थान'समोर लाटेत वाहून न जाता पाय रोवून विश्वासानं उभा टाकला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादही मिळाला. परेश मोकाशी यांचा दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारित "हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' हा चित्रपट तर ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची ऑफिशियल एंट्री होती. मराठी चित्रपट उद्योगानं "बालगंधर्व'सारखा उत्कृष्ट बायोपिकही प्रेक्षकांना दिला आहे; पण अतिरेकी व्यक्तिपूजा आणि उदात्तीकरणाला काही मराठी बायोपिकही काही प्रमाणात बळी ठरले. लोकमान्य टिळकांवरच्या "लोकमान्य' चित्रपटातल्या काही प्रसंगांत टिळकांचं हिंदी ऍक्‍शन हिरोच्या धर्तीवर चित्रीकरण झालं होतं, ते अनेक प्रेक्षकांना खटकलं होतं. डॉक्‍टर बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावरचे बायोपिकही तितके जमून आले नाहीत, अशी टीका झाली होती. या महानायकांवर अजून उत्तम चित्रपट बनू शकले असते. "सिंधुताई सपकाळ', "डॉक्‍टर प्रकाश आमटे', भगवानदादांच्या आयुष्यावर आधारित "अलबेला' हे बायोपिकही अजून चांगले होऊ शकले असते. मात्र, या जॉनरमध्ये मराठी चित्रपटांनी खूप वैविध्य दाखवलं आहे. "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटानं मराठी बायोपिक मोठ्या चित्रटासमोरही किती चांगली कामगिरी करू शकतात, हे सिद्ध केलं आहेच. आगामी "ठाकरे' आणि "भाई' या बायोपिक्‍सडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. रितेश देशमुख आणि रवी जाधव ही दोन बडी नावं छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्‍टवर काम करत आहेत. एकूणच काही अपेक्षाभंग वगळता मराठी बायोपिक्‍स योग्य मार्गानं वाटचाल करत आहेत, असं ठाम विधान करता येईल.

निर्मितीच्या वाटेवरचे बायोपिक्‍स
सध्या डझनभर बायोपिक्‍स सध्या निर्मितीच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. म्हणजे किमान दोन वर्षं तरी हा बायोपिकचा सुगीचा हंगाम व्यवस्थित सुरू राहणार आहे. आगामी बायोपिकमध्ये व्यक्तींचं रोचक मिश्रण आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यावर संजय राऊत बायोपिक बनवत आहेत. आनंदकुमार या गणितज्ञावरच्या "सुपर' या बायोपिकमध्ये हृतिक रोशनसारखा बडा स्टार काम करत आहे. अनेक राजकीय आणि वैयक्तिक चढउतार बघितलेल्या एन. टी. रामाराव या "तेलगू बिडा'वर (आंध्रचा सुपुत्र) तेलगूमध्ये बायोपिक बनत आहे, ज्यात विद्या बालनही एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सिल्क स्मितावरच्या "द डर्टी पिक्‍चर'च्या यशानं प्रेरित होऊन शकीला या पॉर्नस्टारच्या आयुष्यावरही सिनेमा बनत आहे. झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारित "मनकर्णिका' लवकरच प्रदर्शित होईल. "द ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर'मधून माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या आयुष्यातल्या एका वादळी कालखंडाचा आढावा घेण्यात येईल. ऑलिंपिकमध्ये देशाला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्रा या खेळाडूवरच्या बायोपिकची निर्मिती अनिल कपूर करत आहे. पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित "भाई'चा टीझर नुकताच रिलीज झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराच्या आयुष्यावर आधारित सिनेमात चक्क शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे.

बायोपिक्‍सचा ट्रेंड हा दीर्घकाळ इथे राहणार आहे. आपल्या देशात ज्यांच्यावर बायोपिक बनू शकतो अशा लोकांची कमतरता नाही. मात्र, एकूणच भारतीय प्रेक्षक बायोपिक्‍सच्या प्रेमात पडला आहे, असंच सध्याचं चित्र आहे; पण बायोपिक्‍सच "तरारून आलेलं हे पीक' म्हणजे वरून हिरवंगार आणि आतून कीड लागलेली असा प्रकार होऊ नये. कित्येकदा "वाढ' आणि "सूज' यामध्ये लगेच फरक करता येत नाही. त्याला थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. भारतीय बायोपिक्‍सची ही निरोगी वाढ असावी आणि सूज नसावी अशी अपेक्षा आहे.

अभिनेत्यांचा परकायाप्रवेश
चित्रपट हे नेहमीच दिग्दर्शकाचं माध्यम असतं; पण बायोपिकचा मुद्दा येतो, तेव्हा अभिनेताही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण अभिनेत्याला बायोपिकमध्ये अभिनय करताना अक्षरशः "परकाया प्रवेश' करावा लागतो. या प्रक्रियेत अभिनेत्याला आपल्या शरीरयष्टीपासून शब्दोच्चारापर्यंत अनेक गोष्टींत मुळापासून बदल घडवून आणावे लागतात. "गुरू' चित्रपटासाठी अभिषेक बच्चननं आपलं वजन खूप वाढवलं होतं. "दंगल'मधल्या महावीर फोगट यांच्या भूमिकेसाठी आमिर खाननं आळीपाळीनं वजन वाढवलं होतं आणि कमी केलं होतं. आमिरनं वयाच्या पन्नाशीमध्ये हे सगळं केलं, हे खरंच कौतुकास्पद आहे. "ब्यूटिफुल माइंड' या अप्रतिम चित्रपटात रसेल क्रोवे या अभिनेत्यानं जॉन नॅश या महान; पण मानसिक समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या गणितज्ञाची भूमिका केली होती. या भूमिकेत शिरण्यासाठी रसेलनं चाळीसपर्यंतचे पाढे तोंडपाठ केले होते. "द डर्टी पिक्‍चर'साठी विद्या बालननं वजन वाढवलं होतं. "द डल्लास बायर्स क्‍लब'मधल्या एड्‌सग्रस्ताच्या भूमिकेसाठी मॅथ्यू मॅकेटनीनं तब्बल तीस किलो वजन कमी केलं होतं. अशा समर्पित अभिनेत्यांमुळं बायोपिक वेगळ्याच उंचीवर जायला मदत होते.

संशोधकांना "सुगीचे दिवस'
सातत्यानं येणाऱ्या बायोपिक्‍समुळे बॉलिवूडमध्ये "रिसर्चर' किंवा "संशोधक' या दुर्लक्षित जमातीला एकदम सुगीचे दिवस आले आहेत. यापूर्वी आपल्या चित्रपटांत रिसर्चरचा वापर ऐतिहासिक चित्रपटांच्या वेळेसच व्हायचा; पण आता बायोपिक्‍सच्या निमित्तानं एखाद्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीच्या कालखंडावर, भाषेवर, व्यवसायावर अधिकारवाणीनं भाष्य करणाऱ्या संशोधकांची गरज असते. चित्रपटाच्या "ऑथेंटिसिटी'मध्ये हे संशोधक भर घालू शकतात. ऍडमिरल नानावटी यांच्या आयुष्यावर आधारित, अक्षयकुमार अभिनित "रुस्तम'चं उदाहरण बघण्यासारखं आहे. "रुस्तम'मधला नायक नौदल अधिकारी आहे. या अधिकाऱ्याचा वेष कसा असावा, त्याची शारीरभाषा कशी असावी, त्याच्या व्यक्तिरेखेचा "टोन' कसा असावा, यावर मार्गदर्शन करण्यासाठी एक माजी नौदल अधिकारी "ऑन बोर्ड' होता. संहितालेखनापासून त्याचं मार्गदर्शन घेण्यात आलं होतं. सध्या अशा "रिसर्च कन्सल्टंट'ची जाम चलती आहे. बायोपिक्‍सचा हा अजून एक लाभार्थी वर्ग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amol udgirkar write biopic movies article in saptarang