अमृता तू ना...!!!

Amrita Pritam
Amrita Pritamsakal media

अमृता तू ना...!!!

मैं तुझे फिर मिलूंगी

कहां कैसे पता नहीं

शायद तेरी कल्पनाओं

की प्रेरणा बन

तेरे कैनवास पर उतरुंगी

या तेरे कैनवास पर

एक रहस्यमयी लकीर बन

ख़ामोश तुझे देखती रहूंगी

मैं तुझे फिर मिलूंगी

कहां कैसे पता नहीं...

ही कविता वाचताना मला भेटलेली अमृता...अमृता प्रीतम...

प्रेम आणि भावनांनी साकारलेल्या या आयुष्यात, अमृता कधी चर्चिली जाऊ शकत नाही, असे कधीच होत नाही... जिथे प्रेम... तिथे अमृता...

अमृताने जगलेले आयुष्य, या आयुष्यात नवीन आणि वेगवेगळे रंग आहेत, नात्यांचा सुगंध आहे, नात्यांचा सुसंवाद आहे, आठवणींचा खजिना आहे, प्रवासाची उत्सुकता आणि एक प्रकारचा थकवा आहे. अमृताच्या प्रेमाचा हा प्रवास कधी आयुष्यभर टिकतो तर कधी तो प्रवास आयुष्यभर टिकत नाही.

अमृता सारखे प्रेम करणारी स्त्री या जगात दुर्मीळच...

अमृताच्या आयुष्याकडे पाहिल्यावर जितके आयुष्य तिच्या लेखनांने विशाल आणि प्रतिष्ठित आहे, तितकेच तिचे वैयक्तिक आयुष्य एक वेगळे जग आहे. या आयुष्यात सगळे काही असले तरी, एकटेपणा आणि शून्यता देखील आहे जी अमृताला पूर्णता देते तसेच अपूर्णता देते. मनाच्या रिकाम्या भावनेत, जिथे तिला संपूर्णतः शून्य वाटत होते, तिथे तिच्या आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीने रंग भरण्याचे काम केले. आणि, तो व्यक्ती इंद्रजित म्हणजेच अमृताचा इमरोज...

अमृताने जगलेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर एक स्वतंत्र पुस्तक तयार होऊ शकते, इतके तिचे व्यक्तिमत्व अफाट आहे. 1960 आणि 1970 दरम्यान इमरोजला लिहिलेल्या तिच्या पत्रांचे जग देखील इतके विशाल आणि अनुभवांनी परिपूर्ण आहे की त्याकडे आपल्याला कधीच दुर्लक्ष करता येणार नाही. अमृता आणि इमरोज मधील प्रेमाने भरून असलेली सगळी प्रेमपत्रे...एक प्रेमाचे विशाल विश्व आहे. 1960 च्या दशकात शेवटी इमरोज अमृताला भेटतो, आणि तिथून त्यांच्या पत्रव्यवहाराला सुरुवात होते. पत्रांच्या माध्यमातुन सुरू झालेला हा प्रेमाचा प्रवास पुढे, 45 वर्षे टिकतो. इमरोज ज्यावेळेस अमृताला भेटतो, त्यावेळेस अमृता ही दोन मुलांची आई होती आणि तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. दरम्यान, तिला साहिर लुधियानवी आवडतो पण हे नाते कधी पुढे जाऊ शकले नाही. असे, म्हणतात साहिरने लिहिलेली सर्व गीते ही अमृतासाठीच होती...

किताबों में छपते है, चाहत के किस्से

हक़ीकत की दुनिया में चाहत नहीं

ज़माने के बाज़ार में, ये वो शह है

के जिसकी किसीको, ज़रूरत नहीं है

ये बेकार बेदाम की चीज़ है, नाम की चीज़ है...

साहिर लुधियानवीने लिहिलेल्या या गीतातून, त्याने आपल्या प्रेमाबद्दल दुःखी भावना व्यक्त केल्यात. अमृता न मिळाल्याचे दुःख आयुष्यभर आपल्या गीतातून तो मांडत राहिला.....

इमरोज त्या काळात एक उदयोन्मुख चित्रकार होता आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या मुंबई जगात त्याला खूप मागणी होती. अमृता आणि इमरोज यांची मैत्रीण उमा त्रिलोक हिने, त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांना, पुस्तकाचे स्वरुप दिलेले आहे. 'खतों का सफरनामा' असे त्या पुस्तकाचे नाव आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहून आहे, ‘इस किताब में दिए गए अमृता-इमरोज़ के वह मोहब्बत भरे खत हैं, जो इन दोनों की प्यार भरी जिंदगी के अंदर झांकने के लिए एक झरोखा हैं.’

तिच्या पत्रांचा प्रवास आणि तिच्या आयुष्यातील काही सुंदर क्षणांबद्दल वाचल्यावर, आपणही प्रेम केले तर, तसे प्रेम करायला हवे अशी प्रेरणा मिळते. या पत्रातील सर्वांत सुंदर बाब म्हणजे, अमृता आणि इमरोज दोघेही एकमेकांना त्यांच्या आवडीच्या नावाने उद्देशून बोलतात. इमरोज अमृताला, 'आशी', कधी 'बरकते', कधी ‘माजा' तर कधी ‘ज़ोरबी' अशा आपल्या आवडीच्या पंजाबी नावांनी तो अमृताला बोलायचा.

अमृता तिच्या लेखनासाठी जगात प्रसिद्ध होती. अनेक देशात तिला, जगभरातील विविध देशांतील साहित्य आणि कलेवर प्रेम करणारी लोक बोलवायची. इमरोज पासून तिला दूर जाणे आवडत नसे. परंतु इतर देशांमधून सुद्धा तिने इमरोजला लिहिलेल्या पत्रांमध्ये प्रवास करण्याचा अनुभव, त्या देशांची खासियत आणि तिचे दुःख आणि एकटेपणा, ज्याचे तिने त्यात वर्णन केले आहे, हे सगळे वाचतांना एक वेगळाच अनुभव मिळतो. अमृताने बल्गेरिया, मॉस्को, युगोस्लाव्हिया, हंगेरी, रोमानिया, जर्मनी आणि तेहरानचा प्रवास केला आणि तिथून ती इमरोजला सुंदर आणि बोलके पत्र लिहायची. या पत्रांमध्ये ती शहराचे सौंदर्य, तिथले लोक, अनेक गोष्टींच्या किंमतीबद्दल उघडपणे लिहायची आणि तिच्या खूप आवडत्या चहाच्या आठवणीबद्दल सुद्धा.

अमृताला पंजाब मधील सर्वात बंडखोर कवयित्री म्हटल्या जाते. तिचे हिंदी भाषेत देखील खूप चाहते आहेत. अमृताने शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आणि त्या साहित्यातील सगळी पात्रं पूर्ण हक्काने समाजाच्या दारात उभी केलीत त्याचबरोबर साहित्यविश्वात लोकप्रिय देखील केलीत. पण, अमृताला बदनाम करणार्‍यांची देखील कमतरता नव्हती. 1964 मध्ये अमृता आणि इमरोज दोघांनीही, जेंव्हा लग्न न करता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यावर समाजाचे नियम मोडल्याचा मोठा आरोप झाला. दोघे एकाच छताखाली एकत्र राहत होते पण समाजाच्या निकषांनुसार कधीही लग्न केले नाही. त्या काळात, लग्नाशिवाय एकत्र राहणे हा एक मोठा निर्णय होता आणि समाजात ही एक नवीन गोष्ट होती ज्याचा पाया दोघांनीही त्या काळात घातला होता.

अमृताला जेंव्हा तिला तिच्या या निर्णयाबद्दल विचारले जायचे, तेंव्हा तिचे उत्तर असे असायचे, 'आम्ही दोघांनी प्रेमाचे बंधन आणखी दृढ केले आहे. प्रेम हा लग्नाचा आधार असताना आपण कोणता सामाजिक नियम किंवा बंधन तोडले आहे? आम्ही शरीर, मन, कर्म आणि शब्दांनी आमचे नाते निभावले आहे, जी इतर अनेक जोडपी कधीही करू शकणार नाहीत. आम्ही प्रत्येक अडचणीचा सामना केला आहे, हे नाते आम्ही एकत्र आणि प्रामाणिकपणे जगलो.'

अमृता और इमरोज दोघेही आपल्या दिल्ली स्थित घरी एकत्र राहायचे, खूप कमी वेळा बाहेर पडायचे. अमृताचे मित्र आणि सुप्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग नेहमी त्यांना आपल्या घरी बोलवायचे. पण, कालांतराने ते कमी झाले. एकदा, खुशवंत सिंग यांनी त्यांना फोन करून विचारले, " तुम्ही बाहेर का पडत नाही आहात? दिवसभर तुम्ही घरी काय करता?" त्यावर, अमृताने रोचक पद्धतीने उत्तर दिले, "गल्लां यानी बातें और वो हंस दी."

दिवसभर ते एकमेकांना न थकता बोलायचे.

नात्या मधील सुसंवाद हाच तर असतो...

अमृताने तिचे दुःख आणि वेदनेला तिच्या साहित्यिक पात्रांमध्ये साकारले आणि स्वतःला आलेले दुःखी अनुभव यात आयुष्यभर ती गुरफटून राहिली, परंतु इमरोज तिच्यासोबत असणे, हे सर्वात मोठा दिलासा देणारे होते.

अमृताच्या उत्तरार्धातील आयुष्यात, इमरोजने तिची खूप सेवा केली. नेहमी तो तिच्या सोबत असायचा. अमृता इमरोजच्या पाठीवर साहिरचे नाव लिहायची, पण इमरोजला कधीही याबद्दल दुःख वाटले नाही. कारण, ती आपल्यासोबत असणे यापेक्षा दुसरे मोठे त्याच्यासाठी काहीही नव्हते. अमृता अनेक वेळा इमरोजला म्हणायची, "अजनबी तुम मुझे जिंदगी की शाम में क्यों मिले, मिलना था तो दोपहर में मिलते।" पण, आयुष्यात कोण, कधी, केंव्हा आणि कुठे मिळेल काही सांगता येत नाही. आणि कलेमुळे जिथे प्रेम निर्माण होते, त्या प्रेमाला कसलीही सीमा नसते... तसेच काहीसे अमृता आणि इमरोजच्या बाबतीत...

अमृताचे साहित्य वाचता वाचता इमरोज सुद्धा विविध रचना तयार करायला लागला होता,

वह कविता जीती

और जिंदगी लिखती

और नदी सी चुपचाप बहती

ज़रखेज़ी बांटती

जा रही है सागर की ओर

सागर बनने...

अमृताने निर्माण केलेल्या साहित्याच्या महासागरात कित्येकजण स्वतःसाठी काहीतरी थेंब मिळतील या अपेक्षेने तिचे साहित्य वाचतात. या शब्दांच्या महासागरातील प्रत्येक थेंब ही कल्पनाशक्ती आणि वास्तवाची जाणीव आहे. भावना आणि प्रेम हे प्रेमाचे तत्त्वज्ञान आहे आणि यामुळेच अमृता प्रीतम सारखे व्यक्तिमत्व परिपूर्णतेने बनते.

लहानपणी आईचा मृत्यू, फाळणीची वेदना, एक लग्न ज्यात ती वर्षानुवर्षे गुदमरली होती, साहिरवर प्रेम आणि नंतर इमरोज... अमृता प्रीतमचे आयुष्य अनेक दु: खांनी आणि सुखांनी भरलेले होते. मला भेटलेली अमृता, कायमच काल्पनिक, जादुई व्यक्तिमत्त्व बनून माझ्यासाठी राहिली आहे. अमृता सारखी स्त्री, आजच्या काळात दुर्मीळच....

अमृता.... अमृता... अमृता... आणि अमृता... अमृता प्रीतम...

दु: खांनी आणि सुखांनी, पूर्ण आणि अपूर्ण अशा आयुष्यात, सांजवेळी इमरोजसाठी लिहिलेल्या या कवितेने कायमच मनाला रुखरुख लागून जाते..... जणूकाही ती माझ्यासाठीच कुणीतरी लिहिली आहे...

मैं तुझे फिर मिलूँगी

कहाँ कैसे पता नहीं

शायद तेरे कल्पनाओं

की प्रेरणा बन

तेरे केनवास पर उतरुँगी

या तेरे केनवास पर

एक रहस्यमयी लकीर बन

ख़ामोश तुझे देखती रहूँगी

मैं तुझे फिर मिलूँगी

कहाँ कैसे पता नहीं...

अमृता I Love You ❤️

अमृताच्या 102 व्या जयंती निमित्त निघालेले माझ्या लेखनीतील हे दोन शब्द तिच्यासाठी...

✍️संदीप काळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com