"योगशास्त्रामुळं आयुष्य बदललं' (अमृता खानविलकर)

अमृता खानविलकर
रविवार, 14 एप्रिल 2019

माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे.

माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे.

खरंतर "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण मानसिकरित्या, भावनिकरित्या सशक्‍त असतो, तेव्हाच आपण आपल्या शरीराबद्दल, आरोग्याबद्दल विचार करू शकतो. आपली मानसिकस्थिती खचलेली असते, किंवा कमी झालेली असते, तेव्हा आपलं आपल्या कामामध्ये; तसंच आयुष्यातल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींकडं लक्ष लागत नाही. त्यासाठी सकारात्मक राहणं गरजेचं असतं. त्यासाठी मनामध्ये चांगलेच विचार आले पाहिजेत. विचार हे कुठल्याही वेलनेससाठी आरोग्यासाठी, मानसिक व शारीरिक स्वास्थासाठी चांगलेच पाहिजेत. सकारात्मक राहणं हीच खरी वेलनेसची गुरुकिल्ली आहे. तुमची इच्छाशक्ती चांगली नसेल, तर कोणतीही गोष्ट चांगली होत नाही.
मी अभिनय क्षेत्रामध्ये आहे. माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, तरीही मी माझं करिअर चांगलं बनवलं. नोकरीसारखं नऊ ते पाच अशा स्वरूपाचं माझं काम नाही. प्रत्येक चित्रपट वा प्रोजेक्‍टनंतर दरवेळी नव्यानं सुरवात करावी लागते. त्यासाठी मनाची ताकद चांगली असणं गरजेचं आहे. त्यासाठी मानसिक स्थिती भक्कम करणं गरजेचं आहे. आयुष्यात चढ-उतार, यश-अपयश येतच राहतं; पण आरोग्य, करिअर वा तुम्ही स्वत: शाबूत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जेवढं महत्त्व करिअर वा कुटुंबाला देतो, तेवढंच प्राधान्य स्वत:ला देणं गरजेचं आहे. परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि ते सुखी आयुष्यासाठी खूप गरजेचं आहे. "मी अशीच आहे अन्‌ मी हेच करणार' असं म्हणून चालणार नाही. मला स्वत:ला प्रत्येक अडचणीवर परिस्थितीनुसार मात करावी लागते. माझ्याप्रमाणं प्रत्येकानंही परिस्थितीनुसार बदल करणं गरजेचं आहे. खरंतर हीच माझ्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

आयुष्य जगत असताना स्वत:च्या विकासावर भर देणं गरजेचं आहे. मग तो भर फक्त शारीरिकच नको, तर मानसिकतेवरही देणं गरजेचं आहे. त्यासाठी सशक्त राहणं गरजेचं आहे. त्यामुळं मी मेडिटेशन, प्राणायाम, योगासनं करते. आपण स्वत:साठीही वेळ देणं गरजेचं आहे. स्वत:ला समजून घेणं गरजेचं आहे. ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये मला योगासनं, मेडिटेशनमध्येच माझ्या वेलनेसची गुरुकिल्ली सापडली. त्यामुळं प्रसंग कसेही येऊदेत, त्यासाठी मेडिटेशननंच मी माझा पाया पक्का केला.

व्यायामाबाबत मी अत्यंत पक्की आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चित्रीकरण असलं, तर मी सकाळी सहा वाजताच व्यायाम करते. दोन-तीन दिवस मी व्यायामाशिवाय राहू शकते. मात्र, त्यानंतर मला व्यायाम आणि वर्कआऊट करावंच लागतं. शरीरस्वास्थ्यासाठी मी व्यायाम, जिमिंग करते. वेट-ट्रेनिंगही घेते. एखादी गोष्ट बोअर व्हायला लागली, तर दुसरी गोष्ट करते; पण व्यायामाशिवाय मी राहू शकत नाही. माझा आहारही अत्यंत घरगुती असतो. मी घरी बनवलेले पदार्थच खाते. चित्रीकरणाला जाण्यासाठी मी घरी बनवलेला डबाच घेऊन जाते. प्रॉडक्‍शन हाऊस वा बाहेरील गोष्टींवर अवलंबून राहत नाही. जेव्हा खायचं असतं, तेव्हा ते घरातलंच असतं. माझ्या दैनंदिन आहारामध्ये शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा समावेश असतो. प्रोटिनसाठी मी चिकन अन्‌ अंडी खाते. ते घरातच बनवते. मी लॅक्‍टोजइनटॉलरंट व ग्लुटिन फ्री असल्यामुळं चपात्या खात नाही. त्याऐवजी भाकरी व भात खाते. चित्रीकरणामुळं दहा-दहा दिवसांमध्ये वेळा बदलतात; पण मी जेवणाच्या वेळा पाळतेच. त्या ठरलेल्या असतात. विशेष म्हणजे शरीराला गरज असते, तेव्हाच मी खाते. गेल्या सहा ते सात वर्षांपासून मी दूध पीत नाही. त्यामुळं माझे सर्व प्रॉब्लेम दूर झाले आहेत. दुधामुळं मला त्रास होत होता. त्याचप्रमाणं मी ग्लुटिन खात नाही. त्यामुळं हार्मोन्स फ्लक्‍च्युएट होतात. त्यासाठी मी चपाती, ब्रेड, पिझ्झा, बीट खात नाही. मात्र, दररोज तीन लिटर पाणी पिते. ग्रीन टी, कॉफीसह इलेक्‍ट्राल पिते. त्यामुळं माझ्यात एनर्जी येते.

माझ्या आयुष्यात कोणीही फिटनेस गुरू नाही. मी स्वत:च स्वत:ला विकसित केलं आहे. त्यासाठी व्यायाम आणि आयुर्वेदाबाबत मी खूप वाचन करते. त्यानंतर ते आत्मसातही करते. अशाच प्रकारे प्रत्येकामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे, की त्यानं त्याच्या शरीरावर आणि आरोग्यावर प्रेम केलं पाहिजे. आपण देहाला देव मानतो, तर शरीर हे मंदिर असतं. आपण देवाची उपासना करतो. मंदिर नेहमीच स्वच्छ ठेवतो. मग, आपलं स्वत:च मंदिर का स्वच्छ ठेवू शकत नाही? आपलं शरीर अन्‌ आरोग्य सशक्त अन्‌ चांगलं राहिलं, तर आपलं आयुष्यही सुंदर होईल. मी माझं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करते. खूपच कंटाळा येतो वा ताण वाढतो, त्यावेळी मी सुटी काढते. चित्रीकरण नसतं, तेव्हा मी नक्कीच फिरायला जाते. तिथं गेल्यावर मी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेते. सुटी अन्‌ ट्रॅव्हलिंगमुळं माझा ताणतणाव निघून जातो. खरंतर आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुमच्या मनाला पक्कं करायला हवं. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला तयार करा. कारण, कोणत्याही मनाला रूप नसतं. त्याला रंग किंवा आकारही नसतो. त्याच्यावर कामच करायला पाहिजे. खरंतर माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं.

आतापर्यंत मला कोणत्याही चित्रपटासाठी वा प्रोजेक्‍टसाठी वजन कमी किंवा जास्त करण्याची वेळ आली नाही; पण अशी संधी मिळेल, तेव्हा ती गोष्ट मी अतिशय काळजीपूर्वक करीन. आपल्या कुटुंबातल्या वा जवळच्या लोकांच्या सवयी आपल्याला नकळतपणे लागतात. माझी मैत्रीण सोनाली खरे ही योगासनप्रेमी, तर माझा पती हिमांशू मल्होत्रा फिटनेसप्रेमी आहे. तेच गुण माझ्यातही आले. अशी माणसं आजूबाजूला असली, की त्यांच्या गोष्टी आपणही करतो. त्यामुळं घरामध्ये मी आईला वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगते. मात्र, ती कधीच कटकट घालत नाही. ती ते पदार्थ अतिशय निष्ठेनं अन्‌ काळजीपूर्वक बनवते. कारण तिला माहीत असतं, की ही काहीतरी व्यवस्थितच करत आहे.

खरंतर माझा फिटनेस वा वेलनेसचा आदर्श कोणीही नाही. मी माझ्या स्वत:च्या अनुभवांतूनच या गोष्टी शिकले. दुधामुळं त्रास झाल्यानं मी ते बंद केलं. मला पीसीओडीचा त्रास होता. त्यासाठी वेगवेगळ्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडं गेले. सर्वांनी वेगवेगळे सल्ले दिले; पण मी होमिओपॅथी निवडली. त्यामुळं मला खूप फरक पडला. माझं आयुष्यच बदलून गेलं. गेल्या तीन-चार वर्षांत मी ऍलोपॅथीचा वापरच केलेला नाही. मला कोणीही आरोग्याचा सल्ला विचारला, तर मी त्यांना होमिओपॅथीचाच सल्ला देते; पण, इमर्जन्सी असल्यास ऍलोपॅथीचा वापर करायला काही हरकत नाही.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amruta khanvilkar write health article in saptarang