सारे विजय मोदींचे, तर पराभवाचे पितृत्व कोणाकडे?

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

- भाजपच्या वर्तुळात दबक्‍या आवाजात चर्चा
- संघ नेतृत्वाशीही चर्चा

नवी दिल्ली- मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा दोघेच शिल्पकार असतील, तर ताज्या पराभवाचे बिल कोणाच्या नावावर फाडायचे? त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरायचे, तर केंद्राच्या कृषी व अन्य अनेक योजना राज्यांपर्यंत पूर्णत्वाने पोहोचल्या नाहीत, त्यासाठी जबाबदार कोण? असे दबके सूर सत्तारूढ भाजपच्या वर्तुळात उमटू लागले आहेत. या सुरांचा आवाज कर्णकटू होऊ नयेत, यासाठी भाजपच्या वरिष्ठ दुकलीला वेळीच "आपत्ती निवारण' हाती घ्यावे लागेल किंबहुना त्यांच्या दोघांच्या पातळीवर तो विचारविनिमय सुरूही झाला असेल, असे राजकीय जाणकार मानतात.

मध्य प्रदेशात कॉंग्रेस व भाजपमधील पाठशिवणीचा खेळ काल मध्यरात्रीपर्यंत चालला होता व सकाळी शिवराजसिंह चौहान यांनी तलवार म्यान केली. पण, कॉंग्रेसपेक्षा जास्त मते मिळवूनही सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची सल त्यांच्या मनात कायम आहे. रमणसिंह व वसुंधरा राजे यांच्या कार्यकर्त्यांच्याही मनातील अस्वस्थता लपलेली नाही.

विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार शिवराजसिंह यांनी काल उत्तररात्री संघाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी (सरसंघचालक नव्हे) थेट संपर्क साधला व माझ्याकडे एकहाती निवडणूक मोहिमेची सूत्रे दिली असती, तर चित्र बदलले असते, अशी खंत बोलून दाखविली. मोदींच्या सभा, त्यातील विखारी भाषा व अजयसिंह बिश्‍त उर्फ योगी आदित्यनाथांची मुक्ताफळे याबद्दल तर तीनही राज्यांत भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड राग धगधगत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवराजसिंह यांनी मोदींच्या विद्वेषपूर्ण भाषेचे दाखले देताच संघनेतृत्वाने "शिवराजजी, तुम्हीही माई का लाल सारखी भाषा वापरलीत व सवर्णांच्या मतांबाबत ती महागात गेली, हे वास्तव नाही का?'' असा प्रतिप्रश्‍न केला तेव्हा शिवराजसिंह यांनी त्याबाबत कबुली देतानाच, त्याबाबत संघाच्या मदतीने मी माझ्या पातळीवर डॅमेज कंट्रोल केले होते, पण मोदींचे गांधी घराण्यावरील अत्यंत आक्रमक आरोप व मायलेक जामिनावर बाहेर आहेत. अशी धमकीची भाषा जनतेला, विशेषतः युवकांना रुचलेले नाहीत, हे लक्षात आणून दिल्याचे सूत्रांनी नमूद केले. 
शेतकऱ्यांसाठीच्या केंद्राच्या योजना मध्य प्रदेशात पोहोचल्या नाहीत व एकट्या नितीन गडकरींचा अपवाद वगळता केंद्राच्या कोणत्याही मंत्र्याने आपल्या राज्याला मदत केली नाही, अशीही तक्रार शिवराजसिंह यांनी केल्याची माहिती आहे. राजस्थानात मोदींनी सोनिया गांधींना विधवा म्हटल्याचा फटका बसला, तर छत्तीसगडमध्ये योगींची बेताल-भडक भाषा तोटा करणारी कशी ठरली, हेही संघापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. 

माध्यमांना टाळल्याची चर्चा 
याआधीच्या साऱ्या निवडणुकांत विजय झाला की अमित शहांची आक्रमक पत्रकार परिषद, त्यात विरोधात प्रश्‍न विचारणाऱ्या पत्रकारांचा "तुम ये कैसा जर्नेलिझम करते हो भय्या?' म्हणून होणारा जाहीर पाणउतारा आणि नंतर सायंकाळी मोदींचे भाषण, असा क्रम काल पहिल्यांदाच अदृश्‍य झाला. यापूर्वी भाजपचा पराभव झाला, तरी लालकृष्ण आडवानी, राजनाथसिंह, नितीन गडकरी पत्रकारांसमोर येऊन पराभव स्वीकारत व आत्मचिंतनाची ग्वाही देत. मात्र, काल शहांनी माध्यमांना पूर्ण टाळले, याचीही चर्चा राजधानीत सुरू आहे.

Web Title: Analysis about 2018 Assembly Election